प्रसून जोशी

भारताने करोना-विषाणूच्या अरिष्टाशी दोन हात करताना जगापुढे एक अनुकरणीय असे उदाहरण घालून दिले आहे. साधने मर्यादित असूनदेखील भारताने या अरिष्टाचा सामना करण्यात जो समंजसपणा आणि विवेक दाखवला, त्यासाठी सरकार आणि सहयोगी यंत्रणांच्या असामान्य आखणीला श्रेय द्यायला हवेच; पण त्याहीपेक्षा उल्लेखनीय ठरतो तो आपल्या देशातील जनतेचा अभूतपूर्व सहभाग आणि समर्पणभाव, ज्याची जगात अन्यत्र कुठेही कल्पनासुद्धा करताच येणार नाही.. कारण या सहभाग आणि समर्पणभावाला एक आस्था आणि एक आत्मिक बळ यांचे पाठबळ आहे.

जेव्हा जेव्हा देशात आपण आपले हे आत्मिक बळ जागृत केले, तेव्हा तेव्हा आपण अजिंक्यच ठरलो. आपली ही सुप्त शक्ती इतक्या संकटाच्या काळात जागी करण्याचे श्रेय निर्विवादपणे आपल्या पंतप्रधानांनाच जाते. आत्मविश्वासपूर्ण आणि कठोर निर्णय घेतले तेही त्यांनीच आणि दुसरीकडे जनमानसातदेखील ‘आपण करू शकतो’ ही भावना प्रज्वलित केली तीही त्यांनीच.

चमत्कार घडू शकतातच, परंतु त्यासाठी आपणांस अखंडितपणे एक सकारात्मक विचार जिवंत ठेवावा लागतो. आस्थेला प्रश्नांच्या पिंजऱ्यात उभे करायचे नसते तर विश्वासाच्या खुल्या अंगणात घेऊन जायचे असते.

आपल्या देशातच, केव्हापासून कोण जाणे, पण काही लोकांना वाटू लागले की, आपल्याच्याने होणार नाही, जगातील इतर देशांकडे जी शक्ती, जे सामर्थ्य आहे ते आपल्याकडे कुठे आहे. आपल्या अपार शक्तीला आपणच विसरलो. ही शक्ती अनंतातून मिळते.. तिचा स्रोतही अनंत, तिची प्रतीतीसुद्धा अनंत आणि तिच्या शक्यतादेखील अनंतच असतात.

एक प्रेरक कथा आहे..

एका माणसाने एकदा रस्त्याकडेला हत्ती बांधलेला पाहिला. पुढल्या पायाला फक्त एका सुतळीच्या दोराने बांधलेला हत्ती पाहून, एवढा अवाढव्य हत्ती फक्त एका दोराने कसा काय बांधला जाऊ शकतो याचे त्याला नवल वाटले. हत्तीने ठरवले तर एका झटक्यातच दोर तोडून तो स्वतंत्र होऊ शकतो, तरीही इथे तो मान झुकवून गुमान उभा कसा काय राहिला, असे या माणसाला वाटले. त्याने माहुताला विचारले, काय हो- एवढासा दोर हत्ती तोडणार नाही का? त्यावर माहूत म्हणाला, या असे माझ्याबरोबर. पुढे गेल्यावर माहुताने एके ठिकाणी थांबून, तेथे बांधलेले बरेच हत्ती त्या माणसाला दाखवले. ते सारेच हत्ती एका पायाला एक सुतळीचा दोर बांधलेले होते. माहुताने सांगितले, ‘‘या सर्व हत्तींना, ते लहान पिल्लू होते तेव्हापासूनच असे दोराने बांधून ठेवण्याची सवय केलेली आहे. कोणालाही गुलाम बनवायचे असेल, तर आधी त्याचा आत्मविश्वास तोडणे गरजेचे असते. हत्तीची पिल्ले त्या दोराला तोडण्याचा प्रयत्न करीत, पण त्यांच्याकडे त्या वयात तेवढी शक्ती कोठून असणार? त्यामुळे हा दोर तोडता येत नाही अशी त्यांची धारणा तेव्हाच पक्की होते. त्यामुळे मग कालांतराने प्रयत्न करणेही सोडून दिले जाते. हत्तीचे पिल्लू मोठे झाले तरीही हा दोर प्रयत्न करूनही तुटत नाही, आपल्याच्याने होत नाही, होणार नाही, अशी धारणा कायमच राहाते.’’

आपल्या देशात बरेच जण असे आहेत की, त्यांनी आता प्रयत्न करणेच सोडून दिलेले आहे.. असे लोक आता पूर्णपणे विसरून गेलेले आहेत की, या दोरखंडाला आता ते एका झटक्यात तोडू शकतात.. गरज आहे ती सच्चेपणाने आत्मविश्वास जागवण्याची!

देशाचा आत्मविश्वास जागृत होणे म्हणजे काय, हे आपण साऱ्यांनीच करोना संकटाच्या काळात पाहिलेले आहे. माननीय पंतप्रधानांनी केवळ एकदा आग्रहपूर्वक सांगितले म्हणून देशाने आत्मसंयम आणि कर्तव्यभावना यांचे जे दर्शन घडविलेले आहे, ते काही साधेसुधे नाही. लोक स्वत:हून घरात राहात आहेत, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वत:ची पर्वा न करता नि:स्वार्थभावाने कार्यरत राहाणे आणि त्यांना धन्यवाद देण्यासाठीच साऱ्यांनी मिळून टाळ्या वाजवणे आणि दीप प्रज्वलित करणे या गोष्टींची कल्पनाही कोणी करू शकत नव्हते, त्या प्रत्यक्षात उतरल्या असल्याचे आपण ‘याचि डोळां’ पाहिलेले आहे.

जगातला दुसरा कोणताही देश याचा विचारसुद्धा करू शकला नसता आणि साऱ्या जगाने करोना संकटाच्या समयी भारताकडून घेतल्या गेलेल्या निर्णयांची खुल्या दिलाने, कित्येक व्यासपीठांवर प्रशंसादेखील केलेली आहे.

आपला देश हा जगापेक्षा अनेकपरींनी निराळा, आगळा असा आहे. आज जेव्हा निसर्गाचा कोप साऱ्या मानवी संस्कृतीला झेलावा लागतो आहे आणि मानवजातीसमोर कित्येक मूलभूत प्रश्न उभे आहेत, तेव्हा जर जगाने भारताकडे खरोखरच्या प्रामाणिकपणाने बघितले तर जगाला समस्यांची उत्तरे मिळू शकतील.

आपली भारतीय संस्कृती कधीही निसर्गाशी स्पर्धा करण्यास शिकवत नाही, आपण कधीच निसर्गावर स्वत:साठी विजय मिळवण्याच्या भावनेने प्रेरित होत नसतो. उलट आपण निसर्गाला नमन करतो, त्याच्या आदेशांचा अंगीकार करतो आणि निसर्गावर प्रेम करतो. आज जगाला हेच हवे आहे. कोपलेला निसर्ग नव्हे, तर कृपावंत निसर्ग हवा आहे, त्याच्या आशीर्वादाने आपला उद्धार होणार आहे.

आधुनिक विज्ञान, अनुभव आणि आध्यात्मिक बळ घेऊन वाटचाल कशी करायची असते, हे माहीत असणारा भारत हा एकमेव देश आहे.

आज भारत, आपल्या भारतीयतेच्या या भावनेचा अनुभव रसरशीतपणे घेतो आहे आणि इथेच मला देशाच्या उज्ज्वल भविष्याची चुणूक दिसते आहे. ज्याच्या दृढसंकल्प आणि आत्मविश्वासापुढे आपल्याला वारंवार रोखणाऱ्या दोरखंडांना काहीही स्थान नसेल, अशा भारताची चुणूक मला दिसते आहे. आपल्याला रोखणाऱ्या दोरखंडांना आपणच नेमके ओळखावे लागेल. तसे ओळखून काढणे आवश्यकच आहे. कारण या दोरखंडांनीच तर आपल्याला निष्क्रिय, अचेतन बनवून टाकलेले आहे. यांना तोडूनच टाकावे लागेल. अर्थात त्याची सुरुवात आपल्या माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जे ऐतिहासिक निर्णय घेतले गेले, त्यामुळे झालेलीच आहे.

प्रसून जोशी हे कवी व पटकथाकार असून केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे (सेन्सॉर बोर्ड) ते अध्यक्ष आहेत.