मनोज अणावकर

ज काळ बदलतो आहे. ‘असण्या’पेक्षा ‘दिसण्या’ला अधिक महत्त्व मिळताना आपण समाजात पाहत आहोत. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीच्या अंगभूत गुणांपेक्षा, प्रथमच पाहताना असलेली दिसण्यातली टापटीप, व्यक्तीचे कपडे, बूट वगैरेचा अंतर्भाव असलेला त्या व्यक्तीचा पेहराव अशा गोष्टींवर आजचा समाज त्या व्यक्तीबाबतची प्रथमदर्शनी मतं पटकन तयार करताना दिसून येतो. कारण अर्थातच सोपं आहे. स्वभाव, गुण वगैरे अशा गोष्टींबाबत नीट अभ्यास करून जर कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचायचं असेल, तर मग त्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि सध्याच्या फास्ट फूड, फास्ट रिझल्ट वगैरेच्या जमान्यात वेळ आणि मेहनत वाचवण्याकडे कल वाढताना दिसतो आहे. अर्थात, हे चूक की बरोबर यावर वाद घालत बसण्यापेक्षा आपले गुण आणि मेहनत यावरचा विश्वास ढळू न देता, यातून आपल्याला कोणता मध्यम मार्ग काढता येईल याचा विचार करायला हवा. समाजप्रवाहात विरोध न येता जगायचं असेल, तर यथावकाश आपले गुण हे मेहनतीने काम करून सिद्ध करता येतील. पण त्यासाठी समाजाच्या नजरेत टिकून राहायचं असेल, तर आधी आपलं ‘दिसणं’ हे उत्तम ठेवायला हवं. मग कालौघात आपलं चांगलं ‘असणं’ हेही सिद्ध करता येईल. यासाठी जगात वावरताना तुमचं दिसणं, पेहराव कसा आहे, हे ठरवण्यात तुमच्या वॉर्डरोबचा मोठा वाटा असतो. म्हणूनच वॉर्डरोबचं डिझाइन हे अतिशय काळजीपूर्वक आणि निगुतीने करायला हवं.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा >>> सवलती आणि मालमत्ता खरेदी

‘वॉर्डरोबचं डिझाइन’ याचा अर्थ केवळ वॉर्डरोब बाहेरून कसा दिसतो, ते बाह्य रूप असं नसून त्यात कोणत्या गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहेत याचा विचार, त्यासाठी किती कप्पे द्यायचे, त्या प्रत्येक कप्प्याचा आकार किती असायला हवा, अशा अनेक मुद्द्यांचा विचार वॉर्डरोबचं डिझाइन करताना करायला हवा. याबाबत आता एकएक करून तपशिलात जाणून घेऊया.

वॉर्डरोबची खोली : वॉर्डरोबमध्ये आडव्या दांड्यावर आपण जेव्हा हँगर लावतो, तेव्हा ते वॉर्डरोबची खोली व्यापत असतात. या हँगरची लांबी ही साधारणपणे डिझाइननुसार १३ ते १५ इंच इतकी असते. पण काही वेळा हँगरवर इस्त्री केलेले शर्ट हे घडी करून न लावता अख्खे उभे लावले जातात. विशेषत: ब्लेझर्स हे तर घडीशिवाय उभेच्या उभेच लावले जातात. त्यामुळे ते हँगरच्या लांबीच्या पलीकडे जाऊन जागा व्यापतात. यासाठीच वॉर्डरोबची खोली ही किमान २४ इंच म्हणजे २ फूट असायला हवी.

वॉर्डरोबचे दरवाजे : ज्या बेडरूममध्ये हे वॉर्डरोब आपण बसवतो तिचा आकार हल्ली बऱ्याचदा नवीन फ्लॅटमध्ये बराच लहान असतो. एकदा का डबल बेड या खोलीत ठेवला की, तो या लहान आकाराच्या खोलीची इतकी जागा व्यापतो की, बेड आणि वॉर्डरोब यांच्यामध्ये जाण्यायेण्यापुरती केवळ एक किंवा दोन लाद्यांची जागाच शिल्लक राहते. अशा वेळेला वॉर्डरोबला उघडणारे दरवाजे करणं शक्यच नसतं. मग स्लायडिंग दरवाजांशिवाय पर्याय नसतो.

हेही वाचा >>> उपविधींमधील नमूद दंड आकारणे बंधनकारक

वॉर्डरोबचे कप्पे : वॉर्डरोबमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी ठेवायच्या आहेत, हे आधी ठरवून घ्यावं. कारण वॉर्डरोब हा केवळ कपडे ठेवण्याकरता नसतो, तर त्यात प्रसाधनं आणि कधी कधी दागिने, पैसे आणि इतर मौल्यवान गोष्टींसाठी लॉकरही असतो. काहीजण नेहमी वापरात नसलेले महागडे स्पोर्ट शूज ठेवण्या करताही वॉर्डरोबचा वापर करतात. त्यामुळे आपल्या आवडीनिवडी, गरजा आणि सवयी यानुसार वॉर्डरोबसाठी लागणारे एकूण कप्पे आणि त्यांचा आकार ठरवावा लागतो. यामध्ये बाहेरचे ऑफिससाठीचे कपडे आणि कॅज्युअल वेअरचे कपडे, सूट, टाय, बेल्ट्स, हातरुमाल, घरात घालायचे बाहेरचे आणि आतले कपडे, लोकरीचे कपडे, पावसाळ्याव्यतिरिक्त रेनकोट, छत्र्या ठेवण्यासाठीची व्यवस्था, साड्या, महिलांचे ड्रेस, महिलांचं मेकअपचं सामान, सेंट्स आणि पर्फ्युम्स, दागदागिने, पर्सेस, विविध प्रकारच्या टोप्या, स्विमिंगचे कपडे, मोबाइल, कॅमेरे, मनगटी घड्याळं, गॉगल, प्रवासाच्या बॅगा, शूज, इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश असतो. यातल्या काही वस्तू म्हणजे टाय, बेल्ट वगैरे, या टांगण्यासाठीची व्यवस्था करावी लागते. सगळेच कपडे हँगरवर ठेवले जात नाहीत, तर साड्या आणि इतर काही कपडे हे घड्या घालून ठेवावे लागतात. हे सगळं वॉर्डरोबमध्ये बसवताना त्या सर्व वस्तूंची सरमिसळ न होऊ देता, प्रत्येक वस्तूला तिची अशी स्वत:ची जागा निर्माण करावी लागते. त्यानुसार मग कप्प्यांची संख्या आणि लांबी-रूंदी ठरते. अडकवायच्या किंवा लटकवायच्या वस्तूंसाठी नेमके किती हुक द्यायचे, त्यांची संख्या आणि जागा ठरवावी लागते. घरातल्या माणसांच्या उंचीनुसार त्यांच्या हाताला वस्तू पटकन लागतील अशा उंचीवर रोजच्या लागणाऱ्या वस्तूंचे कप्पे किंवा हुक्स बसवावे लागतात. घरातल्या माणसांची फिरतीची नोकरी नसेल, तर प्रवासाच्या बॅगा या केवळ सुट्ट्यांमध्येच कधीतरी लागणार असल्याने त्यांचे कप्पे हे सर्वसाधारणपणे सर्वात वर असतात. घड्याळं, मोबाईल, चाव्या, सेंट्स, पर्फ्युम्स, हातरुमाल यांची जागा ही वॉर्डरोब उघडल्यावर समोरच या वस्तू हाताकडे मिळतील अशी आणि सकाळी ऑफिसला जायच्या घाईत साधारणपणे घरातल्या माणसांच्या थोडी खांद्याच्या उंचीच्या खाली नजरेसमोर पटकन दिसतील, अशी ठेवावी लागते. यामुळे या वस्तू सोबत घेणं घाईत विसरलं जात नाही. थोडक्यात सांगायचं, तर तुमचा वॉर्डरोब हा तुमच्याशी शब्दाविना बोलला पाहिजे. तुम्ही त्याला आणि तो तुम्हाला सरावला गेला पाहिजे. वस्तू शोधण्यात जराही वेळ वाया जाता कामा नये.

वॉर्डरोबचं बजेट : आता हे सगळं वाचल्यावर काही जणांना असं स्वाभविकपणे वाटू शकतं की, अशा प्रकारचे वॉर्डरोब करून घेणं हे फक्त धनिकांनाचे शौक आहेत, तर तसं नाही. वॉर्डरोबचं बजेट जसं असेल, त्याप्रमाणे तो दुकानात मिळणाऱ्या तयार वॉर्डरोबमधून निवडावा की, तयार करवून घ्यावा, त्यासाठी लाकूड, प्लायवूड, एमडीएफ (मीडियम डेन्सिटी फायबरबोर्ड), पार्टिकल बोर्ड (लो डेल्सिटी फायबर बोर्ड) की, स्टील वापरावं, यासारखे अनेक पर्याय आहेत. यापैकी, लाकूड, प्लायवूड आणि स्टील याबाबत बहुतेकांना माहिती असेल. पण एमडीएफ म्हणजे लाकडाचा भुसा, मेण आणि राळ यापासून उच्च तापमानात उच्च दाब देऊन तयार केलेले बोर्ड, तर पार्टिकल बोर्ड म्हणजे लाकडाचे तुकडे आणि राळ यावर उच्च दाब देऊन तयार केलेले बोर्ड असतात. या दोन्ही प्रकारच्या बोर्डांची किंमत ही सुमारे ४० रुपये प्रति चौरस फुटाच्या आसपास असते, तर प्लायवूड जर साधं (कमर्शियल प्रकारचं) असेल, तर ४५ ते ४८ रु. प्रति चौ.फूट, सेमी-मरिन ६० ते ६५ रु. प्रति चौ. फूट, तर वॉटरप्रूफ असणारं मरिन प्लायवूड ७५ ते ८० रु. प्रति चौ. फूट इतक्या दराने मिळू शकतं. पण एमडीएफ किंवा पार्टिकल बोर्डमध्ये केलेले वॉर्डरोब्स हे ४-५ वर्षं टिकतात, प्लायवूडमध्ये केलेले वॉर्डरोब्स हे १०-१२ वर्ष टिकू शकतात, तर घन लाकडात केलेले वॉर्डरोब्स हे २५ -३० वर्ष किंवा त्याहूनही अधिक टिकू शकतात. मात्र, भविष्यात जेव्हा तुम्ही जुने वॉर्डरोब्ज काढून टाकायला जाल, तेव्हा भंगारवाले फक्त लाकडाचे वॉर्डरोब्ज विकत घेतात. एमडीएफ, पार्टिकल बोर्ड किंवा प्लायवूडचेही वॉर्डरोब्ज ते विकत घेत नाहीत आणि ते काढून टाकणं ही एक डोकेदुखी होते. कधीकधी तर ते खूप मोठे असतील, तर ते मोडून घराबाहेर नेण्यासाठी तुम्हाला उलटे पैसे द्यावे लागतात, मिळत काहीच नाही. हे सर्व प्रकार आगीच्याही दृष्टीने ‘धोकादायक’ या प्रकारात मोडतात. याउलट, स्टीलचे वॉर्डरोब्ज सुरुवातीला महागडे असले, तरी लाकडापेक्षा अधिक अग्निरोधक तर आहेतच पण त्याला ‘रिसेल व्हॅल्यू’ही आहे, आणि ते टिकाऊही आहेत. आज अनेक आकर्षक डिझाइन्समध्येही ते तयार स्वरूपात उपलब्ध असतात. मात्र, ते तयार स्वरुपात असल्यामुळे त्याचे कप्पे हे तुमच्या गरजांनुसार असतीलच असं नाही, हा महागडेपणाव्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा तोटा आहे. शिवाय त्यांचा ‘लुक’ हा इतर प्रकारांपेक्षा थोडा साधा असतो.

शेवटी, तुमच्या गरजा, बजेट आणि किती काळानंतर तुम्हाला वॉर्डरोब बदलायचे आहेत, त्यानुसार तुम्ही वॉर्डरोबचा तुम्हाला अधिकाधिक सोयीचा असलेला पर्याय निवडून तुमचं समाजातलं ‘दिसणं’ हे सुनियोजित वॉर्डरोबच्या माध्यमातून अधिक प्रभावी करू शकता.

(इंटिरिअर डिझाइनर आणि सिव्हिल इंजिनीअर)

● anaokarm@yahoo.co.in

Story img Loader