शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार नसून मनसेप्रमुख राज ठाकरेंनीही उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे ठाकरे घराण्यातील कोणीही निवडणूक लढविणार नाही हे स्पष्ट झाले. शिवसेनेच्या उमेदवारांनी २८६ मतदारसंघात अर्ज दाखल केले आहेत. ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि कुख्यात अरुण गवळी याची मुलगी गीता गवळी यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, या जिद्दीने शिवसेना निवडणुकीच्या मैदानात उतरलेली असताना ठाकरे निवडणूक लढविणार का, याबाबत उत्सुकता होती. ते कोणत्या मतदारसंघातून लढणार, याविषयी बरीच चर्चा झाली. पण त्यांनी निवडणुकीच्या िरगणापासून लांबच राहणे पसंत केले.
मोदींच्या १५ सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किमान १५ सभा महाराष्ट्रात होणार आहेत. शक्यतो शिवसेनेवर टीकास्त्र सोडू नये, अशी भूमिका घेण्यात आली आहे. मात्र शिवसेनेने भाजप नेतृत्वालाच लक्ष्य केले, तर
मात्र प्रत्युत्तर देण्याची तयारी भाजपने ठेवली आहे. युती तुटल्यानंतर अध्यक्ष अमित शहा शनिवारी मुंबईत होते.
आठवले भाजपसोबत!
शिवसेनेशी केलेल्या मैत्रीमुळे महायुतीत आलेल्या रामदास आठवले यांनी भाजपसोबत युती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद आणि राज्यात  चार मंत्रीपदांसह रिपब्लिकन पक्षाला सत्तेत दहा टक्के वाटा मिळण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर भाजपला साथ देणार असल्याचे जाहीर केले.