28 February 2021

News Flash

बाजारपेठा, अ‍ॅमेझॉन, बिटकॉइन आणि सार्वभौमत्व

फ्लिपकार्टने भारतीय बाजारात २००७ साली उडी घेतली, तर स्नॅपडीलने २०१० मध्ये भारतात व्यवसाय सुरू केला.

प्रतिनिधिक छायाचित्र

नव्याने उदयाला येणाऱ्या एका नव्या अर्थ-भू-राजकीय साम्राज्याला आपण इच्छा असो वा नसो, सामोरे जात आहोत. डार्विनच्या उत्क्रांतिवादानंतर उदयाला येणारा हा सिलिकॉन व्हॅलीचा नवीन ‘डिजिटल उत्क्रांतीवाद’ नागरिकाला राजकीयदृष्टय़ा अभिव्यक्तिस्वातंत्र्यहीन, परावलंबी करून सोडेल. राष्ट्रांचे आणि पर्यायाने व्यक्तीचे सार्वभौमत्व यातून दुबळे होत जाणार आहे.

जसजशी मानवी संस्कृती प्रगत होत गेली, तसतशी माणसाची जीवनशैली बदलत गेली. जीवनशैलीत होणाऱ्या सुधारणांनुसार नव्या वस्तू व सेवांची मागणी बाजारात निर्माण होऊ लागली. सुधारित जीवनशैलीतून अधिक चांगल्या गुणवत्तेच्या मालाची मागणी वाढत गेली. बाजारात आलेल्या नवनव्या वस्तूंचा उपभोग घेण्यासाठी माणसाला काही तरी निमित्त लागते आणि सण, उत्सव यामुळे हे निमित्त सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक स्तरावर सहजगत्या मिळून जाते. म्हणून वैविधतेने नटलेले सण-उत्सव हा भारतीय बाजार व्यवस्थेचा पाया आहे. तसेच सणांचे वेळापत्रकही आगाऊ कळते. त्यामुळे मालाची आवक-जावक आखता येते.

बाजार आणि अर्थव्यवस्था

मालाची मागणी वाढल्यावर त्या मालाच्या उत्पादनासाठी अधिकाधिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात. त्यासाठी अधिक गुंतवणूक होते आणि यातून रोजगारनिर्मिती होते, त्यामुळे एकूण समाजाच्या मिळकतीत भर पडते, पुन्हा मागणी वाढत जाते. अशा चक्राकार गतीने केन्सप्रणीत (अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड केन्स) सिद्धांतानुसार (Accelerator and Multiplier effect, Full employment) अर्थव्यवस्था अधिक वेगाने पुढे पुढे सरकते. भांडवली अर्थव्यवस्थेचे व बाजारपेठांचे हे अभिजात प्रारूप असून, आता ते नव्याने सिद्ध करण्याची गरज नाही. खुल्या अर्थव्यवस्थेसाठी, सातत्याने होणारा भांडवलाचा, तसेच कच्चा माल, सेवा, मनुष्यबळ आणि साधनसामग्रीचा अविरत पुरवठा ही या सिद्धांताची मूलभूत गरज आहे.

नागरी समाजात बाजाराचे स्थान

अ‍ॅडम स्मिथ या आद्य अर्थतज्ज्ञाच्या मते, ‘श्रमविभागणी ही बाजाराच्या आकारावर/ व्याप्तीवर अवलंबून असते.’ नैसर्गिक व आनुवंशिक कौशल्ये ही बाजारपेठांमुळे जन्माला येतात, वाढतात. हा नियंत्रित बाजार कसा काय निर्माण झाला आणि त्याचा उगम नेमका कसा आणि कुठे झाला हे आता निश्चितपणे सांगता येणार नाही. पण ११व्या शतकापासून अनेक खुल्या बाजारासंदर्भातले दस्तावेज बऱ्यापैकी उपलब्ध आहेत. त्या काळात संपूर्ण युरोपमध्ये नियोजित, नियंत्रित बाजारपेठा आणि त्या अनुषंगाने नवीन शहरवस्त्या निर्माण होऊ लागल्या होत्या. बाजार व्यवस्था निर्माण होणे व त्यांचा विस्तार होणे हे व्यापारउदिमाच्या वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. मार्क कॅसन आणि जॉन एस. ली. हे बाजार-तज्ज्ञ असे म्हणतात की, ‘‘यशस्वी ठरलेल्या ऐतिहासिक बाजारपेठा या स्थानिक नागरी अधिकाऱ्यांनी नियमित केल्या होत्या आणि त्यातून मालाची योग्य किंमत व गुणवत्ता राखणे हा त्यांचा हेतू होता.’’

अभिजात अर्थशास्त्रात बाजारपेठेचे वर्णन सर्वसाधारणपणे मागणी आणि पुरवठा यांच्यामधील छेदनिबदू स्थळ असे केले जाते. यामुळे एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या बाजारशक्ती बाजार -किमतीचा- गुणवत्तेचा तोल सांभाळतात, तसेच उपभोक्त्यांना गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करणारे प्रत्यक्ष (भूतलावरचे) एक ठिकाण, अशी बाजाराची पारंपरिक संकल्पना रूढ झाली आहे.

भारताची पावसाळी शेतीप्रधान अर्थव्यवस्था : एक उदाहरण

भारतातील जवळजवळ ८० कोटी लोक (६०%) ग्रामीण भागात राहतात. त्यांचे जीवन पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते. भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनांपैकी १७.३% उत्पादन ग्रामीण क्षेत्रातून येते. पावसाने दगा दिल्यास त्याचा कृषी क्षेत्राला फटका बसतो. याचा दुष्परिणाम देशाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीवर होतो. पाऊस चांगला पडल्यास शेतीचे उत्पन्न, तसेच शेतकऱ्याची आवकही वाढते. शेतकऱ्यांसाठी हे सुगीचे दिवस असतात. त्यामुळे पावसाळ्यात, विशेषत: श्रावण महिन्यात येणाऱ्या सणवारांचे बाजार हे अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे घटक ठरतात. भारतातली जवळजवळ ५० टक्के शेती प्रत्यक्ष पावसावर अवलंबून आहे. देशात जवळजवळ ७०% पाऊस जून ते सप्टेंबर या पावसाळी हंगामात पडतो. त्यामुळे देशातील २६३ दशलक्ष शेतकऱ्यांसाठी हा हंगाम उत्पन्नाच्या आणि खर्चाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. निसर्ग आणि बाजार यांचा तडक परस्परसंबंध यातून स्पष्ट होतो.

भारतीय सण, उत्सव आणि तेजी : एक आढावा रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा-

श्रावण (ऑगस्ट) महिन्यात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाच्या काळात जवळजवळ ४०० कोटी रुपयांची उलाढाल बाजारात होते.

गणेशोत्सव- या काळात जवळजवळ २० हजार कोटींची उलाढाल होते आणि त्यात दर वर्षी २० टक्के वाढ होत असते. जवळजवळ २० हजार कुटुंबांना वर्षभर काम मिळते.

दुर्गापूजा व नवरात्री-  या उत्सवात ४० हजार कोटींची उलाढाल होते.

दिवाळी- या काळात १२ हजार कोटींची उलाढाल होते. शिवाय, हल्ली या सणाच्या निमित्ताने ऑनलाइन सेल ८० टक्क्यांनी वाढलेले पाहायला मिळतात.

असे पावसावर अवलंबून असलेले अनेक सण-उत्सव भारतीय स्थानिक बाजारपेठा आणि पर्यायाने अर्थव्यवस्था चालवीत असतात.

आता वस्तूंच्या सहज उपलब्धतेमुळे, टीव्ही, स्मार्ट फोनमुळे सण साजरे करण्याची ग्रामीण भारतीयांची हौस खूप वाढलेली दिसते. इंटरनेट, ऑनलाइन शॉिपग उदा. ‘फ्लिपकार्ट’, ‘अ‍ॅमेझॉन’, ‘बायडू’ (चिनी) अशा अनेक कंपन्या प्रत्यक्ष बाजाराचा (Real Market) ताबा मिळवण्यासाठी ऑनलाइन शॉिपगचा पर्याय घेऊन पुढे आल्या आहेत. प्रत्यक्षात हजार रुपये किंमत असलेली वस्तू त्या ७०० रुपयांत देऊ लागल्या, नुकसान सोसून! पण हे नुकसान प्रत्यक्षात कोण सोसते? तर त्या कंपन्यांमधील गुंतवणूकदार! हे नुकसान सोसून या गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या बाजाराला पर्याय निर्माण करावयाचा आहे. त्यांच्यासाठी हे नुकसान म्हणजे गुंतवणूक आहे.

आज ‘अ‍ॅमेझॉन’ ही ऑनलाइन बाजारातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. ‘अ‍ॅमेझॉन’ या कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष जेफ बेझोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. हे कसे व का झाले, ते पाहू. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार जेफ बेझोस यांची एकूण संपत्ती सुमारे १२७ अरब डॉलर आहे. दहा वर्षांपूर्वी अ‍ॅमेझॉनची बाजारातील किंमत २७ अरब डॉलर इतकी होती, ती आज सुमारे ७२७ अरब डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या काही वर्षांत ई-कॉमर्सच्या जगात झालेल्या वाढीमुळे आणि वाढत्या ऑनलाइन शॉिपगच्या प्रभावामुळे कंपनीची किंमत इतकी वाढली आहे.

१९९४ साली अ‍ॅमेझॉन या कंपनीची स्थापना करून बेझोस यांनी खरेदी-विक्रीच्या पारंपरिक संकल्पनाच बदलून टाकल्या. ग्राहकाला जे उत्पादन हवे आहे ते एका क्लिकसरशी त्याच्या दरवाजात, तेही बाजारातील किमतीपेक्षा कमी दरात पोहोचवण्याची किमया बेझोस यांनी अ‍ॅमेझॉनच्या रूपाने साध्य करून दाखवली. एका गॅरेजमधून दोन कॉम्प्युटर्सच्या आणि दोन कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने सुरू झालेली अ‍ॅमेझॉन आज जगातील पहिल्या क्रमांकाची कंपनी बनली आहे. आज अ‍ॅमेझॉनमध्ये जवळपास २० हजार कर्मचारी काम करतात.

भारत ऑनलाइन

भारतीय ऑनलाइन रिटेलर फ्लिपकार्टने भारतीय बाजारात २००७ साली उडी घेतली, तर स्नॅपडीलने २०१० मध्ये भारतात व्यवसाय सुरू केला. फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल हे दोघेही आधी अ‍ॅमेझॉनमध्ये इंजिनीअर होते. बंगळूरुस्थित या कंपनीचा अर्थव्यवहार गेल्या आर्थिक वर्षांच्या अखेरीस १५,२६४ कोटींवर जाऊन पोहोचला होता.

अ‍ॅमेझॉनने भारतात त्या मानाने उशिरा म्हणजे २०१३ मध्ये प्रवेश केला आणि अल्पावधीतच चांगला जम बसवला असला, तरी अति गुंतवणुकीमुळे कंपनीच्या तोटय़ात वाढ झाली आहे. फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी अ‍ॅमेझॉन भारतात पसा ओतत आहे. याशिवाय, भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर मंदीच्या काळात सवलती देणे, सण-‘डे’ (व्हॅलेंटाइन्स डे वगैरे) पाहून वरचेवर ‘सेल’ लावणे, सवलतींच्या मोठाल्या जाहिराती करणे यांसारख्या अनेक ‘ऑफर्स’ अ‍ॅमेझॉन जाहीर करत असते. त्याचबरोबर फ्लिपकार्ट या कंपनीतील २० टक्के समभाग विकत घेण्याची चर्चा या कंपन्यांमध्ये काही काळ सुरू आहे.

पूर्वपीठिका आणि सद्य:परिस्थिती

आंतरराष्ट्रीय साम्राज्यवादी बाजारवादाचे जनक हे मुख्यत्वे इंग्रज होत! इंग्रज हे मुळात अँग्लो सॅक्सन वंशाचे आहेत. त्याचप्रमाणे आजचे बव्हंशी गोरे अमेरिकन (WASP – White Anglo-Saxon Protestant) याच वंशाचे आहेत. या अमेरिकनांचे पूर्वज मुख्यत्वे ब्रिटनमधूनच अमेरिकेत स्थलांतरित झालेले आहेत. अँग्लो सॅक्सनांचे धोरण हे एका हातात तलवार (बंदूक) आणि दुसऱ्या हातात तागडी असे आक्रमक आणि व्यापारी असते. त्यात आता अमेरिकेतील सधन आणि बुद्धिमान ज्यू उद्योजकांची, गुंतवणूकदारांची साथ त्यांना मिळाली आहे. तंत्रज्ञानातील अचाट प्रगतीमुळे ‘सिलिकॉन व्हॅली’ हे आता जगाचे केंद्रस्थान बनले आहे (पूर्वी वॉल स्ट्रीट, न्यूयॉर्क हे होते, तर कधी व्हाइट हाऊस, कधी पेंटागॉन- अमेरिकेचे लष्करी मुख्यालय किंवा कॅपिटॉल हिल हे वॉिशग्टन येथील प्रशासकीय मुख्यालय होते). या बदलामुळे गेल्या फक्त दहा वर्षांत जगातील पहिल्या पाच कंपन्या (द बिग फाइव्ह) आता सिलिकॉन व्हॅलीमधून निर्माण झाल्या आहेत. त्या म्हणजे. ‘अ‍ॅमेझॉन’, ‘अ‍ॅपल’, ‘इंटेल’, ‘गुगल’, ‘मायक्रोसॉफ्ट’. आधीच्या काही दशकांतील एक्सॉन (एडठ), जनरल मोटर्स, जनरल इलेक्ट्रिक, फोर्ड, बोइंग, थ्रीएम, आयबीएम आदी आघाडीच्या कंपन्या आता मागे पडल्या आहेत. पारंपरिक कंपन्यांची अधिकतर बाजारपेठ ही निवासी अमेरिका (होम मार्केट) ही होती, तर नव्या बिग फाइव्हची अधिकतर बाजारपेठ ही आंतरराष्ट्रीय आहे. हा धक्कादायक बदल (Paradium Shift) ग्लोबलायझेशन आणि आयटी तंत्रज्ञान एकत्र येण्याचा परिणाम आहे. क्रिप्टोकरन्सीच्या वापरामुळे त्यात आणखी अनियंत्रित आणि धक्कादायक बदल भविष्यात संभवतात. कसे ते पाहू,

बिटकॉइनची सुरुवात

ऑनलाइन बाजाराकडून आता पुन्हा डिजिटल चलनाकडे वळू. अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशांनाच नव्हे, तर खुद्द अमेरिकेतील सुजाण नागरिकांना आणि कंपन्यांनाही अमेरिकेची एकांगी आर्थिक अरेरावी  मुजोरी संपली पाहिजे, असे वाटत होते आणि यातूनच अस्तित्वात आली, क्रिप्टो करन्सी! ही अमेरिकेबरोबरच आता जगभर हातपाय पसरताना दिसत आहे.

बिटकॉइन हे एक आभासी चलन आहे. आपण हे चलन ना पाहू शकतो, ना त्याला स्पर्श करू शकतो. आभासी असले तरी आज अस्तित्वात असलेले हे सर्वात जोखमीचे चलन आहे. वास्तविक हे कोणत्याही देशाचे चलन नसून, त्याची निर्मिती अनेक कॉम्प्युटर्स, नेटवर्क्‍स आणि सॉफ्टवेअर्सनी स्वतंत्रपणे केली आहे.

आतापर्यंतच्या पसा आणि बँकिंगच्या इतिहासात क्रांतिकारक ठरणाऱ्या बिटकॉइनसारख्या व्हर्च्युअल करन्सीजचे (व्हीसी) महत्त्व भविष्यात विजेच्या गतीने वाढणार आहे आणि म्हणून जगातील सार्वभौम राजकीय देश-सत्तांना (state) पुन्हा नव्याने, चलन एकाधिकारशाहीवर अवलंबून असणाऱ्या, सार्वभौमत्वाविषयी नव्याने भूमिका घ्यावी लागेल. गुगलसारखी आयटी कंपनी बिटकॉइनमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. बिटकॉइन एकटी नाही, तर भविष्यात जगातील आता निकामी ठरत जाणाऱ्या ‘Old School (Crony?) Capitalism and Conventional Markets’ना पर्याय देण्याच्या इच्छेने कोटय़वधी नेटिझन्स, त्यांच्या जागतिक चलन-सार्वभौमत्वाचे आणि आर्थिक व्यवस्थेचे स्वागत, वापर, फायदा आणि संरक्षण करण्यासाठी कार्यरत आहेत.

इतर देशांमधील स्थिती

देशाच्या सार्वभौमत्वाचे मर्मस्थान म्हणजे त्या देशाच्या केंद्रीय बँकेचा, नोटा छापण्याचा छापखाना (करन्सी िपट्रिंग सिक्युरिटी प्रेस) हे होय. जेव्हा लागेल तसा चलनपुरवठा (आणि व्याजदर) कमी-अधिक करून देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा शासनाला या चलन व्यवस्थेच्या एकाधिकारशाहीमुळे हाकणे शक्य होते. बिटकॉइनसारखे आभासी (व्हर्च्युअल) चलन अस्तित्वात आले, तर ते देशोदेशीच्या सरकारांचे आर्थिक बळ आणि अनिर्बंध सत्ता (sovereignity) कमी करणारे ठरेल. या भीतीमुळेच की काय भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने बिटकॉइनसारख्या पर्यायी आणि आभासी चलनव्यवस्थेला तात्त्विक विरोध दर्शविला आहे. चीनमध्ये बिटकॉइनच्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आलेली आहे. तर ब्राझीलच्या सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज कमिशनने बिटकॉइनचे व्यवहार करण्यावर बंदी आणणारे पत्रक  जारी केले आहे. पण या विरोधी भूमिका फार काळ तग धरू शकणार नाहीत. कारण ज्या ब्लॉकचेन यंत्रणेवर बिटकॉइन चालते, त्यावर इतर अनेक आर्थिक व्यवहार भविष्यात चालणार आहेत. ‘मध्यस्थ’ ही संस्था लयाला जाणार आहे.

जी५ देशांनीही बिटकॉइनसाठी आचारसंहिता लागू करण्याचे ठरवले आहे. अमेरिकेच्या नॅसडॅक एक्स्चेंजनेही बिटकॉइन्सचे वायदा (Future) बाजारात पूर्वीच स्वागत केले आहे.

ऑनलाइन व्यवहार आणि आभासी चलनाला जागतिक स्वीकृती मिळाल्यास (जी मिळणे अटळ आहे) या बदलाचा भविष्यावर काय परिणाम होईल? हे पाहण्यासाठी आता आपण पुन्हा बाजारांकडे वळू. अ‍ॅमेझॉनसारख्या ऑनलाइन कंपन्यांनी बाजार ताब्यात घेतल्यावर कोणालाही जमिनीवर, समुद्रात अथवा हवाई युद्ध करण्याची गरजच भासणार नाही. एकदा का बाजार (मार्केट) हातात आला आणि स्पर्धेला कुणी शिल्लक नाही म्हटल्यावर ऑनलाइन बाजार जगाची अर्थव्यवस्था ताब्यात ठेवू शकतो. युद्ध हा एक पराक्रम नसून तो शोषणाचा, गुलामगिरीचा, बलात्कारांचा, अत्याचारांचा आणि भयाचा नंगानाच असतो. त्यातून अनेक प्रश्न उद्भवतात. शिवाय युद्धानंतर निर्वासितांचे प्रश्न, कायदा आणि सुरक्षा, अन्न, पाणी, घरे, रस्ते, वीज, शिक्षण, वैद्यकीय सेवा इत्यादी अनेक मूलभूत समस्यांचे उत्तरदायित्व जेत्या राष्ट्राच्या माथी आपोआपच येते. ते महागात पडते.

ऑनलाइन व्यापारातून असे प्रश्न उद्भवत नाहीत. ऑनलाइन बाजारातील वस्तूंची मागणी ऑनलाइन जाहिराती व प्रमोशनद्वारे करता येते. त्याचा खर्चही कमी येतो. जगातील सर्वात मोठी कार्गो विमानसेवा देणाऱ्या फेडेक्स किंवा डीएचएल अशा कंपन्या वायू सेनेतील जुनी महाकाय बी ५२ बॉम्बरसारखी विमाने वापरून जगभर जलद गतीने वस्तू वाहून नेऊ शकतात. त्यामुळे ‘डिलिव्हरी सिस्टम आणि लॉजिस्टिक्स’चाही प्रश्न सुटतो.

सार्वभौम राष्ट्र संकल्पनेचा अंत या विषयामधील महत्त्वाची बाब म्हणजे प्लेटोच्या काळापासून सुरू असलेली सार्वभौम ‘प्रजा-राज्य-सत्ताक’ ची संकल्पना संपुष्टात येऊन Market Crypto State अशी एक परावलंबी, दुबळी व्यवस्था जगातील काही विकसित, विकसनशील आणि अविकसित देशात निर्माण होईल आणि कोणत्याही लोकशाही राज्यव्यवस्थेत केंद्रस्थानी असलेल्या नागरिकाचे रूपांतर एक भोक्ता यामध्ये होईल व तेवढेच त्याचे अस्तित्व राहील. ऑनलाइन मार्केट आणि व्हर्च्युअल (आभासी) करन्सी हे एक ‘लेथल’ समीकरण ठरणार आहे. पर्यायी डिजिटल चलनांमुळे आर्थिक सार्वभौमत्व गमावलेले देश, जेव्हा मार्केटवरील ताबाही गमावून बसतील तेव्हा आंतरराष्ट्रीय भू-राजकीय व्यवस्थेत त्यांचा अधिकार फक्त ‘होयबा’ होण्याचा राहील, अशी रास्त भीती वाटते. शिवाय, गुगल-फेसबुकच्या डेटा चौर्याने आणि डेटा व्यापाराने व्यक्तिस्वातंत्र्यावर येणाऱ्या मर्यादा आणि या गोपनीय माहितीचा उपयोग करून त्या व्यक्तीच्या आचरणावर मिळवता येणारा ताबा, निश्चितच धोकादायक ठरेल. सायन्स फिक्शन्स (विज्ञान साहित्य) मध्ये कल्पिलेल्या अमर्याद एकाधिकारी राज्यव्यवस्थेकडे ही वाट जाते आहे. म्हणूनच अशा एकाधिकारशाही व्यवस्थेच्या निर्माणासाठी आणि नियंत्रणासाठी अ‍ॅमेझॉन ही जगातील प्रथम क्रमांकाची कंपनी विजेच्या गतीने उदयास आली आहे. बिनीच्या इतर आयटी कंपन्यांबाबतीतही हा नियम लागू शकतो. तर बिटकॉइन ही संकल्पना अशीच वेगाने उभारी घेऊन, भरारी घेऊन जगात चर्चिल्या जाणाऱ्या विषयांमध्ये एक नंबरची कंपनी ठरली आहे आणि ही तर फक्त नांदी आहे. पडदा नुकताच वर गेला आहे, नाटक आता सुरू व्हायचे आहे.

सॉक्रेटीस, प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल यांचे राज्यविषयक तत्त्वज्ञान, तसेच अ‍ॅडम स्मिथ, मार्क्‍स, केन्स अशा अनेक अर्थतज्ज्ञांचे विचार पुन्हा मागे वळून पाहून, येणाऱ्या चौथ्या लाटेमध्ये ते तरतील की वाहून जातील, हेही पाहावे लागेल.

नव्याने उदयाला येणाऱ्या एका नव्या अर्थ-भू-राजकीय साम्राज्याला आपण इच्छा असो वा नसो, सामोरे जात आहोत. डार्विनच्या उत्क्रांतिवादानंतर उदयाला येणारा हा सिलिकॉन व्हॅलीचा नवीन ‘डिजिटल उत्क्रांतीवाद’ नागरिकाला राजकीयदृष्टय़ा अभिव्यक्तिस्वातंत्र्यहीन, परावलंबी करून सोडेल. राष्ट्रांचे आणि पर्यायाने व्यक्तीचे सार्वभौमत्व यातून दुबळे होत जाणार आहे.

मात्र त्यातल्या त्यात आशेची बाब म्हणजे शेती-फळे, फुले आदी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठा पारदर्शकपणे ऑनलाइन खुल्या झाल्यामुळे, चांगले भाव मिळण्याची शक्यता आहे आणि भारतासारख्या शेतीप्रधान देशात, ग्रामीण भागात चांगले पैसे पोहोचले तरच अ‍ॅमेझॉनचे दुकान चालणार आहे आणि त्यामुळे का होईना आपले सण-उत्सव दिमाखात साजरे करणे शक्य होणार आहे. शो मस्ट गो ऑन, ऑनलाइन ऑर ऑफलाइन!

जयराज साळगावकर jayraj3june@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 2:33 am

Web Title: challenges and opportunities of online business in india
Next Stories
1 क्रौर्याचा कळस!
2 स्वरयोगिनी
3 जातवास्तवावर विवेकी हल्ला
Just Now!
X