अ‍ॅड. श्रीनिवास घैसास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

*    मी फ्लॅट घेताना माझ्या वडिलांच्या नावामध्ये चूक झाली आहे. माझ्या वडिलांचे नाव ‘चिंतामण’ असे आहे. परंतु रजिस्ट्रेशन करताना टायपिस्टने ‘चिंतामणी’ असे टाईप केले आहे आणि समभागावरदेखील ‘चिंतामणी’ असेच नाव आले आहे. माझ्या पश्चात याचा माझ्या वारसांना त्रास होऊ शकतो का? ते नाव दुरुस्त करायचे असेल तर ते कसे दुरुस्त करता येईल? नाव दुरुस्त केल्यास न केल्यास चालेल का?

-बाळकृष्ण पाटील, नवी मुंबई</p>

*    सर्वप्रथम आपण नावातील चूक कोठे झाली आहे हे नमूद केलेले नाही. आपल्या करारनाम्यातील नावात चूक झाली आहे, की आपण नोंदणी कार्यालयात बनवलेल्या गोषवाऱ्यामध्ये (डेटा एन्ट्री) चूक आहे हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. आपली चूक करारनाम्यात झाली असेल तर चूक दुरुस्तीपत्र बनवूनदेखील आपण ही चूक सुधारू शकता. हे चूक दुरुस्तीपत्र नोंददेखील होईल. आपली चूक ही गोषवारा (डेटा एन्ट्री) बनवताना झाली असेल तर संबंधित रजिस्टर कार्यालयात आपण त्यांच्या विहीत नमुन्यात अर्ज करून गोषवारा पत्रकातील चूक दुरुस्त करून घ्यावी. नपेक्षा महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटमध्ये आपले नाव दुरुस्त करून घ्यावे आणि त्यातील कोणताही दस्तऐवज बनवल्यास त्याची एक प्रत गृहनिर्माण संस्थेत देऊन चूक दुरुस्त करून घ्यावी. चूक दुरुस्त न केल्याने काय त्रास होईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. मात्र लक्षात आलेली चूक दुरुस्त करणे केव्हाही चांगलेच होय.

 

*    आईवडिलांच्या निधनानंतर मुले आणि मुली यांची नावे सातबारावर शेतजमिनीला लागली आहेत. आता तर बहिणींचेही निधन झाले आहे. या बहिणींच्या पश्चात तिचे पती आणि मुले मुली हयात आहेत अशा परिस्थितीत त्या शेतजमिनीला अथवा मालमत्तेला बहिणींच्या पश्चात कोण वारस लागतील आणि कुणा-कुणाचे हक्क सोडपत्र करून घ्यावे लागेल?

-डॉ. हिरालाल खरनार, खारघर

*    आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे बहिणीच्या पश्चात तिच्या सर्व वारसांची नावे सदर जमिनीच्या सातबारावर दाखल होतील. उदा. बहिणीचे पती, मुले आणि मुली या सर्वाची नावे दाखल होतील. कारण आपल्या बहिणीने मृत्युपत्रासारखे कोणतेही कागदपत्र तयार केलेले नसावेत असे गृहीत धरलेले आहे. आता यापैकी कुणालाही आपला सदर मालमत्तेवर वारसा हक्काने मिळालेला हक्क, मालकी हक्क नैसर्गिक प्रेमापोटी आणि विनामोबदला एखाद्या अन्य लाभार्थीच्यासाठी सोडावयाचा असेल तर त्यांना तसे करता येईल. मात्र तसे करण्याची त्यांची तयारी आहे किंवा नाही हे आपणाला पाहावे लागेल. ज्यांना हा हक्क सोडायचा आहे ते आपला हक्क अन्य वारसापैकी एखाद्यासाठी अथवा सर्वासाठी सोडण्यास तयार असतील तर त्यासाठी हक्कसोडपत्र म्हणजेच ज्याला इंग्रजीमध्ये ‘रिलीज डीड’ असे म्हणतात ते बनवता येईल. आणि ते संबंधित नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन नोंददेखील करता येईल. अशा प्रकारे हक्कसोडपत्र केल्यास हक्कसोडपत्र करणाऱ्यांची नावे सातबारावरून कमी होतील आणि ज्यांच्यासाठी अथवा ज्याच्यासाठी हक्क सोडला आहे त्या व्यक्तीच्या मालकीहक्कात त्या प्रमाणात वाढ होईल. आता ज्यांना हक्क सोडायचा आहे, त्यांनाच असे हक्कसोडपत्र करता येईल.

*    आमच्या सोसायटीमध्ये कार पार्किंगसाठी जागा आहे.

१)   आमच्या गॅरेजमध्ये ५ बाय ६ इतकी जागा अचानक खचली तर त्या दुरुस्तीचा खर्च कोण करणार?

२)   सोसायटीमध्ये मोकळी जागा होती. सोसायटीने खर्च करून सुमारे

२५ गाडय़ा राहतील इतकी पार्किंगची सोय केली. त्यासाठी प्रत्येकी रु. ५०,०००/- अनामत रक्कम घेतली. आता ५ वर्षांने पार्किंग जागेवरील

नारळ आणि झावळ्या पडून जाळी तुटली आहे. आता याचा खर्च कुणी करावा?

-अनंत विष्णू तांबडे, बोरिवली (प) मुंबई</p>

*    आपल्या प्रश्नात आपण स्टिल्टमध्ये कार पार्किंगसाठी जागा असल्याचे म्हटले आहे. आणि पुढे आमच्या गॅरेजमधील जागा खचल्याचे म्हटले आहे. या दोन्ही विधानांचा संबंध लागत नाही. आपण आपले गॅरेज स्टिल्टमध्ये तर बनवलेले नाही ना? असो. आपले वेगळे गॅरेज आहे असे समजून उत्तर देत आहोत. आपल्या गॅरेजमधील जागा खचलेली आहे. याचा अर्थ सदर खचलेली जागा ही गॅरेजचा अंतर्गत भाग आहे. म्हणूनच आमच्या मते सदर जागा दुरुस्त करण्याचा खर्च आपल्यालाच करावा लागेल. आता आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे की, सदर पार्किंगची जागा संस्थेने बनवली आहे आणि संस्थेने सदस्यांकडून अनामत रक्कम देखील घेतली आहे. त्यामुळे सदर दुरुस्तीचे काम संस्थेला करावे लागेल. कारण ही पैसे देऊन घेतलेली सेवा आहे. तेव्हा ही जागा सुस्थितीत ठेवणे ही संस्थेची जबाबदारी आहे.

*  आपला गृहनिर्माण संस्थेच्या अनुषंगाने नवीन नियमासंबंधीचा लेख वाचला. मी आमच्या गृहनिर्माण संस्थेला वार्षिक सर्वसाधारण संस्थेच्या इतिवृत्ताची सीडी / डीव्हीडी द्यावी अशी मागणी केली. पहिल्यांदा संस्थेने अशी सीडी / डीव्हीडी देण्यास नकार दिला. त्यानंतर मी उपनिबंधकांशी संपर्क साधला. त्यांनी असा आदेश दिला की ७९ (अ) कलमांतर्गत बनवलेली सीडी मला देण्यात यावी. त्या आदेशाच्या अनुषंगाने संस्थेने मला असे कळवले की सदर सीडी हरवली असून, तशा अर्थाचा एफआरआर संस्थेने नोंद केला आहे. मला त्या सीडीचा उपयोग पुरावा म्हणून एका प्रकरणात करावयाचा आहे, तर त्या संदर्भात मी मॅनेजिंग कमिटीविरुद्ध काय कारवाई करू शकते?

-मृणालिनी घैसास

*    आपण सदर गृहनिर्माण संस्थेच्या सदस्या असल्याने आपणाला सीडी मागण्याचा अधिकार आहे. आता त्यानी सीडी हरवली आहे तशा अर्थाची तक्रारदेखील त्यांनी दाखल केली आहे, असे आपण दिलेल्या माहितीवरून वाटते. आता यासाठी कोर्टकचेऱ्या करण्यापूर्वी अन्य पर्याय उपलब्ध होतात का ते पाहा. सर्वप्रथम आपण त्या संस्थेच्या इतिवृत्ताची प्रत संस्थेकडून घ्यावी आणि संस्थेला विनंती करा की ज्या व्यक्तीने / संस्थेने व्हिडीओ शूटिंग केले आहे त्याला डुप्लिकेट सीडी देण्यासाठी सोसायटीमार्फत विनंती करण्यास सांगा. तशा पद्धतीने जर सीडी मिळाली तर उत्तमच. परंतु न मिळाल्यास आपण संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीविरुद्ध ७९ (अ) मधील तरतुदींचे पालन न केल्यामुळे हा पुनर्विकास प्रकल्प चालू करू नये, यासाठी स्थगिती मागू शकता. त्यासाठी आपणाला न्यायालयात जावे लागेल. आपणाला सदर सीडी कोणत्या पुराव्यासाठी हवी आहे हे समजले असते तर या प्रश्नाचे उत्तर वेगळ्या दृष्टीनेदेखील देता आले असते. मात्र तेवढेच महत्त्वाचे कारण असेल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणेच इष्ट ठरेल.

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasturang vastu guidance abn
First published on: 23-11-2019 at 01:01 IST