या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘दुर्वा’ या राजकारण केंदस्थानी असलेल्या मालिकेत पाटलांचा वाडा खासच, आणि त्यासोबत येणाऱ्या अन्य वास्तूंविषयी..

ग्रामीण राजकारण आणि समजाकारणाची पाश्र्वभूमी, नायिकेची मध्यवर्ती भूमिका असलेली मालिका ‘दूर्वा’. ‘दूर्वा’ एका मोठय़ा उद्योगपतीची मुलगी! पण राहणी अगदी साधी, समाजसेवेची आतून ओढ, सुस्वभावी. राजकारणातील डावपेचांबद्दल अनभिज्ञ आणि अलिप्तही. तिचं लग्न भूपती पाटीलशी होतं आणि ती राजकारणात ओढली जाते. ‘दूर्वा’पेक्षा अतिशय वेगळ्या स्वभावाचा खूप महत्त्वाकांक्षी असलेला, चटकन् कोणाच्याही आहारी जाणारा- मग दारूचं व्यसन, बरोबर मती भ्रष्ट करणारी बाई या सर्वाचं फलित भूपतीचा खून होण्यात होतं. त्यानंतर तिचा पुनर्विवाह ‘केशव साने’बरोबर होतो. ‘दूर्वा’मध्ये हा पुनर्विवाह काय, अण्णा पाटील (ही भूमिका प्रथम विनय आपटे करीत त्यानंतर शरद पोंक्षे करू लागले.) यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी मंदोदरी पुन्हा अहेवलेणी लेवून घराला सावरायला सिद्ध होते ते काय, महिपती आणि रावसाहेब मूल होत नाही म्हणून स्वत:च्या टेस्ट करून घेणं काय किंवा आपल्या बायकांना त्यांची कुवत आहे म्हणून पुढे जाण्यास संधी देणं अशा सकारात्मक बदलाच्या घटना आल्या आहेत.

फारसे कर्तृत्व नसलेला पण वाचनाने, विचाराने प्रगल्भ असलेला महिपती, पुढे त्याचं गाडं घसरत जातं. त्याची बायको मोहिनी महत्त्वाकांक्षी, राजकारणाचं बाळकडू मिळालेली पण मार्ग निवडताना मात्र साधनशुचिता आणि दूरदृष्टीचा अभाव असणारी आहे. मोठेपणाचा तोरा आणि सदैव समोरच्याला तुच्छ लेखणं, यामुळे तिला कधी यश प्राप्त होत नाही. आणि मग तिच्या दुर्वा-केशव विरूद्ध कारवाया सुरू होतात. त्यात मात्र ती बऱ्याच वेळा यशस्वी होते. दुर्वाचं भाबडेपणही मोहिनीला उपयोगी पडतं. केशव मात्र खराखुरा राजकरणी आहे. मनातल्या भावना चेहऱ्यावर दिसू न देणारा शांत आणि संयत, अनेक गोष्टी मनातच ठेवणारा,  सगळीकडे पूर्ण लक्ष असणारा आणि गंभीर, खूप विचारपूर्वक निर्णय घेणारा असूनही अलीकडे मात्र दुर्वावरील प्रेमामुळे आपला निर्णय बदलणारा.. असे हे पाटील घराणं!

या पाटलांचा बंगला! आहे आपोटशीरच, पण भोवताली खूप मोठा हिरवागार परिसर आहे. छान राखलेली हिरवळ, कडेने मोठय़ा वृक्षांची किनार, मुख्य गेटपासून बंगला आतवर आहे. एका बाजूला एक हिरवागार चौकोन राखून ठेवलेला. त्यात एक झोपाळा, इथेच अभिला काऊचिऊचा घास भरवला जातो. तर कधी ‘पत्रकार परिषद’, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन इथेच केलं जातं. कधी रात्री शतपावली घालत केशव-दूर्वाचं हितगुज चालतं. शिवाय बंगल्यालगत फरसबंद अंगण आहे. त्यात तुळशी वृंदावन. तिथे सणासमारंभाला देखणी रांगोळी काढली जाते. बंगल्याच्या दर्शनी भागात झळाळत्या लाल रंगाची, नजरेत भरणारी एक गणेशमूर्ती आहे. प्रवेशद्वारही चांगले रुंद, पॉलिश केलेले. बाहेरून फिकट आणि गडद असा हिरवा रंग. त्याच्यावरून घराची चांगली निगराणी राखलीय हे कळून येतं.

आत शिरल्यावर मोठा दिवाणखाना, इथेच नातलग, पक्षश्रेष्ठी यांचं चहापान वगैरे होतं. मध्यभागी रंगीत लाद्यांचा रांगोळीसारख्या डिझाइनचा गोलाकार गालिचा आणि डाव्या बाजूला चौकोनी आकाराचा खराखुरा उंची गालिचा. तर उजवीकडे एक छोटा गालिचा. मधल्या भिंतीला पडदा लावून आतल्या भागाचं खासगीपण जपलेलं. आतमध्ये छोटेखानी स्वयंपाकघर, तिथेच डायनिंग टेबल, थोडय़ा अरुंद जागेत. त्याच्यावर तांब्याची ठोक्याची जग व पेले. हॉलमध्येच वर जाण्याचा जिना. त्याच्या शेजारी एक मांडणी जिच्या वेगवेगळ्या कप्प्यांत पुस्तकं, स्मृतिचिन्ह, इ. आहेत.

जिन्याने वर गेलं की समोरच अण्णांची ‘अभ्यासिका’ आहे. आकाराने लांबट. सर्व भिंतींवर कपाटातून राजकीय विषयावरची पुस्तकं, काही फाइल्स, खुच्र्या, टेबल आहेतच. कारण काही  महत्त्वाच्या आणि गोपनीय गोष्टींची चर्चा इथेच होत असे. खोलीच्या मध्यभागी मोठी लांबलचक खिडकी. त्या खिडकीच्या कट्टय़ावर पडून वाचता येईल अथवा आरामात बसता येईल अशी आसनव्यवस्था आहे. इथेच अण्णांची दैनंदिनी आहे. तिच्यात दडले होते केशवच्या जन्माचे रहस्य. त्यामुळे अनेक जण डायरीच्या मागावर होते.

याच मजल्यावर शयनगृहे आहेत. त्यांची रचना जवळपास सारखी. पण मंदोदरीबाईंच्या (आई) खोलीत काळा, राखी या रंगांची सजावट तर दूर्वा- केशवच्या खोलीत उजळ पांढऱ्या रंगाचे आधिक्य, कपडय़ांची कपाटे पांढरी. ड्रेसिंग टेबलही पांढरे, डबलबेडवरच्या चादरी गुलाबी, निळ्या मोठय़ा फुलांच्या, त्यामुळे त्याची खोली प्रसन्न वाटते. केशव-दूर्वाच्या आयुष्यातले सुंदर क्षण चौकटीत कैद करून भिंतीवर सजवलेले.

एक लहान मूल घरात आहे त्याच्या खुणा खेळणी आणि छोटय़ा कपडय़ांच्या रूपाने दूर्वा आणि मालविकाच्या खोलीत दिसतात.

देवघर म्हणजे एक मोठी खोली आहे. वेगवेगळ्या देवांचे टाक- मूर्ती आहेत. कुलदैवत ‘खंडोबा’ही आहे. पूजेचं सर्व सामान, तबक, मोठी समई, निरांजन, ताम्हण, इ. आहे. छोटय़ा- मोठय़ा सुख- दु:खाच्या प्रसंगी सर्वानीच या खोलीत धाव घेतली आहे. या देवघरातच अण्णांनी घातलेल्या रहस्यमय कोडय़ाचा उलगडा केशव- दूर्वाला झाला आहे. गेस्टरूम, आउट हाऊस, गॅरेज आहेच, पण गॅरेजमध्येच एक गुह्य खोलीही आहे.

पक्षाचे कार्यालय म्हणजे बाहेरची मोठी खोली. टेबलखुर्ची आणि कार्यकर्त्यांसाठी बऱ्याच खुच्र्या. सभोवतालच्या भिंतीवर वेगवेगळ्या संदर्भातल्या, विषयावरच्या, प्रकल्पांच्या वगैरे फाइल्स. आतल्या खोलीत तिजोरी आणि महत्त्वाची कागदपत्रे आहेत. दूर्वा, केशव, मोहिनी, महिपती, भूपती हे सर्वच जसं सत्तेचं वारं फिरत असे तसतसे टेबलामागच्या खुर्चीवर स्थानापन्न होतात.

याशिवाय पाटील कुटुंबाचे एक गावाबाहेर शेतघरही (फार्महाउस) आहे. मोठा ऐसपैस बंगला, सर्व तऱ्हेच्या सोयी- सुविधांनी युक्त, भोवताली हिरवाई, आखीवरेखीव झाडांची मांडणी. बंगल्यापर्यंत जायला मोठा वळणदार रस्ता. त्याच्या कडेने लालचुटुक विटांची किनार. त्याच्या आत फुलांनी बहरलेली रोपं. भोवताली खूप मोठा हिरवागर्द परिसर! इथे यावं शांत होऊन जावं आणि नव्या उमेदीनं पुन्हा रोजच्या

दिनक्रमाला सामोरं जावं. पण भूपतीच्या सर्वनाशाची बीजं इथेच पडली. केशव-दूर्वाच्या जवळीकेचा आभास दाखवणारे फोटो इथेच काढले गेले आणि गैरसमज पेरला गेला तो इथेच.

केशवची स्वत:ची ब्रह्मचाऱ्याची मठीही होती. जी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी त्याने विकली. इथे बाहेरची खोली मोठी प्रशस्त, पण आतलं स्वयंपाकघर अगदी कामचलाऊ. कारण केशवचं जेवण सहसा बाहेरच कुठेतरी बऱ्याच वेळा. पण लग्नानंतर ‘दूर्वा’च्या स्पर्शाने स्वयंपाकखोली आपलं अस्तित्व दाखवते.

या मालिकेने अनेक वाटा-वळणं घेतली. त्यात ‘विश्वासराव महाडिक’, दूर्वाचं मोहिनीचं माहेर, भिंगरी, अण्णांच्या खुनाचं कारण, दोनशे कोटींचा डावाचा खेळ, ते पैसे लावणं, मुख्यमंत्र्यांना दूर्वाबद्दल वाटणारी आस्था अशासारख्या काही गोष्टी मागे पडत गेल्या. पण केशव, अण्णा पाटलांचाच मुलगा असणं, भूपतीच्या खुनाचं रहस्य, केशवची आई, राजकारणातले चढ-उतार, मोहिनीच्या कारवाया, चाळीस कोटींचे हिरे, खजिन्याचे रहस्य यामुळे मालिकेमध्ये उत्सुकता वाढती राहते. लेखक विकास मयेकर, कलादिग्दर्शक श्रीरंग भासले आणि दिग्दर्शक पुष्कार रासम यांनी आपापल्या परीने ‘दुर्वा’चा योग्य मेळ साधला आहे.

या प्रवासात पोलीस स्टेशन या वास्तूचेही महत्त्वाचे स्थान आहे. रावसाहेब, केशव, महिपती अशी सर्व मंडळी समज-गैरसमजाने पोलीस कोठडीत बंद होती. सध्या पाटील घराण्याला नेस्तनाबूत करायला लागलेला वीरेंद्र निंबाळकर याचंही हटके रचना असलेलं घर आहे. जिन्याने उतरून खाली आल्यावर या घराचा दिवाणखाना आहे. जिन्याच्या पायऱ्यांवर भिंतीलगत कुंडय़ांनी शोभा आणली आहे. बाकी सगळी सजावट वैभवशाली आहे.

याशिवाय जनतेची कामं करण्याच्या निमित्ताने अनेक वेगवेगळ्या स्तरांतल्या लोकांची घरं झोपडय़ा येतात. कधी एकाच खोलीची झोपडी तर कधी सारवलेलं अंगण असलेली २-३ खोल्यांची घरं. मोहिनीच्या खासदार वडिलांचं, विश्वासराव महाडिक, दूर्वाचे माहेर यांची श्रीमंती थाटाची घरंही येऊन गेलीत. आमदार झाल्यावर मुंबईला मिळालेलं दूर्वाचं सरकारी निवासस्थान, केशवच्या आईचं मुंबईतलं घर अशी आलिशान घरं जशी दिसतात तशीच कधी कोणाच्या भीतीमुळे लपण्याची ठिकाणं, तर कुणाला पळवून नेऊन त्यांना बंदिस्त करून ठेवण्याच्या अडगळीच्या जागा, कधी गुप्त खोल्या. अशा विविध वास्तूंचं दर्शन या मालिकेत घडतं.

meenagurjar1945@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old vada at star pravah durva serial
First published on: 19-03-2016 at 01:10 IST