डोळय़ांसमोर ध्येय निश्चित आहे, ते गाठण्याची क्षमता आहे, मेहनतीची तयारी आहे, पण ध्येयापर्यंत पोहोचवणारी वाटच गवसलेली नाही, असे अनेक तरुण देशात आहेत. अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कशी मिळवावी, प्रवेश परीक्षा कशा द्याव्यात, कोणता अभ्यासक्रम कुठे उपलब्ध आहे अशी सारी माहिती देऊन त्यांची वाट सुकर करणाऱ्या ‘एकलव्य इंडिया फाउंडेशन’ला आता आवश्यकता आहे ती कायमस्वरूपी जागेची..

संविधानाने सर्व समाज घटकांना शिक्षणाचा अधिकार दिला असला तरी आजही ग्रामीण, आदिवासी, दुर्गम, पाडय़ांवरील विद्यार्थ्यांपर्यंत उच्च शिक्षणाची गंगा पोहोचलेली नाही. देश-विदेशातील दर्जेदार आणि नामवंत संस्थांमध्ये उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर पुणे, मुंबईला पर्याय नाही. विदर्भ, मराठवाडय़ातील ग्रामीण आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांनी हे कटू वास्तव स्वीकारले आहे. पण हीच वस्तुस्थिती बदलण्याची जिद्द मनाशी बाळगून राजू केंद्रे यांनी २०१७ मध्ये ‘एकलव्य इंडिया फाउंडेशन’चा अमृतवेल लावला. तेव्हापासून अवघ्या आठ वर्षांत उच्च शिक्षणापासून वंचित असलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी ‘एकलव्य’च्या मार्गदर्शनाखाली भारतासह परेदशातील नामांकित विद्यापीठांत विविध फेलोशिप मिळवल्या आहेत.

आदिवासी, दलित, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि उपेक्षित गटांमधील पहिल्या पिढीपर्यंत उच्च शिक्षण पोहचवण्याचे, त्यांना देश-विदेशांतील नामवंत शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम ‘एकलव्य फाउंडेशन’ करते. अशा विद्यार्थ्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे, त्यांना देश-विदेशातील संस्थांची व तिथे सुरू असलेल्या नवनवीन अभ्यासक्रमांची माहिती व त्यासाठी प्रशिक्षण देणे, विविध विद्यापीठे किंवा नामवंत संस्थांमधील प्रवेशासाठी आवश्यक प्रवेश परीक्षांची तयारी करवून घेणे आदी सर्व प्रकारचे निवासी प्रशिक्षण एकलव्यच्या माध्यमातून दिले जाते. संस्थेत पदवी, पदव्युत्तर ते पीएचडीपर्यंत सर्व अभ्यासक्रम आणि संशोधनासाठी प्रशिक्षण दिले जाते. आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहू शकत नाहीत असे हे तरुण आहेत. एकलव्य अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या फेलोशिप मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते. आज संस्थेचे आजी व माजी विद्यार्थी भारतातील सर्व राज्यांत व जगभरातील पाच देशांत शिक्षण घेत आहेत. आयआयटी, आयआयएमपासून ते हावर्ड, ऑक्सफर्ड अशा जगातील नामवंत विद्यापीठांपर्यंत हे विद्यार्थी पोहचले आहेत. चेवेिनग, कॉमनवेल्थ, इरास्मस मुंडससारख्या प्रतिष्ठेच्या जागतिक शिष्यवृत्ती एकलव्यच्या विद्यार्थानी मिळवल्या आहे. या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत मिळवलेल्या शिष्यवृत्तींची रक्कम सात दशलक्ष अमेरिकी डॉलर्सपेक्षा अधिक आहे. गेल्या आठ वर्षांत ७०० पेक्षा अधिक कार्यशाळा आयोजित करून ग्रामीण व आदिवासी भागांतील पाच लाखांहून अधिक पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांपर्यंत एकलव्य संस्था पोहचली आहे. ३० पेक्षा अधिक राज्यांतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीला संस्थेने हातभार लावला आहे.

‘एकलव्य’ची स्थापना करणाऱ्या राजू केंद्रे यांचाही प्रवास सोपा नव्हता. ते मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील िपप्री खंदारे या छोटय़ाशा गावातील. वारकरी संप्रदायाची परंपरा जपलेल्या राजू यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या शिक्षणाला कायमच पािठबा दिला. केंद्रे कुटुंबात बारावीपर्यंत शिक्षण घेणारी राजू यांची पहिलीच पिढी. जिल्हाधिकारी व्हायचे स्वप्न घेऊन २०११ मध्ये त्यांनी पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुण्यात आल्यावर इतर मुलांचे राहणीमान व एकदंरीत वातावरण पाहून ते अस्वस्थ होत. तिथे त्यांनी सहा महिने तग धरला. मात्र, पुण्यात मन न रमल्याने त्यांनी बाहेरून शिक्षण घेण्याचा पर्याय निवडला.

पुढे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीला प्रवेश घेतल्यानंतर ते मेळघाटातील ‘मेळघाट मैत्री’ स्वयंसेवी संस्थेच्या संपर्कात आले. सामाजिक जाणिवेतून संस्थेबरोबर काम करू लागले. यातून मेळघाटातील शिक्षण, कुपोषण, रोजगारविषयक अडचणी या सर्व विषयांवर काम करण्याची संधी राजू यांना मिळाली. शहरात मिळणाऱ्या सोयीसुविधांपासून मेळघाटातील नागरिक कित्येक मैल दूर असल्याची जाणीव वयाच्या विशीतच त्यांना झाली. अपुऱ्या संधी, शिक्षणाविषयी अनास्था, प्राथमिक सुविधांचाही अभाव, अंधश्रद्धा, सरकारी योजनांविषयीची अनभिज्ञता या गोष्टी त्यांना तिथे प्रकर्षांने जाणवल्या. मेळघाटातील दोन वर्षांच्या अनुभवातून राजू यांच्या मनात या वंचित आदिवासींसाठी काम करण्याचा विचार पक्का होऊ लागला. पुढे त्यांनी टाटा समाजविज्ञान संस्था (टिस) तुळजापूर येथे समाजकार्य विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. बारावीनंतर पुण्यातून ‘ड्रॉपआउट’ होण्यापासून ‘टिस’मधून शिक्षण घेऊन बाहेर पडण्यापर्यंतचा राजू यांचा प्रवास पुढे हजारो विद्यार्थ्यांना दिशा देणारा ठरला.

मराठवाडा आणि विदर्भात शिक्षणाच्या चांगल्या सोयी फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. पुणे, मुंबईसारख्या शहरांत किंवा महाराष्ट्राबाहेर दर्जेदार शिक्षण घ्यायचे असेल तर काय करावे, याची माहिती आदिवासी पाडय़ांवरील, दुर्गम भागांतील, कायम दुष्काळी पट्टय़ातील लोकांना देण्याची व्यवस्था आपल्याकडे अस्तित्वात नव्हती. त्यामुळे आपल्या भागातील मुलांच्या पंखांना बळ देऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी तयार करणारी यंत्रणा आपण उभारणे गरजेचे आहे, हे राज यांनी मनाशी पक्के केले. आजवर ते आपल्या या ध्येयाविषयी ठाम आहेत. पुढे २०२१ मध्ये राजू केंद्रे यांना ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठित अशा चेवेिनग स्कॉलरशिपच्या माध्यमातून लंडनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी मिळाली. तिथून एकलव्यने उभारी घेतली. अनेक नामवंत संस्थांमधील शैक्षणिक सल्लागार एकलव्यशी जोडले गेले. क्षमता असूनही दिशा न गवसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचे हे एकलव्यचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.

नागपूरमधील शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र

‘एकलव्य’ला अधिकाधिक उपक्रम राबवण्यासाठी कायमस्वरूपी जागेची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी राहता येईल, शिकता येईल, त्यांच्या जेवणाची सोय होईल अशी जागा मिळवण्यासाठी एकलव्यचा चमू प्रयत्नशील आहे. २०१८ ते २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातील निरनिराळय़ा भागांत कार्यशाळेचे आयोजन करताना संस्थेचे लाखो रुपये खर्च झाले. हा खर्च त्यांना साहजिकच परवडणारा नव्हता. सध्या नागपूर शहराला लागून गोरेवाडा परिसरात निवृत्त जिल्हाधिकारी डॉ. मुन्शीलाल गौतम यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या निवासी प्रशिक्षण केंद्रात एकलव्यचे कार्य चालते. संस्थेच्या कामाची माहिती डॉ. गौतम यांना मिळाल्यानंतर ही जागा त्यांनी आनंदाने एकलव्यला भाडेतत्त्वावर काही वर्षांसाठी दिली. याठिकाणी ६० विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय आहे. प्रशस्त सभागृह, स्वयंपाकघर शिवाय पुरेसा मोकळा परिसरही आहे. सध्यातरी एकलव्यच्या बहुतांश कार्यशाळा आणि शिबिरे आता याच ठिकाणी पार पडतात.

विद्यार्थ्यांच्या यशोगाथा

  • ‘एकलव्य’ नेतृत्व घडवण्याचे कामही करते. संस्थेच्या सुरुवातीच्या बॅचचा विद्यार्थी व सध्याचा सहसंस्थापक आकाश मोडक याने गांधी फेलोशिप मिळवली, विकास नियोजन विषयात दिल्लीत शिक्षण घेतले, यवतमाळ जिल्ह्यातील खेडय़ात एकल पालक कुटुंबात वाढलेल्या आकाशचे ‘एकलव्य’च्या रोपटय़ाला वटवृक्षाचे रूप देण्यातील योगदान मोठे आहे.
  • एकनाथ वाघ आता हार्वर्ड विद्यापीठात पूर्ण शिष्यवृत्तीवर दोन वर्षांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी जात आहे. तो सुरुवातीपासून एकलव्यमध्ये आहे. भटक्या समाजातील एकनाथ बुलढाणा जिल्ह्यातील खेडय़ातील आहे. त्याच्या पालकांचे प्राथमिक शिक्षणही झालेले नाही, आज तो अनेकांसाठी प्रेरणा ठरला आहे.
  • यवतमाळची पायल झाडे शेतकरी कुटुंबातील मुलगी. वडिलांनी तिला पदवीपर्यंत शिकवून तिचे लग्न ठरवले. पुढच्या शिक्षणासाठी ती आग्रही होती. जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला गेलेली गावातील ती पहिलीच मुलगी. पायल लग्नाला नकार देत असल्याने तिच्या वडिलांनी महाविद्यालयात जाऊन भांडण केले. मात्र, ती निर्णयावर ठाम राहिली. तिची राजू केंद्रे यांच्याशी भेट झाली आणि एकलव्यची माहिती मिळाली. पुढे ती बंगळूरुमधील प्रतिष्ठित अझीम प्रेमजी विद्यापीठात शिकली. आज पायल राजस्थानच्या विविध भागांत काम करत आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल?

सध्या संस्थेचे सर्व कार्य व निवासी केंद्र हे नागपूर शहराला लागून गोरेवाडा- गोधनी भागातील पिटेसूर परिसरात ‘एकलव्य सत्यशोधक रिसोर्स सेंटर’ (पी. एन. राजभोज सेंटर) येथे आहे. संपर्क- ८७६६९७८१५४/

raju. kendre@eklavyaindia.org

एकलव्य ग्रासरूट्स अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट फाउंडेशन

Eklavya Grassroots And Education Development Foundation

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.

ऑनलाइन देणगीसाठी तपशील

’ बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, नागपूर शाखा

’ खाते क्रमांक : ०३७१००१०७१०८

’ आयएफएससी : सीओएसबी०००००३७

धनादेश येथे पाठवा… : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय – लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय – संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय – संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मॅन्शन, तनिष्क शोरूमच्या वर, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. ०२०-२५३८५१३२

पुणे कार्यालय – संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय – संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अॅ३डिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

दिल्ली कार्यालय – संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००