शेतकऱ्यांच्या संवेदनशील प्रश्नावर भाष्य करणारा ‘मुळशी पॅटर्न’ हा मराठी चित्रपट समाजातील सामान्य माणसाने सुपरहिट केला. युवा उद्योजक पुनीत बालन यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाच्या पाठीमागे कोणत्याही मोठय़ा स्टुडिओचे पाठबळ नव्हते, परंतु हा चित्रपट समाजाने उचलून धरला, आज तोच ‘समाज’ संकटात आहे. कारण देशात सध्या ‘लॉकडाऊन’ आहे. या काळात समाजाला मदत करणे नैतिक कर्तव्य आहे, या सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून पुनीत बालन विविध पातळ्यांवर मदत करत आहेत.

आपल्या कुटुंबाला वेळ देण्याची उत्तम संधी

सध्याच्या काळात मी दोन्ही वेळचा स्वयंपाक करतो आहे. त्याची जबाबदारी माझ्याकडे घेतली आहे. ‘देऊळ बंद २’ चे लेखन सुरू केले आहे. ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे यांची ‘सातपाटील कु लवृत्तान्त’ ही कादंबरी वाचतो आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ या आगामी चित्रपटाच्या संकलनाचे काम सुरू आहे. ते अधूनमधून पाहातो आहे. त्याशिवाय आम्ही पुढाकार घेऊन पडद्यामागे काम करणाऱ्या आमच्या कलाकार बांधवांना मदतीचेही काम सुरू आहे. त्यासाठी दूरध्वनी सुरू असतात, त्यांच्या याद्या करणे, यादीनुसार त्यांच्या खात्यात रक्कम जमा करणे असे काम सुरू आहे. त्यात थोडा वेळ जातो. त्याशिवाय तंदुरुस्तीसाठी १०८ सूर्यनमस्कार आणि घरातल्या घरात अर्धा तास सायकलिंग करतो आहे. सध्याचा काळ म्हणजे आपल्या कु टुंबाला वेळ देण्यासाठीची उत्तम संधी आहे. घरात ज्येष्ठ आई-वडील असल्यास त्यांच्याशी बोलावे, कु टुंबाशी गप्पा माराव्यात. कामाच्या गडबडीत आपल्याच माणसांशी असलेला संवाद कमी झाला आहे. या निमित्तानं हा संवाद होऊ शके ल. नातेसंबंध जेवढे पक्के  करता येतील तेवढे करण्याचा प्रयत्नही करता येईल.

*  प्रवीण तरडे, लेखक-दिग्दर्शक

वेळ पुरत नाही

सध्या घरी असल्यामुळे भरपूर वाचन करत आहे, चित्रं काढतो आहे. यूटय़ूबवरील व्हिडिओ पाहून गिटार वाजवायला शिकतो आहे. गेल्या जवळपास १५ वर्षांत चित्रं काढायला वेळ झाला नव्हता. ती उणीव या काळात पूर्ण करून कॅनव्हासवर चित्र काढत आहे. त्यामुळे अक्षरश: कला महाविद्यालयाच्या काळासारखं वाटू लागलं आहे. सात र्वष कला महाविद्यालयात शिकल्यानंतर पुढे छायांकन करू लागलो. छायांकनासाठीच्या स्टोरी बोर्ड पुरतंच स्के चिंग केलं जातं. पण सात-आठ तास बसून चित्र काढायला वेळच मिळत नव्हता. पंधरा वर्षांपूर्वी कॅ नव्हासवर मी विठ्ठलाचं एक स्केच करून ठेवलं होतं. ते चित्र पूर्ण करता आलं नव्हतं. आता या सुटीच्या काळात ते चित्र पूर्ण केलं. त्याशिवाय आईचं, पत्नीचं स्केच केलं. मुलीच्या आवडत्या हॅरी पॉटर मालिके तील एका व्यक्तिरेखेचं स्केच केलं. घरी असल्यामुळे घरातली कामंही करावी लागतात. आधी असं वाटत होतं, आपल्याला कधी वेळ मिळेल.. पण सध्या भरपूर वेळ हातात आहे, तरी तो पुरत नाही असं वाटतं आहे.

* महेश लिमये, सिनेमॅटोग्राफर

सध्याचा काळ सुटीचा नाही..

चित्रपटांचं चित्रीकरण, प्रचार हे सगळं करता करता मोकळ्या वेळात काय करायचं हेच कळत नव्हतं. मात्र, आता खूप मोकळा वेळ मिळाला आहे. पहिले काही दिवस मी टीव्ही पाहिला, चित्रपट बघितले, झोपले, खाणं-पिणं के लं.. पण नंतर टाळेबंदीत वाढ होणार हे लक्षात येऊ लागलं. त्यामुळे माझा दिनक्रम असाच सुरू राहिला, तर ते माझ्या विचारांवर, तंदुरुस्तीवर, मनावर परिणाम करेल असं वाटू  लागलं. कारण मला अतिशय शिस्तबद्ध राहायला आवडतं. त्यामुळे मी माझा दिनक्रम ठरवून घेतला. त्यात आईला घरकामात मदत, चित्रपट पाहणं, योगासनं करणं, एखादं वाद्य वाजवायला शिकणं असं मी करत आहे. त्यामुळे माझा वेळ खूप छान जात आहे. संचारबंदी कधी संपेल, त्याचा कोणत्या उद्योगांवर परिणाम होईल हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे. मला असं वाटतं, की प्रत्येकानं आयुष्यात छंद जोपासले पाहिजेत. त्यामुळे आपला दिनक्रम ठरवून आपल्या मानसिक, शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. मोकळा वेळ के वळ टीव्ही पाहण्यासाठी आहे असं समजू नये. सध्याचा काळ हा सुटीचा नाही. आपल्या देशाला सुदृढ नागरिकांची गरज आहे. त्यामुळे जबाबदार नागरिक व्हायचा प्रयत्न करायला हवा.

* अमृता खानविलकर, अभिनेत्री

आवडीच्या गोष्टी आणि सकारात्मकता

सध्या मनाला येईल ते, मनाला येईल तेव्हा असं सगळं सुरू आहे. धुणंभांडी, स्वयंपाक करणे, वेगवेगळे पदार्थ करणं हे मी आनंदानं करतो. भरपूर वाचन, चित्रपट-वेब सीरिज पाहणं, मित्रमंडळींशी मनसोक्त गप्पा मारणं असं सगळं सुरू आहे. कामाच्या गडबडीत बिनकामाच्या गप्पा मारणं होतच नव्हतं, त्या गप्पा मारायला मिळत आहेत. समाजमाध्यमांचा वापर अगदी थोडासाच करतो. आंतरराष्ट्रीय राजकारण, सध्याच्या काळात शास्त्रज्ञ काय करत आहेत, पुढील काळात राजकारण कसं असेल त्याचा अभ्यासही सुरू आहे. तसेच, काही साहित्यिक, लेखक, काही ज्येष्ठ मित्रांशी चर्चा, आदानप्रदान होत आहे. वेळ मिळाला असता, तर मी हे केलं असतं वगैरे म्हणणाऱ्यांसाठी सध्याचा काळ सर्वोत्तम आहे. ज्यांना काही शिकायचं आहे, वाचायचं आहे, ते सगळं मनसोक्त करता येईल. या संकटावर आपण विजय मिळवूच, लवकरच जगाचं रहाटगाडगं पूर्वपदावर येईल. त्यामुळे वेळ होता तेव्हा केलं नाही अशी पश्चात्तापाची वेळ येऊ देऊ नये. असा वेळ आयुष्यात फार कधी मिळत नाही. सकारात्मक दृष्टिकोनातून या काळाकडे पाहिले पाहिजे. आपल्याकडे काय नाही यापेक्षा काय आहे याचा विचार करणं आवश्यक आहे.

* हृषीकेश जोशी, अभिनेते-लेखक

सामाजिक बांधिलकीची निकड स्पष्ट करताना पुनीत बालन म्हणाले, की सध्या सर्वत्र ‘लॉकडाऊ न’ असल्याने चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे हाल होत आहेत. या लोकांसाठी मदत करण्याचे आवाहन ‘मुळशी पॅटर्न’चे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांनी मला केले, त्याला प्रतिसाद देत ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटासाठी जे कामगार कार्यरत होते त्यांना अडीच लाख रुपयांची मदत केली. तसेच अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाकडे पुण्यातील सिने — नाटय़क्षेत्र, दूरचित्रवाणी व सांस्कृतिक क्षेत्रातील बॅकस्टेज आर्टिस्ट आणि ज्युनियर अ‍ॅक्टर यांच्या मदतीसाठी पाच लाख रुपयांची देणगी दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश यात्रा रद्द झाल्या आहेत, यामुळे तमाशा व्यवसायाला फटका बसला आहे. जास्तीत जास्त लोककलावंतांपर्यंत मदत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शहरातील वृत्तपत्र विक्रे त्यांच्या अडचणींबद्दल माहिती दिली असता मी, तत्काळ पुढाकार घेत जीवनावश्यक वस्तूंच्या अडीच हजार किट पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाकडे सुपूर्त केल्या. तसेच महापौरांच्या पुढाकाराने करोनाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील १० हजार गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करत आहोत. गणेशोत्सव काळातील पडद्यामागचे कलाकार, कामगार यांनाही आमची टीम मदत पोहोचवत आहे.

‘सोशल डिस्टन्सिंग’ नियमांचे पालन करत आमची टीम कार्यरत आहे, असे सांगताना बालन म्हणाले,की पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून येणाऱ्या सूचना आणि ‘लीड  मीडिया’चे विनोद सातव यांच्या विविध संकल्पना आमची टीम राबवत आहे. सध्या सुरू असलेल्या सर्व मदतकार्यात जान्हवी आर. धारीवाल या सRि य सहभागी आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे मी आवाहन करतो.

‘लॉकडाऊ न’मुळे मराठी चित्रपटसृष्टीसाठी सध्याचा काळ भयंकर संकटाचा असला तरी कलाकार, तंत्रज्ञ मंडळींनी घाबरू नये, यातून आपण लवकर बाहेर पडू. आमच्या दोन चित्रपटांचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार होते, करोनामुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे. २०२१ मध्ये एका चित्रपटाचे शुटींग सुरू होणार आहे. या तीनही चित्रपटांची जबाबदारी ‘लीड मीडिया’चे विनोद सातव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या तीनही चित्रपटात जास्तीत जास्त कलाकार, तंत्रज्ञ यांना सामावून घेतले जाईल, असे पुनीत बालन यांनी सांगितले.

स्वत:विषयी विचार करू शकतो.

घरी असल्यामुळे सकाळपासून घरात वेगवेगळी काम करते आहे. मला कधी स्वयंपाक करायला आवडत नव्हतं. त्यामुळे आता स्वयंपाक करायला शिकते आहे. आपली तंदुरुस्ती राखणं गरजेचे आहे. त्यामुळे दररोज व्यायाम करत आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या वेब सीरिज, चित्रपट पाहते. मी खूप र्वष पत्ते खेळले नव्हते. त्यामुळे बाकीच्या वेळात घरी आम्ही पत्ते खेळतो. प्रांजळपपणे सांगायचं तर, संचारबंदी सुरू झाल्यावर पहिले चार-पाच दिवस खूप छान वाटलं. कारण कामानिमित्त मी नेहमीच बाहेर असते. आता घरी राहून जवळपास महिना झाला आहे. त्यामुळे आता सगळं परत कधी सुरू होईल, कामं कधी सुरू होतील याची वाट पाहते आहे. पण सध्याच्या काळात सकारात्मक राहाण्यासाठी काहीतरी शोधलं पाहिजे. आपण स्वत:विषयी विचार करत नाही. त्यामुळे आपण काय करतो, कु ठं चुकतो, काय करायला हवं याचं विश्लेषणही या काळात आपण करू शकतो.

* श्रुती मराठे, अभिनेत्री

या संकटातून निश्चितच बाहेर पडू

आमची कामं नेहमीप्रमाणे सुरू आहेत,कारण आम्ही जवळपास क्वारंटाईन होऊनच काम करत असतो. त्यामुळे कामातून वेळ मिळाला, की घरात वेळ देतो. मुलांबरोबर घरातच कधी क्रिके ट खेळतो, कधी पत्ते खेळतो. सध्याचा काळ हा माणसासाठी आणि माणुसकीसाठीचा मोठा काळ आहे. सरकारच्या स्तरावर अतिशय जागरूकतेने काम सुरू आहे. शासनाचे वेगवेगळे घटक आणि कर्मचारी फार मोठं, संवेदनशील पद्धतीनं काम करत आहेत. अख्खं जगच या संकटाशी लढत आहे. पण आपण यातून निश्चित बाहेर पडू. घरासाठी काम आणि घरातून काम हे दोन वेगळे विषय आहेत हेही या काळामुळे लक्षात येतं आहे. या काळात अतिशय छान विचार करावा, सकारात्मकतेने पाहावे. घरात एकमेकांना गोष्टी सांगणं, गप्पा मारण्यापासून खूप काही करता येऊ शकतं. आत्ता आपल्याला वेळ मिळाला आहे, तर तो सत्कारणी लावला पाहिजे. पण जे करायचे आहे, ते घरात राहून हे लक्षात ठेवलं पाहिजे. सरकार जे सांगते आहे, त्याचं सुज्ञपणे पालन करणं आवश्यक आहे.

*  अजय-अतुल, संगीतकार

घरीच राहाणं गरजेचं

सध्याच्या या काळात आपण सर्वानी घरी राहाणं आपल्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचं आहे. मी ३ मेपर्यंत घरी राहाणार आहे. त्यानंतर सरकार जो निर्णय घेईल, त्यानुसार पुढच्या गोष्टी ठरवेन. सध्या घरीच असल्यामुळे दिवसभरात घरातली कामं करणं, चित्रपट-वेब सीरिज पाहणं, पुस्तके  वाचणं, गप्पा मारणं, मुलांबरोबर वेगवेगळे खेळ खेळणं असं सगळं सुरू आहे. आगामी काळात काय करता येईल याचाही विचार सुरू आहे. हे सगळं लवकर संपावं अशी प्रार्थना आहे. आपण सगळ्यांनी घरीच राहणं गरजेचं आहे. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन के लं पाहिजे. आपलं आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांचं आयुष्य चांगलं राहावं यासाठी प्रार्थना करावी, कारण आपण घरी राहिलो तरच आपल्या आजूबाजूचे सगळे जण सुरक्षित राहणार आहेत.

*  सुबोध भावे, अभिनेता

गाणं, गप्पा, खेळ..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या पहाटे लवकर उठून साडेचार-पाच वाजताच रियाज सुरू होतो. दिवसभरात एक ते दीड तास व्यायाम करतो. बाबांशी गाण्याविषयी चर्चा होते. त्यांच्याकडून शास्त्रीय संगीतातल्या काही वेगळ्या, नव्या गोष्टी शिकायला मिळतात. त्याशिवाय, शास्त्रीयच नाही, तर सुगम, चित्रपट संगीतापासून सारं काही ऐकतो. त्याशिवाय दिवसभरात गप्पा होत असतात, ल्युडोसारखे काही खेळ खेळतो. आमच्याकडे कुत्रा आहे, त्याला बाहेर न नेता सोसायटीतच फिरवायला घेऊन जातो. आताच्यासारखा काळ फार कधी येत नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला आपले छंद जोपासावे वाटतात, त्यांच्यासाठी ही वेळ चांगली वापरता येऊ शकते. माझ्या घरातच गाणं असल्यानं मला सहज शिकण्याची संधी मिळाली. पण ज्यांना शास्त्रीय, सुगम संगीतात काही करायची इच्छा आहे, त्यांना या काळात संगीत शिकायला मिळू शकेल.

*  विराज जोशी, युवा गायक