माणसाची एक सवय आहे. जे आपल्याला हवे आहे, पण अद्याप मिळालेले नाही त्याचा अभाव माणसाला डाचत असतो (व काही अंशी डाचायला हवादेखील!), पण जे आजपावेतो मिळाले ते तो गृहीत धरू लागतो. जे मिळाले आहे ते जर मिळाले नसते तर आपली काय दुरवस्था असती? याची कल्पना करून बघणे हे सहसा कोणी करत नाही. यामुळे झालेली खर्चबचत अ-नोंदित राहते!

ग्राहकाला पडणाऱ्या खरेदी किमती नोंदल्या जातात. उत्पादकाचे उत्पादनखर्च (ज्या त्याने दिलेल्या किमतीच असतात) नोंदले जातात. ग्राहकाला पडणाऱ्या किमतीपेक्षा मिळणारे उपयोग-मूल्य, किंचित का होईना, पण जास्त मोलाचे (वर्थ) वाटले असणार हे उघड आहे. नाही तर तो ते घेणारच नाही. याचप्रमाणे जर उत्पादनखर्चही भरून निघाला नाही तर उत्पादक अडून तरी बसेल किंवा बुडेलही. उत्पादनखर्चावर किती मार्जिन त्याला मिळाले? हेही पैशात मोजता येते व नोंदलेही जाते.

याउलट ग्राहकाला तो घेत असलेली वस्तू/सेवा, पडणाऱ्या किमतीपेक्षा, ‘किती जास्त मोलाची’ वाटली? व पुढे जाऊन ‘किती जास्त मोलाची’ ठरली? या गोष्टी ग्राहकाच्या मनातच राहून जातात किंबहुना विसरल्याही जातात. ग्राहकाचे-वरकड ही संकल्पना मांडली गेली असली तरी हे वरकड मोजण्याची सोय नसल्यामुळे ही संकल्पना अर्थशास्त्रात अडगळीत पडलेली राहिली आहे.

मी शाळेत असताना फाउंटन पेन प्रचलित होते. शाई भरणे, ती कुठूनही गळणे अशा अनेक कटकटी होत्या. बॉलपेन आल्यावर या कटकटी गेल्या. बॉलपेनची किंमत कमी असते हे मोजले जाते; पण कटकटी वाचल्या हा लाभ कुठे मोजला जातो?

मोबाइल फोन स्वस्त झाले. सुस्थितीतील काही लोक तो फालतू गप्पा मारण्यासाठी वापरत असतीलही. पण ज्यांना रोजच्या रोज काम शोधावे लागते त्यांना मोबाइल फोन ही जास्तच गरजेची वस्तू आहे. मजूर अड्डय़ावर जाऊन वाट पाहात बसणे किंवा लेबर कंत्राटदारावर अवलंबून राहणे यापेक्षा जास्त यशस्वीपणे आणि वेळेत कुठे काम आहे आणि आत्ता कुठे गेले पाहिजे हे त्यांना कळते. ज्यांना काम करवून घ्यायचे आहे त्यांना थेट कामगारांशी संपर्क साधता येतो. असा थेट संपर्क काम करवून घेणाऱ्यालाही एजन्सीपेक्षा सोयीचा पडतो.

पण येथे हे विसरून चालणार नाही की बऱ्याच सुस्थितीतील लोकांनी मोठय़ा प्रमाणात फोन घेतले व नवनवीन मॉडेल्स घेत राहिले. त्या उद्योगाला मोठी मागणी आणि घाऊकतेची किफायतशीरता लाभली म्हणून सेलफोन स्वस्त झाले आणि रोजंदारी कामगारांच्या हातात आले. म्हणजेच वरच्या स्तराचे जीवनमान सुधारले तर त्याचा उपयोग खालच्या स्तराचे जीवनमान सुधारण्यासाठी होऊ  शकतो.

अनेक नवे शोध असे आहेत की ते नसते तर किती खर्च आला असता? असा विचार केल्यास कोणालाही आपले उत्पन्न वाढल्याचेच आढळून येईल. संदेशवहन-क्रांतीमुळे विकेंद्रीकरण, पारस्परिकता, पारदर्शकता यात किती क्रांतिकारी बदल झालेत व होणार आहेत हे आपण जाणतोच. करमणूक उद्योग (दर्जा हा विषय सध्या बाजूला ठेवू) किती जास्त जणांपर्यंत पोहोचला हे आपण पाहू शकतो. नाटकानंतर सिनेमा, त्यानंतर व्हिडीओ कॅसेट्स, नंतर केबलवाले आणि आता डीटीएच डिश! वॉचमन मोबाइलवर सिनेमे पाहात बसतात! गरीब घरातले म्हातारेसुद्धा टाइमपास करू शकतात. मुंबईत लोकलचे तिकीट लायनीत उभे राहून काढण्यापेक्षा स्वत:च प्रवास-तारीख शिक्का मारून घेणे हे सर्वानाच सोपे झाले आहे. रेल्वेचा बुकिंग क्लार्क ठेवण्याचा खर्च वाचतो. पैशांत राष्ट्रीय उत्पन्न कमी होत, पण उपयोगितेतले उत्पन्न? जे मोजले जात नाही, ते वाढत असते.

सर्वाना सोपे आहे म्हटल्यावर कोणत्या उत्पन्नगटाला हाही प्रश्न नाही. ऑनलाइन बुकिंग हे सर्वाना आज परवडणार नाही, पण उद्या तेही परवडेल. सेवा मिळणे आणि सेवा सुलभतेने मिळणे यात फरक असतो. पण तो पैशात व्यक्त होत नाही.

अल्प उत्पन्न गटांनासुद्धा

ग्राहकाचे किती श्रम वाचवून त्याला उपयोगमूल्य मिळवून दिले, या गोष्टीला ‘मूल्य’ असते हे आपण यापूर्वीच पाहिले आहे. टेरिकॉट हे कापड तितकेसे चुरगळत नाही म्हणून त्याला इस्त्री करावी लागत नाही. ते धुण्याला सोपे असते. ते टेरिलीनसारखे चकचकीत नसते. त्यात टेरिलीनइतके उकडत नाही. कॉटनचा स्पर्श मिळतो. प्रचंड मागणी असल्याने ते स्वस्तही असते. या कापडाची किंमत राष्ट्रीय उत्पन्नात दर मीटरमागे कमी भर घालते! पण ग्राहकाचे उपयोगमूल्य आत्ता म्हणले त्या अंगांनी किती तरी वाढलेले असते. मला लहानपणीचे स्पष्ट आठवते की पुण्यासारख्या ठिकाणीही कित्येक लोकांना पादत्राणेच नसत. अनवाणीच चालत. आता फुटपाथवर राहणारा बांगलादेशी गरीबसुद्धा पायात काही ना काही घालतो. प्लास्टिक (सेग्रेगेशन आणि डिस्पोजलमध्ये घोळ असल्याने बदनाम असले तरी) क्रांतिकारक ठरले आहे. बादल्या, घागरी, टमरेले आणि किती तरी कंटेनर्स गरिबांच्या वाटय़ाला आली ती प्लास्टिकमुळे! खुच्र्यासुद्धा किती स्वस्त झाल्या. रेनकोट ही गोष्ट किती स्वस्त झाली. रेग्झिनच्या ऐवजी लेदरच्या बॅगा किती जणांना परवडतील?

हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी सरकारने किती खर्च केला हे मोजले जाते. या योजनेतून अवघडलेपण (विशेषत: स्त्रियांचे), अनारोग्य यापासून मुक्तता तर होतेच. पण आधुनिक जीवनाची सवय लागणे हा सखोल फायदा आहे. पण हे कोणतेच फायदे मोजले जात नाहीत. जात्यावरचे दळण आणि गिरणी, किंवा पाटा-वरवंटा आणि मिक्सर, या बदलात कष्ट किती वाचतात हे कोठे मोजले जाते? एखादा पूल बांधला गेला तर तो ट्रक्स, बसेस, कार्स, स्कूटर्स, सायकली व पायी जाणाऱ्यांनाही अंतरात बचत करून देतच असतो. नवे औषध सापडले आणि पेटंट संपून ते स्वस्तही झाले तर ते सर्वानाच उपलब्ध होत असते. रेल्वे, एसटी महामंडळ अशा सार्वजनिक संस्थांपासून सर्वानाच लाभ होत नाही काय?

एकीकडे सार्वत्रिक भाववाढ होतच असते. पण ती जमेस धरूनही काही गोष्टी तुलनात्मकदृष्टय़ा स्वस्त होतात किंवा स्वस्त राहतात. १९७० च्या सुमारास पन्नास पैशांना मिळणारे अंडे आता पाच रुपयांना मिळते. पण याच कालखंडात जेवढी सार्वत्रिक भाववाढ झाली ती लक्षात घेता अंडे स्वस्त राहिले आहे. पोल्ट्री उद्योगातली उत्पादकता वाढल्यानेच हे घडले आहे.

औषधांच्या किमती पेटंट असेपर्यंत जास्त असतात व पेटंट संपले की कमी होतात. त्यांच्यावरील खर्च मोजला जातो, पण आजार टाळण्याने, लवकर बरे होण्याने पेशंटचा त्रास कमी होतोच. इतकेच नव्हे तर कधी एक पॅरासिटेमॉल एक रजा टाळू शकते. उत्पादनखर्च किरकोळ, किंमतही किरकोळ पण मूल्य-प्राप्ती खूपच जास्त, असे हे प्रकरण आहे. लसीकरणाने किती दु:खे टळली? एके काळी कित्येक थोर लोक अल्पायुषी ठरले व याने किती नुकसान झाले याची मोजदाद कोण आणि कशी करणार?

 महागडय़ा वस्तूंची उपयोगिता कमी

साध्या मारुतीपेक्षा मर्सिडीज गाडी जितके पट महाग असते तितके पट ती सुखावह असते का? उंची मद्यांचेही तसेच आहे. चव जरी जास्त चांगली असली तरी ती किमतीच्या प्रमाणात जास्त चांगली नक्कीच नसते. (काही वेळाने चव दुय्यम बनते हे आहेच!) महागडय़ा कॉफी शॉपमधली कापुचिनो मिळमिळीत असते. इम्पोर्टेड सिगारेटने तलफच भागत नाही. फाइव्ह स्टार हॉटेलला स्टार का मिळतात तर उदाहरणार्थ स्विमिंग पूल आहे की नाही वगैरे. ज्याला पोहायचे नाही त्याला काय उपयोग? प्लॅटिनम हा धातूसुद्धा दुर्मीळ आणि महाग आहे. तो कसा दिसतो? दिसण्यात काहीच विशेष नाही- केवळ दुर्मीळतेमुळे महाग- हेच त्याचे मूल्य आहे. यालाच मी प्रतिष्ठामूल्य म्हणतो. सोने, चांदी, रत्ने यांबाबतीतही असेच आहे. नाही तरी ज्वेलरी हे एक ‘इमिटेशन’च आहे! मग इमिटेशन-ज्वेलरीत काय वाईट आहे? कोल्हापुरी साज हा चांदीवर सोन्याचा मुलामा असाच अधिकृतपणे असतो. पण ‘आपल्याला दागिना घेतला’ यातले जे समाधान आहे ते इमिटेशनमुळे कमी होत नाही.

शॉपिंग म्हणून जे चालते त्यात कित्येकदा ‘खरेदी केली’ याचा त्या क्षणी होईल तेवढाच आनंद आणि वापराच्या बाजूने पहाल तर ती वस्तू पडीक राहणे असेच जास्त घडते. सारांश, ग्राहकाला उपयोगमूल्यात मिळणारे प्रत्यक्ष लाभ आर्थिक आकडेवारीत दिसत नाहीत आणि विशेष म्हणजे हे लाभ निम्नस्तरांना जास्त व उच्च स्तरांना कमी मिळतात. उत्पन्न-विषमतेपेक्षा उपयोग-विषमता कमी असते!

– राजीव साने

rajeevsane@gmail.com