सारे जग केवळ मनुष्य प्राण्यासाठीच घडवण्यात आले आहे, असा एक गैरसमज दिसतो. पण जगातील अन्य प्राणीही तेवढेच महत्त्वाचे आहेत, याची आठवण करून देण्याचे काम मुंबईतील ‘आवाज व्हॉइस ऑफ स्ट्रे अॅनिमल्स’ ही संस्था करत आहे. संस्थेचे स्वयंसेवक भटके कुत्रे, मांजरे अशा मुक्या प्राण्यांच्या वेदनांना ‘आवाज’ मिळवून देत आहेत…
शहरातील रस्त्यांवर, गल्लीबोळांत किंवा वसाहतींत कुत्रे, मांजरी भटकताना दिसणे नेहमीचेच. त्यांना खाऊ घालणारे असतात, तसेच त्यांच्यावर काठी उगारणारेही असतात. पण एकंदर अशा प्राण्यांचे आयुष्य खडतरच असते. अन्नासाठी दररोजची धडपड, उन्हापावसाला तोंड देणे, गाडीखाली येण्याचा धोका, जखमा, आजारपण आणि माणसांकडून होणारा त्रास अशी अनेक आव्हाने त्यांच्या समोर असतात. सुरक्षित निवारा नसल्याने त्यांचे आयुष्य अनिश्चिततेच्या छायेतच जाते. भुकेल्या, आजारी किंवा जखमी प्राण्यांकडे लक्ष देणारे कोणीही नसते. काही वेळा पिल्लांचा भुकेने जीव जातो. हे टाळण्यासाठी, मुक्या जीवांना नवी उभारी देण्यासाठी ‘आवाज – व्हॉइस ऑफ स्ट्रे अॅनिमल्स’ ही संस्था काम करते. जखमी प्राण्यांवर उपचार करणे, आजारी प्राण्यांना आसरा देणे, त्यांच्या अन्न-पाण्याची सोय करणे आणि जनजागृती करून समाजाची मानसिकता बदलणे या सर्व आघाड्यांवर ही संस्था कार्यरत आहे. प्राण्यांचे जीवनमान उंचावण्याबरोबरच माणूस आणि प्राणी यांच्यातील सहजीवन अधिक सुकर व्हावे, यासाठी ‘आवाज’ प्रयत्नशील आहे.
संवेदनशील प्राणीप्रेमींनी एकत्र येत २०१७ साली या संस्थेची स्थापना केली. उद्देश फक्त एकच- भटक्या प्राण्यांना अन्न, उपचार आणि आश्रय मिळवून देणे. सुरुवातीला हातात मर्यादित साधने होती. प्राण्यांना दवाखान्यात नेणे, त्यांचे लसीकरण, जनजागृती अशी कामे सुरू करण्यात आली. हळूहळू स्वयंसेवक आणि दानशूर लोक जोडले गेले आणि ‘आवाज’ ही संस्था आज भटक्या प्राण्यांसाठी खरी जीवनवाहिनी ठरली आहे. संस्थेच्या दोन ‘रेस्क्यू अॅम्ब्युलन्स’ असून त्या मुख्यत: विलेपार्ले पूर्व, गोरेगाव पूर्व, वांद्रे पश्चिम आणि मालाड पश्चिम या परिसरांत कार्यरत आहेत. ‘आवाज’मध्ये अनेक स्वयंसेवक सक्रिय आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी, स्थानिक नागरिक हातभार लावतात. समाजमाध्यमांवरही संस्थेच्या कामाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
‘आवाज’ने सुरुवातीला भटक्या श्वानांना खायला देण्यापासून सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू संस्थेची माहिती सर्वत्र पसरू लागली. जखमी, अपंग प्राणी दिसले की लोक आवाजशी संपर्क साधू लागले. कोविडकाळात आवाजने ४० हजारांहून अधिक प्राण्यांच्या खाद्याची व्यवस्था केली. यामध्ये श्वान, मांजरी, गायी आदींचा समावेश होता. याचबरोबर संस्थेने आतापर्यंत १५ हजारांहून अधिक प्राण्यांना वैद्याकीय उपचार मिळवून दिले आहेत. हजारहून अधिक प्राण्यांचे लसीकरण केले आहे. ‘आवाज’चे काम आता मुंबईपुरते मर्यादित राहिलेले नाही. संपूर्ण राज्यात आणि राज्याबाहेरही त्यांचे स्वयंसेवक आहेत. मदतीसाठी दूरध्वनी क्रमांकांची व्यवस्था करण्यात आली असून, त्यावर २४ तास संपर्क साधता येऊ शकतो. अपघातामुळे अपंगत्व आलेल्या अनेक भटक्या श्वानांना संस्थेने आपलेसे केले आहे. आता ‘आवाज’च त्यांचे घर झाले आहे.
काही वर्षांपूर्वी केरळमध्ये पूर आला होता तेव्हा ‘आवाज’च्या स्वयंसेवकांनी तिथे जाऊन भटक्या प्राण्यांची काळजी घेतली. अपघातामुळे कायमचे अपंगत्व आलेल्या श्वानांना संस्था स्वत: सांभाळते. त्यांना उपचारांनंतर मूळ ठिकाणी सोडून येण्याऐवजी संस्थेतच त्यांची काळजी घेतली जाते. अशा प्रकारचे अनेक श्वान, मांजरे सध्या संस्थेकडे आहेत. संस्था अगदी आपुलकीने या प्राण्यांची गेली अनेक वर्षे काळजी घेत आहे. ऋतुमानानुसार आहार, वैद्याकीय उपचार दिले जातात. अनेकदा पाळीव श्वानांनाही बरे नसल्याचे सांगून ‘आवाज’कडे सोपवले जाते. त्यांच्यावरील वैद्याकीय उपचार पूर्ण झाल्यावर जेव्हा घरी सोडण्याची वेळ येते तेव्हा संबंधितांकडून कोणतेही उत्तर मिळत नाही. अशा वेळेस ‘आवाज’ स्वत: त्या प्राण्याची जबाबदारी घेते. त्याचबरोबर संस्थेकडून एखाद्या व्यक्तीने प्राणी दत्तक घेतला, तर त्या प्राण्यावर काही दिवस संस्थेचे कर्मचारी लक्ष ठेवतात. मालक प्राण्याशी क्रूरपणे वागताना, त्याच्या आरोग्याची हेळसांड करताना आढळल्यास त्या प्राण्याला संस्था परत आपल्याकडे घेऊन येते. प्राण्यांची थोडीही गैरसोय होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाते.
अनेकदा वेगळे, आकर्षक दिसणारे श्वान किंवा मांजरी घेतल्या जातात. पण पुढे त्यांना सांभाळता आले नाही तर हे प्राणी असेच रस्त्यावर बेवारस सोडले जातात. त्यांना सांभाळण्यासाठीही आवाज पुढाकार घेते. करोनाकाळात असे अनेक श्वान, मांजरी लोकांनी रस्त्यावर सोडून दिल्या होत्या. त्यांना अन्न-पाणी देण्याचे काम ‘आवाज’ने केले. त्याकाळात कोविडच्या संसर्गाची पर्वा न करता आवाजचे सदस्य, कर्मचारी प्राण्यांची सेवा करत होते. उपाशी राहिलेल्या प्राण्यांचे जीव वाचवत होते. अशा प्रकारे वेळ-काळाची बंधने न पाळता ‘आवाज’ नेहमीच प्राण्यांच्या मदतीसाठी धावून जाते. त्यामुळेच मुंबईपुरते मर्यादित असलेले संस्थेचे काम आता सर्वदूर पसरले आहे. अपघातग्रस्त, जखमी किंवा आजारी प्राणी दिसल्यास नागरिकांकडून संस्थेला फोनवर माहिती दिली जाते. मदत क्रमांकावर किंवा समाजमाध्यमांवर नोंदवलेल्या तक्रारींची दखल घेतली जाते. माहिती मिळाल्यावर संस्थेचे स्वयंसेवक लगेच त्या ठिकाणी पोहोचतात. प्राण्याला सुरक्षितपणे उचलून तात्पुरत्या आश्रयस्थळी किंवा दवाखान्यात आणले जाते. प्रथमोपचार केले जातात. लसीकरण किंवा औषधोपचार केले जातात. गरज भासल्यास शस्त्रक्रियाही करण्यात येते. गंभीर प्रकरणात तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेतली जाते. दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांना माहिती देण्यात येते. ते प्राण्यांची योग्य काळजी घेतील याची खातरजमा करून त्यानंतरच प्राणी दत्तक दिला जातो. प्रत्येक बचावकार्याची ‘केस हिस्ट्री’ नोंदवून ठेवली जाते. जखम, उपचार, प्रगती साऱ्या नोंदी ठेवल्या जातात. पुढे संशोधन, धोरणनिर्मिती यासाठी याचा उपयोग होतो.
आपल्या परिसरात फिरणारे भटके प्राणी बहुतेकदा आपल्याला त्रासदायक वाटतात, पण खरे तर त्यांचे जगणे आपल्या उदासीनतेमुळे अधिक कठीण होते. अशा वेळी ‘आवाज’सारखी संस्था पुढे येते आणि या जीवांना आधार देते. आज संस्थेच्या माध्यमातून प्राण्यांना उपचार, सुरक्षित निवारा, पोटभर अन्न मिळते, त्यामागे अनेक दानशूर हात आहेत. भटक्या प्राण्यांच्या डोळ्यांत दिसणारे समाधान, त्यांच्या जगण्यात झालेला बदल पाहिला की हे काम फक्त दयेवर नाही तर प्रेम, करुणा आणि माणुसकीवर आधारलेले आहे, याची जाणीव होते. ‘आवाज’चे कार्य केवळ प्राण्यांची सेवा करण्यापुरते सीमित नसून त्यातून नकळतपणे समाजातील जिव्हाळा वाढत आहे.
आवाज – व्हॉइस ऑफ स्ट्रे अॅनिमल्स, पुनर्वसन केंद्र, बोअरवेल लश अॅग्रो बंगला, एचएनओ १६, सीटीएस ३३, ३४ एसएनओ २०, मढ मार्वे रोड, मालाड पश्चिम, मंत्रा रेसिडेन्सीसमोर, मुंबई ४०००९५
आवाज व्हॉइस ऑफ स्ट्रे अॅनिमल्स
Awaaz- Voice of Stray Animals
या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.
ऑनलाइन देणगीसाठी तपशील
● बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, शाखा एक्सर रोड
● खाते क्रमांक : – १४११००१०२१३
● आयएफएससी : – सीओएसबी००००१४१
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
धनादेश येथे पाठवा…
दिल्ली कार्यालय – संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००
पुणे कार्यालय – संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५
मुंबई कार्यालय – लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०
महापे कार्यालय – संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
ठाणे कार्यालय – संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मॅन्शन, तनिष्क शोरूमच्या वर, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. ०२०-२५३८५१३२
नागपूर कार्यालय – संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१