News Flash

विद्युतसुरक्षा : बिल्डर, आर्किटेक्ट आणि विद्युत सुरक्षा

मि त्रहो, एखादे घर, फ्लॅट बंगला अथवा हाउसिंग कॉम्प्लेक्स ज्या वेळी उभे राहात असते त्या वेळी इंजिनीअरिंगच्या मुख्यत्वेकरून दोन शाखा कार्यरत असतात.

| April 18, 2015 01:58 am

मि त्रहो, एखादे घर, फ्लॅट बंगला अथवा हाउसिंग कॉम्प्लेक्स ज्या वेळी उभे राहात असते त्या वेळी इंजिनीअरिंगच्या मुख्यत्वेकरून दोन शाखा कार्यरत असतात. पहिली सिव्हिल इंजिनीअरिंग अर्थात स्थापत्यशास्त्र व दुसरी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग म्हणजेच विद्युत अभियांत्रिकी.
हे सांगण्याचे कारण म्हणजे ‘विद्युत सुरक्षा’ हे सदर लिहीत असताना त्या Mind set  अथवा Concept  शी निगडित सर्वच बाबींची तपशीलवार चर्चा होणे आवश्यक आहे. आपण ज्या घरात राहतो ते एखाद्या सिव्हिल इंजिनीअरने दगड, माती, सिमेंट, विटा, वाळू, इ. सामग्री वापरून Building Norms  प्रमाणे केलेले असते. त्यानंतर आपण त्यात राहायला जातो का, तर नाही; कारण त्यात लाइट, पाणी इत्यादी जीवनावश्यक गोष्टींची (Utilities) पूर्तता व्हावयाची असते. एखादा विद्युत कंत्राटदार त्या घराचे विद्युतीकरण करतो; ज्यामुळे सगळीकडे लाइट, पंखे, टीव्ही, ए.सी., इ. जीवनावश्यक सेवा (Services) सुरू होतात व मग आपण त्यात राहायला जातो.
अशा या घरांमध्ये आपण सुरक्षित आहोत का? विद्युतशक्तीचा सुरक्षितपणे वापर झाला आहे का नाही? आणि याचे उत्तर नाही आल्यास त्याला जबाबदार कोण? या सर्व बाबींची चर्चा करण्यासाठीच या लेखाचा प्रपंच मांडलाय. जेणेकरून एखाद्या इमारतीस कुठल्याही कारणास्तव आग लागल्यास त्याचा लेखाजोखा मांडता यावा.
मी सुरुवातीलाच लिहिल्याप्रमाणे एखादी इमारत पूर्ण होण्यात सिव्हिल व इलेक्ट्रिकल इंजिनीअर या दोघांचाही सहभाग असतो. जुन्या पी.डब्ल्यू.डी. नॉर्म्सप्रमाणे कॉस्टिंगच्या हिशेबाने ८५ टक्के सिव्हिल व १५ टक्के इलेक्ट्रिकल अशा प्रमाणात अंदाजपत्रके होत असत. परंतु एअरकंडिशनिंग, फायर अलार्म, हायड्रो न्यूमॅटिक, इ. यंत्रणांमुळे इलेक्ट्रिकलचा खर्च २० टक्क्यांच्याही वर गेलेला दिसतो. समजा ८० व २० असे प्रमाण धरले तर सिव्हिल खर्च जास्त लागला म्हणजे ते जास्त महत्त्वाचे आणि इलेक्ट्रिकलला २० टक्के म्हणजे कमी महत्त्वाचे असे अजिबातच नाही. मानवी शरीरात हृदयाचा आकार किती? पण त्या शरीररूपी सांगाडय़ात चेतना आणण्याचे काम इवलेसे हृदयच करते ना, तद्वतच इमारतीच्या सांगाडय़ात जान आणण्याचे काम विद्युतरूपी ‘दिल’ हे सतत बजावत असते.
अशा रीतीने घराघरांमध्ये विद्युतशक्ती खेळू लागल्यावर तिचा सुरक्षितपणे वापर ही सिव्हिल व इलेक्ट्रिकल इंजिनीअर्सची तेवढीच जबाबदारी आहे. विद्युत कंत्राटदार जे ही कामे करतात त्यांना विद्युत सुरक्षेसाठीचे नियम माहीत असणे अपेक्षित आहे. परंतु बांधकाम क्षेत्रातील अभियंते, बिल्डर्स, आर्किटेक्ट, इ. व्यावसायिकांनासुद्धा विद्युत सुरक्षेसंदर्भात काही नियम माहीत असणे आवश्यक आहे, त्याचा गोषवारा पुढे देत आहे.
प्रत्येक घरात मुख्य एम.सी.बी.साठी तळापासून सहा फूट उंचीवर भिंतीमध्ये एक खाच (gap) ठेवणे व त्यास एक धातूचा दरवाजा ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये सर्वाचे विजेचे मीटर्स हे बहुतांशी जिन्याखाली किंवा एखाद्या अडगळीच्या जागी लावलेले दिसतात, हे अगदी चूक आहे. मीटर व मेनस्विचसाठी बिल्डरने एक स्वतंत्र खोली ठेवणे हे नियम क्र. ३७ of सी.ई.ए. रेग्युलेशन २०१० प्रमाणे जरुरी आहे. संपूर्ण सोसायटीसाठी अर्थिगचा खड्डा दीड मीटर खोल करून विद्युत कंत्राटदारांकडून IS3043 प्रमाणे सोसायटीची स्वतंत्र अर्थिग असणे आवश्यक आहे.
आजकाल सर्वच शहरांमध्ये बहुमजली इमारती (High rise building) होताना दिसत आहेत. पंधरा मीटर अथवा ५० फुटांच्या वर ज्या इमारती आहेत त्यात विद्युत सुरक्षेसाठी खालीलप्रमाणे तरतुदी केलेल्या आहेत.
१) प्रत्येक इमारतीचे मेन स्विच अथवा ब्रेकर हा एकच असावा ज्याला मीटररूममध्ये जमिनीपासून कमीतकमी १.७ मीटर या अंतरावर बसवणे, इमारतीला आग लागल्यास फायर ब्रिगेड हे स्विच बंद करून मग पुढील कार्यवाहीस सुरुवात करते.
२) प्रत्येक इमारतीत बांधकाम सुरू असताना जमिनीपासून वर छतापर्यंत काही नाली (DUCT) सोडतात. यामध्ये पॉवर डक्ट हा स्वतंत्र असून त्यात फक्त त्या इमारतीस लागणारे विजेचे पाइप्स व केबल्स असाव्यात असे निर्देश सी.ई.ए. रेग्युलेशन २०१० च्या नियम क्र. ३६ मध्ये दिलेले आहेत. बाकीचे म्हणजे पाण्याचे पाइप, गॅस पाइप, टेलिफोन केबल्स या वेगळ्या DUCT मध्ये न्याव्यात असे वीज नियमात म्हटले आहे. ज्या बिल्डरने असे केले नसेल त्याला कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागते.
३) इमारतीमध्ये वापरलेले सर्व विद्युत सामान हे ISI  चेच असणे अनिवार्य आहे.
४) पॉवर डक्टमध्ये प्रत्येक फ्लोअर क्रॉसिंगला अग्निरोधक (Fire barrier) लावणे बंधनकारक आहे.
जेथे मोठमोठय़ा हाउसिंग स्कीम्स जसे डीएसके विश्व लोढा कन्स्ट्रक्शन इ. बिल्डरांच्या विविध योजना, टाऊनशिप वगैरेची उभारणी होताना अशा बिल्डरांना वीज कंपनीकडून उच्च दाब (ऌळ) व अति उच्चदाब (EHV) लेवलचा वीजपुरवठा केला जातो, अशा वेळी एकूण लोड (KW) जसे आहे त्याप्रमाणे (रोहित्र) Transformer subrtations उभारावी लागतात, सब स्टेशन परिसरात विद्युत सुरक्षेसाठी खालीलप्रमाणे कार्यवाही ही बिल्डर व आर्किटेक्टने करणे आवश्यक आहे.
१) सबस्टेशनमधील फाऊंडेशनवर उभी करतात. त्याचे आकारमान हे ज्या कंपनीचा ट्रान्सफॉर्मर असेल त्याच्या एरियाप्रमाणे असावे. मात्र सिमेंट काँक्रीटची उंची ही त्या सबस्टेशनच्या क्षमतेवर (KV) अवलंबून आहे. समजा 11KV  चे सबस्टेशन आहे तर रोहित्रावरील बुशिंग हे जमिनीपासून २.७५ मीटर अंतरावर (कमीतकमी) राहील या दृष्टीने सिमेंट काँक्रीट ठेवणे बंधनकारक आहे.
२) समजा दोनपेक्षा जास्त रोहित्रे असतील व प्रत्येकात कमीतकमी २००० लिटर कुलिंग ऑईल (तेल) असेल तर अशा रोहित्रांमध्ये त्यांच्या उंचीच्यावर पोहोचेल अशी भिंत बांधणे सी.ई.ए. रेग्युलेशन २०१० च्या कलम ४५ प्रमाणे बंधनकारक आहे.
३) सबस्टेशन एरियात केबलसाठी भूमिगत चर (Trench) खोदलेले असतात, त्यामध्ये वाळू ओतून त्यावर सिमेंट काँक्रीट अथवा एम.एस.शीटच स्लॅब्स टाकाव्या असे निर्देश सदर नियमात आग प्रतिबंधासाठी दिलेले आहेत.
४) रोहित्रामधील तेलाची क्षमता जर ९००० लिटरच्यावर असेल तर बिल्डरने सब स्टेशनच्या परिसरात एक ऑईल सोक पिट (Oil Soak bit) म्हणजे एक मोठा खड्डा खणून ठेवणे आवश्यक आहे, म्हणजे भूकंप, महापूर, वादळ अशा आणीबाणीच्या परिस्थितीत रोहित्रातील तेलास आग लागू नये म्हणून ते भूमिगत नळ्यांमधून (Draining arrangement) त्या सोक पिटमध्ये नेऊन आगीचा धोका टाळता येतो. आम्ही सेफ्टी ऑडिट करीत असताना पाहिले की बऱ्याच बिल्डरांना त्याची कल्पना नाही व या नियमानुसार ते करून घ्यावे लागले.
५) याशिवाय सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरभोवती व इतरत्र आग प्रतिबंधक यंत्रणा उभारणे हे बंधनकारक आहे, त्यातल्या त्यात रोहित्रांच्या भोवताली पाण्याची पाइपलाइन फिरवून ऑटोमॅटिक वॉटर मल्सिफायर या यंत्रणेचा वापर करण्यात येतो.
६) सबस्टेशनभोवती सी.ई.ए. रेग्युलेशन २०१० च्या कलम ४९ नुसार तारेचे कुंपण घालणे बंधनकारक आहे. सदर कुंपण हे जमिनीपासून १.८ मीटर (कमीतकमी) उंचीचे असावे व ते जमिनीला लागून उभारणे आवश्यक आहे, ज्यामुळे अनधिकृत व्यक्तींना सबस्टेशनमध्ये प्रवेश करता येणार नाही, तसेच जनावरेसुद्धा आत जाऊ शकणार नाही. ज्यामुळे रोहित्रे व उच्च दाबाची उपकरणे सुरक्षित राहतील. तारेच्या या कुंपणास अर्थिग करणे आवश्यक आहे.
७) वाचकांना मला एक माहिती देणे आवश्यक वाटते. आपल्या देशात बहुतेक ठिकाणी तेलाने भरलेल्या रोहित्रांचा वापर केला जातो, परंतु गेल्या काही वर्षांपासून तेलविरहीत ड्रायटाइप रोहित्रेही वापरण्यात येत आहेत, जी बरीच महाग परंतु आगप्रतिबंधक असतात. सी.इ.ए. रेग्युलेशन २०१० च्या कलम ४४ प्रमाणे तेलभारित रोहित्रे फक्त तळमजला व पहिल्या बेसमेंटमध्येच वापरता येतात. पहिला मजला व दुसऱ्या बेसमेंटमध्ये अशी रोहित्रे वापरता येत नाहीत. नरिमन पॉइंट येथील ओबेरॉय हॉटेलमध्ये मी ऑडिट करीत असताना पाहिले की, त्यांच्याकडे चार रोहित्रे होती, त्यापैकी दोन तळमजला, एक पहिला बेसमेंट व राहिलेले दुसऱ्या बेसमेंटमध्ये होते. विद्युत कायद्यातील तरतूद त्यांना दाखविल्यावर महिनाभरात दुसऱ्या बेसमेंटवरील ट्रान्सफॉर्मर त्यांनी पहिल्या बेसमेंटवर हलवला व नियमाचे पालन केले. तेलविरहीत ड्राय टाइप रोहित्र मात्र कुठेही वापरता येते हे बिल्डर व ग्राहकांनी लक्षात ठेवावे.
८) सब स्टेशन हे मुख्य इमारतीपासून दूर बांधणे नियमाप्रमाणे आवश्यक आहे हे आर्किटेक्ट व बिल्डरने जाणून तशीच कार्यवाही करावी, अन्यथा नियमभंगाच्या कारवाईस त्या दोघांनाही सामोरे जावे लागते.
संपूर्ण बांधकाम व्यवसायात वास्तुशास्त्रज्ञ (Architect) यांचे एक वेगळेच स्थान आहे. संपूर्ण स्कीमची परियोजना व Ambience ची कल्पना व ते प्रत्यक्षात आणणे याबाबत त्यांची कळकळ मी अगदी जवळून पाहिली आहे. परंतु त्याचबरोबर सुरक्षेच्या नियमांकडे आपले दुर्लक्ष तर होत नाही ना, हे पाहणेही तेवढेच आवश्यक आहे, असे मला वाटते. एका स्कीममध्ये सबस्टेशन हे सुरक्षा व इकॉनॉमीच्या दृष्टीने गेटच्या लगत ठेवले होते, परंतु रोहित्रामुळे स्कीमचा शो जातो म्हणून एका आर्किटेक्टच्या म्हणण्यानुसार ते मागे शिफ्ट करण्यात आले, ज्यामुळे खर्च जास्त होऊन सुरक्षेवर ताण पडला.
साइटवर काम करणाऱ्या विद्युत कंत्राटदारांनी वरील सांगितलेल्या बाबींचा नियमांसहीत अभ्यास करून ते ज्या बिल्डर वा आर्किटेक्टबरोबर काम करतात त्यांना समजावून विद्युत नियमांप्रमाणे काम होत आहे याची दक्षता घ्यावी म्हणजे विद्युत सुरक्षा प्राप्त होण्यास मदत होईल.
कधी कधी अशा तक्रारी माझ्याकडे आल्यात की एखाद्या स्कीमचे काम चालू असताना बिल्डरने काही आर्थिक विवादावरून विद्युत कंत्राटदाराला काढून टाकले व ते काम दुसऱ्यास दिले. नियमाप्रमाणे हे पूर्णत: चूक आहे. पहिल्या कंत्राटदाराने जेवढे काम केले त्याचा टेस्ट रिपोर्ट व NOC घेऊन त्याला जाऊ देणे. दुसऱ्या कंत्राटदाराने असे अर्धवट काम पहिल्या कंत्राटदाराची NOC पाहिल्याशिवाय सुरू करू नये, अन्यथा ते बेकायदेशीर आहे.
आजकाल घर बांधल्यानंतर त्याच्या सुशोभिकरणासाठी Interior Decoraters चीही बरीच कामं चालू असल्याचे दिसते. त्यांच्यासाठी काही टीप्स ज्या वायरमनला विद्युत यंत्रणेत फेरबदल करण्याचे काम दिले आहे त्याचे शासनप्रणित वायरमन लायसेन्स पाहिल्याशिवाय काम देऊ नये.
०    स्वीचबोर्ड काढून लावताना वायर जोडताना वगैरे तो इन्सुलेशन टेपचा उपयोग करतो ते स्वत: खात्री करून घेणे.
०    सर्व विद्युत सामान ISI चेच असावे.
०    वायरिंगमधील विशेषत: फॉल्स सिलिंगवरील सर्व जॉइंट्सना टेप लावावी. काही वर्षांपूर्वी अंधेरीमध्ये एका डेकोरेटच्या कामात टेपिंग न केल्यामुळे फॉल्स सिलिंगमध्ये एक उंदीर गेला व त्या
जोडास चिकटला. शॉर्ट सर्किटमुळे तिथे आग सुरू झाली पण फायर ब्रिगेडने ताबडतोब काबूत आणली.
०    इंटिरिअरचे काम करताना कॉलम व बीमवर जास्त ड्रिल मशीन चालवू नये, अन्यथा इमारत कमकुवत होऊन पडण्याची शक्यता असते.
प्रकाश कुलकर्णी -plkul@rediffmail.com
विद्युत सल्लागार आणि सदस्य,
राष्ट्रीय सुरक्षा परिषद,

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 1:58 am

Web Title: builder architect and electricity security
टॅग : Builder,Electricity
Next Stories
1 वास्तुदर्पण : स्वयंपूर्ण स्वयंपाकघर
2 विकास आराखडय़ात शहर सौंदर्यविषयक नियमांचे योगदान
3 आठवणी दाटतात..
Just Now!
X