loksatta-verdha
दक्षिण मुंबईत फिरताना इंग्लंडमधील एखाद्या शहरात फिरतोय, असंच वाटत राहतं. निळ्या आकाशाच्या पोटात घुसण्याऐवजी त्या आकाशाशी सावध सलगी करू पाहणाऱ्या ब्रिटिशकालीन इमारतींमुळे हा परिसर देखणा वाटतो. दक्षिण मुंबईतील या वैभवशाली वास्तू हाच मुंबईचा खरा अमूल्य ठेवा आहे..
देशाची आर्थिक राजधानी आणि एक जागतिक शहर ही मुंबईची ओळख आता नवीन नाही. ‘मुंबई’ ही तीन अक्षरे उच्चारल्यावर बहुतेकांच्या मनात असंख्य चित्रांचा स्लाइड शो सुरू झाल्यास नवल वाटणार नाही. पण या शहरातील अमूल्य अशा वास्तूंच्या गतवैभवाबद्दल आजच्या तरुणांना खूपच कमी माहिती आहे. पोर्तुगीज राजकन्येकडून हुंडय़ात ब्रिटिशांना मिळालेल्या सात बेटांपासून ते ती बेटे एकत्र येऊन एक शहर तयार होण्यापर्यंत मुंबईचा प्रवास अद्भुत आहेच. पण १८७२ मध्ये या शहराला ब्रिटिश साम्राज्यातील दुसरे शहर असा दर्जा मिळाला, ही गोष्टही तेवढीच अद्भुत म्हणायला हवी. या शहरातील नागरी पायाभूत सुविधांचा आराखडा ब्रिटिशांनी तयार केला, यात दुमत नाही. पण तो राबवण्यासाठीचा पैसा आणि श्रम मात्र भारतीयांचे आणि खास करून मुंबईकरांचेच होते. यातूनच १९व्या शतकात मुंबई एक महत्त्वाचे औद्योगिक आणि आर्थिक केंद्र म्हणून उदयाला आले. विभिन्न समाजांच्या, जातींच्या आणि भाषांच्या लोकांच्या साहचर्यामुळेच मुंबईला अठरापगड चेहरा मिळाला. हा अठरापगड चेहरा मुंबईच्या गतवैभवातून सहज डोकावतो. मग ते गतवैभव म्हणजे वास्तू असोत, वास्तुशैली असो, खाद्यसंस्कृती असो, वेशभूषा असो, भाषा असो किंवा उत्सव असोत!
ब्रिटिशांची वसाहत असलेल्या भारतातील मुंबई हे ब्रिटिशांचे अत्यंत महत्त्वाचे केंद्र होते. त्यामुळे या शहराने ब्रिटिश आमदनीत इमारत बांधकामाच्या पद्धतीत परिवर्तन झालेले पाहिले. मुंबईतील एकापेक्षा एक सरस वास्तूंमधून तीन पद्धतींच्या वास्तुशैली ठळकपणे दिसतात. त्या म्हणजे ग्यॉथिक, इंडो-सारसेनिक आणि आर्ट डेको! व्हिक्टोरियन आमदनीत, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश राजघराण्याकडे भारताची सत्ता हस्तांतरित झाल्यावर शहरात बांधल्या गेलेल्या सर्वच इमारतींवर साम्राज्यवादी मिजाशीचा ठसा दिसतो. यांची अगदी ठळक उदाहरणे द्यायची झाली, तर व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस), उच्च न्यायालय, मुंबई महापालिकेचे मुख्यालय आणि फोर्ट येथील मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवर, कॉवसजी जहांगीर दीक्षान्त सभागृह आदी इमारती सहज डोळ्यांसमोर येतात.
या इमारतींवरील घुमट, कमानी, रंगीत काचेच्या तावदानांचा स्थापत्यशैलीतील वापर ही सर्व मुंबईच्या इमारतींच्या बांधणीत वापरलेल्या ग्यॉथिक शैलीची काही वैशिष्टय़े आहेत. एफ. डब्ल्यू. स्टिव्हन्स किंवा जॉर्ज स्कॉट यांसारख्या ब्रिटिश स्थापत्यविशारदांनी आखलेल्या डिझाइन्सवर आधारलेल्या इमारती आजही मुंबई शहरासाठी अभिमानाचे बिंदू ठरतात. गमतीचा भाग म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील इमारतींचे स्थापत्यविशारद स्कॉट यांनी मुंबई शहराला एकदाही भेट दिली नव्हती. मात्र त्यांनी आखलेल्या आराखडय़ांच्या आधारे ले. कर्नल जे. ए. फुलर (अधीक्षक अभियंता), रावबहाद्दूर मुकुंद रामचंद्र (साहाय्यक अभियंता) आणि नागोजी सयाजी (कंत्राटदार)या तिघांनी तंतोतंत इमारतींची उभारणी केली. अमेरिकेत १८६१मध्ये सुरू झालेल्या नागरी युद्धाचा फायदा मुंबईतील कापड व्यावसायिकांना मोठय़ा प्रमाणात झाला. त्यापैकी एक होते प्रेमचंद रायचंद हे जैन व्यावसायिक आणि शेअर दलाल! या व्यवसायात मिळालेल्या नफ्यातील मोठा वाटा प्रेमचंद रायचंद यांनी विद्यापीठ संकुलातील टॉवर आणि वाचनालय यांच्या बांधकामासाठी देणगी म्हणून दिला. त्यांच्याच इच्छेनुसार या टॉवरला त्यांच्या आईचे म्हणजेच राजाबाई रायचंद यांचे नाव देण्यात आले. त्यांच्या देणगीतून उभी राहिलेली ही वास्तू म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि अनावर्त वास्तूरचनेचा उत्तम नमुना आहे. समुद्रावरून येणारे वारे या टॉवरचा आणि वाचनालयाचा अंतर्भाग थंड ठेवतात, तर कमानींनी वेढलेले व्हरांडे या इमारतीचे मुंबईच्या महाकाय पावसापासून संरक्षण करतात. लंडनमधील अल्बर्ट मेमोरियल, सेंट पॅनकार्स स्थानकावरील मिडलँड ग्रँड हॉटेल, कॉमनवेल्थचे कार्यालय या लंडनमधील वास्तूंची स्थापत्य रचनाही जॉर्ज स्कॉट यांनीच केली आहे.
१९व्या शतकाच्या अखेरीस आणि २०वे शतक सुरू होताना इंडो-सारसेनिक शैलीने मुंबईतील वास्तूंवर आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली. पाश्चात्त्य आणि भारतीय घटकांचे एकीकरण असलेली ही शैली आपल्याला गेटवे ऑफ इंडिया, द प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम (छत्रपती शिवाजी महााज वस्तू संग्रहालय), जीपीओ इमारत आणि परळ येथील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय (केईएम) या इमारतींमध्ये प्रकर्षांने जाणवते. मुंबईतील इमारतींमध्ये या शैलीचा अंतर्भाव करण्याचे श्रेय जॉर्ज विटेटसारख्या स्थापत्य विशारदांकडे जाते. विशेष म्हणजे गेटवे ऑफ इंडिया किंवा प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम या दोन्ही वास्तूंच्या आराखडय़ासाठी एक स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेतून विटेट यांच्या आराखडय़ांची निवड करण्यात आली. ते किती उत्कृष्ट होते, हे आता आपल्याला या दोन्ही वास्तू पाहून लक्षात येईलच.
पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात आणखी एका नव्या वास्तुशैलीने मुंबईत आपल्या खुणा दाखवण्यास सुरुवात केली. या शैलीची सुरुवात फ्रान्समध्ये झाली आणि १९२०-१९३० या दशकांत मुंबईत उभ्या राहिलेल्या अनेक वास्तूंमध्ये या शैलीचा ठसा दिसला. आर्ट डेको या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शैलीने लवकरच मुंबईत आपला जम बसवला. ‘राणीचा रत्नहार’ अशी ओळख असलेल्या मरिन ड्राइव्हच्या सान्निध्यात उभ्या असलेल्या अनेक इमारती या शैलीचे उत्तम उदाहरण आहेत. अशा प्रकारे आर्ट डेको शैलीतील एवढय़ा इमारती एकत्र असलेले मुंबई हे मियामी खालोखालचे दुसरे शहर आहे. रिगल, इरॉस आणि मेट्रो ही मुंबईकरांची आवडती चित्रपटगृहेदेखील आर्ट डेको शैलीतच बनलेली आहेत. दक्षिण मुंबईतील अनेक निवासी इमारती बांधताना या सोप्या आणि तरीही रेखीव शैलीचाच वापर झाला आहे. प्रमाणबद्ध रचना, नैसर्गिक वारा येण्यासाठी सौध आणि खिडक्या यांचा पुरेपूर वापर ही या शैलीची काही वैशिष्टय़े आहेत.
या तिन्ही शैलींतील अनेक सुंदर वास्तू आजही मुंबईत दिमाखात उभ्या आहेत. या तीन शैलींव्यतिरिक्त इतर शैलींचाही अंतर्भाव मुंबईतील वास्तूंमध्ये आहे. त्यात व्हर्नाक्युलर शैली, चाळ, आदी अनेक शैलींचा समावेश आहे. भविष्यात मुंबई शहराचे नियोजन करताना हा वास्तूंचा अमूल्य ठेवा, मोकळी जागा आणि या वास्तूंच्या भोवतालची जागा सांभाळणे आवश्यक आहे. या वैभवशाली इमारतींपैकी अनेक इमारतींमधील स्थापत्यशैली मौल्यवान असून या इमारती अगदी जुजबी डागडुजी करूनही दिमाखात उभ्या राहू शकतात, असे अनेक नागरी नियोजनकार सांगतात. त्याऐवजी पुनर्विकासाच्या नावाखाली टॉवर उभारण्याने काहीच साध्य होणार नाही. या गगनचुंबी इमारतींमध्ये घर घेणे शहरातील ९५ टक्के लोकांना परवडणारे नाही. त्यामुळे आता राज्य सरकार, शहर नियोजनकार, स्थापत्य विशारद आणि मुंबईकर यांनी एकत्र येत शहराच्या विकासासाठी एक सर्वसमावेशक भूमिका घेण्याची वेळ आली आहे. अशी भूमिका ज्यात पर्यावरणाचा समतोल आणि शहरातील अमूल्य वास्तूंचे गतवैभव जपले जाईल.
(लेखिका मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागप्रमुख आहेत.)