22 September 2020

News Flash

पाटा-वरवंटा

पन्नास-साठ वर्षांपूर्वी म्हणजे साधारण पन्नास ते साठच्या दशकात मुंबईमध्ये दुपारच्या निवांत वेळी

पन्नास-साठ वर्षांपूर्वी म्हणजे साधारण पन्नास ते साठच्या दशकात मुंबईमध्ये दुपारच्या निवांत वेळी रस्त्यावरून दोन-चार आरोळ्या मारलेल्या हमखास ऐकायला यायच्या, आंबे लोणच्या..च्ये, कला..य, बांगडी..य, जुने..र,  त्यात एका स्त्रीने मारलेली खणखणीत टिपेच्या आवाजातील एक आरोळी असायची, पाटय़ाला.. टाकीय. ज्यांच्या घरातील पाटा- वरवंटय़ाला टाकी लावून घ्यायची असेल ती गृहिणी त्या बाईला बोलवत असे आणि तिच्याकडे घरातील पाटा-वरवंटा टाकी लावण्यासाठी सुपूर्द करत असे.

आधुनिक स्वयंपाकघरातून विजेवर चालणारे मिक्सर ग्रायंडर आले आणि कुटण्यासाठी लागणारा खलबत्ता आणि वाटण करण्यासाठी लागणारा पाटा आणि वरवंटा कायमचे अदृश्य झाले.

कुटण्यासाठी खलबत्ता उपयोगी पडत असला तरी त्यात फक्त कोरडे पदार्थ बनविणे शक्य होत असते, परंतु पदार्थाला ओलसरपणा असण्याची गरज असेल तर त्यासाठी मात्र पाटा- वरवंटा वापरण्याशिवाय पर्याय नव्हता. साधारण दोन ते तीन इंच जाडीचा काळ्या दगडापासून पंचकोनी आकारात पाटा बनविण्यात येतो. हा पंचकोनी असला तरी त्याचा साधारण आकार पोस्टाच्या उघडय़ा पाकिटासारखा असतो. म्हणजे समान लांबीच्या दोन समांतर बाजू, एक बाजू त्यापेक्षा कमी लांबीची आणि वरच्या दोन बाजू वर निमुळत्या होत एका ठिकाणी मिळालेल्या. जमिनीपासून थोडा वर राहावा म्हणून त्याच्या एका बाजूला त्याच दगडातून कोरून एक सपाट उंचवटा तयार केलेला असतो. म्हणजे जमिनीवर तो अडवा टाकला की वाटणाऱ्या व्यक्तीला त्याच्यावर वाटण करणे सोपे जाते. याबरोबरच वरवंटा असल्याशिवाय हा संच पूर्ण होत नाही. वरवंटादेखील काळ्या दगडापासून बनविलेला असतो. वरवंटय़ाची लांबी आणि जाडी पाटय़ाच्या आकाराला योग्य अशा प्रमाणात असते. दंडगोलाकृती काळ्या दगडापासून बनविलेल्या वरवंटाच्या दोन्ही बाजू मधल्या बाजूपेक्षा कमी जाडीच्या आणि किंचित उतरत्या स्वरूपात असतात. परंतु लाटण्याइतक्या निमुळत्या होत गेलेल्या नव्हेत. त्याच्या टोकाच्या बाजू दोन्ही हातांच्या पंज्यात नीट धरता येतील अशा.

ज्या पदार्थाचे वाटण करायचे असेल ते पदार्थ आडव्या घातलेल्या पाटय़ाच्या सपाट भागावर ठेवून वरवंटय़ाखाली आणून तो पदार्थ पाटा आणि वरवंटय़ामध्ये घर्षण करत मध्ये मध्ये आवश्यक तितके पाणी वापरून त्याचा एकसंध ओला गोळा तयार करता येतो. हे वाटण करताना वाटणाऱ्याला पदार्थ किती बारीक झाला आहे याचा वारंवार अंदाज घेता येतो आणि त्यामुळे पदार्थ जितका बारीक करणे आवश्यक आहे तितकाच तो करणे शक्य होते. मिक्सर ग्राईंडरमध्ये ते शक्य होत नाही. शिवाय यात घर्षणाने अधिक उष्णता निर्माण होत नसल्यामुळे पदार्थाची मूळ चव कमी न होता उलटपक्षी अधिक चवदार वस्तू बनते.

पुरणपोळीसाठी डाळीचे पुरण, ओला किंवा सुखा नारळ घालून केलेली चटणी किंवा वाटली डाळ, आंबे डाळ, किंवा इडली-वडय़ासारखे दक्षिणी पदार्थ, मांसाहार किंवा मत्स्याहार करण्यासाठी जो ओला मसाला करावा लागतो आणि देशावर खर्डा वगैरे मसालेदार पदार्थ वाटून तयार करण्यासाठी पाटा-वरवंटा उपयोगी पडतो. कोकण प्रांतात नारळ विपुल प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या स्वयंपाकात ओल्या खोबऱ्याचा अगदी रोज आणि सढळ हस्ते वापर करण्यात येतो. अशा घरात बरीच माणसे राहात असली तर अशा ठिकाणी स्वयंपाक बऱ्याच प्रमाणात बनवावा लागतो. त्यामुळे अशा मोठय़ा घराच्या मागच्या पडवीत  खूप मोठय़ा आकाराच्या पाटय़ा-वरवंटय़ाचा सरंजाम कायम आडव्या स्थितीत मांडलेलाच असतो. कारण ती वजनशीर वस्तू रोज काम झाल्यावर उभी करून ठेवणे शक्य होत नाही. दक्षिण भारतात पाटय़ा-वरवंटय़ाचे उभे रूप रगाडय़ाच्या रूपात पाहायला मिळते. त्याचाही आकार गरजेनुसार लहान-मोठा असतो.

यावर वाटण करताना, वरवंटा दोन हातांच्या तळव्यात घट्ट पकडून तो पद्धतशीरपणे पुढे-मागे सरकवीत पाटय़ावर ठेवलेला पदार्थ वाटावा लागतो. त्यमुळे वाटण करणाऱ्याच्या शरीराच्या होणाऱ्या लयबद्ध हालचाली पाहण्यासारख्या असतात. यामुळे आपोआप हातांच्या दोन्हीही तळव्यांना, मनगटांना आणि खांद्यांना उत्तम व्यायाम नकळत घडत असतो. शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने ते फायद्याचे ठरते.

पाटा आणि वरवंटा यात चांगले घर्षण निर्माण व्हावे म्हणून पाटय़ाला आणि वरवंटय़ाला खरखरीतपणा असणे आवश्यक असते. म्हणून या दोन्हींना टाकी लावावी लागते. त्यासाठी पाटा-वरवंटय़ाला टाकी लावण्यासाठी पाथरवट, वस्त्या वस्त्यांतून हाळी देत जात असत. आता कोणाला विश्वास बसणार नाही, परंतु मुंबईमध्ये देखील मोठी पटांगणे होती आणि त्याच्या एका बाजूला वड-पिंपळ झाडांना पार बांधलेले असत. मुंबईतील अशा जुन्या वस्तीत पारावर पाथरवट लोकांची वस्ती असे. त्यातले कारागीर काळ्या दगडातून नवीन पाटे- वरवंटे बनवीत असत. शिवाय ज्या पाटय़ा-वरवंटाच्या सतत वापरामुळे खरखरीतपणा जाऊन ते गुळगुळीत झालेले असत, त्यांना परत छिन्नी-हातोडी आणि त्यांच्याकडे असलेल्या एका हत्याराने परत खाचा पाडून पुनश्च उपयुक्त करून देत. ते देखील एक कौशल्यपूर्ण काम आहे. असे टाकी घातलेले पाटे-वरवंटे पुन्हा वापरायला घेताना खूप काळजी घ्यावी लागे. कारण टाकी लावताना त्यात अगदी सूक्ष्म दगडाचे कण अदृश्य स्वरूपात तयार होत आणि त्यावर तसेच वाटण केले तर पदार्थात कच येऊन खाणाऱ्याचा हिरमोड होत असे. त्यावरून कुटुंबात भांडण उभे राहात असे. कारण तयार केलेला पदार्थ टाकून देण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून अशा टाक्या लावलेल्या वस्तू स्वच्छ धुऊन वर कणकेचा बारीक गोळा त्यावर वारंवार फिरवून त्यातील दगडाचे सर्व सूक्ष्म कण राहिलेले नाहीत याची खात्री करून घ्यावी लांगे. हे टाकी घालण्याचे काम चार-सहा महिन्यांनी करण्या व्यतिरिक्त त्याला कसल्याही दुरुस्तीची गरज पडत नसे. शिवाय वीज असो नसो त्यावर काम करता येत असे. त्यामुळे दुरुस्ती खर्च नाही.

आधुनिक स्वयंपाकघरांतून आता पाटा-वरवंटा देखील अदृश्य झाला आहे. इतर काही वस्तूंबरोबरच तोही आता इतिहासजमा होणार असे म्हणायला

हरकत नाही.

पाटा आणि वरवंटा यात चांगले घर्षण निर्माण व्हावे म्हणून पाटय़ाला आणि वरवंटय़ाला खरखरीतपणा असणे आवश्यक असते. म्हणून या दोन्हींना टाकी लावावी लागते. त्यासाठी पाटा-वरवंटय़ाला टाकी लावण्यासाठी पाथरवट, वस्त्या वस्त्यांतून हाळी देत जात असत. आता कोणाला विश्वास बसणार नाही, परंतु मुंबईमध्ये देखील मोठी पटांगणे होती आणि त्याच्या एका बाजूला वड-पिंपळ झाडांना पार बांधलेले असत. मुंबईतील अशा जुन्या वस्तीत पारावर पाथरवट लोकांची वस्ती असे. त्यातले कारागीर काळ्या दगडातून नवीन पाटे- वरवंटे बनवीत असत.

मोहन गद्रे
gadrekaka@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 6:25 am

Web Title: mixer grinder
Next Stories
1 रंग वास्तूचे हॉस्टेल
2 नंदनवन
3 घोषणापत्र : महाराष्ट्र अपार्टमेंट कायदा १९७०
Just Now!
X