News Flash

घर खरेदीदारांची नवी मुंबईला पसंती

दर्जेदार सुविधांसह विविध प्रकल्पांमुळे नोकरीच्या संधीतही वाढ

|| बापू बैलकर

दर्जेदार सुविधांसह विविध प्रकल्पांमुळे नोकरीच्या संधीतही वाढ

मुंबईला पर्याय म्हणून ४८ वर्षांपूर्वी एका बेटावर सिडकोच्या माध्यमातून नियोजनबद्ध नवी मुंबई शहर विकसित करण्यात आले. सिडको व महापालिकेच्या नियोजनामुळे या शहराला राहण्यासाठी नागरिक मोठय़ा प्रमाणात पसंती देत आहेत. अलीकडेच केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने केलेल्या सर्वेक्षणात नियोजनबद्ध शहर असलेल्या नवी मुंबईला राहण्यायोग्य शहरांच्या स्पध्रेत देशात दुसरा क्रमांक मिळाला आहे. वीजपुरवठा, र्सवकष गृहनिर्मिती, रोजगारनिर्मिती ई-गव्हर्नन्स, शिक्षण, आरोग्य, दळणवळण आणि नियमित पाणीपुरवठा यात हे शहर उजवे आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, देशातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत यामुळे मोठय़ा प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नवी मुंबईला राहण्यासाठी पसंती मिळत आहे.

राज्य शासनाने मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबईची निर्मिती करण्याचा निर्णय ४८ वर्षांपूर्वी घेतला. आता नवी मुंबईचा बऱ्यापकी विकास झाला असून विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. ग्रामीण आणि झोपडपट्टी भाग वगळता हे नियोजन चंडीगडप्रमाणे आहे. २०११च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ११ लाख २० हजार ५४७ असून ती आतापर्यंत १५ लाखांच्या घरात गेली आहे.

नवी मुंबई साडेचारशे किलोमीटरचे विस्तीर्ण रस्ते, दोनशेपेक्षा जास्त उद्यााने, चोवीस तास पाणीपुरवठा, आठ लाखांपर्यंतची वृक्षसंपदा, पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी डच पद्धतीचे नाले, समुद्राच्या भरतीचे पाणी थेट शहरात जाऊ नये यासाठी करण्यात आलेली धरण तलाव उपाययोजना, सीसीटीव्हीचे जाळे, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, अद्ययावत क्षेपणभूमी, पाच स्तरांची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, आधुनिक व अद्ययावत पालिका शाळा, वाढती विद्यार्थीसंख्या, अल्पकाळात झालेली शैक्षणिक पंढरी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेले लक्षवेधी प्रयत्न, आकर्षक रेल्वे स्थानक, आयटी कंपन्यांची पसंती, पारसिक डोंगर आणि ठाणे खाडीमधील नसíगक भूभागावर वसलेले सुंदर शहर, तीन हजार छोटय़ा-मोठय़ा कारखान्यातील उद्योग आणि रोजगार, दळणवळणाची साधने, ९६ टक्के सुशिक्षित नागरिक, कमी गुन्हेगारी, आशिया खंडातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ आणि या सर्व सुविधांमुळे तयार झालेली उत्तम जीवनशैली यामुळे नवी मुंबईला राहण्यायोग्य शहर म्हणून पसंती दिली जात आहे.

मुंबई, ठाणे, पुण्यासारखी नवी मुंबईत सांस्कृतिक चळवळ रुजलेली नाही, तसेच पश्चिम बाजूस असलेल्या विस्तीर्ण झोपडपट्टी व प्रदूषण या काही समस्या आहेत. पण अलीकडे नवी मुंबईतील दगडखाणींचा खडखडाट बंद झाला असल्याने नवी मुंबईच्या उत्तर बाजूस प्रदूषणाची पातळी तुलनेने कमी झाली आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईला एक वेगळेच महत्त्व निर्माण होत आहे. सुमारे दोन हजार हेक्टर जमिनीवरील या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चारही बाजूने विकास होणार आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हा या भागाचा कायापालट करणारा ठरणार आहे. हा विकास शास्त्रोक्त व नियोजनबद्ध व्हावा यासाठी सिडको एक आराखडा तयार करीत आहे. त्यात येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्यातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुंबईशी संलग्नता वाढावी यासाठी न्हावा-शेवा शिवडी सागरी सेतूचेही काम सुरू आहे. त्यामुळे केवळ २२ मिनिटांत नवी मुंबई गाठता येणार आहे. सिडकोची नवी मुंबई मेट्रो पुढील वर्षी धडधडणार आहे. तिचा प्रवास खांदेश्वरहून नवी मुंबई विमानतळापर्यंत होणार आहे. हीच मेट्रो पुढे नियोजित ‘अ‍ॅरोसिटी’लादेखील जोडली जाणार आहे. रेल्वेच्या नेरुळ-उरण विस्तारित प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची नेरुळ खारकोपर सेवा सुरू झाली आहे.  विमानतळ, मेट्रो, गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्कसारखे मोठे प्रकल्प मार्गी लावल्यानंतर सिडकोने खारघरमध्ये पारसिक डोंगररांग आणि सेंट्रल पार्कमध्ये असलेल्या १२० हेक्टर मोकळ्या जागेवर बीकेसीच्या धर्तीवर एक अद्ययावत कॉर्पोरेट पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली विमानतळ आणि मेट्रो यांना संलग्न असलेल्या अ‍ॅरोसिटीप्रमाणे नवी मुंबई विमानतळाजवळील साठ हेक्टर जमिनीवर सिडको एक अद्ययावत आणि आधुनिक अशी अ‍ॅरोसिटी उभारणार असल्याचे सिडकोने जाहीर केले आहे.

उरण ते नवी मुंबईला जोडणाऱ्या लोकल मार्गावरील या नागरी वस्तीत सुसज्ज अशी घरे बांधली जात आहेत. त्यामुळे लवकरच या भागातील नागरी विकासातही वाढ होणार आहे. चिरले सारख्या गावांमध्येही नवनवीन गृहप्रकल्प सुरू आहेत. शेकडो घरांच्या विक्रीलाही सुरुवात झालेली आहे.

या सर्व प्रकल्पामुंळे नवी मुंबई शहराला भूतकाळ नसला तरी भविष्यकाळ चांगला असल्याने, या शहराला मोठय़ा प्रमाणत पसंती दिली जात आहे.

vasturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 12:10 am

Web Title: house in navi mumbai for sale mpg 94
Next Stories
1 थोरोचं घर!
2 वास्तुसंवाद : दुरूस्ती खर्चाचे अंदाजपत्रक
3 वास्तुसोबती : झेंडू :माझ्या आयुष्यातला आनंदाचा भाग!
Just Now!
X