संहिता जोशी

‘कूपातिल मी नच मंडूक’ असे म्हणणारा कवी केशवसुतांचा ‘नव्या मनूतिल, नव्या दमाचा’ शिपाई आता कुणाला पुरेसा आठवतही नसेल.. समाजमाध्यमांवरले आपण, आपल्यासारख्याच विचारांच्या लोकांना ओळखतो, त्यांनाच मैत्रयादीत जोडतो.. विरोध करणाऱ्यांना तात्काळ ब्लॉक करतो.. आणि आपल्याभोवतीची कुंपणं आपणच वाढवतो! 

गेल्या काही वर्षांत सगळ्यात लोकप्रिय समाजमाध्यमं म्हणजे ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि लिंक्डिन. पैकी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एखादं पोस्ट आवडल्याचं सांगण्यासाठी बदामाचं बटण आहे; लिंक्डिन आणि फेसबुकवर अंगठा वर करणारं बटण आहे. फेसबुकवर हसरा चेहरा, बदाम आणि इतर काही बटणंही आहेत. त्यांत तीन बटणं सहमतीदर्शक, एक आश्चर्य व्यक्त करणारं आणि दोन नकारात्मक भावना दर्शवणारी आहेत. म्हणजे नकारात्मक भावना व्यक्त करणं ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डिनवर सोपं नाही; फेसबुकवर त्यासाठी पर्याय खूप कमी आहेत.

फेसबुक आणि फेसबुकाच्या मेसेंजरवर सगळ्यात जास्त कोणते इमोजी (भावना दर्शवणारी बाहुली) वापरले जातात, याची सांख्यिकी तपासली तर सगळे इमोजी आनंदी, सकारात्मक आहेत. वेगवेगळ्या देशांमध्येही हे इमोजी सकारात्मक आहेत. हे सकारात्मक आहे, तर खवचट-दुष्टपणानं लोकांच्या आनंदात बिब्बा घालण्याचं काही कारण असू नये. पण आहे. तिथपर्यंत जाण्याआधी, थोडं विदाविज्ञानाचं शास्त्र बघू या.

विदाविज्ञानातला एक भाग असतो रीइनफोर्समेंट लर्निग –  प्रयोगांतून आलेले निष्कर्ष बघून एकंदर धोरण (स्ट्रॅटेजी) ठरवणं. या विषयाचं साधं उदाहरण – फुलीगोळा खेळताना संगणक जिंकला तर त्याला एक गुण, हरला तर उणे एक आणि कोणीच न जिंकल्यास ० गुण. सुरुवातीला संगणक कुठेही खुणा करेल, पण हरल्यास शिक्षा आणि जिंकल्यास बक्षीस या पद्धतीमुळे संगणक कसं जिंकायचं किंवा निदान हरणं कसं टाळायचं हे शिकेल. फुलीगोळा हा सोपा खेळ झाला, संगणक बुद्धिबळही खेळतात आणि भल्याभल्या बुद्धिबळपटूंना हरवतात.

या विषयातलं एक मुख्य तत्त्व असं की, खेळताना शेवटचा निकाल महत्त्वाचा. म्हणजे बुद्धिबळ खेळताना एकेक प्यादं मारलं का नाही, यावरून गुण मिळत नाहीत; शेवटी जिंकलं कोण, यावरून गुण मिळतात. संगणकानं प्रतिपक्षाची बहुतेकशी प्यादी, हत्ती-घोडे, वगैरे मारले आणि तरीही संगणक हरला तर संगणकाला उणे गुणांकन मिळणार. शिक्षा होणार. ही शिक्षा नसेल तर संगणकाला असे खेळ शिकायला आणि जिंकायला खूप वेळ लागतो; वेळप्रसंगी संगणक शिकतच नाहीत. नकारात्मक प्रतिक्रिया दिल्यामुळे संगणक जिंकण्याचं धोरण शिकतो.

असे प्रसंग म्हणजे काय? तर ज्यात एकामागून एक घटना, गोष्टी घडत राहतात. बुद्धिबळात आपण एक प्यादं पुढे सरकवलं की, प्रतिस्पर्धी एक घोडा पुढे करेल. त्यावरून पुढची खेळी आपण ठरवू. म्हणजे मागच्या प्रसंगात काय घडलं आहे, यावरून पुढे काय करायचं, कसं वागायचं हे ठरवलं जातं.

पुन्हा फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर येऊ. सुरुवातीला खातं काढल्यावर आपण मर्यादित लोकांशी जोडलेले असतो. ओळखीचे, शाळेतले, नातेवाईक वगैरे. आपल्या कोणा नातेवाईकांनी एखादी बातमी शेअर केली, आपण त्यावर काही प्रतिक्रिया दर्शवतो; तिथे कोणा अनोळखी मनुष्यानं काही लिहिलेलं असतं, ते आवडलं तर आपण ‘लाइक’ करतो. आपलं लाइक बघून त्यांची विनंती येते, आपण त्यांच्याशी जोडले जातो. ओळखीतून ओळखी वाढत जातात. ओळखी वाढण्याचं मुख्य कारण असतं विचार, मतं आवडणं; किंवा रोज सकाळी एकमेकांना ‘गुड मॉìनग’ म्हणणं, यांसारख्या आवडीनिवडी जुळणं. सुरुवातीला अनोळखी असणारे लोकही जोडले जातात ते परस्परांच्या आवडी समान असण्यामुळे.

समाजमाध्यमांवर नकारात्मक प्रतिक्रिया दर्शवण्यासाठी सोपे पर्याय फार नाहीत. उदाहरणार्थ, आता फेसबुकवर संताप किंवा दुख दाखवण्याची सोय एका क्लिकसरशी आहे. आपत्तीसमयी दुख, संताप व्यक्त करण्यासाठी त्याचा योग्य उपयोग होतो; अशा प्रसंगी दुखासारखी नकारात्मक भावना अपेक्षितच असते. मात्र एरवी आपली आयुष्यं ठीकठाक सुरू असतात. सकारात्मक प्रतिक्रियाच येत राहतात.

कोणी एक विचार व्यक्त करतात, त्यावर प्रतिक्रिया येते, त्यावरून पुढची प्रतिक्रिया येते. संगणक बुद्धिबळ खेळायला शिकतो तसंच. मात्र इथे एक फरक आहे. संगणक खेळायला शिकतो, त्यात जिंकणं-हरणं असतं, हरल्यावर गुण कमी होतात, शिक्षा होते. प्रत्यक्षात आपण माणसं जोडतो तो काही खेळ नाही. त्यात हार-जीत म्हणजे काय त्याचे नियम नाहीत, तसे विचारच बहुतेकदा होत नाही. हरलं नाही तर गुण कमी होणार नाहीत. हार नाही तर जिंकणं तरी कशाला म्हणायचं? पण कोणी तरी आपल्याला ‘लाइक’ ठोकतात, ‘वा, तुमची प्रतिक्रिया आवडली’ म्हणतात, तेव्हा आपल्याला मनातून आनंद होतो, गुण मिळतात. खेळाचा अंतिम निर्णय लागण्याआधीच.

आपलंही एक प्रकारचं ‘रीइनफोर्समेंट लर्निग’ सुरू आहे, पण त्यात मुळातच हरणं म्हणजे काय हे निश्चित नाही, त्यातून गुण जाण्याची भीती फारच कमी आहे. एक तर विरोध करण्यासाठी सोयीचं बटण नाही. दुसरं, विरोध करणाऱ्यांना ब्लॉक करणं, अनफ्रेंड करणं, व्हॉट्सअ‍ॅपवरच्या समूहातून काढूनच टाकणं किंवा आपण स्वत: निघून जाणं असे पर्याय आहेत. आपल्या सोयीचं, आवडेल, रुचेल तेवढंच बघायचं आणि बाकीचं नजरेआड करून टाकायचं, याच्या सहजसोप्या तांत्रिक सोयी आहेत.

तिसरं येतं विदाविज्ञान. विशेषत: फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर. तिथे आपल्या न्यूजफीडमध्ये काय दिसणार, यावर आपला संपूर्ण ताबा नसतो. व्हॉट्सअ‍ॅपचं स्वरूप  निराळं आहे. इतर तिन्ही माध्यमांमध्ये, आपण ज्या प्रकारच्या भावना व्यक्त करतो, त्याच प्रकारच्या पोस्ट्स आपल्या फीडमध्ये मोठय़ा प्रमाणावर दिसतात. ज्या लोकांशी आपण जास्त बोलतो, त्यांच्या पोस्ट्स जास्त दिसतात. समाजमाध्यमांनी माणसांचे असे असंख्य गट केलेले असतात; आपल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचे अंदाज घेऊन. बहुतेकदा आपल्याला आपल्याच गटातली माणसं ‘पीपल यू में नो’मध्ये दिसतात; बाहेरच्या विचार, मत, आवडीनिवडींचा वाराही आपल्याला लागू नये, याची सोय केली जाते.

असं करण्याचं कारण, आपण अधिकाधिक वेळ फेसबुक, ट्विटरवर घालवावा. म्हणजे त्यांचं जाहिरातींचं उत्पन्न वाढेल.

या सगळ्या यंत्रणेत कुठेही नकारात्मक प्रतिसाद मिळण्याची सोय नाही. उदाहरणार्थ नरेंद्र मोदींना ट्विटरवर ‘राहुल गांधींना फॉलो करा’, असं सुचवलं जाईल की, ‘अमित शहांना फॉलो करा’ असं? अर्थातच मोदी-शहा एकत्र दिसणार. हे उदाहरण काल्पनिक असलं तरी प्रत्यक्षात विरोधी किंवा विविध विचारधारा एकत्र न मिसळण्याची पुरेपूर काळजी एक तर तंत्रामुळे घेतली जाते आणि मानवी स्वभाव त्यात भर घालतो.

यातून आपली विचारकूपं (एको चेम्बर्स) आणखी चिरेबंद, नव्हे हवाबंद होतात. एकदा एकानं आत आरोळी दिली की, तो आवाज आपापल्या विचारकूपांमध्ये मोठा होतो आणि वाढतच राहतो. आपल्या समूहाबाहेरच्या लोकांचा द्वेष करणं सोपं असतं; उत्क्रांतीमधून आलेला हा मानवी गुणधर्म आहे (आणि अत्यंत रोचक विषय असला तरी लेखमालेच्या कक्षेबाहेरचा आहे).

पुलवामासारखी अत्यंत क्लेशकारक घटना प्रत्यक्ष आयुष्यात घडते, तेव्हा समाजमाध्यमांवर विचारकूपांमधले मंडूक इतर कूपांमधल्या मंडूकांना नावं ठेवण्यात रममाण होतात. यातून दहशतवाद कमी होत नाही; उलट समाजात दुफळी माजलेली दहशतवाद्यांच्या पथ्यावर पडते; संधिसाधू राजकारण्यांना त्याचा फायदा होतो.

बुद्धिबळात एक प्यादं मारल्यावर संगणकाला गुण मिळत नाहीत; संपूर्ण खेळ जिंकला तरच मिळतात. आपण मात्र आपल्या विचारकूपांमध्ये प्यादी मोजल्यासारखी आपल्याविरुद्ध गटातल्यांना मारलेले टोमणे आणि ठेवलेली नावं मोजत बसतो; यातून नक्की काय मिळणार आहे, म्हणजे खेळाचा शेवट नक्की कसा असावा, याचा विचार न करताच.

सूचना, प्रतिसाद, प्रश्नांचं स्वागत.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com