मोहरी आणि जवसावर संशोधन करून त्यांचे सुधारित वाण भात पिकानंतर शेतात लावल्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होतो आहे. याशिवाय दुभत्या जनावरांसाठी आणि कुक्कुटपालन खाद्यापदार्थांसाठी जवसाच्या तेलबियांची ढेप वापरल्यामुळे दुधाच्या व अंड्याच्या गुणवत्तेत वाढ झाल्याने तेथील लोकांचा जोडधंदाही वाढला आहे. सुधारित बियाण्यांपासून तेलापर्यंत जवसाची संपूर्ण मूल्यवर्धित साखळी विकसित करण्यात महत्त्वाचा हातभार लावणाऱ्या आणि जवसाच्या शेतीचे क्षेत्रफळ वाढवणाऱ्या डॉ. बीना नायर आहेत यंदाच्या दुर्गा.

कृषी महाविद्यालयात संशोधक म्हणून नोकरी करताना कुठल्याशा वाणावर, पिकावर काम करणं स्वाभाविक आहे, त्यातली पोषकमूल्यं, त्या रोपाच्या प्रत्येक भागाचा होणारा उपयोग अभ्यासातून शोधून काढताही येईल, मात्र त्यापलीकडे जात ज्या प्रदेशात काम करायचं तिथलं शेतीपूरक हवामान, पिकांवर पडणारी कीड-रोग, पिकांना होणारा प्राण्यांचा उपद्रव याचा अभ्यास करणं आणि मुख्य म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांना या संशोधित वाणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी अथक मेहनत करणं इथे त्या संशोधकाचं वेगळेपण ठरतं. पण ते इथेच थांबत नाही तर त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाढलेल्या उत्पादनाचा आनंद त्यांना विक्री व्यवस्था करून दिल्यानंतरच त्या घेतात. त्या आहेत, कृषी संशोधक डॉ. बीना नायर. त्यांच्या संशोधनातून तयार झालेल्या मोहरी आणि जवसाच्या वाणांमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुहेरी झालं आहे.

कृषी वनस्पतिशास्त्रात एमएस्सी आणि त्यानंतर विशेष प्रावीण्यासह ‘जेनेटिक्स अॅण्ड प्लान्ट ब्रिडिंग’ या विषयात पीएच.डी. प्राप्त केल्यानंतर ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला’ अंतर्गत कृषी महाविद्यालयातील ‘अखिल भारतीय जवस व मोहरी संशोधन प्रकल्पा’च्या प्रमुख म्हणून रुजू झालेल्या डॉ. बीना नायर यांनी केवळ मोहरी आणि जवस या पिकांवर संशोधनच केलं नाही तर रब्बीच्या मोसमात भात शेती झाल्यानंतर त्या जागेत पर्यायी उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा कसा होईल हे सप्रमाण सिद्ध केलं. मागील ५ वर्षांपासून पूर्व विदर्भ चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपूर मंडळ, नागभीड, सिदेवाही तालुक्यातील जवस पिकाच्या क्षेत्रफळात २२ टक्के वाढ झाली आहे.

२०१८ पासून खऱ्या अर्थाने त्यांचा संशोधनाचा प्रवास सुरू झाला. ‘भारतीय कृषी अनुसंधान परिषदे’कडून त्यांना मोहरी आणि जवस संशोधनाचा प्रस्ताव दिला गेला. कारण विदर्भात ८ लाख हेक्टर भातशेती आहे. सुरुवातीला त्यांनी मोहरीवर संशोधन केलं. त्यासाठी त्यांनी भंडारा जिल्ह्याची निवड केली कारण तुलनेत त्या जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता जास्त होती. तसेच तिथे जंगली प्राण्याचा प्रादुर्भाव जास्त होता.

हे प्राणी मोहरीचे पीक खात नसल्याने शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून मोहरी पिकवायला सुरुवात केली. त्यानंतर जेव्हा जवसावर संशोधन सुरू केलं. तेव्हा शेतकरी पारंपरिक वाणच लावत होते. त्यांनी संशोधित वाण वापरला तर त्यांचाच फायदा होईल हे त्यांना पटवून सांगण्यासाठी डॉ. बीना यांनी अथक परिश्रम घेतले. अनेक कृषी मेळावे, तसेच विविध प्रसार माध्यमातून उपलब्ध तंत्रज्ञानाची माहिती सांगायला सुरुवात केली. ‘भारतीय कृषी संशोधन परिषदे’कडून मिळालेला निधी वापरून त्यांनी शेतकऱ्यांना बियाणं आणि खत दिलं. त्याचे परिणाम पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना या संशोधनाचं, नव्या वाणाचं महत्त्व पटू लागलं.

डॉ. बीना नायर यांनी पिकांच्या लागवडीबाबत केलेल्या दहा विविध शिफारशी राज्य पातळीवर प्रसारित करण्यात आल्या असून त्याला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. ‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळा’द्वारे या वाणांचे बीजोत्पादन करण्यात येत आहे. जवसाच्या प्रसारित केलेल्या वाण ‘पीकेव्ही एनएल २६०’ याचा ‘गजानन महाराज जवस उत्पादक कंपनी’ सोबत करार करून त्यांचे बीजोत्पादन करण्यात येत आहे.

डॉ. बीना यांनी जवस पीक लागवडीचे पुनरुज्जीवन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. खरे तर जवस हे विदर्भातील पारंपरिक पीक होते, पण दरम्यानच्या काळात गहू आणि चणा उत्पादनाला मागणी असल्याने ती पिके घेणं सुरू झालं होतं मात्र त्यावर पडणाऱ्या किडीमुळे शेतकऱ्यांनी कोणतंही पीक घेणं बंद केलं. यावर मात करण्यासाठी आणि जवसाचे क्षेत्र वाढवण्यासाठी, सुधारित पद्धतींसह संशोधित जातींचा वापर करणं, पीक प्रात्यक्षिकांची संख्या २० वरून ५५० पर्यंत वाढवून तरुण शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढवणं, आणि बियाण्यांपासून ते तेलापर्यंत जवसाची संपूर्ण मूल्यवर्धित साखळी विकसित करणं यावर त्यांनी काम केलं. तसेच दुभत्या जनावरांसाठी आणि कुक्कुटपालन खाद्यापदार्थांसाठी तेलबियांची ढेप वापरल्यामुळे दुधाच्या व अंड्याच्या गुणवत्तेत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

सध्या त्यांचं ‘पीडीकेव्ही शारदा’ हे नवं संशोधित वाण तयार असूून नागपूर जिल्ह्यात त्यावर कामही सुरू आहे. या वाणात असलेल्या रोगप्रतिकार शक्तीमुळे पिकाला कीड, रोग लागत नाही. तसेच जवसाच्या दांड्यातून फायबर काढून त्याची कपडानिर्मिती शक्य होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी.आर. कडू, ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला’चे संशोधन संचालक डॉ. एस.एस. माने आणि कुलगुरू डॉ.एस.आर. गडाख यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे हे संशोधन शक्य झाल्याचे त्या आवर्जून सांगतात.

आपल्या संशोधनाचा वापर कृषी क्षेत्रात करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी मदत करणाऱ्या डॉ. बीना नायर यांना ‘लोकसत्ता’चा सलाम rakhi.chavhan@expressindia.com