scorecardresearch

अत्याधुनिक सुविधांचा लाभ पनवेल-रायगडमधील घर खरेदीदारांना

रायगड जिल्ह्यासह पनवेल व परिसरातील बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस येण्याचे दुसरे कारण येथील अत्याधुनिक दळणवळणसेवेसाठी हजारो कोटी रुपये खर्च करून केले जात असलेले निजोजन ही मुख्य बाब आहे.

अत्याधुनिक सुविधांचा लाभ पनवेल-रायगडमधील घर खरेदीदारांना

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून मालवाहतुकीचे पहिले विमान काही महिन्यांतच उड्डाण घेणार असे नियोजन सिडको महामंडळाने केल्याने, येथील ढिम्म झालेल्या गृहनिर्माण बांधकाम व्यवसायाला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. रायगड जिल्ह्यासह पनवेल व परिसरातील बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस येण्याचे दुसरे कारण येथील अत्याधुनिक दळणवळणसेवेसाठी हजारो कोटी रुपये खर्च करून केले जात असलेले निजोजन ही मुख्य बाब आहे. याच उत्तम दळणवळणाच्या सर्व घडामोडींचा परिणाम मुंबई महानगर प्रदेशातील झपाटय़ाने वाढणाऱ्या पनवेलमध्ये आपलेही हक्काचे घर असावे अशी मनीषा प्रत्येक मध्यम उत्पन्न गटातील नागरिकाची झाली आहे. याच दरम्यान कामोठे येथे ९ ते १२ डिसेंबरला होत असलेल्या क्रेडाईच्या मालमत्ता प्रदर्शनाला हजारोंच्या संख्येने गुंतवणूकदार येणार असल्याने त्याचे नियोजन सध्या कामोठेत सुरू आहे. ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई’ने कामोठे येथील खांदेश्वर रेल्वेस्थानकासमोर ‘द सिटी ऑफ ड्रीम्स’ या संकल्पनेतून हे वार्षिक महामालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. क्रेडाई बीएएनएम रायगड, एक्स्पो २०२२ या प्रदर्शनात अनेकांना त्यांचे हक्काचे व स्वप्नातील घर निवडण्याची संधी मिळणार आहे.

राज्यातील सुनियोजित शहरांपैकी नवी मुंबई, रायगड व पनवेल हा परिसर गणला जात आहे. मुंबई-दिल्ली कॉरीडोर, न्हावा शिवडी प्रकल्प, विरार अलिबाग रस्ते प्रकल्प, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचे रुंदीकरण, कळंबोली सर्कल येथील विस्तारीकरण या सर्व रस्त्यांच्या प्रकल्पांमुळे पनवेल व उरण येथील पंडित जवाहरलाल नेहरू बंदरातील वाहतुकीला नवे वळण मिळणार आहे. सध्या असणारी वाहतूक कोंडीचे पनवेल ही ओळख पुसली जाऊन काही मिनिटांतच सर्वच वसाहती एकमेकांना जोडणारे अंतर्गत रस्त्यांचे जाळे विणले जात आहे.

शहरात रस्ते व पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन असल्यास तो परिसर संपन्न राहतो, हे वास्त्व आहे. याप्रमाणे सिडको मंडळाने रसायनी येथील पाताळगंगा नदीतून थेट पाणी विविध सिडको वसाहतींना पुरवठय़ासाठी नियोजन करून त्या योजनेत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच सिडको मंडळाने पेण येथील बाळगंगा, पनवेल येथील देहरंग धरणाचा जलस्रोतांसाठी खर्च करून तेथील पाण्याचा वापर भविष्यातील शहरीभागांसाठी करण्याचे विचाराधीन आहे. शहर उभारणीनंतरही येथील हिरवळ वाढीस प्राधान्य दिल्याने येथील जैवविविधतेची ठिकाणे आजही शाबूत ठेवूनच विकास केल्याने पनवेल हे निसर्गाच्या सान्निध्यातील राहण्याजोगे शहर बनले आहे. देशातील विविध नामांकित शिक्षण संस्था या परिसरात स्थिरावल्याने शिक्षणनगरी अशी ओळख या परिसराची होत आहे. आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेमुळे येथील राहणाऱ्यांमधील निटनिटकेपणा कमालीचा उंचावलाय. दक्षिण मुंबई ते पनवेल हे अंतर रस्त्याने पार करण्यासाठी १२० मिनिटे म्हणजेच दोन तास लागतात. शिवडी न्हावा शेवा पुलामुळे हे अंतर २० मिनिटांवर येणार आहे. नवी मुंबई (बेलापूर) ते तळोजा या मार्गिकेवर पहिल्यांदा धावण्यासाठी मेट्रो रेल्वे अंतिम टप्प्यावर सज्ज आहे. त्यामुळे येथील सिडको वसाहतींमधील रहिवाशांचे घर ते रेल्वेस्थानक हा प्रवासही मेट्रोतून गारेगार व सुसह्य सुखकर होणार आहे. जेएनपीटी या प्रमुख बंदराला महत्त्वाकांक्षी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पाशी जोडायचे आहे. जेएनपीटी एक प्रमुख बंदर असल्याने ते व्यस्त आर्थिक राजधानीतून मार्ग काढण्याऐवजी प्रस्तावित दिल्ली-मुंबई औद्य्ोगिक कॉरीडॉरशी जोडला जावा असा प्रस्ताव आहे.

या सर्वाचा लाभ पनवेल, खारघर, तळोजा, पळस्पे, अलिबाग येथे घर घेणाऱ्यांना होणार आहे. येथील बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूकदारांसाठी गेल्या पाच वर्षांपासून क्रेडाई बीएएनएम रायगड असोशिएशन विविध प्रदर्शने शहरात आयोजित करत आहे. कामोठे येथे कालपासून सुरू झालेले प्रॉपर्टी प्रदर्शन सोमवार (१२ डिसेंबर) पर्यंत सुरू राहणार आहे. हे प्रदर्शन पनवेलकरांसाठी गुंतवणुकीचे नवे दालन असणार असल्याची चर्चा आहे. क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी हजारोंच्या संख्येने या प्रदर्शनाला गुंतवणूकदार भेट देतील अशी अपेक्षा आहे. यापूर्वीच्या प्रदर्शनात ३०० हून अधिक गुंतवणूकदारांनी मालमत्ता बुकिंग केल्या होत्या. यावेळी मालमत्ता बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी मोटार, दुचाकी, टीव्ही आणि मोबाइल यांसारख्या विविध सोडती येथे होणार असल्याने आयोजकांना दुप्पटीपेक्षा अधिक गुंतवणूकदार बुकिंग करतील अशी अपेक्षा आहे. या प्रदर्शनात एकूण ५० विकासकांनी ७५ पेक्षा जास्त स्टॉल्स बुक केले आहेत. तर दहा बॅंका आणि वित्तिय संस्था सहभागी झाल्या आहेत.

विकास प्रकल्प गृहप्रकल्पांसाठी फायदेशीर

पनवेल, खारघर, तळोजा, पळस्पे अशा अनेक ठिकाणी नवीन गृहप्रकल्प सुरू होत आहेत. या गृहप्रकल्पांसाठी याच भागाची निवड करण्याची अनेक कारणे आहेत. पनवेलचे विमानतळ- जे लवकरच तयार होण्याच्या मार्गावर आहे, मेट्रो, मुंबई- पुणे महामार्ग, जेएनपीटी, शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू, दिल्ली-मुंबई कॉरीडॉर हे नजिकच्या काळात कार्यान्वित होणारे प्रकल्प या भागातील गृहप्रकल्पांसाठी नवसंजीवनी ठरतील. निसर्गरम्य परिसराबरोबरच अत्याधुनिक दळणवळण सेवा इथल्या गृहप्रकल्पांसाठी फायदेशीर ठरेल. परिणामी या परिसरात गृहप्रकल्पांना मोठय़ा प्रमाणात मागणी वाढत आहे. जागेच्या उपलब्धतेमुळे इथे विशिष्ट संकल्पनेवर आधारित अर्थात थीमबेस गृहप्रकल्प उभारता येऊ शकतात आणि आम्ही त्यासाठीच प्रयत्नशील आहोत.

– मनिष बथीजा, व्यवस्थापकीय संचालक, पॅराडाईस ग्रुप

मराठीतील सर्व वास्तुरंग ( Vasturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 00:47 IST

संबंधित बातम्या