मुंबई दूरदर्शन वाहिनीवर प्रसिद्ध संवादक व गीतकार सुधीर मोघे यांनी ज्येष्ठ कवयित्री शान्ताबाई शेळके यांची काही वर्षांपूर्वी घेतलेली दीर्घ मुलाखत. खास ‘मराठी भाषा दिना’निमित्त..

सुधीर मोघे – शान्ताबाई, कवितेचं तुमचं नातं प्रथम कसं जुळलं आणि कवितेचे संस्कार तुमच्यावर कुठून आणि कसे झाले?

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी

शान्ता शेळके – माझं बरंच बालपण खेडय़ामध्ये गेलं. खेडं म्हणजे अगदीच खेडं नव्हे. आपल्या पुणे जिल्ह्य़ातील राजगुरूनगर, ते माझं आजोळ. तिथे माझं बरंच बालपण गेलं. त्या वेळेला गाण्याचे खूप संस्कार माझ्यावरती झाले. आता उदाहरणार्थ, पहाटेच्या वेळी बायका जात्यावर दळायच्या आणि ओव्या म्हणायच्या तर त्यातल्या ओव्या मी ऐकत असे. त्या मनावरती ठसल्या. त्याच्यानंतर घरामध्ये लग्नकार्य वगैरे निघालं तर अगदी पहिलं गाणं घालण्यापासून तर थेट मुलीची पाठवणी करण्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची गाणी असायची. त्याच्यानंतर मग दाराशी भिक्षेकरी वगैरे यायचे. त्यांच्यामध्ये वासुदेव असायचा ‘दान पावलं..दान पावलं’ करीत येणारा, नंतर कुडमुडय़ा जोशी असायचा, बाळसंतोष असायचा, इतर भिक्षेकरी असायचे. या सगळ्यांच्या येण्याला गाण्याची जोड असायची. तर ती गाणी मनावरती नकळत ठसत गेली. नंतर मग नागपंचमीचा सण असेल तर गावातल्या मोठय़ा बायका गावाबाहेर फेर वगैरे धरायला जायच्या. लिंबाला झोका बांधून गाणी म्हणायच्या. ती गाणी माझ्या मनावरती ठसली. ताल आणि सूर कशाला म्हणतात काहीच मला माहीत नव्हतं. परंतु याच्यातून खूप संस्कार माझ्या मनावर होत गेले असले पाहिजे. आता हा एक प्रकार झाला. यातली पुष्कळशी गाणी सांगण्यासारखी आहेत. परंतु आपल्याकडे तितका वेळ नाही. मला आठवतं.. एक सणांचं गाणं होतं. या गाण्यात ‘कांडून कुटून केली पंचमी.. नेमकाच लागला डोळा.. आला श्रावणी पोळा.. श्रावणी पोळ्याचे काढीत होते चित्र..आले वडलांचे पित्र’ असं लांबलचक ते गाणं, थेट अक्षयतृतीयेपर्यंत त्याच्यात सगळे सण गुंतलेले असायचे. आता तुमच्या लक्षात येईल सगळं. तुम्ही स्वत: गीतं लिहिता, कविता करता. एक असा अतिशय सुंदर ज्याला आपण ऱ्हिदम म्हणतो किंवा ताल म्हणतो किंवा लय म्हणतो ती याच्यामध्ये आहे. सगळं असं केवळ श्रवणानं माझ्यामध्ये झिरपत होतं आणि तिथे ते ठसत होतं. आता हा एक भाग झाला. आपण असं म्हणू या की, हा लोकसंगीताचा संस्कार माझ्यावर झाला. दुसरा जो संस्कार झाला तो म्हणजे, पुस्तकातूनच गीतं माझ्यापर्यंत आली. ती कशी आली तर ती ब्राह्मणी घरातून माझ्यापर्यंत आली. उदाहरणार्थ, माझे आजोबा म्हणजे आईचे वडील हे सबरजिस्ट्रार होते. त्यामुळे जी मित्रमंडळी असायची ती माझ्या आजीच्या गावातल्या मैत्रिणी वगैरे त्या अशा मुनसफाची बायको, मामलेदाराची बायको, डॉक्टराची बायको आणि ती ब्राह्मणी घरं होती. त्यावेळी दोन पुस्तकं अत्यंत लोकप्रिय होती. मला वाटतं, तुम्हीसुद्धा तुमच्या घरात विचारलं आईला, आजीला तर तुम्हाला कळतील. एक त्यामध्ये कृष्णाबाई गाडगीळांचं ‘मानसगीत सरोवर’ नावाचं पुस्तक होतं. ते इतकं सुंदर आहे की अजूनसुद्धा मला ते आवडतं. यामध्ये कृष्णाचं गाणं, दत्ताचं गाणं, शंकराचं गाणं अशी नाना प्रकारची गाणी त्यामध्ये होती. उत्कृष्ट काव्य त्याला म्हणता येईल आणि उत्कृष्ट गीतगुण हे दोन्ही त्या गाण्यांमध्ये होते. असंच एक पुस्तक त्याच घरातनं आमच्याकडे आलं आणि माझ्या आईला, मावशीला ते खूप आवडलं. आता त्यातली ती गाणी काही सांगू शकत नाही, पण गाणी फार सुंदर होती. तर त्यामध्ये गंगाबाई नावाची कुणी अनामिक कवयित्री होती. हे जे सांगितलं ना आता ‘स्त्री गीत रत्नाकर’. दोन भाग असावेत त्याचे आता मला आठवतं. त्यात या गंगाबाईची गाणी होती. तुम्हाला या गाण्याचे थोडेसे नमुने सांगते. आता आपण जी गीतं करतो त्याच्याशीसुद्धा त्याचं कसं नातं लागतं ते पाहा. या कृष्णाबाई गाडगीळांकडे एक उत्तम शब्दकळा होती आणि ज्याला गाणी म्हणतात त्याचा त्या बाईंवर उपजत असा एक संस्कार असला पाहिजे. एक गाणं त्याच्यातलं असं होतं- शंकराचं गाणं होतं, ‘श्रेयाळ अंगणीच वाढले, अंगी भस्म चर्ची आले, व्याघ्र गजेचर्म ओले डमरू त्रिशुळाकडी धरिले..’ त्याच्यानंतर ‘पायात साखळ्या वाळे चाळ, काय मौजेचे श्रीगोपाळ’ नंतर आणखी एक असं गाणं होतं.. ‘आले आले गोपिनाथा सारुनिया काम रे, वृंदावनी वाजविशी वेणू जरा थांब रे, एक गोपी म्हणे माझ्या घरी आले पाहुणे, बहिणीचे पती माझे होती सख्खे मेहुणे, आता कशी येऊ देवा स्मरते तुझे नाम रे. म्हणे हरी तुझी मुरली रागी रंगली, हिच्या नादी आज माझी पतीसेवा भंगली..विडा करिता-करिता आले सुटला भाळी घाम रे, गोपिनाथा आले आले सारुनिया काम रे..’

नंतर आणखी एक गाणं होतं.. ‘अजी कमलनायका, मुरली वाजवू नका, तिरी घागर पाझरते, रोमांचित तनू होते, मन मुरली गुंगविते, अजी कमलनायका’ या गाण्यांचे संस्कार माझ्या मनावर झाले. चालीदेखील फार चांगल्या होत्या त्यांच्या. आता या कृष्णाबाई गाडगीळांची कहाणी सांगितली आणि दुसरी गंगाबाईंची. या गंगाबाईंच्या एका गीताचा दुर्गाबाई भागवतांनीदेखील उल्लेख केलेला आहे. ‘पिवळीच मी पाकोळी, पिवळे कृष्णनाथ चाफ्याची कळी..’ असं ते गाणं आहे त्या बाईचं.

सुधीर मोघे – याचा अर्थ गाण्यांतून तुमच्या मनात कविता झिरपली. पण, मग आधुनिक कविता प्रवाहाची ओळख तुम्हाला कशी, केव्हा झाली आणि त्यात ज्यांनी विशेष प्रभाव पाडला असे कवी कोणकोणते?

शान्ता शेळके – हं, आम्ही जेव्हा लहान होतो, शाळेत शिकत होतो तेव्हा आमच्या ज्या कविता होत्या शालेय पुस्तकातल्या, त्या फार सामान्य कविता होत्या. बोधपर, उपदेशपर अशा त्या कविता होत्या. परंतु त्याच्यामध्ये एक मला माझं सुदैव वाटतं की ज्ञानेश्वर, श्रीधर म्हणजे पांडवप्रताप रामविजय वगैरे लिहिणारे किंवा मोरोपंत यांचेही काही उतारे त्यातल्या त्यात सोपे, असे बघून घेतलेले होते. नंतर मला आठवतं की शालेय पुस्तकात आम्ही अतिशय रुक्ष आणि गद्य कविता वाचत होतो. त्यातच परशुरामतात्या गोडबोल्यांच्या काही कविता होत्या. परशुरामतात्या ज्यांनी नवनीतचं संपादन केलं ते. शब्दावर प्रभुत्व असलेला असा हा कवी होता. त्यांनी ‘उत्तरराम चरित्रा’चं भाषांतर केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी आणखी काही संस्कृत नाटकांचे अनुवाद केले असतील. ते अनुवाद किती साधे आणि प्रासंगिक होते त्याचा एक अनुभव मी तुम्हाला सांगते.

उत्तरराम चरित्रामध्ये एक श्लोक असा आहे, ‘त्वम जीवितम् त्वमसि मे हृदयम्’ हा श्लोक सीतेच्या संदर्भात आहे. ‘तू जीव, तू हृदय, तू मजला विसावा, तू चंद्रिकाच नयना शरीरा सुधावा..’ अतिशय हृदयस्पर्शी अशी ही रचना आहे. ती मला त्या वयातही खूप आवडली होती.

आता पुढचा जो तुमचा प्रश्न आहे की, आधुनिक कवितेशी तुमचा परिचय केव्हा झाला? तर तो मला आठवतं की मी इंग्रजी चौथीमध्ये असताना आम्हाला ‘महाराष्ट्र रसवंती’ असे संकलन अभ्यासाला होते. त्याचे दोन-तीन भाग आहेत आणि ते सगळे अभ्यासले. अद्भुतरम्य अशा एखाद्या गोष्टीवरचा पडदा दूर व्हावा आणि ते आपल्याला पहायला मिळावं ना, असं वाटलं. इथेच बालकवींची ‘फुलराणी’ पहिल्यांदा भेटली. माधव नावाचे कवी त्यांची रामदास बोट बुडाल्याचे वर्णन आहे त्यामध्ये. ‘पाट दरियात वाहती वारे बेफाम..’ असे अतिशय चित्रदर्शी असं आहे. यानंतर माधव ज्युलियन त्यात भेटले, यशवंत भेटले. तिथे खऱ्या अर्थाने आधुनिक मराठी कवितेचे संस्कार मनावर झाले. इतकंच नाही तर त्या कवितेबद्दल अतिशय प्रेम आणि ओढ माझ्या मनामध्ये निर्माण झाली.

सुधीर मोघे – शान्ताबाई! त्याकाळची सर्वच कविता धृपद, अंतरा अशा पद्धतीची होती. म्हणजे, गीत हा फॉर्म स्वीकारलेली. पण, गीतकार म्हणावे असे कोण कवी वाटतात?

शान्ता शेळके – वा, असे होते ना! महाविद्यालयीन काळात आमच्या मनावर भा.रा. तांब्यांचा आणि रविकिरण मंडळाचा प्रभाव होता. त्यातही माधव ज्युलियन आणि यशवंत हे अतिशय आवडते कवी आमचे. त्यावेळची कविता अशी गेय आणि धृपदप्रधान कविता होती. तांब्यांची तर रचना तशीच होती. काही कवितांमध्ये तर त्यांनी राग, ताल वगैरे दिलेले आहेत. नंतर आणखी एक पुस्तक त्याचवेळी माझ्या वाचनात आलं. त्याचा मला मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो ते ‘सुगी’ नावाचं पुस्तक. ग.ल. ठोकळांनी त्यावेळी ग्रामीण कवितांचे एक संकलन काढलं, त्याला ‘सुगी’ असं नाव दिलं. खांडेकरांनी त्याला सुंदर प्रस्तावना लिहिली आणि तिथे मला दोन मोठे कवी भेटले. त्यामध्ये एक बोरकर आणि दुसरे ना.घ. देशपांडे. हे दोघेही उत्कृष्ट कवी आणि उत्कृष्ट गेयतागुण असलेले होते. तेसुद्धा त्यावेळी माझ्या मनावर अतिशय ठसले. तिथून परत ही गेय आणि धृपदप्रधान रचना आली. रविकिरण मंडळाचीसुद्धा बरीचशी कविता गेय आणि धृपदप्रधान अशीच कविता होती. या कवितेमध्ये काव्यगुण भरपूर होते, पण दुसरीकडे कुठेतरी इतर रचनेशी त्याचं फार जवळचं नातं होतं. सुगीमध्ये सोपानदेव चौधरी यांची एक कविता होती. ‘चाल सोना येती का वं, माया घरी पेरणीले.. आज कुठलाच होका आला पेरणीचा तुले?’ हे मी केव्हा वाचले तर तिसरी किंवा चौथीत असताना. या अशा कवितांनी माझ्या मनावर खूप संस्कार केले.

सुधीर मोघे – हे सगळं पाथेय झालं. स्वत:चं काव्यलेखन किंवा गीतलेखन तुम्ही केव्हा सुरू केलंत?

शान्ता शेळके – ना.घ. देशपांडे, बा.भ.बोरकर, कुसुमाग्रज, रविकिरण मंडळाच्या कवितांचा प्रभाव माझ्यावर होताच. याच कविता प्रेमातून आपणही कविता लिहून पाहावी, अशी इच्छा जागृत झाली. माझ्या बहुतेक कविता अशा अस्थायी, पुढे अंतरा, त्या अंतऱ्यात कवितेची मध्यवर्ती संकल्पना आणि पुढे कडव्या-कडव्यात त्या कवितेचा विस्तार केलेला, अशी जी पद्धती आज टाकून दिलेली आहे बहुतेक कवींनी, तर त्या पद्धतीने मी लिहायला लागले.

सुधीर मोघे – मराठी भावगीतात तुमचं स्वत:चं एक वेगळं दालन आहे. त्यात खूप मोठं काम केलंय तुम्ही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भावगीताचे दोन कालखंड महत्त्वाचे वाटतात. एक कालखंड वसंत पवार, सुधीर फडके, दत्ता डावजेकर ही जी मंडळी ऐन जोमात होती तो काळ आणि आधुनिक भावगीतं म्हणता येईल असा. हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, यशवंत देव असा हा कालखंड. या दोन्ही कालखंडांशी तुमचा संबंध आलाय. त्यामुळे या दोन्ही कालखंडांच्या सीमारेषेवर असलेलं तुमचं एक गीत आहे, ‘तोच चंद्रमा नभात’ तर या गाण्याची कहाणी काय आहे?

शान्ता शेळके –  ‘तोच चंद्रमा’बद्दल.. तुम्ही विचारता म्हणून सांगते, फार मजेदार आहे त्याची कहाणी. काय झालं की, त्यावेळी मी बाबूजींच्याकडे चित्रपटांची गाणी करीत होते. एकदम चार-पाच चित्रपट त्यांच्याकडे ओळीने केले. ते एकदा मला म्हणाले की, एक गाणं मला पाहिजे आहे तुमच्याकडून आणि एक गाणं माझ्याकडे माडगूळकरांचं आहे. त्यावेळी त्यांचं आणि माडगूळकरांचं काहीतरी भांडण होतं. ते म्हणाले, मी त्यांच्याकडे गाणं मागायला काही जाणार नाही. तुम्ही मला ते द्या. बीएच्या वर्गात मी शिकत असताना मला ‘काव्यप्रकाश’ होती मम्मटाचं आणि त्याच्यामध्ये एक अतिशय सुंदर असा श्लोक होता. तोसुद्धा एका स्त्रीने लिहिला होता. तो माझ्या मनावरती अत्यंत ठसलेला होता. त्या श्लोकाचा मराठीत अर्थ असा आहे की, ‘माझं कौमार्य हरण करणारा माझा प्रियकर तोच आहे, चैत्र महिन्यातील रात्रीही त्याच आहेत. कदंब वृक्षावरून वाहत येणारे आणि मालतीपुष्पाच्या सुगंधानं सुगंधित झालेले वारे तेच आहेत. मीही तीच आहे आणि आमच्या प्रेमाच्या क्रीडाही त्याच आहेत. इतकेच नव्हे तर स्थळही तेच आहे. परंतु मनाला कुठेतरी उदासीनता आणि हुरहूर लागलेली आहे.’ हा श्लोक मला आवडलेला होता. तेव्हापासून या श्लोकाचं कधीतरी काहीतरी आपण करावं, असं माझ्या मनात होतं. त्यामुळे बाबूजी जेव्हा मला म्हणाले, की तुम्ही गाणं द्या आणि शक्यतो गझलच्या वजनाचं गाणं द्या तेव्हा हे गाणं मी केलं. नंतर बाबूजींनी ते गाणं रेकॉर्ड झालं तेव्हा मला आपल्या घरी ऐकायला बोलावलं. तेव्हा यमन राग वगैरे मला काहीसुद्धा माहीत नव्हतं. आताही फारसं माहिती नाही.

सुधीर मोघे -आधुनिक कालखंड ज्याला मी म्हणतो त्यातलं अध्वर्यू वाटणारं जे गीत आहे, ज्याला बाळासाहेब मंगेशकरांनी संगीतबद्ध केलंय ते गाणं म्हणजे, ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे..’ त्याच्याबद्दल काही सांगता?

शान्ता शेळके – काय झालं होतं की, बाळनी ते कुणा दुसऱ्या कवीकडून आधी करवून घेतलं होतं आणि त्यांना ते तितकं पसंत पडलं नव्हतं. मला ते म्हणाले की, तुम्ही एक गाणं असं कराल का? तर मी त्यांना म्हणाले की, आधी ज्या कवींनी हे गाणं केलं आहे त्यांना ते कसं पसंत पडेल मी केलेलं. तर ते म्हणाले, त्याची काळजी करू नका. मी त्यांना सांगेल. माझ्याकडे माझ्या वडिलांची म्हणजे दीनानाथांची एक चाल आहे आणि आपल्याला ते गाणं करायचं आहे. ते गाणं केलं मी. ‘राहिले रे दूर घर माझे’ आणि हा जिवलगा जो शब्द आहे तो बाळनी घातलेला आहे. तर ते म्हणाले, जिवलगा शब्द कसा काय वाटतो तुम्हाला? मी म्हटलं, जिवलगा शब्द छानच आहे, म्हटलं प्रश्नच नाही आणि तेही गाणं असं सरळ होत गेलं. आता आठवण झाली म्हणून आणखी एका गाण्याची माहिती तुम्हाला सांगते, एकदा मी अशीच मंगेशकरांकडे गेले असताना एक गाणं ऐकवलं बाळनी आणि म्हणाले, हे गाणं भंकस आहे. त्याचे शब्द असे होते, ‘माथे तोरे चांद का टिका अंग पे तोरे हिरे जडे हैं..दुल्हनिया तू हैं सजनिया प्यारी’. मी म्हटलं, सोपं आहे अगदी. यावर आपण मराठी करू या म्हटलं आणि.. ‘शालू हिरवा, पाचू नि मरवा, वेणी तिपेडी घाला..साजणी बाई येणार साजण माझा’.

सुधीर मोघे – चित्रपट गीतलेखनाची संधी तुम्हाला कशी आली?

शान्ता शेळके – संधीच आली असंच म्हणायला पाहिजे. कारण, तेव्हा मी ‘नवयुग’मध्ये आचार्य अत्रेंच्या बरोबर काम करीत होते. दिनकर पाटील म्हणजे जे आज एक नामांकित दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत, तर ते आणि माधव शिंदे मिळून त्यांनी आपला पहिलाच चित्रपट ‘रामराम पाहुणे’ सुरू केला होता. त्यांनी माझ्या कविता वगैरे वाचलेल्या होत्या, तर ते ‘नवयुग’मध्ये माझा शोध करीत आले. मला म्हणाले, ‘आम्हाला एक चित्रपट काढायचा आहे आणि तुम्ही त्याची गाणी लिहाल का?’ पी. सावळारामही त्या वेळी नवीन होते. त्यांचाही पहिलाच चित्रपट तो. ते काही गाणी करणार होते आणि काही गाणी मला करायची होती. मी म्हणाले, ‘मला गाण्यांचा तसा अनुभव नाही.’ तर ते म्हणाले, ‘आम्ही तुमच्याकडून ते करवून घेऊ सगळं.’ नंतर मग प्रश्न आला, म्हटलं संगीत दिग्दर्शक कोण? तर त्या चित्रपटाला लताबाईंनी संगीत दिलं होतं. म्हणजे हा एक मोठा गमतीदार योग आहे की मी चित्रपटासाठी पहिलं गाणं जेव्हा लिहिलं तेव्हा त्याचं संगीत लताबाईंनी दिलं. त्या वेळी त्या खूप कामामध्ये होत्या. त्यामुळे अशी काही शक्यता निर्माण झाली नाही की त्यांच्यासोबत बसून वा चर्चा करून गाणी करता आली नाही. मी गाणी दिनकररावांकडे दिली आणि दिनकररावांनी ती लताबाईंकडे दिली. आणि तो चित्रपट पुष्कळ चालला. नंतर मला जी संधी आली ती अशी की मी मामा वरेरकरांकडे लेखनिक म्हणून काम करायला जात होते. आमच्या नवयुगच्या ऑफिसपासून त्यांचं घर जवळ होतं. चिंतामणराव कोल्हटकर मामांचे फार जवळचे मित्र. ते त्या वेळी मामांचं कुठलं तरी नाटक बसवत होते. त्याच वेळी बाबा म्हणजे, भालजींकडे त्यांचा कोणता तरी चित्रपटही सुरू होता. मला वाटतं, ‘मोठी माणसं’ हे त्या चित्रपटाचं नाव असावं. तर ते भालजींना काय म्हणाले की, मुंबईला एक अशी मुलगी आहे जिला कवितेची हौस आहे. तिला एखाद्या चित्रपटात गीत लेखनाची संधी का देत नाही? तर बाबांनी त्या वेळी कोल्हापूरचं जाण्या-येण्याचं तिकीट देऊन बोलावून घेतलं. मी तिथे गेले. तिथे एका हॉटेलात राहिलो. खाणं-पिणं, दिवसातून दहा वेळा चहा, अशी सर्व मजा सुरू होती. पण, गाणी कुठं सुचतात? गाणी अजिबात सुचेनात मला. ‘स्वराज्याचा शिलेदार’ म्हणून तो चित्रपट होता. मला खूप नव्‍‌र्हसनेस आला. शेवटी मी म्हटलं, ‘मला परतीचं तिकीट काढून द्या मी परत जाते मुंबईला.’ ते म्हणाले, ‘तुम्ही धीर सोडला तर कसं होणार? ललला, डडडा, टटटा.. असं काहीतरी गुणगुणत राहा. त्याच्यातून सुचेल गाणं आणि नाहीच सुचलं तर मी आहे ना’ म्हणाले. अशा पद्धतीनं त्यांनी माझ्याकडून ते सर्व करून घेतलं. त्यानंतर ‘शिवा रामोशी’ चित्रपट निघाला. त्याचीही गाणी त्यांनी माझ्याकडून करवून घेतली.

सुधीर मोघे – या कारकीर्दीतले महत्त्वाचे टप्पे तुम्हाला कुठले वाटतात?

शान्ता शेळके – महत्त्वाचे टप्पे म्हणजे, पहिला मला ज्यांचा आदरपूर्वक उल्लेख करायला पाहिजे ते म्हणजे संगीत दिग्दर्शक वसंत पवार. आता संगीत दिग्दर्शक  म्हणून ते किती मोठे होते हे सर्वाना माहीत आहे. पण, माणूस म्हणूनही तितकेच मोठे होते. त्यावेळी अनंत माने चित्रपट काढत होते. त्यांनी एकदम तीन-चार चित्रपटांची गाणी माझ्याकडून करून घेण्याचं ठरवलं. पण, पुन्हा माझा नव्‍‌र्हसनेस. म्हटलं, ही गाणी मला कशी काय जमणार? तर वसंतराव अक्षरश: पेटी घेऊन बसायचे. खूप काही ऐकवायचे. कंटाळा आला की पत्त्यांच्या ट्रिक्स करून दाखवायचे, जादू करून दाखवायचे. त्यांनी खूप हसत-खेळत, प्रोत्साहन देऊन काम करवून घेतलं. शेवटी माझ्यात इतकी धिटाई निर्माण झाली की मी त्यांना एक चाल सुचवली बरं का! त्यावेळी ‘दिल्लगी’ नावाचा एक चित्रपट होता आणि ‘मुरलीवाले मुरली बजा..’ असं काहीतरी सुरैय्याचं गाणं होतं. मीही म्हटलं, अशी काहीतरी एखादी चाल देता नाही का येणार? ते म्हणाले, ‘येईल-येईल. तुम्ही म्हणता ते सगळं करू आपण.’

सुधीर मोघे – शान्ताबाई, तुम्ही कविताही लिहिल्यात स्वत: ज्याला आत्मनिष्ठ कविता म्हणतात अशा आणि भावगीतही लिहिली. पण, चित्रपटगीत हा पूर्णत: वेगळा प्रकार आहे. तर त्यातलं आव्हान तुम्हाला काय वाटतं?

शान्ता शेळके – चित्रपट गीताची आव्हानं आहेत ना! पहिलं आव्हान म्हणजे, आपली अनुभूती नसते ती. कवितेत आपण आपली व्यक्तिगत अनुभूती मांडतो. चित्रपटासाठी लिहिताना कधी लावणी लिहायची असते, कधी अंगाई गीत लिहावे लागते, कधी देवाची प्रार्थना असते, कधी द्वंद गीत असतं. इथे कुणाच्या तरी भावनांमध्ये तुम्हाला प्रवेश करावा लागतो. हे एक आव्हान त्यामध्ये आहे. दुसरं एक आव्हान मी असं म्हणेण की, संगीत दिग्दर्शकाला जास्तीत जास्त दक्ष राहावं लागतं.

सुधीर मोघे – चित्रपटगीते लिहिण्यात जी अनेक आव्हानं आहेत, त्यातलं एक सर्वात मोठं आव्हान म्हणजे चालीवर गीत लिहिणं. ज्याच्याविषयी खूप गैरसमज आहेत आणि कवीच्या मनात अशी दडस असते त्या बाबतीत. तर याबाबतीत तुम्हाला काय वाटतं?

शान्ता शेळके – आपल्याकडे ही पद्धती काही सिनेमाबरोबरच आली असं नाही. आपली जी जुनी नाटय़ परंपरा आहे त्यात तुम्हाला सर्वत्र असं दिसेल की संगीतकारांनी चिजा दिलेल्या आहेत. विशेषत: भास्करबुवा बखले किंवा रामकृष्णबुवा वझे किंवा सुंदराबाई जाधव, नंतरच्या काळामध्ये गोविंदराव टेंबे, अशी ही संगीताच्या क्षेत्रातील नामवंत मंडळी होती. त्यांनी जेव्हा नाटकांसाठी चाली लिहिल्या तेव्हा त्यांनी काय केलं की अतिशय उत्तम अशा चिजा त्यांनी दिल्या. या चिजांवरून त्या काळातील नाटककारांनी गीते लिहिली आहेत. मी याची दोन-तीन उदाहरणं सांगते, ‘चढला रवी तापा..’ असं एक गाणं आहे. हे गाणं ‘जमुनातट शाम खेले होली..’ या गाण्यावरून ते रचलेलं आहे. दुसरं एक ‘विद्याहरण’मधलं गाणं आहे पाहा ‘मधुकर वनवन फिरत करी..’ तर ते ‘पिया कर धरकत है मोरी छतिया’ किंवा ‘नाही मी बोलत नाथा.. हे हमसे ना बोलो राजा..’ अशी जी चीज आहे त्यावरून ते घेतलेलं आहे. कानडी चिजांवरून चाली घेतलेल्या आहेत. त्यामुळे मुळात हा प्रकार नवा नाही.

सुधीर मोघे – चित्रपट गीतावर दोन आरोप नेहमी केले जातात. ते बऱ्याच वेळा पूर्वग्रहदूषित आणि थोडय़ाशा अज्ञानातूनसुद्धा होतात. त्यातला एक आहे गीतातल्या कारागिरीबद्दलचा आणि दुसरा आहे तो उसनवारीचा. तर या दोन्ही गोष्टींविषयी तुम्ही काय सांगाल?

शान्ता शेळके – कारागिरीबद्दल म्हणाल तर मला असं वाटतं की, कविता रचनेतदेखील कारागिरी आहे. चित्रपट गीतांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जेव्हा तुम्ही गीत लिहायचे कबूल करता तेव्हाच तुम्ही कवीच्या भूमिकेवरून गीतकाराच्या भूमिकेत येता. मग गीताची काही बंधनं तुम्हाला आपोआप पत्करावी लागतात. उसनवारीबद्दलही मला असं म्हणायचं आहे की, ज्यावेळी तुम्ही गीतरचना करीत असता तेव्हा सामूहिक जनमानसाच्या भावना तुम्ही त्यात प्रकट करीत असता. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं की लोकांना आवडणाऱ्या कल्पना किंवा त्यांच्या अनुभव संचितामध्ये ज्या गोष्टी आहेत, किंवा ज्यामुळे लोकांच्या मनातील सुखद अशा भावना जागृत होतील ती रचना करावी लागते. कवितेबद्दल आपण खूप जागृत असतो. कुणाची छाप आपल्या कवितेवर नसावी, असा आपला प्रयत्न असतो. परंतु गीतांमध्ये लोकगीतांचं भांडार असतं, परंपरेने दिलेली सगळी गाणी असतात. या गाण्यांसाठी समूहाचं भावनासंचित असतं तुम्हाला उसनवारी करायला, पण मी त्याला उसनवारीदेखील म्हणणार नाही. ते उचलायला तुम्हाला काही हरकत नाही. आता माडगूळकरांची उदाहरणं मी तुम्हाला सांगते, त्यांच्या कितीतरी गीतांची मुळं अशा परंपरेमध्ये असलेली तुम्हाला दिसतील. तरीही त्या गीतांना त्यांनी आपलं स्वतंत्र परिमाण दिलेलं आहे. ‘उद्धवा अजब तुझे सरकार..’ असं जे गाणं आहे ते जनाबाईंचं एक गाणं आहे ‘विठ्ठला धुंद तुझा दरबार..’ यावरून घेतलं आहे. याला मी चोरी म्हणणार नाही. माडगूळकरांनी संस्कृतमधून घेतलं, इंग्रजीतून घेतलं, लावण्यांमधून त्यांनी घेतलं आहे. उदाहरणार्थ – ‘राया तुम्ही घडीभर पलंगावरी बसा..’ अशी एक लावणी आहे. तर ‘माझ्यासंग पंगतीत बोलू नका..’ असं त्यांनी केलंय. पण, ही मी चोरी मुळीच म्हणणार नाही. हे भांडार असं खुलंच असतं आणि गीतकारांनी मुक्त हस्ते त्यातून उचल करायची असते.

सुधीर मोघे – आपण अनेक संगीतकारांसोबत कामं केली. त्यातले अनुभव?

शान्ता शेळके –  मला असं वाटतं ना, की मी फार भाग्यवान आहे असं म्हटलं पाहिजे. त्याचं कारण असं की सलील चौधरींसारख्या मोठय़ा संगीतकाराबरोबर मी ‘सूनबाई’मध्ये गाणी केली. त्यांनी बंगाली चाली मला दिल्या आणि त्यावरती मी गीतरचना केली. त्यामुळे माझा बंगालीत प्रवेश झाला. त्याच्यानंतर मंगेशकर मंडळींबद्दल तर बोलायलाच नको. ती तर अलिबाबाची गुहाच होती. माझ्या गीतांचं खूपच मोठं श्रेय त्यांना द्यायला पाहिजे. सुधीर फडके यांनी मला परिश्रमाचे महत्त्व शिकवले. काही गाणी त्यांनी १३-१३ वेळा करवून घेतलेली आहेत. राम कदम यांच्याकडे लावण्यांचं अफाट भांडार होतं. तसंच वसंत पवार यांच्याकडे होतं. त्यामुळे त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. याशिवाय अशोक पत्की, बाळ पळसुले, बाळ पार्टेपर्यंत सगळ्यांसोबत मी काम केलं. एकदा माझ्या मनात विचार आला, आपण सर्व संगीतकारांसाठी काम केलं, पण वसंत प्रभू आणि वसंतराव देसाई राहिलेच. पण, मग मला आठवलं की वसंतराव देसाई यांनी एका सार्वजनिक समारंभासाठी माझ्याकडून एक गीतरचना करून घेतली होती. आणि दुसरं, वसंत प्रभूंसाठीही मी एक गाणं केलं होतं. ‘पुत्र व्हावा ऐसा’ या चित्रपटासाठी त्यांना एक गाणं हवं होतं, तर ते गाणं त्या चित्रपटाच्या प्रोडय़ुसरने माझ्याकडून करवून घेतलं. मग मला समाधान वाटलं की ठीक आहे, हे काही सुटलेले नाहीत आपल्याकडून.

सुधीर मोघे – शान्ताबाई तुम्ही कविता लिहिल्या, गीतं लिहिलीत. यापैकी तुमचा पिंड कशाला अनुकूल आहे, असं तुम्हाला वाटतं?

शान्ता शेळके – कविता लिहिण्यात एक वेगळा आनंद आहे. गीतरचनेतही वेगळा आनंद आहे. त्याच्यानंतर बालगीतं लिहिणं यात एक वेगळा आनंद आहे. पण, एक मात्र आहे की कविता ही कायम माझीच राहिली आहे. कधी-कधी वर्ष-वर्षसुद्धा आपल्याला कविता सुचत नाही, तर तिथे मी कधी अट्टाहास केला नाही. दिवाळी अंक आलेले आहेत तर आपण चार-पाच कविता लिहिल्याच पाहिजेत. पण, चित्रपटाची निकड वेगळी असते. कधी-कधी तो चित्रपटाचा प्रोडय़ुसर येऊन सांगतो की उद्या आम्ही स्टुडिओ बुक केलेले आहे, तेव्हा आज आम्हाला एक गाणं पाहिजे.

सुधीर मोघे – कमी वेळात तुमचा प्रवास कळला. तुमच्या व्यासंगाची खोलीही कळली, व्याप्तीही कळली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सर्व गोष्टींकडे पाहणारी तुमची निर्मळ, निकोप नजर कळली. जी मला लाखमोलाची वाटते. मन:पूर्वक धन्यवाद! गप्पा संपवताना विनंती आहे की, तुमची एक कविता ऐकायची आहे. ती कविताही आहे आणि गीतही आहे. ते तुमचं मनोगत तर आहेच, पण कुणाही सच्च्या गीतकाराचं मनोगत तेच असू शकतं..‘असेन मी नसेन मी, तरी असेल गीत हे..’ ऐकवता?

शान्ता शेळके –

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे

फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे

हवेत ऊब भोवती, सुवास धुंद दाटले

तसेच काहिसे मनी, तुला बघून वाटले

उन्हें जळात हालती तिथे दिसेल गीत हे

स्वयें मनात जागते, न सूर ताल मागते

अबोल राहुनी स्वत: अबोध गूज सांगते

तृणांत फुलपाखरू तसे बसेल गीत हे

तुला-मला न ठाउके, पुन्हा कधी, कुठे असू

निळ्या नभांत रेखिली, नकोस भावना पुसू

उरी भरून राहिले, तुला दिसेल गीत हे

फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे

(संकलन, संपादन शफी पठाण)