बिपीन देशपांडे
फळ बाग शेतीत आता चिंच लागवडीकडेही अनेक शेतकरी लक्ष देऊ लागले आहेत. औरंगाबाद येथील हिमायतबाग फळ संशोधन केंद्रामध्ये चिंच वृक्षावर संशोधन सुरू असते. या केंद्रातर्फेच चिंचेचे नवे ‘शिवाई’ हे वाण विकसित करण्यात आले आहे.
शेतक ऱ्यांसह त्यांच्या पुढील पिढ्यांसाठीही उत्पन्नाचा स्राोत वाहता ठेवणारे, असे चिंचेचे नवे ‘शिवाई’ हे वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या औरंगाबाद येथील हिमायतबाग फळ संशोधन केंद्राने विकसित केले आहे. कोरडवाहू जमिनीतही वर्षाला सहा ते सात क्विंटल चिंचेचे चांगले उत्पन्न देणारे हे वाण असल्याचा दावा केंद्राचे अधिकारी करतात.
औरंगाबादमधील दिल्ली गेट भागात हिमायतबाग फळ संशोधन केंद्र आहे. या केंद्राचा परिसर साधारणपणे ३०० एकरमध्ये विस्तारलेला आहे. या भागात सुमारे एक हजार चिंचेची झाडे आहेत. या झाडांमध्ये ‘प्रतिष्ठान’, ‘अजिंठा’, ‘२६३’ या वाणांचा समावेश आहे. तर आता नव्याने विकसित करण्यात आलेल्या ‘शिवाई’ या वाणाची २०० रोपे लावण्यात आलेली आहेत. त्याला फळ येण्यास आणखी तीन वर्षांचा अवधी आहे. ‘२६३’ नंतर शिवाईसाठी पाच ते सहा वर्षांचा अभ्यास करण्यात आलेला आहे, असे फळ संशोधन केंद्राचे प्रमुख अधिकारी डॉ. एम. बी. पाटील यांनी सांगितले.
‘२६३’ या वाणाला देशातून सर्वच भागातून मागणी आहे. ‘प्र्तिष्ठान’ वाणातून वर्षाला ४ ते ५ क्विंटल, ‘२६३’ मधून ५ ते ६ क्विंटल चिंच मिळते. आता या नव्याने विकसित केलेल्या ‘शिवाई’ वाणातील चिंचेचे झाड ६ ते ७ क्विंटल माल शेतक ऱ्यांना देईल असा अंदाज आहे. आजचा चिंचेचा दर सात ते दहा हजार रुपये क्विंटल एवढा आहे. एवढ्या मालातून ३५ ते ४० हजार रुपयांच्या पुढे शेतक ऱ्यांना उत्पन्न मिळू शकेल, असा दावा केंद्राचे अधिकारी करतात.
कोरडवाहू शेती असणाऱ्या शेतक ऱ्यांना चिंचेचे झाड बांधावर लावून उत्पन्नाचा स्राोत तयार करता येऊ शकतो. शेताच्या मध्यभागी लावली तर ३० मीटरचे अंतर असावे. कुठल्याही चिंचेच्या लागवडीसाठी अंतराचा हाच नियम लागू राहील. त्यापेक्षा कमी अंतरावर लागवड केली तर अपेक्षित उत्पन्न साध्य होऊ शकणार नाही.
चिंच हे फळ मूळ आफ्रिकेतून आलेले आहे. हजारो वर्षांपूर्वी ती आपल्याकडे आली असल्याचा अंदाज आहे. त्यात मोठ्या आकड्यांची चिंच ही महाराष्ट्रातच केवळ आढळून येईल. त्यातही गराचे प्रमाण अधिक आहे. तामिळनाडूत गेले तर ‘केरियाकुलम’ नाव असलेला चिंचेचा प्रकार आढळून येतो. त्याचे आकारमान लहान असते.
चिंचेच्या झाडांचे वयोमान ८० वर्षांपेक्षाही अधिकचे असते. अधिक उत्पन्नासाठी झाडाची झाडणीच करावी लागते. चांगली झाडणी झाली तर पुढील वर्षांत अधिक फळधारणा होते. झाडणी झाली तर झाड सुप्तावस्थेत जाते. त्यातून कार्बोहायड्रेड, कर्बोदके तयार होतात. ते पुढच्या येणाऱ्या फुलांमध्ये येतात. ज्या झाडांना चिंचा येत नाहीत, त्यांनाही झोडपणे आवश्यक आहे, असे केंद्राचे अधिकारी सांगतात.
चिंचेचे विविध उपयोग
चिंचेचा उपयोग खाद्य पदार्थासह कारखान्यामध्ये वस्तू निर्मितीच्या ठिकाणी होतो. चिंच ही उष्णतेची दाहकता कमी करणारे फळ आहे. फटाक्यांमध्ये रासायनिक घटकांसोबतच चिंचोक्यांचे पीठ वापरले जाते. चिंचोक्यांचा सध्याचा बाजारभाव २ ते अडीच हजार रुपये क्ंिवटल एवढा आहे. चिंचोक्यांचे काळसर लाल रंगाचे आवरण असते. त्याला ‘लेदर इंडस्ट्रिज’मध्ये रंग देण्यासाठी उपयोगात आणले जाते. चिंचेचे टरफल वीट भट्टीवर भाजण्याच्या भुशासारख्या साहित्यात वापरले जाते.
– डॉ. एम. बी. पाटील, प्रमुख अधिकारी, फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग केंद्र, औरंगाबाद
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2021 12:20 am