स्वमग्न मुलांचा सांभाळ करताना पालकत्वाची कसोटी लागते. करोनाकाळात कोंडलेपणामुळे अशी अनेक मुले हिंसक बनल्याचे प्रकारही समोर आले. अशा मुलांना सांभाळतानाच त्यांना स्वावलंबी बनवण्याचा वसा औरंगाबाद येथील ‘आरंभ’ संस्थेने घेतला आहे. आतापर्यंत शेकडो मुलांना ‘आरंभ’ने जगण्याची नवी दिशा दाखवली आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोल फिरणाऱ्या पंख्याच्या पात्यांकडे तासन्तास पाहत राहणे किंवा एखादी दोरी हातात घेऊन खेळत राहणे, अशा गोष्टींनी ते कंटाळत नाहीत. हलणाऱ्या वस्तूंबाबत त्यांना कमालीची उत्सुकता असते. पण अवस्था स्वमग्न. सुंदर चित्र काढतील, पण नैसर्गिक विधी कोठे आणि कसे करावेत, याचे भान मात्र नसते. अशा स्वमग्न मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ‘आरंभ’ ही स्वयंसेवी संस्था शाळा चालवते.

दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद शहरातील चित्रप्रदर्शन दालनात स्वराजची चित्रे लावण्यात आली  होती. रंगसंगती आणि रेषांचे त्याचे भान स्तिमित करणारे. त्यामुळे चित्रप्रदर्शनात त्याची चित्रे विकली गेली. त्यातून त्याला २२ हजार रुपये मिळाले.. दुसरे उदाहरण सौरभचे. त्याला नीटसे बोलता येत नाही. तुम्ही बोलाल तेवढेच तो बोलण्याचा प्रयत्न करतो.. स्वमग्न स्थितीमधील अशा मुलांना सांभाळणे हेच जणू जीवन व्हावे, अशी या मुलांच्या पालकांची स्थिती असते. त्यामुळे मूल आणि त्याचे पालक या दोघांशी एकाच वेळी संवाद ठेवावा लागतो. या मुलांनी त्यांची दिनचर्या स्वत:हून पूर्ण करावी अशा पद्धतीचे शिक्षण शाळा देते. ही संस्था सुरू करण्यापूर्वी अंबिका टाकळकर यांना स्वमग्न मुलांना सांभाळतानाच्या मानसिक आणि शारीरिक ताणातून स्वत:लाही जावे लागले. औरंगाबादसारख्या ठिकाणी या मुलांवर उपचार करू शकतील अशी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे दरवेळी पुणे आणि मुंबईला मुलासह जाणे हे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे तर नाहीच, शिवाय मुलांची होणारी फरफट निराळीच. त्यामुळे या मुलांसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्याचे त्यांनी ठरविले. दोन मुलांसह त्यांनी २०११ मध्ये हे काम सुरू केले आणि सध्या ६७ मुले येथे शिकतात.

एखादे मूल इंग्रजी वर्णाक्षरे काढू शकत असेल, पण त्याला किती जेवावे, विधी कोठे करावेत हे कळत नाही. पण या मुलांची बुद्धिमत्ता कमी असते असे नाही. फक्त त्यांची बुद्धी शरीराच्या गतीशी जुळत नाही. ‘आरंभ’चे काम येथे सुरू होते. संगीत, नृत्य, शारीरिक कसरत, मन आणि शरीर यांचा समन्वय जुळविणारे खेळ, त्यातून वाचाविकास, संवाद प्रक्रिया घडून यावी असे शब्द, वाक्य, नाटक असे नानाविध प्रकार उपचारपद्धतीचा भाग म्हणून शाळेत वापरले जातात. प्रत्येक मुलाच्या दिनचर्येची आखणी करणे हे या कामाचे सूत्र. शून्य ते सहा वयोगटातील विद्यार्थ्यांची कृतिपत्रिका वेगळी आणि ६ ते १८ वर्षांच्या मुलांसाठी वागण्या-बोलण्याची पद्धत, त्यांचे दिवसभरातील कृतिकार्यक्रमही निराळे. अशा मुलांसाठी शिक्षक मिळणे हे महाकठीण काम. विशेष मुलांच्या शिक्षकांची गरज असली तरी त्यांची महाविद्यालये कोण काढणार? मराठवाडय़ात असे महाविद्यालय नाही. त्यामुळे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला प्रशिक्षित करण्याचे कामही ‘आरंभ’ला करावे लागले.

ही मुले एका जागी बसू शकत नाहीत. त्यामुळे या मुलांच्या आईची दररोज परीक्षाच असते. ही मुले नजरेला नजर देत नाहीत. ओळखीच्या लोकांनाही प्रतिसाद देताना यांना वेळ लागतो. एकच गोष्ट वारंवार करतात. त्यामुळे मूल वयाने वाढते. मोठे दिसू लागते. पण त्याचा स्वत:वर ताबा नसतो. या मुलांची चिडचिड वाढत जाते. टाळेबंदीमध्ये तर अशा काही मुलांनी आई-वडिलांवरही वस्तू फेकल्याच्या तक्रारी आल्या. अशा मुलांना सांभाळणे अवघड होऊन बसते. नांदेड जिल्ह्य़ातील धर्माबाद तालुक्यातील एका मुलाची समस्या आणखी निराळी. या मुलाची आई हयात नाही. वडील एकटे किती करणार? ४५ वर्षांच्या त्यांच्या मुलाला अजूनही स्वत:चे सारे विधी स्वत: करता येत नाहीत. अशा मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्याचा ‘आरंभ’ संस्थेचा मानस आहे. ही मुले जेवढय़ा लवकर शिकतील तेवढी ती स्वतंत्र होऊ शकतात.

किरण जोशीचा शाळेत दाखल झाल्यापासूनचा प्रवास मोठा थक्क करणारा आहे. तो आता १९ वर्षांचा आहे आणि दहावीच्या परीक्षेची तयारी करतो आहे. तो आता बाहेर पडू शकतो. हा मुलगा शाळा सुरू झाली तेव्हा, म्हणजे २०१२ साली ‘आरंभ’मध्ये आला. आता तो दुचाकी चालवू शकतो. भ्रमणध्वनी हाताळू शकतो. संगणकही हाताळतो. पण तो आला होता तेव्हा त्याचे स्वत:वर नियंत्रण नव्हते. अजूनही बोलताना लागणारे सगळे शब्द त्याला सापडतात असे नाही. संवादाच्या अडचणी आहेत. पण तो जे सांगतो ते कळते. दोन बोटांत पेन पकडता येणे ही त्याची पहिली पायरी वयाच्या आठव्या वर्षी होती. तो आता दहावीची परीक्षा देणार आहे. एखादे मूल घडत असतानाचा आनंद जसा शिक्षकांना असतो, तसाच तो त्यांच्या पालकांनाही. अशा मुलांना आनंदाने, सन्मानाने सुरक्षित जगायला मदत करणे हेच संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे व्यवस्थापकीय संचालक अंबिका टाकळकर सांगतात. सध्या १६ कर्मचारी या कामात आहेत.

सगळी मुले एकाच वेगाने प्रगती करीत नसतात. हे कोणत्याही शाळेत घडते. मग ती महापालिकेची असो किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाची. प्रत्येक मुलाची शिकण्याची विशिष्ट गती असते. त्या गतीला अनुरूप शिक्षण देता आले पाहिजे. स्वमग्नता लक्षात आली तर शीघ्र निदान आणि उपचार करताना दृक्-श्राव्य माध्यमातून शिक्षण दिले जाते. या मुलांमधील अतिचंचलता कमी करण्यासाठी संगीताचा उपयोग केला जातो. राष्ट्रीय मुक्त संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या मुलांच्या प्रगतीचे मूल्यांकन केले जाते.

या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणूनही विशेष प्रयत्न केले जातात. भेटकार्ड, राखी, कागदी पिशवी, पणत्या अशा अनेक वस्तू तयार करून त्याची विक्री करणे हे आता दरवर्षी नित्याची बाब झाली आहे. या सगळ्या मुलांनी समाजमान्य वर्तन करावे, असा भाषाविकास आणि वर्तनबदल करण्यासाठी शाळेतील शिक्षक सातत्याने काम करत असतात. रंगकाम, तबला किंवा इतर वाद्य वाजविणे, संगणकासमोर काही वेळ घालविणे यातून मुलांमध्ये बदल होतात. त्याचा वेग कमी असतो. पण तो जाणीवपूर्वक वाढवावा लागतो. या मुलांनी काहीतरी कौशल्य आत्मसात करावे, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. आपले मूल स्वमग्न आहे हे स्वीकारण्यास पालकांची मानसिकता घडविण्यापासून प्रत्येक टप्प्यावर त्यांना विश्वासात घ्यावे लागते. उदाहरणार्थ, एक मूल आठ महिने शाळेच्या प्रवेशद्वारात बसायचे. त्याला आतमध्ये यायचे नव्हते. कारण काय माहीत नाही. सारे जण हैराण झाले. शेवटी या मुलासाठीचे सगळे कृती-अभ्यास प्रवेशद्वारात घ्यायचे ठरले. तो मुलगा आता शाळेत रमला आहे. सगळ्या वर्गात हिंडत राहतो. पण हे सारे करताना मूल आणि पालक या दोघांशी सतत बोलावे लागते, समजून घ्यावे लागते. मानसिकता घडविण्यासाठी संयम ठेवावा लागतो. हे आता ‘आरंभ’मधील मंडळींच्या अंगवळणी पडले आहे. त्यासाठी पालकमंचही चालविला जातो.

राज्यात अशा मुलांच्या समस्यांवर काम करणाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळाही संस्थेमार्फत घेतल्या जातात. सध्या हे सारे उपक्रम भाडय़ाच्या जागेत सुरू आहेत. महिन्याला दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च ही शाळा सुरू ठेवण्यासाठी येतो. त्यातील सर्वाधिक खर्च इमारत भाडय़ाचा आहे. केवळ समाजाच्या मदतीने सुरू असणाऱ्या या शाळेला स्वत:ची जागा घेण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. सध्या बजाज दुचाकी कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून काही मदत मिळत असल्याने डोलारा उभा आहे. पण इमारत बांधण्यासाठी जागा नसल्याने सारे अडकून पडले आहे.

– सुहास सरदेशमुख

गोष्ट छोटी, आनंद मोठा

औरंगाबाद तालुक्यातील कुंभेफळ नावाच्या गावातील एका पालकाला अगदी छोटय़ाशा गोष्टीचा आनंद झाला होता. त्यांचा स्वमग्न मुलगा तेव्हा १८ वर्षांचा असावा. तो ‘आरंभ’च्या शाळेत येऊ लागला आणि त्याच्यात हळूहळू सुधारणा होऊ लागल्या. जवळ गेले की तो चावायचा. त्याला हाताळताच येत नव्हते अनेक दिवस. मग प्रशिक्षकांची त्याला सवय होत गेली. त्याचा विश्वास वाढला. मग भाकरीचे किंवा पोळीचे तुकडे करून दिले की स्वत:हून खाऊ लागला. पण शाळेतील ही प्रगती घरात काही होत नव्हती. घरात त्याने खूप चिडचिड केली. पण नंतर तो स्वत:च्या हाताने जेवू लागला. त्या दिवशी वडील पेढे घेऊन शाळेत आले अन् सगळ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. छोटय़ा गोष्टीतही माणसाला किती मोठा आनंद  होतो ना? ‘आरंभ’मधील हा अनुभव उमेद वाढविणारा आहे.

संस्थेपर्यंत

कसे जाल?

औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून रिक्षाने साधारणत: १५ मिनिटे अंतरावर शहानूरमियाँ दर्गा चौकातून संस्थेपर्यंत जाता येते.

आरंभ स्वमग्न आणि गतिमंद मुलांची संस्था

Aarambh  Society  For  Autism And  Slow  Learners  Children

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा.

संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.

समुपदेशन.. स्वमग्न मुलांना समजून घेणारा समाज घडावा, यासाठी समुपदेशनाचे कार्यक्रम घेतले जातात. या मुलांना मुख्य प्रवाहात आणता यावे, असा ‘आरंभ’चा प्रयत्न असतो. त्यासाठी ५० हून अधिक कार्यशाळाही घेण्यात आल्या आहेत.

धनादेश येथे पाठवा..: एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

 

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२- २२३०४२१

दिल्ली कार्यालय

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarva karyeshu sarvada 2020 article on aarambh society for autism and slow learners children abn
First published on: 28-08-2020 at 00:07 IST