दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. केजरीवाल यांना मधुमेहाचा गंभीर त्रास आहे. परंतु, तुरुंगात त्यांना मधुमेहावरील औषधं मिळवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांचं कुटुंब त्यांच्यापर्यंत औषधं पोहोचवू शकत नसल्याची तक्रार आप नेत्यांनी केली आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी न्यायालयात याचिका दाखल करून तुरुंगात इन्सुलिन देण्याची मागणी केली आहे. औषधांसाठी केजरीवालांना न्यायालयाचं दार ठोठवावं लागलं आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्ष तुरुंग प्रशासन आणि केंद्र सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनीदेखील यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच राऊत यांनी ते तुरुंगात असताना त्यांच्याबरोबर तुरुंग प्रशासनाने केलेल्या वाईट व्यवहाराची माहिती दिली.