‘लोकांना गृहीत धरू नका’ असे भाषणात वारंवार सांगणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत मतदारांनी अजिबात गृहीत न धरल्यामुळे मनसेचा मुंबईसह महाराष्ट्रात धुव्वा उडाला. शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे थोडीशी आशा मनसे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र ‘देशात राष्ट्रीय पक्ष आणि राज्यात प्रादेशिक पक्षांना विजयी करा,’ असे आवाहन करत, यापुढे लोकसभा निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा करणाऱ्या मनसेला मतदारांनी विधानसभा निवडणुकीतूनही हद्दपारच केले. दोनशेपेक्षा जास्त जागा लढविणाऱ्या मनसेला जुन्नरमध्ये शरद सोनावणे यांच्या रूपाने एकमेव विजय मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


सत्ता आल्यानंतर काम करू शकलो नाही तर ‘राजकीय दुकान’ बंद करेन, असे सांगणाऱ्या राज यांच्या दुकानाकडे मतदार‘राजा’ फिरकलाही नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे सेना-भाजपचे मुंबईतील बहुतेक उमेदवार पडले होते, एवढेच नव्हे तर मनसेचे सहा आमदार विजयी झाले होते. या वेळी मतदारांनी मनसेच्या मुंबईतील सहा आमदारांसह सर्व उमेदवारांना साफ झिडकारले असून सेना-भाजपचे उमेदवार दोन आकडी संख्येत विजयी केले. प्रामुख्याने मराठी मतदारांनीही राज यांच्या मनसेकडे सपशेल पाठ फिरविल्याचे चित्र मुंबई, ठाणे, पुणे व नाशिकसारख्या शहरी भागांत निर्माण झाले असून मनसेसाठी हा पराभव धक्कादायक असल्याचे मनसेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मनसेचे मुंबईतील मावळते आमदार प्रवीण दरेकर, बाळा नांदगावकर, मंगेश सांगळे, शिशिर शिंदे आणि नितीन सरदेसाई यांचा पराभव करून गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा शिवसेनेनेच वचपा काढला. नाशिक या मनसेच्या बालेकिल्ल्यातही सर्व विद्यमान आमदारांना पराभव स्वीकारावा लागला असून पुण्यात काही जागा येतील ही अपेक्षाही फोल ठरली आहे.
शिवसेनेतून बाहेर पडून स्वत:चा पक्ष निर्माण केलेल्या राज यांच्या जोरदार भाषणांमुळे तरुणवर्ग मोठय़ा संख्येने सुरुवातीला मनसेकडे आकृष्ट झाला होता. महापालिका व विधानसभा निवडणुकीतही मनसेचे आमदार व नगरसेवक मोठय़ा संख्येने पहिल्याच फटक्यात निवडून आल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच नाशिक व पुणे पालिकेत मनसेच्या नगरसेवकांनी कोणताच ठसा उमटवला नाही आणि राज यांनीही त्याकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले नाही. एवढेच नव्हे तर पक्षबांधणीकडे राज यांनीच दुर्लक्ष केल्याचा मोठा फटका विधानसभा निवडणुकीत बसून मनसेचे मनसुबे उद्ध्वस्त झाले.
मनसेचा दादर-माहीमचा किल्ला उद्ध्वस्त
मुंबई : दादर-माहीममधील शिवसेनेचा पराभव हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जिव्हारी लागला होता. सेनेचा बालेकिल्ला परत मिळवा, असे आवाहनही बाळासाहेब ठाकरे यांनी निधनापूर्वी दसरा मेळाव्यात चित्रफितीद्वारे केले होते. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राहुल शेवाळे विजयी झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी दादर-माहीमचा गड पुन्हा काबीज करण्यासाठीसारी ताकद पणाला लावली होती. मनसेचे आमदार नितीन सरदेसाई तसेच या विधानसभा मतदारसंघात सातही नगरसेवक हे मनसेचे असल्यामुळे सेनेपुढे बालेकिल्ला जिंकण्याचे मोठे आव्हान होते. त्यातच सेना-भाजप युती तुटल्यामुळे परिस्थिती कठीण झाली होती. तथापि सेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी तसेच शिवसैनिकांनी घराघरात जाऊन प्रचार केल्यामुळे सेनेला आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवता आला. ‘आपलं माणूस’ म्हणून मतदारसंघात आपलेपणा रुजविण्याचा सरदेसाई यांचा प्रयत्नही फारसा कामी आला नाही.

मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns blueprint fails to connect with voters then in lok sabha now in assembly election
First published on: 20-10-2014 at 05:30 IST