योगेश वाडदेकर
कार्ल सेगन यांची ‘कॉसमॉस’ नावाची मालिका दूरदर्शनवर लागायची. त्या मालिकेतील भागांमध्ये काय दाखवले जाणार आहे, याची माहिती डॉ. जयंत नारळीकर सांगायचे. खगोलशास्त्राविषयी कुतूहल निर्माण होण्याचे कारण ती मालिका ठरली. त्यानंतर १९८८मध्ये पुण्यात ‘आयुका’ नावाची संस्था स्थापित होणार असल्याचे ऐकले होते. त्याच सुमारास ज्योतिर्विद्या परिसंस्थेने डॉ. नारळीकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्या वेळी मी डॉ. नारळीकर यांना पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहिले. ‘परग्रहावरील जीवसृष्टी’ या विषयावर त्यांनी उत्कृष्ट व्याख्यान दिले होते.
१९९३मध्ये मला ‘आयुका’मध्ये एक ‘समर प्रोजेक्ट’ करण्याची संधी मिळाली. १९९४ ते २००० या कालावधीत मी ‘आयुका’मध्ये पीएच.डी. केली. प्रा. अजित केंभावी हे मार्गदर्शक होते. त्यांनी डॉ. नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. केली होती. प्रा. केंभावी यांच्याप्रमाणे डॉ. नारळीकर यांचे अन्य काही विद्यार्थी ‘टीआयएफआर’मधून (टाटा मूलभूत संशोधन संस्था) पुण्यात ‘आयुका’मध्ये आले आले होते. तेथे असताना डॉ. नारळीकर यांची अनेक वैशिष्ट्ये पाहायला मिळाली. प्रशासक म्हणून झालेले त्यांचे दर्शन काही वेगळेच होते. संस्थेत कोणतीही अडचण असल्यास ते पहिल्यांदा चर्चा करायचे. सगळे मलाच कळले पाहिजे, मीच सगळे करणार, अशी त्यांची भावना कधीच नसायची. ते इतर सक्षम सहकाऱ्यांना बऱ्याच गोष्टी स्वतंत्रपणे करायला द्यायचे. ते अतिशय विचार करून पटकन निर्णय द्यायचे. तो बऱ्याचदा सकारात्मक असायचा.
डॉ. नारळीकर यांना लहान वयातच पद्माभूषण पुरस्कार मिळालेला असल्याने त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. आम्ही सरकारी संस्थांमध्ये जायचो आणि सांगायचो, की आम्ही डॉ. नारळीकर यांच्या संस्थेतून आलो आहोत, तेव्हा आम्हालाही आदर मिळायचा, आमची कामे पटापट व्हायची. डॉ. नारळीकर यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ते कधीच निराश व्हायचे नाहीत. ८०-९०च्या दशकात आपल्याकडे विमानांना विलंब व्हायचा. अशा वेळी त्यांनी विमानतळावर बसून खगोलशास्त्रावरील पुस्तकाचे लेखन केले होते. परिस्थिती अशी आहे, आपण त्यातून पुढे जाऊ या, असाच ते विचार करायचे. समाजात त्यांना काही चुकीच्या गोष्टी निदर्शनास आल्या, तर ते त्यावर वृत्तपत्रांतून लिहायचे. त्यांची भाषा सौम्य असायची. त्याचा चांगला परिणाम व्हायचा.
‘आयुका’ची उभारणी करताना डॉ. नारळीकर यांच्या मनात आठ पैलू होते. त्यातील एक पैलू म्हणजे, ‘जीएमआरटी’चा (जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) भारतीय शास्त्रज्ञांकडून जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी जे काही करावे लागेल ते करायचे. राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (एनसीआरए) आणि ‘आयुका’ या दोन्ही संस्था खगोलशास्त्राशी संबंधित असल्यामुळे, कित्येक लोक त्यांचे ‘टीआयएफआर’पासूनचे सहकारी असल्यामुळे डॉ. नारळीकर, डॉ. गोविंद स्वरूप यांच्यानंतर त्या दोन्ही संस्थांचे, संचालकांचे नेहमीच चांगले संबंध राहिले. मी ‘आयुका’त पीएच.डी. करताना काही प्राध्यापक ‘आयुका’तील होते, काही ‘एनसीआरए’तील होते. आयुका, एनसीआरए ही जोडी अजूनही कायम आहे.
विशेष म्हणजे डॉ. नारळीकर ‘थिअरॉटिकल अॅस्ट्रोफिजिसिस्ट’ होते. त्यांचा निरीक्षणांशी जास्त संबंध नव्हता. मात्र, निरीक्षणांचे महत्त्व किती आहे हे ते जाणून होते. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच ‘आयुका’, ‘एनसीआरए’ या संस्थांची सांगड घालून दिली. त्यामुळे या दोन्ही संस्था एकमेकांना उत्तम सहकार्य करतात.
डॉ. नारळीकर यांचा वारसा केवळ खगोलशास्त्रातील संशोधनापुरता मर्यादित नाही. संशोधनासह त्यांनी खगोलशास्त्रावर लिहिलेली उत्कृष्ट पाठ्यपुस्तके पीएच.डी.पर्यंत वापरता येतात. डॉ. नारळीकर आणि डॉ. पद्मानाभन वगळता अन्य कोणीही इतक्या मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तके लिहिलेली नाहीत. तसेच नारळीकर यांना शालेय शिक्षणात रुची असल्याने अनेक राज्य मंडळे, सीबीएसई यांच्या पाठ्यपुस्तके तयार करणाऱ्या समितीवरही त्यांनी काम केले.
(लेखक राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रात (एनसीआरए) ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)