घर आणि रांगोळी यांची तर रोजची मनोहर युती आहे. रांगोळीशिवाय घर ही कल्पनाच सहन होत नाही. त्यातून दिवाळीसारखा सण रांगोळीचे महत्त्व अधोरेखित करतो. दारावरच्या लोकरीच्या तोरणाची नजाकत काही वेगळीच. झेंडूची केशरी फुले आणि आंब्याची हिरवीगार पाने, दिवे, आकाशकंदील असलेली तोरणं पिशवीत बसायला उत्सुक असतात. घरसजावटीसाठी कागदाच्या फुलांचा पर्यायही असतोच. सर्व रंगाची जास्वंद, झेंडू, कमळ, गोकर्ण, प्राजक्त, अस्टर्ड आणि गुलाब अगदी हुबेहुब खऱ्या फुलांचा आभास करून देतात.

कोजागरीच्या टिपूर चांदण्यात आटीव दुधाचा आस्वाद घेऊन झाला की घरासह सगळ्या परिसराला दिवाळीचे वेध लागतात. ‘तुम्हीही सजा आणि घर ही सजवा’ म्हणत प्रदर्शनाच्या जाहिराती वर्तमानपत्रांतून झळकू लागतात. दिवाळी अंकांची वर्गणी भरण्याचे आवाहन वाचनालयातून केले जाते. त्यांचे अंतरंग थोडेसे किलकिले करून उत्सुकता वाढवली जाते. शिवाय अक्षरवाङ्मय म्हणजे पुस्तके सवलतीच्या दरात विकली जातात. सरस्वती पूजनच ते… नोकरदार मंडळी कॅलेंडरवरील लाल तारखा बघून रजेचे प्लॅनिंग करतात. भेटीगाठींसाठी बस- रेल्वेचे आरक्षण केले जााते. ‘दिवाळी पहाट’ च्या कार्यक्रमाचा शोध घेतला जातो. कपडे, सोन्या- मोत्याचे दागिने यांच्या दुकानांत गर्दी होऊ लागते.

परदेशस्थ मुलाबाळांना फराळ पाठवले जातात. ‘दिवाळी नवीन घरांत साजरी करा’ म्हणत सवलतींचे ‘मधाचे बोट’ दाखवत नवीन गृहखरेदीला प्रोत्साहन दिले जाते. दिवाळी हा वर्षातील मोठा सण. वसुबारसेला मातृशक्ती आपल्या बाळांसाठी उपास करून गायवासराची पूजा करतात. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सहा दिवस नटण्यामुरडण्यात मौजमस्तीत घालवायचे असतात. शिवाय पाहुणेमंडळींशिवाय तर घराला शोभाच नाही. म्हणून घराच्या साजावटीचा विषय अगदी ऐरणीवर येतो. बाजारात त्याला अनेक पर्याय उपलब्ध असतात.

एखाद्या ठिकाणी सगळ्या लोकरीच्या वस्तू असतात. ते असते एका सुईवरचे क्रोशावर्क. एखादीने अत्यंत परिश्रम घेऊन आवडीने त्या बनवलेल्या असतात. त्यातून त्या व्यक्तीची कलात्मकदृष्टी, रंगांचा अचूक आकर्षक उगवदार मेळ घालण्याची नजर दिसून येते. पाय तिथे रेंगाळतातच. घर म्हटलं की प्रथम लक्ष जाते ते बाहेरच्या मुख्य दरवाजाकडे. तिथे तोरण लावले जातेच. लोकरीच्या तोरणाची नजाकत काही वेगळीच. झेंडूची केशरी फुले आणि आंब्याची हिरवीगार पाने, दिवे, आकाशकंदील असलेली तोरणं पिशवीत बसायला उत्सुक असतात. लोकरीची असल्यामुळे कोमेजण्याची भीती नाही. महिरपीसारखे किंवा दाराला समांतर असे, आपल्या आवडीचे रंगीबेरंगी तेारण एखाद्या नववधूप्रमाणे, नव्याची नवलाई मिरवत, येणाऱ्यांना ‘थबकले उंबऱ्यात मी’ म्हणायला लावते. शिवाय टेबल रबर, पूजा मॅट यांचा उपयोग करावा तसा होत असतो. मोगरीचा गजरा, वेण्या, हेअरक्लीपमुळे ‘मेकओव्हर’ करणे सोपे जाते. शिवाय त्यांचा कायम एव्हरग्रीन आणि टिकाऊ मामला. त्यामुळे केशरचना डोळ्यात भरणारच. आकर्षक रंगसंगतीमुळे हे घेऊ की ते घेऊ, असं होऊन जातं.

सजावटीसाठी कागदाच्या फुलांचा पर्यायही असतोच. सर्व रंगाची जास्वंद, झेंडू, कमळ, गोकर्ण, प्राजक्त, अस्टर्ड आणि गुलाब अगदी हुबेहुब खऱ्या फुलांचा आभास करून देतात. ‘प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट’ असंच वाटत राहातं. शिवाय अत्तर लावण्याचं काम सोपं करणारी अत्तर सोनचाफा, अत्तर मोगरा वातावरण सुगंधी करत असतात. खास प्रसंगी भेट देण्यासाठी अमुक इतक्या फुलांची परडी किंवा मोगऱ्याच्या कळ्यांचा हारही सहज उपलब्ध होऊ शकतो. लक्ष्मीपूजनासाठी कमळाची बैठक मिळते. शिवाय महिरपी, हार, तोरणं, माळा, पुष्पगुच्छ, वेण्या, फुलांचे आकडे पुष्पक्स्टँड यांचे वैविध्य बघून मनासारखी खरेदी करता येते. खरं तर ही क्रेपची फुलं प्रत्येक सणाला घराचे ‘रूप’ खुलवत असतात.

घर आणि रांगोळी यांची तर रोजची मनोहर युती आहे. रांगोळीशिवाय घर ही कल्पनाच सहन होत नाही. त्यातून दिवाळीसारखा सण रांगोळीचे महत्त्व अधोरेखित करतो. हे पटत असतं पण काही वेळेला गृहिणींना नोकरी, घर, मुलंबाळं ही तारेवरची कसरत करताना वेळ मिळत नाही. काहींना रांगोळी काढायला येत नाही. काहींना वय झाल्यामुळे किंवा शारीरिक दुर्बलतेमुळे मनात संस्कृती जपण्याची इच्छा, आवड असूनही रांगोळी काढता येत नाही.

हेही वाचा

अशा वेळी रांगोळीचा साचा अत्यंत उपयुक्त ठरतो. काही सेकंदातच रांगोळी काढली जाते. शिवाय कधी रांगोळी काढण्याची जागा खडबडीत असते. जागेचा रंग फिकट असल्यामुळे रांगोळी उठून दिसत नाही. झाडूवाला केव्हा दत्त होईल याची खात्री नसते. अशा वेळी काळा आणि गेरुसारख्या तपकिरी रंगात, आठ विविध आकाराचे हलकेफुलके, सहज उचलून आत-बाहेर ठेवता येतील असे पाटही उपलब्ध आहेत. ते कसे वापरायचे, हे पण पाटाच्या मागच्या बाजूस लिहिलेले आढळून येते. पाटावरती अत्यंत रेखीव अशी ही रांगोळी फारच छान दिसते. त्यात रंगही भरू शकतो किंवा ते साचे वापरून वेगळीच रांगोळीही काढता येते. जवळजवळ साडेचारशे डिझाइन्स बघायला मिळतात.

कोपऱ्याकोपऱ्यावर पणत्यांचे ढीग दिसून येतात. त्यातल्या काही ‘रंगात’ येत आहेत. कापसाची वात आणि पोटातील स्निग्धता यांच्या साथीने उजळणारा प्रकाशाचा तेजाचा अंश म्हणजे पणती. घराच्या पायरीवर, कठड्यावर बसून दिवाळीचे सौंदर्य वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. वाऱ्याच्या झुळुकीबरोबर हलणाऱ्या तेजाच्या या चिमुकल्या ज्योती भरभरून सात्त्विक आनंद देतात. परिसरात रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा, आकाशकंदिलाचे गळेसर दोरीला पकडून हिंदोळत राहिलेले असतात.

दिवाळीचे दिवस उत्साहात जातातच. पण दिवाळीचे पडघम वाजायला लागले की तिच्या स्वागताची पूर्वतयारी करण्यातला आनंद दरवर्षी अनुभवण्यातही कमालीची गंमत असते.

suchitrasathe52@gmail.com