-गिरीश कुबेर

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे करोनावरचे औषध आहे असा समज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुळात का आणि कशामुळे करून घेतला, हे कालच पाहिले. हे असे होणे यात काहीही आक्रीत म्हणता येणार नाही. कोणत्याही पदावरच्या व्यक्तीचे कोणत्याही मुद्दय़ावर समज-गैरसमज होऊ शकतात. त्यात गैर ते काय?

त्या समजांना कवटाळत सत्याकडे पाठ फिरवणे हे गैर. आणि तसे करताना आपला गैरसमज हाच तुमचाही समज असायला हवा असा दुराग्रह बाळगणे, त्यासाठी आपण कोणाच्या तोंडाला लागतो आहोत याचे भान सुटणे त्याहूनही गैर. अध्यक्ष ट्रम्प यांचे ते सर्वार्थाने सुटले.

झाले असे की पत्रकार परिषदेत ‘‘काही आठवडे झाले मी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेत आहे,’’ अशी फुशारकी ट्रम्प मारत असतानाच त्यांच्या आवडत्या ‘फॉक्स न्यूज’ वाहिनीचे वृत्त निवेदक नील कावुटो हे या संदर्भात बातमी देताना म्हणाले : हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेऊ नका. तुम्ही मराल!

अमेरिकी अध्यक्षालाच उद्देशून असे उद्गार काढले गेल्यानंतर काय हाहाकार उडाला असेल याच्या अनेक कल्पना येथील वातावरणावरच पोसलेल्या अनेकांनी रंगवल्या असतील. पण या कल्पनांना साजेसे दृश्य अमेरिकेत नव्हते. म्हणजे काय, हे समजून घ्यायला हवे.

‘फॉक्स न्यूज’ ही पूर्णपणे सरकारधार्जिणी वृत्तवाहिनी. इतकी की तिचा आणि पत्रकारितेचा काही संबंध आहे का असा प्रश्न पडावा अशी स्थिती. असे पत्रकाररूपी सत्तासेवक सगळीकडेच असतात. नव्याने त्यांच्याविषयी काही सांगायची गरज नाही. ही वाहिनी ट्रम्प यांच्या इतक्या प्रेमाची की, भर पत्रकार परिषदांत ते तिचे नाव घेऊन अन्यांनी फॉक्सचा धडा घ्यावा असे सांगत असतात. खरे तर फॉक्स वगळता अन्य सर्व माध्यमे ट्रम्प यांच्या मते ‘फेक न्यूज’. तसे ते बोलूनही दाखवतात.

आता ट्रम्प आणि ही वाहिनी यांनी एकमेकांतील संबंधांच्या अशा जाहीर आणाभाका घेतलेल्या असताना या वृत्तवाहिनीचा निवेदक थेट ट्रम्प यांना ‘तुम्ही मराल’ असे म्हणाला असेल तर त्यामुळे अमेरिकी अध्यक्षांचा किती प्रेमभंग झाला असेल, हे लक्षात येईल. त्यांचे त्यानंतरचे वर्तनही त्यामुळे तसेच झाले. त्यांनी या वृत्त निवेदकाविषयी अद्वातद्वा उद्गार काढले. हे असे सगळे चव्हाटय़ावर येत असताना अन्य माध्यमे मागे कशी राहणार? तीही मैदानात उतरली. त्यामुळे काही काळ त्यातल्या त्यात सभ्य शब्दांतला शिमगा झडला. त्यात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाची चर्चा तर होतीच. पण अमेरिकेच्या अध्यक्षाने- म्हणजे जगातील सर्वात बलवान अशा महासत्तेच्या प्रमुखाने – य:कश्चित अशा वृत्त

निवेदकाच्या तोंडास लागावे का, हा प्रश्नदेखील काहींनी उपस्थित केला. ट्रम्प तेथेच थांबले नाहीत. त्यांनी फॉक्सला बोल लावायला सुरुवात केली. आता या वाहिनीतही कसे ट्रम्पविरोधक घुसलेत, फॉक्स आता पूर्वीसारखी कशी राहिलेली नाही, मला आता फॉक्सला किती महत्त्व द्यायचे त्याचा विचार करावा लागेल वगैरे वगैरे शेलक्या शब्दांत त्यांनी फॉक्सची संभावना केली. अध्यक्षांच्या या कृत्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पण ट्रम्प काहीही करू शकतात यावर एकमत झाल्याने हा मुद्दा मागे पडला. पुन्हा चर्चेत आले हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन.

आणि इथेच तर खरी मेख आहे.

ती अशी की या अमेरिकी अध्यक्षास आपण खरोखरच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेत आहोत किंवा काय, हेच माहीत नाही. ट्रम्प यांच्या वयाचा इसम सांगतो आहे तितके दिवस हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेत असणे केवळ अशक्य अशी भूमिका आधी फॉक्सच्या वृत्त निवेदकाने घेतली आणि त्यानंतर या क्षेत्रातील अनेक भाष्यकारांनी त्यास दुजोरा दिला. ‘फॉक्स’चा निवेदक ‘तुम्ही मराल’ असे जे म्हणाला तेही योग्यच, असेही काही म्हणाले. तेव्हा प्रश्न असा की ट्रम्प खरोखरच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेतात का?

यावर ते गप्प आहेत. त्यांचा वैद्यक सूत्रधारदेखील गप्प आहे. आपली ट्रम्प यांच्याशी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनबाबत चर्चा झाली होती, इतके अध्यक्षांचा वैद्यक मान्य करतो. पण म्हणून ट्रम्प यांना हे औषध खरोखरच दिले गेले किंवा काय, आणि दिले असल्यास त्याची मात्रा काय, किती दिवसांसाठी ते दिले.. वगैरे सर्वच प्रश्न अनुत्तरित.

आणि यातून ट्रम्प यांना प्रत्यक्षात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन एकदाही दिलेले नाही, हे उघड झाले तर? वॉशिंग्टन पोस्टसारखी दैनिके हाच प्रश्न उपस्थित करताना दिसतात.

तात्पर्य : काही गैरसमजांचा गोडवा तसाच राहिलेला बरा. नपेक्षा अनवस्था प्रसंग संभवतो.

जाता जाता : ‘फॉक्स’ने आपल्या या वृत्त निवेदकावर काहीही कारवाई केली नाही.

@girishkuber