८ मार्च या ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’ला आजच्या वातावरणातील दोन शब्द प्रामुख्याने लक्षात घ्यावेसे वाटतातस्त्रीवाद आणि स्त्रीमुक्ती. माझ्या आकलनाप्रमाणे ‘स्त्रीवाद’ हे एक दर्शन किंवा तत्त्वज्ञान आहे. मानवी समाजाच्या हितासाठी, स्त्रीच्या दृष्टिकोनातून सर्व विश्वाला पाहणे, हे त्याचे मूलतत्त्व म्हणता येईल. आज मानवी समाजावर पुरुषी दृष्टिकोनाचा प्रभाव आहे. त्यात परिवर्तन होणे स्त्रीवादाला अपेक्षित आहे. या तत्त्वज्ञानातील ‘स्त्रीमुक्ती’ हा एक विचारप्रवाह आहे आणि तो प्रामुख्याने चळवळीच्या रूपात जनतेसमोर आला. आपल्याकडे स्त्रीमुक्ती हा शब्द प्रथम पोहोचला, स्त्रीवाद त्यानंतर!
१९७५ या ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्षां’त स्त्रीमुक्ती हा शब्द भल्याबुऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला. सुरुवातीला पाश्चात्त्य देशांतून आलेले फॅड म्हणून या विचाराकडे तुच्छतेने पाहिले गेले. त्या आरंभकाळात या विचारप्रणालीचे अधिष्ठान भारताबाहेर आहे, असे वाटण्यासारखी परिस्थिती होतीही. ८ मार्च १९०५ या दिवशी कपडे व्यवसायातील मजूर स्त्रिया त्यांच्या मागण्यांसाठी संघटितपणे प्रथम रस्त्यावर आल्या, त्यांच्यावर गोळीबार झाला. तो दिवस १९१७च्या राज्यक्रांतीनंतर कम्युनिस्टांनी ‘महिला दिन’ म्हणून उचलला. युनोने १९७५ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले तेव्हा ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ ही कल्पना जगभर प्रसारित झाली.
भारताच्या सार्वजनिक जीवनातही प्रसारमाध्यमातून ‘जागतिक महिला दिना’चे पडसाद दरवर्षी ऐकू येऊ लागले. आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृतीची प्रतीके म्हणून मंगळसूत्र घालू नये, कुंकू लावू नये या प्रकारचे विचार स्त्रीमुक्तीच्या समर्थकांकडून पुढे येऊ लागले. नवऱ्याकडून अपमान-अत्याचार सहन करण्यापेक्षा घटस्फोट श्रेयस्कर, एकत्र राहताना स्त्री-पुरुषांची मानसिक समरसता असणे विवाह विधीपेक्षा अधिक महत्त्वाचे असते, असाही विचार स्त्रीमुक्तीच्या समर्थकांकडून मांडला जात होता. त्यामुळे ती पाश्चात्त्यांच्या राहणीची नक्कल आहे असे अनेकांना वाटू लागले. या वादावादीतूनच आपल्याकडचे ‘स्त्रीवाद’ हे तत्त्वज्ञान आकार घेत होते.
आज सुमारे ३५ वर्षांनंतर असे निश्चित म्हणता येते की, स्त्रीमुक्ती ही विचारप्रणाली म्हणजे परदेशातून आलेली क्षणिक लाट ठरली नाही. ती येथे रुजली. या मातीतल्या स्त्रीच्या प्रश्नांना स्पर्श करण्याचे मूलभूत सामथ्र्य तिच्यात आले. सगळ्या राजकीय पक्षांना आणि शासनाला या विचारप्रणालीकडे लक्ष देणे भाग पडू लागले. डाव्या-उजव्या विचारधारांच्या सामन्यात ‘स्त्री’ हा समाजघटक कोणत्या बाजूला झुकेल हा प्रश्न महत्त्वाचा होऊ लागला. सगळे राजकीय पक्ष आपल्या पक्षाच्या स्त्री-आघाडीकडे लक्ष पुरवू लागले. ज्यांनी ही प्रणाली प्रथमपासून उचलून धरली त्या कार्यकर्त्यां, नेत्या, प्रामुख्याने डाव्या चळवळीतील होत्या. ‘जगातल्या सर्व कामगारांनो, एक व्हा’प्रमाणेच ‘जगातल्या सर्व स्त्रियांनो, एक व्हा’ अशी त्यांची हाक होती. या विचारसरणीचे वैशिष्टय़ हे की, महाराष्ट्रात डाव्या चळवळींची निवडणुकीच्या राजकारणात पीछेहाट होत असताना ही विचारसरणी मात्र जोरावत चालली. जनता या प्रणालीकडे कधी विश्वासाने, कधी आशेने, कधी तिरस्काराने, कधी गमतीने पाहू लागली, परंतु तिची उपेक्षा, तिच्याबद्दल दुर्लक्ष, औदासीन्य सहसा दिसत नाही. आज वळून पाहताना वाटते, या सर्व वातावरणाचा समाजावर काही प्रमाणात अनुकूल परिणाम दिसू लागला. १९७५ नंतर स्त्रियांच्या आत्मचरित्रांची संख्या प्रचंड वाढली. निरनिराळ्या स्तरांतल्या स्त्रिया आत्मचरित्रांतून आपला कोंडमारा, भावना- वासना व्यक्त करू लागल्या. त्यावर उलटसुलट विचार समाजात झिरपू लागले. यापूर्वीच्या आत्मचरित्रांमध्ये हा मोकळेपणा नव्हता. बेअब्रू होण्याच्या कल्पनेचा धाक न मानता, स्त्रियांवरील अन्याय- अत्याचाराच्या बातम्या काही प्रमाणात बाहेर येऊ लागल्या. त्यात लोकमत स्त्रीकडे सहानुभूतीने पाहू लागले. जळगावपासून गेल्या काही महिन्यांतील दिल्लीतील बलात्काराच्या घटनांवरील लोकांच्या प्रतिक्रियांत हे दिसून येते आहे.
धर्माने स्त्रीची अनेक प्रकारे कोंडी केली आहे, असे स्त्रीवादींचे प्रतिपादन आहे. हे प्रतिपादन करताना हिंदू धर्मातल्या अनेक रूढींवर आणि हिंदुत्ववादी विचारधारा शिरोधार्य मानणाऱ्या रा. स्व. संघ परिवारावर त्यांच्याकडून सतत आघात होऊ लागले. त्यांना प्रतिगामी म्हणून हिणवले जाऊ लागले. त्यामुळे एकंदर संघ परिवार या प्रणालीबद्दल सावध झाला. स्त्रीमुक्तीमुळे आपली कुटुंबसंस्था धोक्यात येते आहे का, हे हिंदू धर्मावरील,
राष्ट्रवादावरील संकट आहे का, यांच्याकडून हिंदू धर्माइतके आघात इतर धर्मावर केले जातात का, अशा प्रकारचे विचार व्यक्त होऊ लागले; परंतु त्याकडे लक्ष न देता संघ परिवारातील काही स्त्रियांनी १९८८ मध्ये ‘भारतीय स्त्री शक्ती’ ही संघटना स्थापन करून आपल्या कार्याला सुरुवात केली. आपली अधिकृत भूमिका मांडताना या संघटनेने स्त्रीमुक्ती चळवळीशी आपले नाते मान्य केले. त्यांची स्त्रीविषयक भूमिका स्त्रीमुक्तीपेक्षा काही खास निराळी तत्त्वे सांगणारी नाही. ती सामान्यत: स्त्रीमुक्तीचीच आहे. कुटुंबसंस्थेला भावनात्मक महत्त्व दिसते. एकंदरीत पाहता या संघटनेने रा. स्व. संघ परिवारातील संघटनांतले पुरुषी वर्चस्व नाकारले असे दिसते. आज वळून पाहताना स्त्रीवादी/स्त्रीमुक्ती या विचारप्रणालीच्या व्यवहारातल्या मर्यादाही जाणवतात. स्त्रियाच आपली चळवळ पुढे नेतील या धारणेतून स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रियांसाठी, स्त्रियांचे, स्त्रियांकडून अशी काही संकल्पना आहे, अशी भावना काही अंशी निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे पुरुष त्यापासून दूर गेले. ज्या स्त्रियांनी स्त्रीवादाचा पुरेसा अभ्यास केलेला नाही त्याही स्त्रिया स्त्री-प्रश्नांविषयी अधिकारवाणीने बोलू लागल्या. अशा स्त्रिया पुरुषप्रधान संस्कृतीच्या चष्म्यातूनच स्त्री-प्रश्नांकडे पाहतात. त्यांना त्या प्रश्नांमधली गुंतागुंतीची मर्मस्थाने व्यवस्थित आकलन होत नाहीत. त्यामुळे त्याही स्त्रीला न्याय देऊ शकत नाहीत. मग समाजात प्रतिक्रिया उमटतात- ‘नेमल्या ना बायकांना. सुटले का बायकांचे प्रश्न? बाई हीच बाईची शत्रू.’ हा लढा पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध आहे, पुरुषाविरुद्ध नाही, असे उत्तर स्त्रीवादींनी वेळोवेळी दिले, पण तो आवाज क्षीण ठरला. प्रगल्भ, कर्तृत्ववान स्त्रीचा मन:पूर्वक समान पातळीवर स्वीकार करण्यासाठी पुरुषांची मने तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक होते. या प्रयत्नांचे प्रमाण फार अल्प राहिले. सगळ्या जगातल्या स्त्रियांना एक होण्याचे आवाहन करणाऱ्या स्त्रीवादी, उजव्या चळवळीतल्या स्त्री-संघटनांविषयी आस्था दाखवत नाहीत किंवा त्यांना आपल्या व्यासपीठावर सामावून घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत. म्हणजे याबाबतीत त्या डाव्या पुरुषप्रधान संघटनांचे वर्चस्व मान्य करतात? स्त्रीवादी विचार आणि स्त्रीमुक्ती चळवळ यांची पुढची
वाटचाल कशी असावी?
आज सारांशाने असे म्हणावेसे वाटते की, निसर्गत:च स्त्री आणि पुरुष यांच्या शरीररचनेत भेद आहे. त्यानुसार मनोधर्मातही भेद संभवतो. हा भेद मानवी संस्कृतीने अत्यंत तीव्र केला आहे. शिवाय त्यातील उच्च-नीचतेची भावना निसर्गनिर्मित नाही, ती मानवनिर्मित आहे.
१) पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध संघर्ष करण्यासाठी पुरुषांच्या सहकाऱ्याची आत्यंतिक निकड आहे. जसे ब्राह्मणशाहीचे वर्चस्व नाहीसे करण्यासाठी सुबुद्ध ब्राह्मणांचे सहकार्य मिळाले होते तसे. मात्र उच्चवर्णीय विरुद्ध दलित किंवा भांडवलशाही विरुद्ध कामगार या संघर्षांपेक्षा स्त्री विरुद्ध पुरुषप्रधान संस्कृती या संघर्षांचे स्वरूप वेगळे आहे. दलितांच्या शोषणाचे, कामगारांच्या श्रमण्याचे उदात्तीकरण झालेले नव्हते, झालेले नाही. क्रौर्य, अन्याय तेथे ठोसपणे दिसतो. ‘स्त्रीच्या राबण्याचे’ उदात्तीकरण झालेले आहे. राबण्यासाठी तिला गृहदेवता, मातृदेवता, सौंदर्यासाठी काव्यदेवता संबोधले गेले आहे. त्यामुळे इतरांना आणि तिला स्वत:ला तिच्यावरचा अन्याय कळणेच मुश्कील होते. स्त्री-स्वातंत्र्याची वाट त्यामुळे अधिक कठीण आहे.
२) कृत्रिम गर्भधारणेचे निरनिराळे प्रयोग वैज्ञानिकांनी चालवले आहेत. हे प्रयोग प्रामुख्याने स्त्री-शरीरावरच होतात. आपले शरीर विज्ञानाचे उपकरण होऊ द्यावयाचे किंवा नाही हा निर्णय घेण्याइतकी स्त्री सक्षम व्हावी यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
३) आपल्या शरीरावर आपला स्वत:चा अधिकार आहे, हे स्त्रीच्या मनावर बिंबले पाहिजे. गर्भारपण, बाळंतपण आणि मुलांचे काही काळ पोषण या तिच्या नैसर्गिक जबाबदाऱ्या आहेत. यामुळे विवाह करावा की न करावा, करायचा झाल्यास कोणाशी केव्हा करावा, विवाह न करताच जोडीदाराबरोबर राहावे का, मुले हवीत की नकोत, किती असावीत, त्यांच्यातील अंतर किती असावे, ती कोणत्या पुरुषापासून व्हावीत हे ठरवण्याचे निर्णय घेण्यास ती सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
४) अजूनही बहुसंख्य स्त्रियांचे समाजातील स्थान दुय्यम आहे. त्या सतत पुरुषांच्या संदर्भात जगतात. कु., चि.सौ.कां, सौ., श्रीमती ही स्त्रीच्या नावामागे असलेली वैवाहिक स्थितीदर्शक बिरुदे तिच्या दुय्यम स्थानाचे निदर्शक आहेत. ती अजूनही बऱ्याच ठिकाणी वापरली जातात. ती वापरणे बंद झाले पाहिजे. या प्रकारची विवाहस्थितीदर्शक बिरुदे पुरुषाच्या मागे नाहीत.
५) आजच्या समाजचौकटीत इच्छेने किंवा अनिच्छेने प्रामुख्याने स्त्रियाच स्त्रियांना मदत करतात. नोकरी करणाऱ्या स्त्रीचे मूल सांभाळण्याची जबाबदारी आई, सासू किंवा पाळणाघरातली स्त्री घेताना दिसते. त्याऐवजी वडिलांचा अपत्यसंगोपनातील सहभाग वाढावा. त्यासाठी त्याला पालकत्वाची रजा सक्तीची असावी. मूल जन्माला आल्यानंतर स्तनपानाव्यतिरिक्त मुलाची स्वच्छता इत्यादी सर्व कामे मुलाच्या आईवडिलांमध्ये वाटली जावीत. तरच स्त्रीची मुलाशी असलेली चोवीस तासांची बांधीलकी बारा तासांवर येऊ शकेल. त्यासाठी पुरुषाला स्वत:च्या करियरला थोडा लगाम घालावा लागेल. तो घातला गेला पाहिजे.
६) प्रत्येक स्त्रीनेही स्वत:च्या गरजांपुरतेच अर्थार्जन केले पाहिजे. यात तिचे मातृत्व आडवे येऊ नये ही काळजी घेण्याची जबाबदारी नवऱ्याची असावी. तिने उपजीविकेसाठी नवऱ्यावर अवलंबून नसावे. पूर्णवेळ गृहिणीला नवऱ्याच्या उत्पन्नातील काही टक्के भाग म्हणून मिळाला पाहिजे, या प्रकारची मागणी स्त्रीवादी विचारात आहे. व्यवहारात काही ठिकाणी कौटुंबिक संदर्भात ती स्त्रीवरचा अन्याय दूर करणारी आहे, म्हणून तिचा उपयोग परिस्थितीच्या संदर्भात जरूर करावा; परंतु ते प्रत्येक प्रकरण (case) पाहून ठरले पाहिजे. कारण या मागणीत समतेच्या दृष्टिकोनातून एक घातक शक्यता दडलेली आहे. ती म्हणजे जितका नवरा पसेवाला तितका गृहिणीच्या मिळकतीतला वाटा मोठा. म्हणजे पुन्हा पसेवाला नवरा मिळवण्याकडे स्त्रियांचा कल राहणार, किंबहुना तसा नवरा मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू होणार. तेव्हा समतेचा आदर्श म्हणजे स्त्रीने आर्थिक बाजूने स्वावलंबी असणे हेच श्रेयस्कर.
७) वारसाहक्काने येणाऱ्या संपत्तीत स्त्रीचा वाटा असावा, तसेच वारशाने येणारी कर्जे आणि जबाबदाऱ्यांतही तिची
भागीदारी असावी.
८) समाजातील स्त्रीचे स्थान पुरुषाप्रमाणेच तिच्या कर्तृत्वावर ठरावे. ते तिच्या सौंदर्यावर आणि नवऱ्याच्या
समाजातील स्थानावर ठरू नये.
९) विनोदी लेखक, चित्रपट, दूरचित्रवाणीवरील मालिका यांनीही स्त्रीचे नकळत अतोनात नुकसान केले आहे. विनोदी लेखकांनी तिला करमणुकीचे साधन केले आहे. बहुसंख्य चित्रपट आणि मालिकांमधून स्त्रीची थोरवी सांगण्यासाठी तिला कधी ‘त्यागमूर्ती’, कधी ‘कारुण्यमूर्ती’ केलेले असते. कधी काहीही करू शकणारी ‘शक्तिमान देवता’ बनवले असते किंवा उलटय़ा टोकाला जाऊन ‘सूडाने पेटलेली राक्षसी’ दाखवले असते. यात स्त्रीच्या वास्तव परिस्थितीकडे दुर्लक्ष होते. यांचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक आणि स्त्रीवादी अभ्यासक यांच्यात सतत विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे.
वरवर पाहता स्त्रिया सर्व क्षेत्रांत शिरताना, सर्व जगात फिरताना दिसू लागल्या असल्या तरी त्यांना पुरुषांबरोबर समान स्थान मिळालेले नाही, हे दैनंदिन बातम्या आपल्याला सांगत आहेत. तेव्हा हा विचार पुन:पुन्हा मांडला जाण्याची आणि समाजाला त्यानुसार आचारासाठी उद्युक्त करण्याची आजही गरज आहे. स्त्री आणि पुरुष दोघेही मानवी समाजाचे अविभाज्य अंग आहेत. त्यामुळे पुरुषाला या विचारप्रणालीपासून- चळवळीपासून दूर जाणे परवडणारे नाही. एकमेकांच्या हातांत हात घालूनच आणि पायात पाय न घालता, वाटचाल केली तरच स्त्रीचा, किंबहुना दोघांचाही विकास होणे शक्य आहे.