प्रतीक धानमेर

काम करून घेणाऱ्यांनी थकवलेली प्रचंड रक्कम हे एखाद्या वास्तुविशारद आणि अभिकल्पकाराच्या आत्महत्येचे कारण ठरू शकते, याची पुरेशी दखल आता- अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण धसाला लावले जात असताना तरी- घेतली जायला हवी. आर्किटेक्ट, इंटीरिअर डिझायनर यांनी अशा बुडणाऱ्या पैशांबद्दल बोलायला हवे आणि ‘या व्यवसायात लोक पैसे बुडवतातच’ हा शिरस्ताही थांबायला हवा..

अर्णब गोस्वामी पकडला गेला आणि सुटलाही. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येवर घसा फोडून ओरडणारा अर्णब स्वत: कोणाच्या तरी आत्महत्येला कारणीभूत होता. त्यात तो नक्की दोषी आहे-नाही हा वेगळा (वेगळं राजकारण म्हणणं जास्त समर्पक ठरेल) विषय; पण आत्महत्या आणि मानसिक तणाव हे न चर्चा होणारे मुद्दे राजकारणात झाकले गेले. आणि एक वास्तुविशारद म्हणून मलाही हा मुद्दा ठळकपणे पुढे ठेवावास वाटतो, कारण मे २०१८ मधील ती आत्महत्या माझ्या व्यवसायक्षेत्रातील एकाची होती.

वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने पाच मे २०१८ रोजी आत्महत्या केली, कारण-  अर्णब गोस्वामीसह तिघा बडय़ा ‘क्लायंट’नी किंवा सेवाग्राहकांनी, केलेल्या कामाचे पैसे (एकंदर पाच कोटी ४० लाख रुपये) दिले नाहीत. अर्थातच त्या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या कंत्राटदार आणि मेस्त्रींनी अन्वय नाईक यांच्याकडे तगादा लावला आणि त्याचा ताण ते घेऊ शकले नसणार.

आजदेखील, कोणत्याही वास्तुविशारदाला भेटाल तर या अशा पैसे न मिळण्याच्या घटना (इतक्या मोठय़ा रकमेच्या नसल्या तरी) त्यांच्यासाठी नव्या नाहीत. प्रत्येक आर्किटेक्ट असा आलेला ‘अनुभव’ सांगेल. मी स्वत: माझ्या फीसचा शेवटचा हप्ता मिळणार नाही हे गृहीत धरूनच प्रोजेक्टला हात घालतो. माझ्या कित्येक आर्किटेक्ट मित्रांना क्लायंटकडून पैसे मागताना अवघडल्यासारखे वाटते. मुळात या क्षेत्रात, केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळवणे म्हणजे स्वत:चेच पैसे दुसऱ्याच्या खिशातून घेण्यासारखे मानले जाते.

पाश्चात्त्य देशांत वास्तुविशारद आणि इंटीरिअर डिझायनरला- अंतर्गत अभिकल्पकाराला-  मिळणारा सन्मान आणि आर्थिक मोबदला इथे दुरापास्त आहे. आर्थिक मोबदला कमी द्यावा लागेल म्हणून भरपूर सन्मान देण्याचा देखावा आम्हाला काही नवा नाही.

पैसे कमी घ्यावे आणि जवळजवळ फुकटात काम करून घेण्यासाठी जे काही क्लायंट आम्हाला सांगतात त्याची एक भली मोठी यादीच आहे माझ्याकडे. ‘‘साहेब, हे काम केलं तर तुमचंच नाव होईल’’ किंवा, ‘‘हे काम केलं तर आजूबाजूची खूप कामं मिळतील’’ या त्यातल्या काही नेहमीच्या ओळी.

एकदा गप्पांच्या ओघात माझ्या आर्किटेक्ट मित्राने एक घटना सांगितली. त्याचा कुठलासा भाचा आर्किटेक्चर करायचे म्हणून समुपदेशनासाठी गेला होता. त्या वेळी त्या कौन्सिलरने त्याला सांगितले- ‘‘आर्किटेक्ट्स आर लेट ब्लूमर्स’’ (या व्यवसायात फळे उशिरा मिळतात). त्यावर माझा मित्र म्हणाला – लेट म्हणजे नक्की कधी ते वयसुद्धा सांगा, तेवढाच आम्हाला दिलासा! विनोदाचा भाग सोडला तरी हे वास्तव ९५ टक्के वास्तुविशारदांसाठी सत्य आहे.

वास्तविक आर्किटेक्ट हा कोणत्याही प्रकल्पामध्ये सूत्रधार असतो. क्लायंट, कंत्राटदार आणि वेगवेगळ्या एजन्सींमध्ये तो सुसूत्रता आणण्याचा काटेकोर प्रयत्न करत असतो. केवळ अभिकल्प आणि संकल्पना यांच्या पलीकडे जाऊन येनकेनप्रकारे प्रकल्प समाधानकारकरीत्या क्लायंटच्या हातात सोपवणे हे त्याचे अंतिम ध्येय असते. मी आजपर्यंत प्रत्येक आर्किटेक्टला स्वत:च्या कामात जीव ओतताना पाहिले आहे. कदाचित आमचे शिक्षण आणि जडणघडण तशीच झालेली असते. हे सारे करूनही, प्रकल्पात जराही कुठे कमीजास्त झाले तर त्याचा आर्थिक आणि मानसिक भार आर्किटेक्टच्याच माथी येतो. सुरुवातीच्या काळात एका क्लायंटसह पहिल्याच मीटिंगमध्ये क्लायंटने ‘डिझाइन आणले का?’ विचारले. मी म्हटले – ते करायला काही वेळ लागतो. तेवढय़ात बाजूला बसलेल्या कंत्राटदाराने एक फाइल काढली आणि बंगल्याचे ‘थ्रीडी’ फोटो त्यांना दाखवायला सुरुवात केली. काम मला मिळाले नाही.. हे ठरलेच होते. तयार ‘थ्रीडी’ फोटोंनाच पसंती मिळणार होती, वेळ घेऊन केलेल्या विशिष्ट रचनेला नव्हे!  ‘वास्तुविशारद बांधकामाचा सखोल आणि सारासार विचार करतो’ हे मार्केटला कधी समजेल असे वाटत नाही.

कित्येकदा पैसे थकूनही आर्किटेक्ट काम पूर्ण व्हावे म्हणून झिजत राहतात आणि काम झाल्यावर ५० टक्के मोबदलाही मिळत नाही. केलेल्या कामात काहीतरी खोट दाखवून पैसे कमी करणे हे आम्हाला पाचवीला पुजलेले आहे. माझ्या एका वास्तुविशारद मैत्रिणीला काम पूर्ण झाल्यावर क्लायंटने पैसे दिले तर नाहीतच उलट ‘एस्टिमेट’मध्ये घोळ केल्याचा आरोप करून वरचे पैसे परत मागितले. त्या वेळी तिला आलेला मानसिक तणाव मी पाहिला आहे.

कित्येकदा सुरुवातीपासूनच गुडविल करण्याच्या नादात आर्किटेक्ट कोणताही मोबदला न घेता साइट व्हिजिट (क्षेत्रभेट) करतात. प्रवास खर्च, गेलेला वेळ आणि अशा विनामोबदला केलेल्या अनेक क्षेत्रभेटी यांचे गणित शेवटाला नुकसानीतच जाते.

आमचे सल्लागार आणि वकील असलेल्या अमित सरांनी एकदा एक छान उदाहरण दिले – ‘‘व्यावसायिक आणि व्यापारी यांत भरपूर फरक असतो. व्यावसायिक उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो तर व्यापारी मोबदला किती मिळेल हे पाहत असतो.’’ आर्किटेक्टच्या कामाचा आर्थिक मोबदला हा संभ्रमाचा विषय यांसाठी आहे कारण ती एक संकल्पना असते, वस्तू नाही. आणि फुकट सल्ले आणि संकल्पनांची आपल्याला सवय आहे. तसेच आर्किटेक्टचे काम हे ‘पूर्ण’ झाल्यावर दिसते. आणि जेव्हा ते दिसते तेव्हा आर्किटेक्टची गरज क्लायंटला नसते. ही एक विचित्रच परिस्थिती आहे.

माझ्या व्यावसायिक मित्राने एकदा, आलेले प्रोजेक्ट आणि पूर्ण झालेले प्रोजेक्ट (फीसकट ) यांची टक्केवारी काढली. पूर्ण झालेले प्रोजेक्ट केवळ ४० टक्के होते. त्यावर दुसरा मित्र म्हणाला – वाह, मी तर २५ टक्के वर आहे अजून. बहुतांशी आर्किटेक्ट जरी हे विषय हसण्यावारी नेत असले तरी, थकीत रक्कम मोठी असल्यास याचा येणारा मानसिक तणाव प्रत्येक वेळी नजरेआड करता येणार नाही.

सध्या आर्किटेक्चर महाविद्यालयांची संख्यासुद्धा झपाटय़ाने वाढते आहे. भविष्यात इंजिनीअरप्रमाणे आर्किटेक्टांचीसुद्धा गर्दी होणार हे उघड आहे. त्या वेळी कमी मोबदल्यात काम करणे आणि स्पर्धेत टिकणे यांचे प्रमाण प्रचंड वाढेल. कामाची गुणवत्ता पर्यायाने ढासळेल. कित्येक नामवंत आर्किटक्ट आजही कमीतकमी मोबदल्यात काम करून जास्तीतजास्त कामे स्वत:कडे ओढत आहेत. माझा एक मित्र एका लायसनिंग फर्ममध्ये कामाला होता. त्याने मला तिथल्या कामाची ‘छापखाना’ पद्धत सांगितली होती. त्या फर्मकडे ‘वन बेडरूम-हॉल-किचन’ (बीएचके),  ‘टू बीएचके’, ‘थ्री बीएचके’ असे हजारो टेम्प्लेट होते. क्लब, पार्किंग यांचेसुद्धा लेआउट ऑटो कॅड सॉफ्टवेअरमध्ये तयार होते. कोणताही प्रोजेक्ट आला की त्या दिवसाच्या संध्याकाळी वर्किंग ड्रॉइंगचा सेट क्लायंटकडे जायचा, (वर्किंग ड्रॉइंगपर्यंत काम पोहोचायला सामान्य आर्किटेक्टला साधारण २ महिने लागतात) अगदी लायसन्स ड्रॉइंगसकट!  एका एका वेळेला ६० ते ७० प्रकल्प धडाधड संपवले जायचे. त्यापैकी १०-१५ बिल्डरांनी फी बुडवली तरी फरक पडायचा नाही. या सगळ्या प्रकारात आपणच आपल्या क्षेत्राची माती नाही करत आहोत का? स्पर्धा असावी पण ती नीतिमत्तेवर आधारित नसावी का? असे प्रश्न मला पडतात.

या अशा ‘छापखाना’मय (तो तरी बरा!) परिस्थितीत, ‘आपल्या देशात सौंदर्यदृष्टीचा अभाव आहे’ यावर तोंडसुख घेण्याचा कोणालाही अधिकार आहे का? या अशा परिस्थितीत बकाल वस्त्या उभ्या राहणार नाही तर काय होणार? देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे नियोजन कसे होणार?

एकंदरीत, आर्किटेक्चर क्षेत्रावर तणाव आहे आणि अन्वय नाईक यांची आत्महत्या त्याचेच सर्वासमोर आलेले उदाहरण. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अर्णब त्या आरोपांतून सुखरूप सुटेलही पण माझ्या व्यवसायबंधूंसाठी मला असे वाटते की, आपल्या क्षेत्राची वाताहत आपणच नाही का थांबवायची? एकदा याचा विचार नक्कीच करावा. आणि ज्यांना ज्यांना फीस घेण्याचा मूलमंत्र समजला आहे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनासुद्धा हे शिकवावे. एखाद्या आर्किटेक्टला प्रोजेक्टवरून काढल्यावर अथवा त्याने स्वत:हून प्रोजेक्ट सोडल्यावर दुसऱ्या आर्किटेक्टने तो प्रोजेक्ट घेताना मूळ आर्किटेक्टशी संवाद साधावा, आधीच्या आर्किटेक्टवर अन्याय झाला असेल तर त्या प्रकल्पाला सर्वानीच बहिष्कृत करावे. याने एक पायंडा पडेल. आणि या क्षेत्रात ढासळलेली नीतिमत्ता पुन्हा मजबूत करता येईल.

अन्वय नाईक हे केवळ एक उदाहरण. मानसिक ताण पराकोटीला जाऊ शकतो आणि त्यासाठी क्लायंट कारणीभूत असू शकतात, याचे. पण त्या ‘केस’विषयी हा लेख नाही. आज प्रत्येक आर्किटेक्ट, प्रत्येक इंटीरिअर डिझायनर एकेकटा आहे. त्यामुळेच हा लेख केवळ वाचला जाऊ नये, त्यावर चर्चा व्हावी आणि एक योग्य बांधकाम चळवळ अस्तित्वात यावी ही अपेक्षा आहे.

(लेखक अभिकल्पकार (डिझायनर) असून एका अंतर्गत रचना-अभिकल्प संस्थेशी संबंधित आहेत.)

pratik@designjatra.org