अशोक तुपे

दुग्धव्यवसाय हा शेतीचा महत्त्वाचा जोडधंदा आहे. दुग्धव्यवसायात एकूण खर्चाच्या ७० ते ७५ टक्के चारा व पशुखाद्यावर खर्च होतो. जनावरांच्या आहारामध्ये ७० टक्के हिरवा व सुका चारा असतो. लसूण घास, मका, ऊ स व वैरण या पारंपरिक चाऱ्याबरोबरच आता बिनकाटय़ाचे निवडुंग, ओट (सातू), संकरीत नेपीअर गवत याचा वापर सुरू झाला आहे.

शेतीला दुग्धव्यवसाय हा महत्त्वाचा जोडधंदा आहे. दुग्धव्यवसायात एकूण खर्चाच्या ७० ते ७५ टक्के चारा व पशुखाद्यावर खर्च होतो. जनावरांच्या आहारामध्ये ७० टक्के हिरवा व सुका चारा असतो. ३० टक्के पशुखाद्याचा वापर केला जातो. लसूण घास, मका, ऊ स व वैरण या पारंपरिक चाऱ्याबरोबरच आता बिनकाटय़ाचे निवडुंग, ओट (सातू), संकरीत नेपीअर गवत याचा वापर सुरू झाला आहे. राज्यात चाऱ्यासाठी पोटपिकाची लागवड आता वाढू लागली आहे.

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे चारा संशोधन केंद्र १९७१ मध्ये सुरू झाले. आता या केंद्राला ५० वर्षे पूर्ण झाले आहेत. चारा पिकांवर येथे मोठय़ा प्रमाणात संशोधन सुरू असते. संशोधक डॉ. प्रसन्ना सुराणा, डॉ. प्रमोद बढे, डॉ. एस. ए. लांडगे, डॉ. संदीप लांडगे, कुणाल पवार, प्रा. शिवाजी दमामे, प्रा. सर्फराज पठाण, प्रा. अण्णासाहेब तांबे हे या संशोधन केंद्रात संशोधन करीत आहेत. या केंद्राच्या माध्यमातून चारा पिकाच्या अनेक जातींचे संशोधन करण्यात आले आहेत. चारा पिकाच्या क्षेत्रात खासगी कंपन्या उतरलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यापीठावरच चारा पिकाच्या संशोधनाची जबाबदारी असून ती समर्थपणे विद्यापीठाने पार पाडली आहे.

ओट (सातू) हे गहू पिकासारखे दिसणारे चारा पीक आहे. पूर्वी त्याची लागवड उत्तर भारतात होत असे. पण अलिकडे राज्यातही ओटची लागवड वाढू लागली आहे. ओटचा चारा हा उत्पादनक्षम पोषक आणि चविष्ट आहे. ओटच्या हिरव्या चाऱ्यात ८ टक्के प्रथिने, ३५ टक्के काष्टमय पदार्थ, १.८ टक्के स्निग्ध पदार्थ, १० टक्के खनिजे व ४५.५ टक्के पिष्टमय पदार्थ असतात. हे तंतूमय असल्यामुळे जनावरांसाठी पोषक असते. त्याचा पाला हिरवागार, रसाळ, रुचकर व पौष्टिक असा असतो. त्याचे खोड देखील मऊ रसाळ व लुसलुशीत असते. त्यामुळे ओटचा हिरवा चारा जनावरे आवडीने खातात. या चाऱ्याच्या पिकात कोणतेही अपायकारक द्रव्य नसते. त्यामुळे कोणत्याही अवस्थेत जनावरांना खाऊ  घातला तरी धोका निर्माण होत नाही. दुभत्या जनावरांना या पिकाचा चारा दिल्यास दुधाच्या प्रमाणात वाढ होते. तसेच दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण वाढते. असा हा बहुगुणी चारा आहे. रब्बी हंगामात जनावरांच्या चाऱ्याकरिता दुसरे पीक नसल्याने ओट हे महत्त्वाचे ठरते. हा चारा कडब्यापेक्षा उत्तम, सरस व पौष्टिक आहे. कमी कालावधीत त्याचे उत्पादनही चांगले येते. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ओटच्या ‘फुले सुरभी’आणि ‘फुले हरिता’ या दोन संकरीत जाती तयार केल्या आहेत. दीड महिन्यात चाऱ्यासाठी येणारे हे महत्त्वाचे असे पीक आहे. त्याखेरीज अन्यही जाती उपलब्ध आहेत. आता ओट पिकाकडे शेतकरी आकर्षित झाले असून त्यापासून मुरघासही बनवू लागले आहेत.

ओट हे पीक सर्वप्रकारच्या जमिनीत येते. उत्तम निचरा होणारी जमीन ह्य पिकाला मानवते. थंड व उबदार हवामानात ते चांगले येते. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत ओट या पिकाची पेरणी करतात. आता ओटचा प्रसार आणि प्रचार राज्यात सुरू आहे. त्यामुळे शेतकरीही या पिकाकडे आकर्षित झाले आहेत. जिरायत भागात रब्बी हंगामात पाणी उपलब्ध असते. त्यामुळे जिरायत भागात या पिकाखालील क्षेत्र वाढणे गरजेचे आहे.

पूर्वी निवडुंग (कॅकट्स) हे रानावनात व पडीक जमिनीत नैसर्गिक रीत्या येत असे. त्याला काटे असल्याने त्याचा काहीही उपयोग नव्हता. मात्र, आता शोभेचे झाड म्हणून त्याचा वापर केला जातो. तसेच वास्तुशास्त्रातही निवडुंगाला महत्त्व आहे. घरासमोरील अंगणात शोभेचे झाड म्हणून निवडुंगाचा वापर वाढला आहे. निवडुंगाच्या अनेक प्रजाती आहेत. हा काटेरी वृक्ष आहे. बहुतांश निवडुंगावर काटे असतात व त्याची त्वचा जाड असते. काही निवडुंगाला काटे नसतात. अशा या काटे नसलेल्या निवडुंगाचा वापर हा जनावरांच्या चाऱ्यासाठी होतो. कितीही दुष्काळ पडला तरी निवडुंगाचे झाड तग धरून राहते. निवडुंगात ८० टक्के पाणी असते. अति थंडी व अति उष्णतेतही हे पीक तग धरते. कमी पाऊ स मुरमाड जमीन, नापीक व पडीक जमिनीत निवडुंग येते. त्यामुळे दुष्काळी भागात शोभेचे झाड असलेले निवडुंग हे चाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू लागले आहे. त्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठात निवडुंगावरती संशोधन करण्यात येत आहे.

निवडुंगाच्या पानामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅगेशिअम आदी खनिजे, १४ टक्के तंतूमय पदार्थ असतात. निवडुंगाला उन्हाळा व कोरडे हवामान चांगले मानवते. दुष्काळी भागात निवडुंग हे चारा पिकासाठी अतिशय फायदेशीर असे ठरणार आहे. निवडुंग लागवडीची पीक पद्धती ही कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. निवडुंगाच्या पानाचे तुकडे करून कोरडय़ा चाऱ्याबरोबर गाय, म्हैस व शेळी, मेंढीला चारा म्हणून ते देता येते. निवडुंगावर आता विशेष संशोधन सुरू असून डोंगराळ भागात त्याची लागवड वाढविता येऊ  शकते. मात्र, काटय़ांमुळे आजही शेतकरी त्यापासून दूर आहेत. बिनकाटय़ाचे निवडुंग हे अतिशय महत्त्वाचे असे ठरले आहे.

चाऱ्यासाठी आता गवताचा वापर हा शेतकरी नेहमी करतात. पूर्वी गायरान जमिनी मोठय़ा प्रमाणावर होत्या. चराऊ  कुरणे होती. चारा पीक म्हणून गवताची लागवड करण्याची गरज नव्हती. कुठेही गवत उपलब्ध असे. पण आता गायरान जमिनी शिल्लक राहिलेल्या नाहीत. त्यामुळे शेतात चाऱ्याकरिता गवताची लागवड केली जाते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संकरीत नेपिअर गवताची ‘फुले जयवंत’ हा वाण विकसित केला आहे. तो पौष्टिक व पाचक अशा स्वरूपाचा आहे. विशेष म्हणजे त्याची लागवड वर्षांत कधीही करता येते व पहिली कापणी लागवडीनंतर नऊ  ते दहा आठवडय़ांनी करता येते. नंतर अनेक दिवस हे गवत चालते. सहा ते आठ कापण्या सहज मिळू शकतात. या गवताचा चारा हा पालेदार, हिरवागार, रसदार व रुचकर असा आहे. राज्यातील मोठे क्षेत्र या गवताखाली आले आहे.

पारंपरिक पद्धतीचा चारा जनावरांना दिला जातो. आता अनेक पर्यायांचा विचार शेतकरी करू लागले आहेत. मका व उसापासून मुरघास केला जातो. काही भागात कपाशीपासूनही मुरघास केला जातो. मका पिकाचा मुरघास हा अत्यंत चांगला असतो. मात्र, चाऱ्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यास शेतकरी ऊ स व कपाशीचा मुरघास करतात. त्यात पोषकमूल्य कमी असतात. काही प्रमाणात दुष्परिणामही जनावरांवर होतात. त्यामुळे आता ओट, निवडुंग, नेपिअर गवत अशा पर्यायांचा शेतकरी विचार करू शकतात.

ashok.tupe@expressindia.com