– श्रीनिवास मुजुमदार

घराच्या बाहेरील बाजूच्या भिंतींवर पावसाच्या पाण्याने ओल येते. अशा भिंतींवरून जाणाऱ्या तारांचे इन्सुलेशन खराब झाले असेल तर त्या भिंतींवर शॉक लागू शकतो. हे टाळण्यासाठी अशा भिंतीवरून जाणाऱ्या तारांच्या इन्सुलेशनची पाहणी व खराब झाले असल्यास त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे. विद्युत तारांवर ओले कपडे वाळविण्यासाठी टाकू नयेत.

सध्या मिक्सर, ओव्हन, वॉशिंग मशीन, डिश वॉशर, इ. उपकरणांनी स्वयंपाकाघरात घर केले आहे. तर टीव्ही, संगणक, होम थिएटर यांनी अन्य खोल्यांत स्थान मिळवले आहे. अर्थात यांना ऊर्जा मिळते ती विद्युत यंत्रणेतून. या विद्युत यंत्रणेची असुरक्षित हाताळणी केली तर प्रसंगी ते जिवावर बेतू शकते. तेव्हा योग्य ती सुरक्षाविषयक काळजी नेहमीच घ्यावी लागते.  शिवाय पावसाळ्यात विशेष दक्षता घ्यावी लागते. पावसाळ्यात व तो सुरू होण्यापूर्वी ढगांच्या गडगडाटासह  विजा चमकण्याचे प्रसंग घडत असतात. अशा प्रसंगी घ्यावयाच्या खबरदारीचा ऊहापोह या लेखात करणार आहोत.

अत्यंत विशुद्ध अवस्थेत पाण्याची विद्युत रोधकता बरीच जास्त असते. (असे पाणी मिळणे दुरापास्त!) नेहमी उपलब्ध असलेल्या पाण्यात कोणते ना कोणते क्षार किंवा रसायने विद्राव्य स्वरूपात असतातच. त्यात काही पदार्थ अल्प प्रमाणात असल्याने  त्याची  रोधकता एकदम कमी होते. कोणतेही विद्युत उपकरण भिजले वा त्यात पाणी गेले तर त्या  उपकरणाची  रोधकता  कमी झाल्याने शॉक लागण्याची शक्यता असते. असे उपकरण  वापरणे धोक्याचे असते. त्याची तज्ज्ञ व्यक्तीकडून तपासणी झाल्याखेरीच वापर करू नये. त्या उपकरणाच्या सर्किटमध्ये एमसीबी (Miniature Circuit Breaker) बसविला असेल तर अशा बिघडलेल्या स्थितीत उपकरण चालू करण्याचा प्रयत्न केल्यास, एमसीबीमुळे विद्युतप्रवाह तात्काळ बंद होतो व धोका टळतो. याच दृष्टीने स्वयंपाकाघरात ओटय़ावर विजेचे  सॉकेट व पाण्याचा नळ यात अंतर ठेवावे व एमसीबीसहित सॉकेट बसवावेत.

घराच्या बाहेरील बाजूच्या भिंतींवर पावसाच्या पाण्याने ओल येते. अशा भिंतींवरून जाणाऱ्या तारांचे इन्सुलेशन खराब झाले असेल तर त्या भिंतींवर शॉक लागू शकतो. हे टाळण्यासाठी अशा भिंतीवरून जाणाऱ्या तारांच्या इन्सुलेशनची पाहणी व खराब झाले असल्यास त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे. विद्युत तारांवर ओले कपडे वाळविण्यासाठी टाकू नयेत.

बहुतेक इमारतींच्या तळमजल्यावर सर्व घरकुलांचे  मीटर बसविलेले असतात.    पावसाळ्यात, विशेषत: भरतीच्या वेळी सोसायटीच्या प्रांगणातील पाण्याचा निचरा पूर्ण होत नाही व पाण्याची पातळी वाढत जाते. ही पातळी जर मीटरच्या जवळपास येऊ  लागली तर तात्काळ वीजपुरवठा कंपनीला फोन करून वस्तुस्थिती सांगून संबंधित वीजपुरवठा बंद करण्याबद्दल सांगावे, जेणेकरून संभाव्य धोका टाळता येईल.

पावसाळ्यात किंवा त्यापूर्वी अनेकदा वादळ व ढगांच्या गडगडाटासह विजा चमकणे  (लायटनिंग -तडित) हे प्रकार होत असतात. त्या वेळी ढगांवर प्रचंड विद्युत भार असतो आणि वीज पडण्याचे प्रकार घडतात. अशा वेळी घरातील टीव्ही, फ्रिज किंवा अन्य उपकरणे बंद ठेवून सॉकेटपासून अलग करावीत. टीव्हीची डिस्क किंवा डिश अँटेनापासून जी वायर टीव्हीपर्यंत येते त्याची पिन टीव्हीपासून वेगळी करावी. इमारतीच्या तडितवाही (लायटनिंग कंडक्टर) पट्टीस स्पर्श करू नये. अशा वेळी घराच्या बाहेर जाणे टाळावे. जर घराच्या बाहेर असाल तर इलेक्ट्रिक लाइनपासून दूर जावे. झाडाखाली कधीही आश्रय घेऊ  नये. कुंपण  किंवा लोखंडी आधाराला स्पर्श करू नये. पावसात भिजू नये म्हणून छत्रीचा वापर करू नये. रेनकोट किंवा घोंगडीचा वापर चालेल. परिसरात माणसाच्या उंचीपेक्षा जास्त उंचीची वस्तू नसल्यास माणसाच्या अंगावर वीज कोसळण्याची बरीच शक्यता असते. अशा वेळी जमिनीवर आडवे झोपावे.

तडितासंबंधी एक नियम प्रचलित आहे, त्याचे नाव लायटनिंग ३०/३० रुल. तो असा : वीज चमकल्यानंतर ३० सेकंदाचे आत ढगांचा गडगडाट ऐकू आला तर तडितनजीकच्या परिसरात आहे असे समजावे व अशा वेळी बाहेर पडू नये. वादळ व गडगडाट संपल्यावर ३० मिनिटांनंतर बाहेर पडण्यास हरकत नाही.

मुंबई सोडून महाराष्ट्रात अन्यत्र उपरी (ओव्हरहेड) विद्युत वाहिन्या आहेत. खांबांना, त्याच्या ताणांना स्पर्श करू नये. शेतातील खांबांना जनावरे बांधू नयेत. वादळामुळे खांब वाकू किंवा पडू शकतात. अशा वेळी तुटलेल्या तारा ओलसर जमिनीवर पडून शॉक लागू शकतो. या परिस्थितीत तारांना स्पर्श करू नये, तसेच त्याच्या परिसरात फिरकू नये. याची माहिती वीजपुरवठा कंपनीला फोन करून द्यावी.

एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे पावसाळा असो वा नसो उपकरण व व्यक्ती यांच्या सुरक्षिततेसाठी अर्थिग ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अर्थिग वायर अखंड व अर्थ टर्मिनलला व्यवस्थित जोडलेली असणे अनिवार्य आहे. तसेच संपूर्ण वायरिंगमध्ये वायर, स्विचेस, उपकरणे, इ. केवळ आयएसआय मार्क असलेल्याच वस्तू  वापरणे अपेक्षित आहे.

सल्लागार (विद्युतप्रणाली)

shrimujumdar@gmail.com