लोकसभा निवडणुकीच्या तयारीची कवायत सुरू असताना जागरूक लोकप्रतिनिधी, नेतृत्व कसे असते हे दाखवून देण्यासाठी प्रसिद्धीझोतात राहण्याच्या तंत्रावर भर देणे आलेच. शेतकरी चळवळीचे नेते राजू शेट्टी यांनी शासनाकडे लोकांचे प्रश्न उपस्थित करण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या आठवडय़ात त्यांनी मुंबई दौरा केला असता ऊस तोडणी मशीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान मिळण्याच्या आंदोलनात ते सहभागी झाले. उसाच्या एफआरपीमध्ये तुकडे करण्याबाबतच्या उच्च न्यायालयातील याचिकेवर त्यांनी टिप्पणी केली. पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याच्या माध्यमातून प्राप्तिकर विभाग ४४ हजार कोटींचा भुर्दंड जनतेवर टाकत असल्याचे पत्रक काढले. राज्यातील जैव वैद्यकीय कचरा विघटन सेवाशुल्क आकारणीबाबत पर्यावरण प्रधान सचिवांची भेट घेतली. एसटीप्रमाणे शहरी बस सेवेतही महिलांच्या तिकीट आकारणी ५० टक्के सवलत देण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. एफआरपी अदा न केलेल्या साखर कारखान्यावर महसुली जप्तीची कारवाई करण्याची मागणी साखर आयुक्तांकडे केली. आता, काम करतोय म्हटल्यावर प्रसिद्धी तर पाहिजेच. राजू शेट्टी प्रसिद्धीचा हा कित्ता असा घासूनपुसून गिरवत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाजपेयी यांच्या काळात सीबीआय चांगली होती..

हिंद मजदूर सभेचा देशातील पहिला अमृत महोत्सवी सोहळा नाशिकरोड येथील चलार्थपत्र आणि भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्या जिमखान्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडला. या मुद्रणालयातून भंगारात काढलेल्या छपाई यंत्राच्या आधारे झालेला तेलगीचा बनावट मुद्रांक घोटाळा देशात गाजला होता. महत्त्वाचे उद्योग, कार्यालये राज्याबाहेर जात असताना ही मुद्रणालये नाशिकमध्ये कायम राहिल्याचा आनंद प्रगट करताना भुजबळांनी मुद्रणालयाशी संबंधित कटू आठवणींना यावेळी उजाळा दिला. जेव्हा मुद्रांक घोटाळा उघडकीस आला, तेव्हा भुजबळ उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होते. तत्पूर्वी १६ वेळा सुटलेल्या तेलगीला आम्ही मोक्का लावला. मुद्रणालयातील तत्कालीन व्यवस्थापकाने छपाई यंत्र चुकीच्या प्रकारे बाहेर पाठविले. या प्रकरणात आपण नाशिकचे असल्याने आपल्यावर आरोप झाले. काहीही संबंध नसताना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे म्हणजे सीबीआयकडे गेले. आपली चौकशी झाली. पण दोषारोपपत्रात नाव आले नाही. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यांच्या काळात सीबीआय चांगले काम करीत होती, असा दाखला देत भुजबळांनी सीबीआयच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आयुष्यातील गोड-कडू आठवणी कथन करीत भुजबळांनी तेव्हा राजीनामा घेणाऱ्यांसमोर नव्याने आपली बाजू मांडली.

श्रद्धेपेक्षा प्रतिष्ठा मोठी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी जाताना त्यांच्याबरोबर काही मंत्री, खासदार व आमदारांसह काही नेतेही होते. विरोधकांची टीका अंगावर घेऊन अयोध्येला गेलेले शिंदे-फडणवीस मुंबईत परतले आहेत. त्यांच्या अयोध्या दौऱ्यात यापूर्वी शिवसेनेत झालेल्या मोठय़ा बंडामध्ये एकनाथ शिंदे यांना साथ देऊन गुवाहाटीला गेलेले सांगोल्याचे आमदार  शहाजीबापू पाटील यांचा काय झाडी, काय डोंगार.काय हाटिल.समदं ओक्केमंदी.हा संवाद सर्वत्र गाजला होता. त्यानंतर आता झालेल्या अयोध्या भेटीत शहाजीबापू सहभागी झाले नव्हते. त्यांची आठवण सर्वाना होणे स्वाभाविक होते. इकडे शहाजीबापू अयोध्येला का गेले नाहीत, याची प्रश्नार्थक चर्चा होत असताना त्याचे कारणही लगेचच समोर आले. शहाजीबापू हे सांगोला भागाचे आमदार असून याच सांगोल्यात राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडेच आहे. एकीकडे अयोध्येत रामलल्लाचे दर्शन हे श्रद्धेचा भाग असताना दुसरीकडे संमेलनाचे स्वागताध्यक्षपद सांभाळणे ही प्रतिष्ठा. श्रद्धा आणि प्रतिष्ठा यापैकी प्रतिष्ठा महत्त्वाची होती. म्हणूनच शहाजीबापूनी बहुधा अयोध्या दौरा टाळला असावा.

‘भाग्यवंत’ मंत्री !

 केंद्रात अर्थ विभागासारख्या महत्त्वाच्या खात्याचे राज्यमंत्री म्हणून डॉ. भागवत कराड यांना मिळालेली बढती ही भाजपमध्ये मंथनाचाच विषय ठरते आहे.  वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी एका कार्यक्रमात बोलताना त्यांना ‘नशिबान’, ‘भाग्यवंत’ या अर्थाने संबोधले. दीडेक वर्षांपूर्वी रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही एका कार्यक्रमात  मिश्किल शैलीत डॉ. कराड यांच्या मंत्रीपदावरून टिप्पणी केली होती. फडणवीस यांचे ‘विश्वासूमंत्री’ म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांनी आपल्यावर पाच वेळा निवडून आलो तेव्हा कुठे मंत्रीपद मिळण्यासारखी कृपादृष्टी झाली. पण डॉ. कराड हे भाग्यवान आहेत. तसेच अतुल सावे यांचेही आहे. पहिल्यांदाच निवडून आले तेव्हा राज्यमंत्रीपद तर दुसऱ्या वेळी कॅबिनेटपद मिळाले. तेही आपल्यापेक्षा भाग्यवान आहेत, असे महाजन यांनी सांगताच मंत्रीपदाची ‘कृपादृष्टी’करणारा ‘विठ्ठल’पुजता आला पाहिजे अशी कुजबुज सुरू झाली. (संकलन : अनिकेत साठे, एजाज हुसेन मुजावर, सुहास सरदेशमुख, दयानंद लिपारे, बिपीन देशपांडे)

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra political crisis maharashtra political turmoil maharashtra political differences zws
First published on: 11-04-2023 at 05:00 IST