योगी आणि टोळीया अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकसत्ता’च्या योगी आणि टोळी या संपादकीयाने अत्यंत महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडली आहे. मुळातच संस्थात्मक उभारणी हा आपल्या देशात अत्यंत दुर्लक्षित राहिलेला विषय, त्यामुळेच की काय आपल्याकडे हार्वर्ड, केम्ब्रिज अथवा रेडक्रॉस अशा संस्था उभ्या न राहता, उभी राहिली ती तद्दन धंदेवाईक डी. वाय. पाटील भारती विद्यापीठासारखी विद्यापीठे अथवा हिंदू युवा वाहिनी किंवा स्वाभिमान शिवसंग्राम अशा कोणतीही शाश्वत ध्येये अथवा मूल्ये न पाळणाऱ्या संघटना! अर्थात या साऱ्यांना रयत शिक्षण संस्था इत्यादींसारख्या संस्था अपवाद असून उच्च मूल्ये घेऊन या संस्था आजही काम करीत आहेत. स्वत:चे पक्ष उपलब्ध असताना स्वतंत्र संस्थाने उभी करण्याची धडपड हे नेते का करतात या प्रश्नाचं उत्तर बहुधा आपण भारतीयांच्या सरंजामी मनोवृत्तीत असावं , या संघटनांद्वारे स्वत:च स्वतंत्र संस्थान जपलं तर जातंच पण त्यासोबतच राजकारणाच्या पलीकडे जाऊन स्वत:चा प्रभाव वाढवण्याची संधी यातून मिळते. आपल्या राजकारणासाठी आवश्यक असणारा माणसं, पैसे यांचा दारूगोळा या स्वतंत्र संस्थांमार्फत नेत्याला मिळतो. राजेशाहीचं आपल्याला किती आकर्षण आहे हे बाहुबली आदींसारख्या चित्रपटांतून आपण पाहतोच, या स्वतंत्र संस्था म्हणजेच छोटय़ा छोटय़ा राजेशाहय़ाच असतात. या राजेशाहीत राबणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांला आपण आपल्या नेत्याला काही तरी दैवी कार्य पार पडण्याचा बाबतीत सहकार्य करून परिवर्तनाच्या मोठय़ा टप्प्याचा आणि एका आमूलाग्र बदलाच्या प्रक्रियेचा भाग बनत आहोत, अशी भावना दिली जाते. जो कार्यक्रम नेत्याला पक्षाच्या लोकशाहीवादी चौकटीत बसून राबवता येत नाही तो कार्यक्रम नेता या संघटनांमार्फत राबवू शकतो. उदाहरणार्थ, भाजपच्या व्यासपीठावरून ‘लव्ह जिहाद’ हा मुद्दा उपस्थित करू शकत नाही, कारण या पक्षाला आम्ही कसे घटनेच्या तत्त्वांशी बांधील आहोत हे दाखवायचे आहे, मात्र तोच मुद्दा हिंदू युवा वाहिनीने उचलल्यास त्याचा लोकमानसात परिणाम होऊन ध्रुवीकरणसुद्धा होते आणि आणि त्याचा योगी आदित्यनाथ यांना आणि पर्यायाने भाजपलादेखील फायदा होतो. स्वतंत्र संघटना उभ्या केल्याने या नेत्यांना स्वत:च्या पक्षनेतृत्वावर गरज पडलीच तर डोळेसुद्धा वटारता येतात. जसे छगन भुजबळ हे सध्या तुरुंगात असलेले नेते बिहार, उत्तर प्रदेशसारख्या राज्यात समता परिषदेच्या अक्षरश: मोठमोठाल्या सभा घेऊन पक्षनेतृत्वाला स्वत:च्या भुजांत किती बळ आहे हे दाखवत राहायचे. जसं नगरसेवक होण्यासाठी स्वत:चं गणेशोत्सव मंडळ असणं ही पूर्वअट आहे तसंच राज्याचा नेता म्हणून दावा ठोकण्यासाठी अशा चार-पाच जिल्’ाांपुरत्या मर्यादित असलेल्या राज्यव्यापी संघटना असणं ही पूर्वअट झाली आहे. व्यवस्थेपेक्षा व्यक्ती मोठी होऊ  लागली की ती व्यक्ती नंतर व्यवस्थेलाच अडचणीत आणते. समांतर व्यवस्था या लोकशाहीला कायम धोकादायकच आहेत, ते मेणबत्ती संप्रदायाचे आंदोलन असो वा राज ठाकरेंसारख्या नेत्याचे उठता बसता सिनेमासृष्टीतील मंडळींना घाबरवणे असो. या संघटनादेखील समांतर व्यवस्थाच होऊ  पाहत आहेत. मुळातच योगी आदित्यनाथ यांना मिळालेलं मुख्यमंत्रिपद हे काही आजीव नाही, तेव्हा पदावर असेपर्यंत हिंदू युवा वाहिनीचा प्रभाव जितका वाढवता येईल तितका वाढवावा आणि जेव्हा मुख्यमंत्रिपदावर नसू तेव्हा इतर काही तजवीज नाहीच झाली तर या टोळीद्वारे समांतर शासन चालवावं हा योगींचा मानस असावा. मात्र हिंदू युवा वाहिनीसारख्या संस्था वाढीत असताना संघ काय करीत होता हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ही संघटना जोवर संघाला पूरक काम करीत होती तोवर या हिंदू युवा वाहिनीबद्दल संघाला काही आक्षेप नव्हता; मात्र आज जेव्हा ही संघटना थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच आव्हान ठरू लागल्यानंतर संघ याबद्दल प्रश्न विचारू लागला आहे.

हिंदू युवा वाहिनीसारख्या संघटना वाढणं हा केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच नाही तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थेलाच मोठा धोका आहे. योगी आदित्यनाथ यांनी हिंदू युवा वाहिनीद्वारे काम चालू ठेवणे म्हणजे निव्वळ प्रतिसरकार कायम ठेवण्याचा प्रयत्न करणे आहे. नुकत्याच एका हिंदी प्रसिद्धी माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार योगी सरकार सत्तेत आल्यापासून उत्तर प्रदेशात हिंदू युवा वाहिनीचे प्रतीक असलेल्या भगव्या उपरण्याचा खप प्रचंड वाढला आहे, आजघडीला उत्तर प्रदेशात भगवी उपरणे बाहेरून मागवावी लागत आहेत. या हिंदी वाहिनीवर अनेक नागरिकांनी बोलताना सांगितले की अशा प्रकारे भगवे उपरणे परिधान केल्याने त्यांना सुरक्षित वाटते, लोकशाहीचे याहून मोठे दुर्दैव काय असणार..? उपरण्याचे केवळ हे एक उदाहरण उत्तर प्रदेशातील हिंदू युवा वाहिनीचे स्थान कशा प्रकारे मजबूत होत आहे हे दाखवण्यासाठी पुरेसे बोलके आहे. यात मला सर्वात महत्त्वाचे हे वाटते की हिंदू युवा वाहिनीला आदर्श मानून इतर राज्याराज्यांत अशा प्रकारच्या संघटना उभ्या राहिल्या तर लोकशाहीच्या वाहिन्या या संघटना बंद करून टाकतील. धर्म, जात आणि भाषेच्या नावाने भारतीय लवकर एकत्र येतात. अशा प्रकारच्या संघटना प्रचंड वेगाने वाढण्यास पुरेसा वाव आहे. उत्तर प्रदेशात भीम आर्मीचा उदय नुकताच झालेला आहे, हिंदू युवा वाहिनीला प्रत्युत्तर म्हणून ही संघटना वाढते आहे. या साऱ्यांच्या निमित्ताने यापूर्वी प्रचंड चर्चिला गेलेला हे सर्व आपल्याला कोठे नेणार, हा प्रश्न मला पडतो आहे.

(आयएलएस विधि महाविद्यालय, पुणे)

मराठीतील सर्व कॅम्पसकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta blog benchers winner bhushan raut
First published on: 03-06-2017 at 01:22 IST