News Flash

आमचं पाण्यातलं गाव..

पूर हा काही कृष्णा-पंचगंगेच्या काठच्या लोकांना नवीन नाही.

|| सुहास जोशी

पूर हा काही कृष्णा-पंचगंगेच्या काठच्या लोकांना नवीन नाही. कुरुंदवाडजवळच्या कृष्णाकाठच्या घाटावरील कमानीत आजवरच्या पुराच्या नोंदी कोरल्या आहेत. सर्वाधिक मोठय़ा पुराची खूण १९१४ ची. त्यानंतर २००५ साली. त्यामुळे यंदा वाढत्या पावसाने पातळी वाढली तरी पाणी ओसरेल, असा विश्वास कुरुंदवाडकरांना होता; पण यंदाच्या पुराने साऱ्या विश्वासालाच तडा गेला.. आणि अनेक प्रश्नही उपस्थित केले..

अखेरीस पूर काहीसा ओसरू लागला तसा कोल्हापूरहून हुपरीमार्गे लांबच्या पल्ल्यानं कुरुंदवाड गाठलं. हेरवाडजवळ येताच नाकात एक विशिष्ट उग्र दर्प घुसला. आठ-दहा दिवस पाण्यात असलेल्या या गावामध्ये अनेकांच्या अंगणात सामानाचा ढीग लागला होता. हेरवाडच्या पुढे अजूनही पुरुषभर पाणी तुंबलेलं. मग माळरानातून गाव गाठलं. कुरुंदवाड जवळ आलं तसं माळभागात पुराची फारशी झळ नव्हती. थिएटर चौक पार करताना जाणवू लागलं, की या भागानं खूप सोसलंय. गुरुवार बाजाराचा दिवस, पण शुकशुकाट होता. पाणी ओसरलं होतं, पण ते त्याच्या खुणा ठेवूनच. प्रत्येक जण आपआपल्या घरात साफसफाईत मग्न.

कृष्णा-पंचगंगेच्या संगमाजवळचा हा सारा परिसर. नृसिंहवाडी, कुरुंदवाड, औरवाड, गौरवडा, शिरटी, हासूर, खिद्रापूर, आलास, बुबनाळ ही सारी या परिसरातली गावं. नदीकिनारी समृद्धतेनं, सुपीकतेनं बहरलेली. एरवी इकडे पाऊस कमी, पण पुराचा फटका ठरलेला. गावात शिरलो तसं कुठं घरं पडलेली, कुठं दुकानं उद्ध्वस्त झालेली. बाजारपेठ पार करून जुने एसटी स्टॅण्ड, नंतर न्यायालय, पोलीस ठाणे मागे पडले. नेहमीची लगबग नव्हतीच; पण झेरॉक्सच्या दुकानात एकच झुंबड उडालेली. गावची चावडी हे एरवी कायमचं दुर्लक्षित ठिकाण. पण आज तिथं शेकडय़ांनी लोकांची रांग लागलेली. सरकारी पाच हजार रुपयांची मदत मिळत होती. रेशन कार्ड आणि आधार कार्ड दाखवून रोखीत पैसे मिळत होते. ती रांग पाहूनच गांगरायला झालं.

शेवटी घर गाठलं. घर तसं वेशीजवळच, पण नेहमीच्या रस्त्यानं आलात तर. या वेळी मात्र एकदम शेवटाचं आणि पाण्यानं वेढलेलं. जेवढं सामान वरच्या मजल्यावर चढवलं तेवढं शिल्लक होतं. बाकी सर्व कुजलेलं. ते सर्व सामान थेट बाहेर काढलं. टाकून देण्याशिवाय पर्यायच नव्हता. गल्लीत प्रत्येकच घराबाहेर पोती आणि फेकून द्यायच्या सामानाचे ढीग लागलेले. कुरुंदवाडच्या या परिसरात एक सुप्तशी जाणीव दबून राहिलेली.

पूर हा काही कृष्णा-पंचगंगेच्या काठच्या लोकांना नवीन नाही. फरक असलाच तर तो पूर आणि महापूर यांतला. कुरुंदवाडजवळच्या कृष्णाकाठच्या घाटावरील कमानीत आजवरच्या पुराच्या नोंदी कोरल्या आहेत. त्यातली सर्वाधिक मोठय़ा पुराची खूण म्हणजे १९१४ ची. त्यानंतर २००५ साली. पुरामुळे होणारी धावपळ येथे अंगवळणी पडली असे म्हणता येणार नाही, पण किमान मुंबईकरांची होते तशी तारांबळ नक्कीच होत नाही. डोंगरात पाऊस वाढला की धरणं भरतात आणि पाठोपाठ कृष्णा-पंचगंगेच्या तीरावरील लोकांना पुराचा फटका बसतो. पूर आला की प्रत्येकाची कामं ठरलेली असतात. शेतातला पंप हटवणं असो की गुरं सुरक्षित जागी पोहोचवणे. दुसरीकडे नृसिंहवाडी येथे तर दत्तांची उत्सवमूर्ती वाढत्या पुरानुसार कोणकोणत्या टप्प्यावर हलवायची आणि अखेरीस ज्यांची वर्षीली असेल त्यांच्या घरी जायची.

या वर्षी पूर येऊ  लागल्यावर आधी आनवडी फुटली. ही आनवडी म्हणजे कुरुंदवाडच्या शेजारून वाहणारा पंचगंगा नदीचा एक प्रवाह, जो पुन्हा कृष्णा-पंचगंगा संगमाआधी पंचगंगेत मिळतो. त्यामुळे आनवडीच्या छोटय़ा पुलावरून पाणी वाहू लागले की, तीदेखील एक पूर्वसूचनाच असायची. नंतर मग तेच पाणी वाढता वाढता कुरुंदवाड-वाडी रस्त्यावरील गावच्या वेशीवरच्या शिवाजी पुतळ्यापाशी रस्ता ओलांडते. या वर्षी असंच झालं. हे झालं की मग कुरुंदवाडचा संपर्क तुटतो (आत्ता मोबाइलमुळे तो सुरू असतो इतकंच), रस्ते बंद होऊ  लागतात. या वर्षी केवळ रस्ताच नाही, तर गणपती मंदिर, ब्राह्मणपुरी, कुंभार गल्ली असे पाणी पसरू लागले. दुसरीकडे गावाच्या पल्याड असलेल्या आनवडीच्या तीरावरील भैरववाडीत पाणी वाढू लागले. नवीन एसटी स्टॅण्डच्या परिसरातील शिकलगार वस्ती, बस्तवाड तर पाण्यातच गेले. पाहता पाहता गावात काही घरांच्या पायऱ्यांवर पाणी आलं. नगरपालिकेच्या नोटिसा येऊ  लागल्या. पाणी किती वाढणार, याची गावकऱ्यांना कल्पनाच नव्हती. किंबहुना सोमवारी ५ ऑगस्टपर्यंत गावातले लोक नेहमीच्याच पुराचे हे वाढते रूप समजत होती. त्यातल्या त्यात थोडी सावधगिरी बाळगत काहींनी थोडंफार जड आणि किमती सामान वरच्या मजल्यावर हलवलं. पहिल्या मजल्यावर काही पाणी जायचं नाही हा भाबडा विश्वास.

पण यंदा या साऱ्या विश्वासालाच तडा जाणार होता. गुरुवारी- ८ ऑगस्टला पाणी वाढू लागलं. गावाच्या अन्य भागांत पाणी पसरू लागलं. जो तो उंच ठिकाणाचा वा कोरडय़ा जागेचा आसरा शोधू लागला. गावात तशा उंचावरच्या जागा दोन-तीनच. काहींना वाटलं, बाजारपेठेच्या भागात पाणी येणार नाही. त्यामुळे कोणी तेथील आप्तांकडे धाव घेतली. ब्राह्मणपुरी, कुंभार गल्ली, जुने व नवीन एसटी स्टॅण्ड परिसर. सर्व ठिकाणी प्रत्येकानं आसरा शोधला. गावाच्या बाहेर माळभागात गेल्या पंधराएक वर्षांत अनेकांनी बिगरशेती प्लॉटवर घरं बांधलेली. तिकडं पाणी येणार नाही, ही अपेक्षा; पण तिथंही तळमजला बुडाला. सारे लोक पहिल्या मजल्यावर अडकून पडलेले. प्रत्येकानंच जमेल तसं सामान स्वत:ला सुरक्षित वाटणाऱ्या ठिकाणी ठेवलं; पण या सुरक्षेची हमी निसर्गावर होती आणि तो तर कोणाच्याच नियंत्रणात नव्हता.

तेच झालं. बाजारपेठेत पाणी शिरलं. काही ठिकाणी गटारीतून शौचालय आणि न्हाणीघरातून पाणी घरात शिरू लागलं. हे कधीच कोणी अपेक्षिलं नव्हतं. मग फोनाफोनी सुरू झाली. जे गावात होते, ज्यांच्याकडे संबंधित यंत्रणांचे संपर्क होते, ते त्यांच्याशी बोलू लागले; पण या वेळी मदतीचा सारा भर होता तो सांगली-कोल्हापूर शहरांच्या परिसरात. गावाबाहेर असणारे लोक गावातील लोकांचे ढीगभर नंबर फिरवू लागले; पण गावात वीजच नव्हती. शुक्रवारी- ९ ऑगस्टला पाणी वाढू लागलं, तसा माझा फोनदेखील खणखणू लागला. रात्री ९ ते १२ केवळ एकच काम उरलं- गावकऱ्यांकडून माहिती घ्यायची व तहसीलदार, प्रांत आणि इतर संबंधित यंत्रणांना पोहोचवायची. उंच ठिकाण म्हणून ज्याचा उल्लेख व्हायचा, त्या राजवाडय़ाच्या दिशेनंदेखील पाणी चढू लागलं होतं. वीज नाही, खाद्यपदार्थ मर्यादित आणि वाढतं पाणी. ते तीन दिवस गावकऱ्यांना अन्य काही कामच उरलं नव्हतं. सकाळी उठलं की पाण्याकडे धावायचं, किती चढलं आणि किती उतरलं हेच पाहायचं. मग दिवसभर कोणाला या घरून त्या घरी न्यायचं किंवा केवळ इतर ठिकाणी काय सुरू आहे, हे पाहात भटकायचं.

पुलंच्या ‘म्हैस’ कथेतील मधु मलुष्टेच्या तोंडी एक वाक्य आहे : ‘आज माणुसकी उरली असेल तर ती केवळ गावातच.’ यातला उपरोध बाजूला ठेवून विचार केला, तर या काळात गावकऱ्यांतील माणुसकीच दिसून येत होती. कोण-कोण कोणा-कोणाच्या घरी राहिले याचं काहीच गणित नव्हतं. ज्याला ज्याला आसरा देणं शक्य होतं, तो तो माणूस आपल्या घरी आसरा देत होता.

अखेरीस शनिवारी- १० ऑगस्टला मदतसामग्री घेऊन पहिलं हेलिकॉप्टर कुरुंदवाडात उतरलं. दुसऱ्याच दिवशी एनडीआरएफचा चमूही दाखल झाला. किमान तीसएक हजारांच्या वस्तीच्या कुरुंदवाड गावाला बसलेल्या महापुराच्या तडाख्याची काही प्रमाणात जाणीव होऊ  लागली. मग एकापाठोपाठ हेलिकॉप्टरचा ओघ वाढला; पण रस्तामार्गे गावाचा संपर्क बंदच होता. गावात शासकीय यंत्रणा कार्यरत होत्या, पण त्यांच्याही मर्यादा होत्या. आलेल्या मदतवाटपातदेखील मग गडबड होऊ  लागली. गटागटांतील कुरबुरीदेखील झाल्या. त्या पुढे आणखीच वाढल्या.

अखेरीस सोमवारी- १२ ऑगस्टनंतर पाणी हळूहळू ओसरू लागलं. मजरेवाडी-दत्तवाड- पाच मैल- बोरगाव- हुपरी- कोल्हापूर असा एक लांबचा पर्याय खुला झाला. काही मदत पथकं या वाटेनं आलीदेखील; पण नेहमीचा जयसिंगपूर- शिरोळ-नृसिंहवाडी- कुरुंदवाड हा मार्ग काही खुला झाला नाही. मदतीचे अनेक ट्रक शिरोळमध्ये अडकून पडले होते.

हे ट्रक, हेलिकॉप्टर कुरुंदवाडात दोन दिवसांनी आलेदेखील; पण त्याच वेळी आणखी एका प्रश्नानं फणा काढला. गावात ट्रक आला रे आला, की त्याला गराडा पडायचा. मदत घेऊन येणाऱ्यांच्या दृष्टीनं सारेच ‘पूरग्रस्त’ होते. त्यात पुन्हा गटातटांचं राजकारण होतंच. मन म्हटलं, महापुरात एकमेकांना साथ देणारे हे गावकरी असे का वागताहेत!

तुलनेनं आजूबाजूच्या गावांत याबाबतीत बरी परिस्थिती होती; पण तेथे वेगळाच प्रकार लक्षात आला. कपडय़ांच्या स्वरूपात आलेली मदत म्हणजे निव्वळ शहरातल्या लोकांनी स्वत:चे वॉर्डरोब साफ करण्याचा प्रकार होता. शिरोळच्या पद्मजा विद्यालयात अशा कपडय़ांचा ढीगच लागलेला होता. कोठे मदत मिळाली, तर कोठे काहीच नाही. उद्ध्वस्त झालेली घरं खरं तर पूर्णत: नव्यानं वसवण्याची गरज या भागात दिसत होती. शहरातील सजग नागरिकांकडून येणारी मदतही अनेकदा ठरावीक साच्यातील असते. त्यांना वस्तुस्थितीची जाणीव असतेच असं नाही; पण बांधिलकीच्या भावनेनं मदत होत असते हे नक्की. परंतु हे कोणी तरी नियंत्रित करणंही गरजेचे आहे.

पाणी ओसरू लागलं तसं प्रत्येक जण आपापल्या घराकडे जाऊ  लागला. साफसफाई करणे, फेकून द्यायचे सामान बाहेर टाकणं हेच काय ते काम उरलं. नळाला पाणी नव्हतंच, मग रस्त्यावर असलेलं पुराचंच पाणी वापरून घरं धुवायची. पाणी भरलेल्या ठिकाणी वीज बंद होती. संध्याकाळ झाली की साफसफाईचं काम बंद. मग केवळ अंधाराचंच साम्राज्य. एक भीषणता साऱ्या परिसरात भरून राहिलेली. कोणी परगावी जवळच्या नातेवाईकांकडे गेले होते किंवा उरलेले दिवसभर काम करून झोपी जात होते. प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न होताच, हे असं कसं झालं? इतकं चांगलं सुरक्षित वगैरे गाव, एका महापुरानं सारं काही विस्कळीत करून टाकलं. हे आत्ता दरवर्षीच होणार का? या प्रश्नाला खरं तर उत्तर नव्हतं..

suhas.joshi@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 11:28 pm

Web Title: heavy rainfall maharashtra floods part 3 mpg 94
Next Stories
1 डोळेच कॅमेरा होतात तेव्हा..
2 उपेक्षेचा महापूर!
3 गुणांची पारख
Just Now!
X