दयानंद लिपारे dayanand.lipare@expressindia.com
उन्हाळा सुरू झाला, की आंबट—गोड चवीचा रानमेवा सर्वत्र दिसू लागतो. करवंद, जांभूळ, आवळा, कैरी-आंबा, फणस, ताडगोळे यांसारखा हा विविध औषधी गुणधर्म असलेला रानमेवा आपल्या जिभेची चव खुलवतो. याच रानमेव्यावर प्रक्रिया उद्योग उभा करत कृषी क्षेत्राला नवी जोड देण्याचे काम सध्या कोल्हापूर जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी सुरू आहे. याच उपक्रमाविषयी..
उन्हाळा वाढू लागला की अंगाची लाही लाही होते. अशावेळी हवाहवासा आंबट—गोड दिलासा मिळतो तो म्हणजे रानमेव्याचा. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली यावर बालकांच्या उडय़ा पडतात आणि मोठय़ांनाही त्याची भुरळ पडते. करवंदे, जांभळे, आवळा, कैरी-आंबा, फणस, ताडगोळे यांसारखा अनेक रानमेवा याकाळात उपलब्ध होतो. सह्यद्रीच्या कुशीत अनेक तालुक्यांमध्ये रानमेवा मुबलक मिळतो. ही रानावनातील फळे अनेक लोकांच्या उत्पन्नाचा आधार ठरतात. हल्ली त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित पदार्थाची विक्री करणारे शेतकरी, बचत गट वाढत आहेत. त्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याने जीवनमान उंचावत चालले आहे. कोल्हापुरातील अनेक तालुक्यांत रानमेवा प्रक्रिया उद्योग स्थिरावत आहे.
गुलाबी थंडी सरली की हळूहळू उन्हाची काहिली वाढत जाते. अंगाची तगमग होऊ लागते. अशा वेळी रानमेवा हा दोन्ही अंगानी उपयुक्त ठरतो. आंबटगोड चवीचा रानमेवा चाखायला मिळाल्यामुळे काही वेगळे खाण्याचा आनंद मिळतो आणि शरीर थंड ठेवण्यास त्याचा उपयोग होतो. त्याचे अनेक औषधी उपयोगही असल्याचे अभ्यासक सांगतात. यामुळे परीक्षा संपली; सुट्टी लागली की गावगाडय़ाकडे लोकांचा राबता वाढतो. तेथील रानावनात भटकंती करताना रानमेव्याचा आस्वाद घेतला जातो. करवंद, जांभळे, कैरी, फणस असे सहजी मिळणारे पण याच्या बरोबरीनेच आवळधोंडा, रान आवळा, बोर, चिंच, भेडशी, आमठा, चिकना, अटका, तोरणा, चारोळी, हसोळी यांसारखी नाना रानफळे रानोमाळ – डोंगर कपारीत सर्वत्र लगडलेली असतात. मात्र बेसुमार जंगलतोडीमुळे रानमेव्याला धोका निर्माण होत चालला आहे. निसर्गाचा हा अनमोल ठेवा त्यामध्ये वाया जात आहे. त्याचे संवर्धन होण्याची गरज आहे. रानावनातील दुर्मिळ झाडे वाचवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे रानमेवा प्रक्रिया बाजारपेठही विकसित होत आहे. उन्हाळ्यात मंडईमध्ये रानमेवा विक्रीसाठी येतो. पण अलीकडे काही शेतकरी, बचत गट यांनी रानमेव्यावर प्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत. हे पदार्थ जिभेचा स्वाद वाढवतात. रानातील स्वादिष्ट फळांचे महत्त्व या निमित्ताने अधोरेखित होत आहे. जंगल संरक्षणासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होत आहे.
उन्हाळा सुरू झाला की पहिला सण गुढीपाडव्याचा. याच काळात करवंदे, जांभूळ, आंबा यांना पाड येतो. अक्षय तृतीयापर्यंत ही फळे पूर्ण पक्व होतात आणि त्याची चव चाखायला खवय्ये सज्ज होतात. फणस, काजू ही फळे तयार होण्यास काहीसा अवकाश असतो. तोवर करवंदे, जांभूळ विक्रीची ललकारी गल्लोगल्ली ऐकू यायला लागते. आरोग्यवर्धक रानमेव्याचे बाजारात आगमन झाले आहे. ते ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सह्यद्रीच्या वाडय़ावस्त्यांवर राहणाऱ्या खेडूतांना रानमेवा विक्रीतून उपजीविकेला हातभार लागत आहे. वर्षांतून एकदाच; ते ही उन्हाळ्यात मिळणारा रानमेवा चाखण्याची ओढ सर्वानाच असते. बारमाही उपलब्ध होणाऱ्या सफरचंद, संत्री, चिकू, केळी अशी फळे आणि त्यावर होणारी प्रक्रिया ही आता सर्वाच्या चांगल्याच परिचयाची झाली आहे. याच्या बरोबरीने नैसर्गिकरीत्या वाढलेल्या, आरोग्याला लाभदायक रानमेवा खाण्यासह त्यावर प्रक्रिया करणारा उद्योग स्थिरावत चालला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सह्यद्रीच्या कुशीतील अनेक तालुक्यांमध्ये असे व्यवसाय सुरू झाले आहेत. कृषी विभाग, जन भारती न्यास, आत्मा विभाग, स्वयंसिद्धा आदी शासकीय विभाग, स्वयंसेवी संघटना प्रक्रिया उद्य्ोगासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक सहकार्य करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यातून काही बचत गट यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
कोल्हापुरातील जन भारती न्यासाने गगनबावडा तालुक्यातील कृषी क्षेत्रात लक्ष घातले आहे. त्याचा एक भाग म्हणून रानमेवा प्रक्रिया उद्य्ोगाचा विकास होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गगनगिरी महिला शेतकरी गटाची कामगिरी नजरेत भरणारी आहे. शेनवडे येथील या गटात १२ महिला सदस्य आहेत. करवंद लोणचे, सरबत याचे उत्पादन ते प्रामुख्याने घेतात. करवंद गोळा करणे, प्रक्रिया करणे, विविध प्रेक्षणीय स्थळावर थेट विक्री करणे या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि आर्थिक लाभ या गोष्टी साध्य करण्याचा प्रय होत आहे. सन २०१० मध्ये स्थापन झालेल्या या गटाला प्रारंभी पंचायत समितीचे सहकार्य लाभले. न्यासाच्यावतीने सावंतवाडी, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यपीठ, दापोली येथे प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. २०१४ मध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिल्या वर्षी करवंद सिरप तयार करण्यात आले. तत्पूर्वी करवंद हाताने कुस्करून मलमलच्या कापडातून गाळून घेतले जात असे. ही प्रक्रिया किचकट, क्लिष्ट होती. कष्ट वाचवण्यासाठी त्यांनी यंत्रसामग्री बनवून घेतली. तेव्हापासून उत्पादनात वाढ झाली. याविषयी अध्यक्षा शारदा बापू जाधव यांनी सांगितले की, ‘प्रारंभी स्वच्छ पिकलेली करवंद मशिनमध्ये कुस्करली जातात. गर, बिया, साल एका बाजूला जाते तर दुसरीकडून रस भांडय़ांमध्ये साठवला जातो. त्यामध्ये साखर, सोडियम याचे मिश्रण केले जाते. ते आठवडाभर ढवळत राहावे लागते. त्यातून तयार रसबताची अर्धा लिटरच्या बाटलीमधून त्याची विक्री केली जाते. मशीन आल्यामुळे काम करणे सुलभ झाले. सुरुवातीला प्रयोगाच्या पातळीवर असलेले येथील उत्पादन आता तीन हजार लिटर रसबत तयार करण्यापर्यंत गेले. मुंबई, पुणे येथील ग्राहक पेठेसह राज्यात अन्य ठिकाणी या रसबताची विक्री करता आली. हैद्राबाद, औरंगाबाद येथील बचत गटाच्या प्रदर्शनात या उत्पादनास मोठा प्रतिसाद मिळाला. समाज माध्यमातून उत्पादनाची जाहिरात केली जाते. याच्या जोडीने फणसाचे विविध उत्पादनही केले जाते. सिरप, जाम, गरे, वेफर्स आदी उत्पादने २०१५ पासून तयार करण्यास सुरुवात केली. दापोली येथे फणस प्रक्रिया उद्योगाची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत प्रशिक्षण घेतल्यामुळे त्यापासून जाम, वेफर्स तयार करता येऊ लागले. १ हजार लिटर फणस सिरप, पाचशे किलो वेफर्स बनतात. स्थानिक लोकांकडून करवंद, फणस खरेदी केली जाते. ५० कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे. प्रक्रिया उद्योगात दहा महिलांना काम मिळते. वार्षिक उलाढाल पाच लाखापर्यंत गेली आहे. ‘आत्मा’च्यावतीने बाजारपेठ, प्रदर्शन येथे विक्रीसाठी संधी मिळाली आहे. प्रकल्प अधिकारी पराग परीट यांचे मौलिक मार्गदर्शन मिळत आहे.’
शाहूवाडी तालुक्यातील तळवडे, आंबा गावातील १२ महिलांनी एकत्र येऊ न सन २०१६ साली सह्य़गिरी महिला बचत गट तयार केला. या गटाला कोल्हापुरातील स्वयंसिद्धा संस्थेच्या कांचनताई परुळेकर यांनी मार्गदर्शन केले. गटाच्या अध्यक्षा सायली राजेंद्र लाड व सहकाऱ्यांनी रानमेव्यावरील प्रक्रिया उद्योगात लक्ष घातले. या भागात रानमेवा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होतो. स्थानिक महिलांकडून त्याची रास्त भावात खरेदी केली जाते. करवंद चटणी, लोणचे, सरबत, जाम, जांभळाचे सरबत, कोकम सोलकढी, कोकम सरबत, फणसापासून वेफर्सची निर्मिती केली जाते. रानमेव्याची आगळी चव आणि दर्जा यामुळे मागणी वाढत आहे. कामात सुलभता यावी, गती मिळावी यासाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी केली आहे. करवंद लोणचे १६० रुपये, चटणी, जाम १८० रुपये, फणस वेफर्स २०० रुपये, पल्प, आंबा लोणचे १५० रुपये या दराने विक्री केली जाते. मुंबई,पुणे, कोल्हापूर, दिल्ली येथील प्रदर्शनात बचत गट सहभागी होतो. ग्राहकांना थेट विक्री केली जाते. स्वयंसिद्धाच्या शॉपीमध्ये विक्रीची सोय केलेली आहे.
गगनबावडा तालुक्यातील मार्गेवाडी येथे श्रीराम महिला शेतकरी बचत सन २०१५ मध्ये स्थापन झाला. त्यांनी जन भारती न्यासद्वारे प्रशिक्षण घेऊन फणस प्रक्रिया उद्योग पुढच्याच वर्षी सुरू केला. गटाच्या अध्यक्षा मयुरी ऋतुराज खानविलकर. सचिव मीरा मोहन पडवळ यासह दहा महिला सदस्य फणसापासून सरबत, वेफर्स, जाम, पोळी, चॉकलेट, भाजी हे पदार्थ बनतात. शिवाय कोकम, आवळा, जांभूळ, आंबा यांचे सरबत, लोणची बनवले जाते. राजस्थानी, गुजराती लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या भोकरचे लोणचे निर्मिती ही खासियत आहे. सावंतवाडी व दापोली येथे प्रशिक्षण घेऊन या बचत गटाने फणसावरील मूल्यवर्धित पदार्थाच्या उत्पादनाकडे लक्ष पुरवले. सुरुवातीचा काही काळ पदार्थ कसे बनवायचे यामध्ये गेला. त्यामध्ये हातखंडा बसला. सन २०१९ मध्ये रानमेवा पदार्थाची विक्री वाढली. मुंबईतील महालक्ष्मी सरस प्रदर्शनात सहाशे लिटर सरबत विकले गेले. किरकोळ विक्री दीड हजार लिटर झाली. २५० किलो वेफर्स, २०० किलो जामची विक्री झाली. मागणीनुसार ५० किलो फणसपोळी विकली. आता उलाढाल तीन लाखापर्यंत झाली आहे. नफा सदस्यांना विभागून दिला जातो. फणस पीठ बनवण्याचे काम हाती घेतले आहे. मार्गेवाडी येथील शिवप्रसाद खानविलकर हे मूळचे अभियंते. त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये उतरून रानमेव्यापासून सरबत, लोणची तयार करण्याच्या उद्योगात लक्ष घालून लौकिक मिळवला आहे.
केवळ पारंपरिक शेती कसण्याऐवजी त्या भागात उपलब्ध पदार्थापासून मूल्यवर्धित घटकांची खाद्य पदार्थाची निर्मिती केली की अधिक लाभ मिळणे शक्य आहे. हा दृष्टिकोन बाळगून जन भारती न्यास प्रयत्नशील आहे. सचिव शेखर धर्माधिकारी यांच्यासह नामदेव मोरे, बापू जाधव हे स्थानिक प्रमुख या न्यासाचे कार्य पहात आहेत. बचत गटांना बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, आगम उद्योगाचे श्रीकृष्ण महाजन सावंतवाडी येथील डॉ. हेडगेवार प्रकल्पमध्ये अरविंद रानडे यांनी रानमेवा प्रक्रिया प्रशिक्षण दिले.
या भागात उसाचे उत्पादन वाढत असले तरी या भागातील भौगोलिक परिस्थिती पाहता उसाचे उत्पादन फायदेशीर नाही. येथेच मुबलक मिळणारा रानमेवा प्रक्रिया उद्योग करणे अधिक लाभदायक आणि सोयीस्कर ठरणार असल्याने त्यावर सध्या लक्ष केंद्रित केले असून आता त्याचे लाभही दिसू लागले आहेत.
महिलांचा आर्थिक आधार
अशाप्रकारे ग्रामीण भागातील महिला स्वत:चे उत्पादन निर्माण करण्याइतपत सक्षम झाल्या आहेत. बाजारपेठेतही आता त्यांचा हळूहळू लौकिक पसरत आहे. गुणकारी ठरणारा रानमेवा या भागातील रानावनातील, वाडय़ा वस्त्यांवरील महिलांचा आर्थिक आधार ठरत आहे. कृषी क्षेत्रातील हा बदल त्यांना सक्षम करीत आहे. तर शहरी भागातील लोकांना रानमेव्याची नव्या रंगा-ढंगातील चव केवळ उन्हाळ्यात नव्हे तर बारमाही चाखायला मिळत आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा केंद्रबिंदू धरून न्यास काम करीत आहे. कमी खर्च, शेतीपूरक उद्योग आणि प्रक्रिया उद्योग या तिहेरी सूत्राचा वापर केला जात आहे. गनबावडा तालुक्यात बचत गटांना प्रक्रिया उद्योगात मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योगात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू ठेवले.
– शेखर धर्माधिकारी, सचिव, जन भारती न्यास