scorecardresearch

Premium

वास्तु-मार्गदर्शन

आमच्या गृहनिर्माण संस्थेमध्ये बहुतांश काळ अ‍ॅडमिनिस्ट्रेटरचा कारभार होता.

वास्तु-मार्गदर्शन

’ प्रश्न : आमच्या गृहनिर्माण संस्थेमध्ये बहुतांश काळ अ‍ॅडमिनिस्ट्रेटरचा कारभार होता. या काळात संस्थेची कोणतीही देखभाल त्यांच्याकडून झालेली नाही. नवीन कार्यकारिणीने सन २००० पासून आत्तापर्यंत महिना १०० रुपयेप्रमाणे देखभाल खर्च भरावा असे फर्मान काढले आहे. त्याला बहुसंख्य सभासदांचा विरोध आहे. परंतु ऑक्टोबर २०१५ पासून देखभाल खर्च देण्यास सर्व सभासद तयार आहेत. तसा ठरावदेखील विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. तर या ठिकाणी नवीन कमिटी पूर्वलक्षी प्रभावाने देखभाल खर्च वसूल करू शकते का?
– ज्ञानेश्वर बागुल, चेंबूर, मुंबई
उत्तर : सर्वप्रथम आपण एक गोष्ट स्पष्ट केलेली नाही, ती म्हणजे जेव्हा कार्यकारिणीने सन २०००पासून देखभाल खर्च लावताना त्याला सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतली होती का? ती घेतल्यावर आपण किती दिवसांत विशेष सर्वसाधारण सभा बोलावलीत आणि वर दर्शविलेला ठराव मंजूर करून घेतलात? या सर्व गोष्टींच्या खुलाशावरच या प्रश्नाचे उत्तर देता येईल. कारण एका विषयावर एकाच वर्षांत दोन ठराव मंजूर केले आहेत की काय, हेदेखील विचारात घ्यावे लागेल. पण एक गोष्ट निश्चित, देखभाल होवो अथवा न होवो, पण देखभालीसाठी विशिष्ट रक्कम जमा करण्याचा हक्क गृहनिर्माण संस्थेला आहे.

’ प्रश्न : मी संस्थेचा सभासद असून माझे सदस्यत्व माझ्या नावावर बदलून घेतलेले आहे. त्यासाठीची ट्रान्सफर फी रु. ५०,००० देखील मी अदा केली आहे. त्यानंतर समाजकल्याण खात्याची मान्यता मिळाल्यावर मी संस्थेकडे संस्थेचे समभाग माझ्या नावावर हस्तांतरित करण्यास माझी पाणी बिले, मालमत्ता बिले माझ्या नावे करण्यास, वीज बिल माझ्या नावे करण्यासाठी संस्थेला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास विनंती केली असता संस्थेने देखभालीची रक्कम भरल्याशिवाय असे प्रमाणपत्र देता येणार नाही असे सांगितले. तर संस्था अशा प्रकारे प्रमाणपत्र देण्यास नकार देऊ शकते का? संस्थेची नवीन कार्यकारिणी ऑक्टोबर २०१५ पासून स्थापन झाली आहे व सर्व सभासद देखभाल खर्च ऑक्टोबर २०१५ पासून देण्यास तयारआहेत.
– ज्ञानेश्वर बागुल, चेंबूर, मुंबई.
उत्तर : आपल्या देखभाल खर्चावर आपल्याच प्रश्नाच्या एका उत्तरात मी सविस्तर खुलासा केलेला आहे. त्यामुळे सन २००० पासून लावलेला देखभाल खर्च जर कायदेशीररीत्या लावला असेल तर संस्था प्रथम देखभाल खर्चाची रक्कम भरा मग आम्ही ना-हरकत प्रमाणपत्र देतो असे म्हणू शकते. कारण अशा प्रकारे गृहनिर्माण संस्थेने थकबाकीची रक्कम जमा केली नाही तर गृहनिर्माण संस्थेकडे कोणत्याही प्रकारे थकबाकी जमाच होणार नाही.

’ प्रश्न : आम्ही दक्षिण मुंबईत एका ठिकाणी सुमारे ७० वर्षे भाडेकरू म्हणून रहात आहोत.
आमचे मालक आमची गृहनिर्माण संस्था बनवण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देत नाहीत. मात्र मालक इमारतीचा पुनर्विकास करण्यास तयार आहेत. आम्ही सर्वजणदेखील इमारतीचा पुनर्विकास करण्यास तयार आहोत. त्याबद्दल अनेक बैठकादेखील झाल्या. परंतु कागदावर मात्र काहीच लिहिले गेले नाही. याचे कारण म्हणजे संस्था स्थापन झालेली नाही.
– विलास जी, मुंबई.
उत्तर : खरे तर गृहनिर्माण संस्था नोंदणे आणि पुनर्विकासाचा प्रस्ताव आणणे यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. गृहनिर्माण संस्था न नोंदतादेखील आपला मालक तयार असेल तर आपण पुनर्विकास करू शकता. त्यासाठी भाडेकरू, मालक व विकासक
यांच्यात नोंदणीकृत करारनामा करण्यास सांगावे. आमच्या मते, आपण पुनर्विकास प्रकल्प हा शासनाने निर्धारित केलेल्या योजनांतर्गतच होईल. कारण आपली इमारत आमच्या मते उपकर लागू असणारी इमारत असावी. थोडक्यात, आपण गृहनिर्माण संस्थादेखील स्थापन करू शकता अथवा पुनर्विकासासाठीदेखील जाऊ शकता.
’ प्रश्न : मी कांजुरमार्ग येथील एका हाउसिंग सोसायटीचा सदस्य असून आमची संस्था सध्या पुनर्विकास प्रकल्प राबवत आहे. या पुनर्विकास प्रकल्पाचे काम मंदगतीने चालू आहे. विकासकाने आम्हा सदस्यांना १५ टक्के जादा क्षेत्रफळ दिले आहे, परंतु मी या ठिकाणी त्याहून जास्त क्षेत्रफळाची सदनिका घेण्याचे ठरवले आणि याचे वेगळे पैसेही दिले. म्हणून मला विकासकाने सर्व सदस्यांना ज्या मजल्यावर सदनिका दिल्या आहेत त्याहून वेगळ्या मजल्यावर सदनिका दिली. त्याबाबत कोणतेच मतभेद नाहीत. दरम्यानच्या काळात गृहनिर्माण संस्थेची बैठक झाली असता संस्थेचे सेक्रेटरी म्हणतात की तुम्ही या गृहनिर्माण संस्थेचे सदस्यच नाही. कारण तुम्ही सदनिका (पूर्वीची) विकासकाला देऊन त्या बदल्यात नवीन सदनिका घेतली आहे. तेव्हा मी सदस्य आहे की नाही? याबाबत मार्गदर्शन करावे.
– हृषीकेश नाईक, कांजुरमार्ग, मुंबई
उत्तर : आपण सदर गृहनिर्माण संस्थेचे सदस्य आहातच. आपल्या सेक्रेटरीने घेतलेली भूमिका चुकीची आहे. याचे कारण म्हणजे, त्यांनी जो निकष तुम्हाला लावला तोच सर्व सदस्यांना लावला तर काय होईल? त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर त्यांनी कमी क्षेत्रफळाच्या सदनिका विकासकाकडे देऊन त्या बदल्यात १५ टक्के जास्त क्षेत्रफळ असणाऱ्या सदनिका घेतल्या, त्यामुळे संस्थेचे कोणीच सदस्य राहणार नाही. थोडक्यात तुम्ही सदस्य आहात.
अ‍ॅड. श्रीनिवास घैसास ghaisas_asso@yahoo.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Architectural guidance

First published on: 11-06-2016 at 01:31 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×