आपले घर सुंदर असावे, अगदी चित्रात असते तसे असावे, असे सर्वानाच वाटत असते. त्यासाठी आपण सतत मेहेनत करीत असतो. बाजारात गेल्यानंतर आपली बारीक नजर आपल्या घराला काय शोभून दिसेल याकडे असतेच. अर्थात त्यात वावगे काही नसते. पण घर स्वछ असावे यासाठी सतत धडपडणारी माणसे आपल्या परिसराबाबत मात्र उदास असतात, हे पाहून मनस्वी खेद होतो. आपले घर स्वछ करून जो केरकचरा आपण काढतो तो बिनदिक्कतपणे आपण बाहेर फेकून देतो तेव्हा आपल्या हाताला कधी कंप जाणवत नाही! याचे कारण म्हणजे, घर आपले असते व बाहेरचा रस्ता किंवा परिसर हा महानगरपालिकेचा असतो, ही भावना आपल्या मनात पक्की बसलेली आहे. ज्या देशाच्या संस्कृतीने संपूर्ण मानवतेला ‘वसुधव कुटुंबकम्’ म्हणजे  ‘हे विश्वचि माझे घर’ असा अतिशय संवेदनशील संदेश दिला त्या देशातील नागरिक मात्र तो संदेश केव्हाच विसरून गेल्यासारखे वागतात व त्यामुळे देशाचा उकिरडा झाला आहे. धावपळीच्या आजच्या युगात त्याचे फारसे सुख-दु:ख कोणाला वाटतही नाही. आपल्या भावना बोथट झाल्याचीच ही लक्षणे आहेत. म्हाडाच्या किंवा विविध गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात किंवा बाजारात नजर टाकली तर सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसते. ह्या साम्राज्यातील काही कचरा आपल्या घरातून आलेला असतो, याचा आपल्याला सोयीस्करपणे विसर पडतो व आपण महापालिकेच्या नावाने खडे फोडतो. खरे तर प्रत्येक घराने ठरविले की माझ्या घरातील कोणताच कचरा मी महानगरपालिकेला देणार नाही तर कचऱ्याची समस्या उरणारच नाही. मग शहरांसाठी मोठमोठी डिम्पग यार्डस् लागणार नाहीत. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी मोठय़ा योजनादेखील आखव्या लागणार नाहीत! पण विकेंद्रित स्वरूपात घराघरांत निर्माण होणारा कचरा एकत्रितपणे हजारो टनांनी महानगरपालिकांच्या गाडय़ांमधून शहराबाहेर पाठविला जातो तेव्हा ह्या प्रचंड भस्मासुरामुळे आर्थिक ताण तर महानगरपालिकेच्या तिजोरीवर येतोच, पण त्याचा पर्यावरणीय ताण आपल्या सर्वानाच जाणवतो. ह्या कचरा वाहतुकीमुळे सर्व शहरांत दरुगधी पसरत राहते व परिसराला एकप्रकारचा बकालपणा येतो. २६ जुल २००५चा प्रलयंकारी पाऊस ह्या ताणाचेच दृश्य स्वरूप होते व सध्या चालू असलेली स्वाईन फ्लूची साथदेखील याच पर्यावरणीय असंतुलनातून निर्माण झालेली आहे. त्याशिवाय याच कचऱ्यातून उद्याचे स्रोत पुनश्च निर्माण होणार असतात त्या निसर्गनियमालाच तडा जातो हे आपल्या लक्षातही येत नाही.   
गृहनिर्माण संस्थेचा दर्शनी भाग चांगला दिसावा याकडे सदस्यांचे लक्ष असते, पण इमारतीच्या मागच्या बाजूला काय काय फेकले जाते हे पाहिल्यावर आपली मान शरमेने खाली जाते. आपण आपल्या नव्या पिढीपुढे कोणते आदर्श ठेवीत आहोत याचे भान आपल्या कुणाला राहिले आहे, असे अजिबात वाटत नाही. बाल्कनीतून किंवा खिडकीतून कचरा बाहेर टाकताना घरातील मुले पाहात असतात व असेच वागायचे असते असा धडा आपण त्यांना यातून देत असतो! आपल्या घराभोवती  किंवा इमारतीभोवती जो कचरा दिसतो त्यात खरकटे व वाया गेलेले अन्न, अंडय़ाची टरफले, कागदी बोळे, केळाच्या साली, सिगारेटची थोटके, कागदी कप, पेले, प्लास्टिकच्या डिशेस- चमचे, वापरलेले सॅनीटरी नॅप्कीन्स व गर्भनिरोधकं; आणि हे कमी म्हणून की काय त्या प्लास्टिकच्या पिशव्यादेखील असतात! मुलांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, वास्तुशांत, सत्यनारायणाची पूजा, बढती मिळाल्याच्या आनंदात केलेले समारंभ साजरे करताना
आपण प्लास्टिकच्या डिस्पोजेबल वस्तूंचा आपली सोय म्हणून वापर करतो आणि दुसऱ्या दिवशी त्या फेकलेल्या वस्तूंमुळे पर्यावरण किती दूषित होते याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. गणपतीच्या मूर्तीची जी विटंबना विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पाहावयास मिळते त्यात व पर्यावरणाची ही जी विटंबना होत आहे त्यात गुणात्मक काहीच फरक नसतो. प्रत्येक सुजाण नागरिकाने अशी शपथ घेतली पाहिजे
की मी कोणत्याही परिस्थितीत या पर्यावरणास घातक असलेल्या गोष्टींचा वापर न करता समारंभ साजरे करीन. माझ्याकडून पर्यावरणाची हानी होणार नाही ह्याची दक्षता घेईन.  केळीच्या सालाचे विघटन झाले नाही तर उद्याच्या केळींना जी फळे येतील त्यांना साली नसतील व आपल्या वंशजांना त्यांचा आस्वाद घेता येणार नाही, हे लक्षात घेऊन केळीच्या साली व साराच कचरा पर्यावरणास किंवा निसर्गास परत
कसा करता येईल याची उपाययोजना आपल्याला करावयाची आहे.
इमारतीभोवती काहीही फेकले जाणार नाही ही दक्षता प्रत्येक सदस्याने घेतली तर पाहिजेच, शिवाय इतर कोणी तसे करीत नाही हेही पाहणे तेव्हढेच गरजेचे आहे. आपली इमारत किंवा गृहनिर्माण संस्था आदर्श म्हणून ओळखली जायला पाहिजे, ही भावना आपल्या सर्वाच्या मनात निर्माण करता आली पाहिजे. प्रगत देशातील सार्वजनिक स्वच्छता हा कौतुकाचा विषय आहे. तेथील लोक कचरा आपल्या पिशवीत ठेवतात व योग्य ठिकाणीच नियमाला अनुसरून त्याची जागरूकपणे विल्हेवाट लावतात. प्रत्येक गृहनिर्माण संस्थेसमोर तीन किंवा चार वेगवेगळ्या रंगांच्या पेटय़ा ठेवून लाल पेटीत काच, निळ्या पेटीत धातू, हिरव्या पेटीत ओला कचरा व काळ्या पेटीत उरलेला कचरा त्या संस्थेतील प्रत्येक सदस्य इमानेइतबारे टाकीत असतो. त्यामुळे आपोआपच प्रत्येक प्रकारच्या स्रोताच्या पुनर्चक्रांकरणास प्रोत्साहन मिळते व त्यांची  विल्हेवाट लावण्यासाठी पसे मोजण्यापेक्षा त्यातून पसे मिळविता येतात. शिवाय अशा वर्गीकृत केलेल्या कचऱ्याची वाहतूक सुसूत्रपणे करून त्यावरील खर्च कमी करण्यातही या देशांना यश मिळाले आहे. कारण अशा वर्गीकृत कचऱ्याची सोयीनुसार वाहतूक करून त्याची विल्हेवाट लावणे कमी खर्चाचे असते व स्रोतांच्या पुनíनर्मितीसाठी ते फायद्याचे असते.
प्लास्टिक पिशव्यांनी सर्व देशांतच हाहा:कार माजविलेला आहे. तो पाहिल्यावर आपण किती असंस्कृत आहोत याची पदोपदी जाणीव होते. प्लास्टिकवर बंदी घालावी अशी सार्वत्रिक मागणी केली जाते. पण सरकारने बंदी घालण्यापेक्षा आपणच ती घातली तर गोष्टी कितीतरी सोप्या होतील. बाजारात भाजी आणताना आपल्या घरातली कापडी पिशवी नेली तर आपल्याकडून पर्यावरणात प्लास्टिक पाठविण्याचे पाप होणार नाही. भाजीचे दुकानदार प्लास्टिकच्या पिशव्या ठेवतात. कारण त्यांना त्यांचे गिऱ्हाईक गमवायचे नसते व गिऱ्हाईक आपल्याकडे कापडी पिशवी ठेवत नसेल तर मग हा मेळ घालण्यासाठी त्याला या पिशव्या ठेवणे भाग पडते! आजकाल काही दुकानांमधून प्लास्टिकच्या पिशव्यांना पसे मोजावे लागतात. त्यामुळे मग कापडी पिशवीचा पर्याय आपोआपच स्वीकारला जातो. आपण सर्वानी ठरवू की प्लास्टिकच्या पिशव्यांवर आपणच बंदी घालावयाची आहे व आतापासूनच त्याची अंमलबजावणी सुरू करू या.
प्लास्टिकच्या पिशव्या गाईंच्या पोटात पोहोचल्या आहेत. इंदूरमध्ये एक जनावरांचे डॉक्टर रोज पाच गाईंवर शल्यक्रिया करून त्यांच्या पोटातील प्लास्टिक काढण्याचे काम गेली काही वष्रे करीत आहेत. अजाणतेपणातून फेकलेल्या प्लास्टिकने केवढा कहर केला आहे, हे यावरून लक्षात घ्यावे व प्लास्टिक बंदी आपणच जाहीर करावी ही वेळ आलेली आहे.
आपल्या संस्कृतीमध्ये कचरा कधी आला व कायमची डोकेदुखी होऊन बसला हा संशोधनाचा विषय आहे. पण वाढत्या सुबत्तेमुळे कचरा वाढतो हे समीकरण आता दिसू लागले आहे. निसर्गाच्या शब्दकोशात कचरा हा शब्द नाही. झाडाचे पान गळते तेव्हा त्याचे विघटन होऊन मग नवीन पानासाठी लागणारी मूलतत्त्वे मुक्त होतात. जर गळलेले पान कचरा असता तर नवीन पान आलेच नसते व आपली ही परिसंस्था कधीच उन्मळून पडली असती! पदार्थाच्या अविनाशित्वाच्या नियमावरच जग चालले आहे. या नियमाला अनुसरूनच आपण आपले जीवन जगले पाहिजे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.    
सह संचालक, जैवविज्ञान वर्ग, भाभा अणुशक्ती केंद्र