कोणताही लाभ वा मानमरातब याची अपेक्षा न ठेवता निरलसपणे विज्ञान प्रचार आणि प्रसाराचे काम करणारे श्रीकृष्ण गुत्तीकर यांचे अलीकडेच निधन झाले.  आगळ्यावेगळ्या अशा या विज्ञानवादी  संशोधकाच्या कार्यकर्तृत्वाचा  हा मागोवा..

लोकविज्ञान संघटनेचे आधारस्तंभ असलेले, वयाच्या ८२व्या वर्षीही प्रचंड उत्साहाने विज्ञान-प्रसाराचे काम करणारे श्रीकृष्ण गुत्तीकर यांच्या अचानक जाण्याने लोकविज्ञान संघटनेत तर मोठी पोकळी झाली आहेच, पण विज्ञान चळवळीतील निरनिराळे प्रवाह आणि कार्यकर्ते यांच्यातील एक महत्त्वाचा दुवाही निखळला आहे. पक्का विज्ञानवादी, पुरोगामी असा हा हाडाचा कार्यकर्ता दिलदारपणे सर्वाशी संवाद साधणारा आणि जीवनावर सर्वागाने प्रेम करणाराही होता. अनेकांना त्यांच्या नकळत विज्ञान-प्रसाराच्या कामात ओढणाऱ्या या विलक्षण व्यक्तिमत्त्वाची समाजमानसात नीट नोंद व्हायला हवी.

घरच्या परिस्थितीमुळे विज्ञानाची पदवी न घेताच ते नोकरीला लागले. विषाणूजन्य आजार पसरवणाऱ्या निरनिराळ्या रक्तपिती डासांचे व संबंधित कीटक, पक्षी, प्राणी यांचे सर्वेक्षण करणाऱ्या पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेतील चमूत ते होते. या सर्वेक्षणाच्या कामाकडे केवळ नोकरीतील एक काम असे न बघता ते एक आव्हान म्हणून बघत. हिमालयापासून ते दक्षिणेतील शिमोगाच्या घनदाट जंगलांमध्ये निरनिराळ्या परिस्थितीत संबंधित निरीक्षणे नोंदवण्याचे चिकाटीचे, मेहनतीचे काम उत्साहाने गुत्तीकर करत होतेच, पण शिवाय संबंधित प्राण्यांच्या वागणुकीबाबत काही वैज्ञानिक अनुमाने बांधून त्याचा प्रसंगी धोका पत्करून पाठपुरावा ते करत. स्थानिक रहिवाशांमध्ये मिसळून, त्यांच्याशी मैत्री करून त्यांचे सहकार्य या सर्वेक्षणात ते सहजतेने मिळवत. कामाबद्दल त्यांची बांधिलकी, विलक्षण उत्साह तसेच निरीक्षण व अनुमानक्षमता अशा निरनिराळ्या चतुरस्र गुणांमुळे लवकरच ते सहकाऱ्यांमध्ये आदरणीय व प्रिय झाले. त्याचबरोबर संस्थेतील विशेषत: कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कधी अन्याय झाला तर ते अधिकाऱ्यांशी निर्भीडपणे वाद घालत, त्यांची बाजू नीट मांडून अधिकाऱ्यांना मुद्दा पटवून देत. त्यांचे दर्जेदार काम, निस्पृहता, कळकळ यामुळे अधिकाऱ्यांमध्येही त्यांच्याबाबत स्नेहपूर्ण आदरभाव होता.

१९८० मध्ये स्थापन झालेल्या लोकविज्ञान संघटनेच्या कामाशी त्यांची ओळख झाल्यावर त्यांनी लोकविज्ञान संघटनेच्या कामात स्वत:ला झोकून दिले, कारण त्यांची वैज्ञानिक, मानवतावादी ऊर्मी, त्यांचा चतुरस्रपणा, लोकसंग्रह आदी गुणांना तिथे पूर्ण वाव होता. विशेषत: वंचित समाजामध्ये विज्ञान रुजवण्याचे काम लोकविज्ञान संघटना करत होती याचे गुत्तीकरांना खास आकर्षण होते. तसेच लोकविज्ञान संघटनेच्या कामात केवळ वैज्ञानिक माहिती देण्यावर भर नव्हता, तर निरनिराळ्या विज्ञान-शाखांना सामाईक अशी वैज्ञानिक विचारपद्धती रुजवण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे निरनिराळ्या विज्ञान-शाखेतील तज्ज्ञांच्या मदतीने आयोजित केलेल्या लोकविज्ञानच्या सर्व कार्यक्रमांत ते उत्साहाने भाग घेत. तसेच ‘ज्या प्रश्नांची उत्तरे आज मिळालेली नाहीत ती वैज्ञानिक विचारपद्धती वापरूनच मिळतील,’ असा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची लोकविज्ञान संघटनेची भूमिकाही त्यांना मनोमन पटली होती कारण ते स्वत: पक्के  विज्ञानवादी होते.

गुत्तीकरांना अभिप्रेत असलेल्या विज्ञानवादाचे केंद्र माणूस होता. त्यामुळे विज्ञानाचे सामान्य माणसावर होणारे परिणाम हा त्यांच्या दृष्टीने कळीचा मुद्दा होता. मानवी ऊर्मीना पुरेपूर वाव देणारे, सुखी जीवन हे सर्व आधुनिक विज्ञानामुळे प्रत्यक्षात आणता येईल असे ते लोकांपुढे ठासून मांडत. पण त्याच बरोबर विज्ञानाच्या दुरुपयोगाच्या विरोधातही ते ठाम भूमिका घेत; लोकविज्ञानच्या अणुबॉम्बविरोधी मोहिमेच्या नियोजनातही ते पुढाकार घेत राहिले.

लोकांमध्ये मिसळण्याचे त्यांना व्यसन असल्यामुळे विज्ञान यात्रा, विज्ञान जत्रा, विज्ञान दिन आयोजित करण्याची त्यांना मनस्वी आवड होती. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील नेरूरपार इथे ‘वसुंधरा विज्ञान केंद्रा’त २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन आयोजित करण्यात त्यांनी यंदाही, वयाच्या ८२व्या वर्षीही  पुढाकार घेतला. सुयोग्य वक्ता निवडून त्याला आठ तासांचा मोटार प्रवास घडवत नेरूरपारला घेऊन जाण्याचा सात वर्षांचा शिरस्ता त्यांनी यंदाही पाळला!

विज्ञान, प्रबोधन चळवळीतील महाराष्ट्रभरच्या संस्था, संघटना आणि व्यक्ती यांच्याशी गुत्तीकरांचे संबंध वाढत गेले ते लोकविज्ञान दिनदर्शिकेमुळे. ही अभिनव दिनदर्शिका प्रसिद्ध करून तिचे महाराष्ट्रभर वितरण करणे हे त्यांचे मिशनच बनले होते. ही दिनदर्शिका प्रसिद्ध करण्यामागे विचार आहे की विज्ञान, वैज्ञानिक, वैज्ञानिक शोध हे लोकांच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा, विचारविश्वाचा, भावविश्वाचा भाग बनावे. सामाजिक-राजकीय पुढारी, देवादिक असे फोटो जसे निरनिराळ्या ठिकाणी लावले जातात, त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे आपले जीवन प्रगत, सुखी बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशा शास्त्रज्ञांचेही फोटो ठिकठिकाणी लागावे; त्यांनी लावलेल्या शोधाची, धडपडीची माहिती सर्वाना व्हावी यासाठी ही दिनदर्शिका आहे. तिच्या प्रत्येक पानावर एका पथदर्शी वैज्ञानिकाचा फोटो असतो तसेच त्याचे काम व वैयक्तिक जीवन याबद्दल सुबोध माहिती आणि इतर उद्बोधक विज्ञान-टिपणे असतात. गेली २९ वर्षे लोकविज्ञान दिनदर्शिका प्रसिद्ध होते आहे. त्यासाठी सुयोग्य शास्त्रज्ञ निवडायचे, त्यांच्यावरील टिपणे काही तज्ज्ञांकडून लिहून घ्यायची, स्वत: लिहायची, त्यांचे संपादन करायचे, प्रूफे तपासायची, आकर्षक डिझाइन, मांडणी करण्यासाठी उदय बांदिवडेकरांशी सतत संवाद करायचा, जाहिरातीवजा देणग्या मिळवायच्या, छपाई, वितरण ही सर्व कामे गुत्तीकर गेली अनेक वर्षे अत्यंत आवडीने, निष्ठेने, तळमळीने करत होते. आमचा इतर काही जणांचा सहभाग फारच थोडा होता. महाराष्ट्रातील ठिकठिकाणचे कार्यकर्ते अगदी आवर्जून वर्षांनुवर्षे ५०, १००, २०० दिनदर्शिकांची मागणी नोंदवत. त्या सर्वाशी गुत्तीकरांचा छान संवाद असायचा. दिनदर्शिका कमी किमतीत देता यावी म्हणून बरेचसे जाहिरातदार आपणहून देणगीवजा जाहिरात देत. गुत्तीकरांच्या प्रयत्नाने महिनाभरात ७-८ हजार दिनदर्शिका हातोहात विकल्या जात.

गुत्तीकरांना सर्वाचे सहकार्य मिळे कारण त्यांची तळमळ, निष्ठा या सोबत त्यांचा दिलदार, गप्पिष्ट स्वभाव, कामाच्या पलीकडे जाऊन, कधी काळी आलेले कटू अनुभव विसरून निरनिराळ्या संघटनेतील लोकांशी ते जिव्हाळ्याचे नाते बांधायचे. साहित्य, संगीत, कला, पक्षी निरीक्षण अशा अनेकविध विषयांत त्यांना चांगली जाण होती. आपल्याला आवडलेली गोष्ट आवर्जून इतरांबरोबर शेअर करण्याची हौस त्यांना होती. मित्रमंडळींना, कार्यकर्त्यांना आपणहून चौकशीचे फोन, इतरांचे मनापासून कौतुक, आपुलकीने, वडीलकीच्या नात्याने दिलेले सल्ले, मित्रांना घरी बोलावून स्वत: केलेले निरनिराळे पदार्थ खायला घालण्याचा शौक, निरनिराळ्या विषयांवर गप्पा.. एकूणच माणसांवर विलक्षण लोभ. अशा त्यांच्या स्वभावामुळे सर्वाना ते आपले वाटत. त्यांच्या पत्नी, मुले, जावई सर्वाचे लोकविज्ञानाच्या कामात सहकार्य असल्याने सर्व कार्यकर्त्यांचे त्यांच्या घरी स्वागत असे, कारण त्यांचे काम आणि वैयक्तिक आयुष्य यात फारकत नव्हती. अशा या जगन्मित्र, अजातशत्रू, जिंदादिल गुत्तीकरांची परंपरा चालू ठेवणे हीच त्यांना आदरांजली ठरेल!

डॉ. अनंत फडके

anant.phadke@gmail.com