रावसाहेब पुजारी
एका बाजूला उसाची उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत निघालेली आहे. यातून नव्याच समस्या समोर येत आहेत. त्यावर मात करताना ऊस शेती आणि ऊस उद्योगाला नव्या समस्यांनी संकटात टाकलेले आहे. सध्या सगळीकडे ‘एआय’ तंत्रज्ञानाचा उदो उदो सुरू आहे. मात्र, त्याबाबत तळच्या पातळीवर शेतकऱ्यांची फारशी तयारी कुठेच दिसत नाही. वरून आले म्हणून काही साखर कारखाने याबाबत किमान चर्चा करत आहेत. काही कारखानदार याबाबत साशंकच दिसतात. एवढे करून उसाचे उत्पादन वाढले, तरी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीची कोणीही हमी देताना दिसत नाही. हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत शेतकरी फारसे काही स्वीकारतील, असे दिसत नाही. नवे तंत्रज्ञान स्वीकारता स्वीकारता नव्याच समस्यांनी सध्या ऊसशेती आणि कारखानदारी घेरलेली आहे.

संकटे ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात पाचवीला पूजलेली असतात. फक्त ती निरनिराळी रूपे घेऊन येतात. या संकटांचे आणखीन एक वैशिष्ट्य असते, ते म्हणजे ती एकेकटी कधी येत नाहीत. एका वेळी अनेक संकटे येतात. या अनेक संकटांशी प्रभावीपणे सामना, दोन हात कसे करावेत, असा प्रश्न बहुतेक सर्व शेतकऱ्यांना बऱ्याचदा पडतो. तो त्याच्या ताकदीनिशी व पूर्ण सामर्थ्याने संकटांशी लढण्याचा प्रयत्न करतो. पण, बऱ्याचदा संकट इतके जबरदस्त व प्रभावशाली असते, की त्याच्यापुढे शेतकऱ्याची ताकद, सामर्थ्य आणि प्रयत्नांची शिकस्त ही अपुरी पडते आणि त्याचा परिणाम पिकाचे उत्पादन व सरासरी उत्पादकता घटण्यावर होतो. गेल्या वर्षीचा गळीत हंगाम आपण ८० दिवसही करू शकलो नाही. याबाबतचा आढावा घेतल्यानंतर चक्रावून सोडणाऱ्या अनेक बाबी पुढे आल्या आहेत. त्यामुळे साखर कारखानदार, ऊसउत्पादक सगळेच चिंताक्रांत आहेत.

साखरेचे उत्पादन घटण्याचा जो अनुभव महाराष्ट्राला आला, तोच अनुभव उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांनाही आलेला आहे. २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ च्या हंगामात महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन आठ लाख, उत्तर प्रदेशात ९.६२ लाख आणि कर्नाटकामध्ये ४.१० लाख टनाने घटले आहे. नुसतेच साखरेचे उत्पादन घटले असे नाही, तर देशाचे ऊस पिकाखालील क्षेत्रही ५.३७ ते ५.७४ दशलक्ष हेक्टरने घटले आहे. इथेनॉल निर्मितीसाठी वापरल्या गेलेल्या उसाचे प्रमाण ३५ लाख टनांच्या आसपास आहे. ही आकडेवारी ऊस शेतीसाठी धोकादायक ठरते आहे.
नव्याने उद्भवलेल्या समस्या :

आता जवळपास ७५० वर्षे ऊस शेती आपण करतो आहोत. तेवढ्या वर्षांपासून महाराष्ट्रात उसाचे पीक लावले जात आहे. ब्रिटिशांनी १५० वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातल्या शिंदेवाडी येथे ऊस संशोधन केंद्र काढले होते. याचा अर्थ विदर्भात व मुख्यत्वे पूर्व विदर्भात उसाची लागवड होत होती, असा कोणी अर्थ काढला, तर तो चुकीचा ठरणार नाही. अर्थात त्या काळी ऊसउत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, ऊस पिकावर येणारे निरनिराळे रोग व किडी यात आता आमूलाग्र बदल झालेला आहे. बऱ्याच समस्यांची नव्याने निर्मिती झाली आहे. त्यांपैकी अनेक समस्या मानवनिर्मित अशा आहेत. यामध्ये

१) उसाची गवताळ वाढ (ग्रासी शूट)

या समस्येमध्ये गवती चहासारखे उसाचे बेट तयार होते. गवतासारखी उसाची वाढ होते. मात्र, या गवतापासून ऊस तयार होत नाही. मागील दोन-तीन वर्षांपासून ही समस्या उद्भवण्यास प्रारंभ झाला आहे. विशेषत: २६५ या जातीच्या उसामध्ये ही समस्या प्रामुख्याने आढळून येते. बियाणे हस्तांतरणातून हा रोग पसरत असल्यामुळे शुद्ध व दर्जेदार गुणवत्तेचे बियाणे उपलब्ध होणे आवश्यक आहे. कोल्हापूर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांत फार मोठ्या प्रमाणात पसरते आहे.

याच्या आणखी खोलात गेल्यानंतर असे दिसून आले आहे, की काही ऊस रोपवाटिका या ऊस रोपे तयार करताना जुनाट ऊस, खोडवं, निडवं असे बियाणे सर्रास वापरतात. त्यांच्यावर कोणाचाच अंकुश नाही. हे रोपवाटिकाधारक मागणी आहे म्हणून काहीही वापरून रोपांचा पुरवठा करू लागलेत. हे प्रमाण २६५ व्हरायटीमध्ये सर्वाधिक असल्याचे कारखानदार सांगतात. मात्र, २६५ चा उतारा इतर व्हरायटींपेक्षा थोडा कमी असल्यामुळे साखर कारखान्यांच्या दृष्टीनेही ती नावडती जात आहे. ग्रासी शूट या समस्येचे समूळ उच्चाटन करायचे असेल, तर टिश्यू कल्चर तंत्राद्वारे चांगले सकस बियाणे वापरून उसाची रोपे बनविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सुपरकेन नर्सरी टेक्निक – शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात स्वतःची रोपे तयार करून वापरणे – सर्वांत उत्तम उपाय ठरतो आहे. या तंत्रामध्ये ६० ते ७० पैशांत रोप तयार होते. खात्रीशीर रोपांची हमी मिळते. शेतकरी सहज हे तंत्रज्ञान वापरू शकतात.

२) पाने पिवळी पडणे (यलो लीफ डिसीज)

बुरशीमुळे (व्हायरस) हा रोग होतो. यात प्रथम उसाच्या पानाच्या आतील शीर पिवळी पडते. नंतर पाने पिवळी पडतात. हवेतली आर्द्रता व उष्णता वाढली, की हा रोग दिसू लागतो. सध्या ऑगस्ट, सप्टेंबरमधील पावसाळी वातावरण या रोगाच्या प्रसारासाठी अनुकूल आहे. त्यामुळे रोगाचा प्रसार थांबवायचा असेल, तर आंतरप्रवाही बुरशीनाशकाच्या दोन फवारण्या दर १५ दिवसांच्या अंतराने करणे आवश्यक आहे. ड्रोनद्वारे तत्काळ यावर उपाय करून घेतला पाहिजे. अन्यथा अनेक ठिकाणी ऊस पीक वाया जाऊ लागलेले आहे.

३) निकृष्ट दर्जाच्या रोपवाटिका

ऊस लागणीचा हंगाम आता जोरात सुरू झाला आहे. गावोगावी उसाची रोपे पुरविणाऱ्या नर्सऱ्या (रोपवाटिका) उभ्या राहिल्या आहेत. काही भागांमध्ये गावेच्या गावे या रोपवाटिकांचा व्यवसाय करू लागली आहेत. त्यामधून कोट्यवधी रोपे आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील हजारो गावांमध्ये सध्या विकली जात आहेत. कुटिरोद्योगाप्रमाणे उसाची रोपे पुरविणाऱ्या शंभर नर्सऱ्या एकेका गावात उभ्या राहिल्या आहेत. यातूनही बऱ्याच प्रमाणात अनेक समस्या समोर येताना दिसताहेत. त्यावर शासनाचे कसलेच नियंत्रण नाही.

४) कांड्यांवरही किडीचा प्रादुर्भाव

यात सहा महिन्यांनंतर उसाच्या कांडीला कीड लागते. दोन कांड्या लहान होतात आणि डोळे फुटून बाहेर येतात. पण या वर्षी सगळ्याच व्हरायटींमध्ये आणि सर्वच कांड्यांमध्ये ही कीड आढळून आलेली आहे. त्यामुळे आता सध्या आठ ते दहा कांड्या उसाला पडल्या आहेत, त्या ४ ते ८ इंचाच्या होण्याऐवजी अर्धा ते एक इंचाच्या झाल्या आहेत. तापमान जास्त झाल्यामुळे ही कांडी कीड नावाची समस्या उद्भवते. पूर्वी ही दोन कांड्यांपुरतीच मर्यादित होती. तापमान कमी होऊन पूर्ववत आल्यावर दुसऱ्या इतर कांड्यांची चांगली वाढ होत असे. पण, आता इतर कांड्यांवरही या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट येणार आहे व येते आहे.

५) अखंड पाऊस, शेतात साचलेले पाणी

या वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस कोल्हापूर, सांगली भागात ऑगस्ट महिना उलटला, तरी अजूनही सुरू आहे. अखंडित पावसामुळे उसाला खत टाकणे बऱ्याच शेतकऱ्यांना शक्य झालेले नाही. कोणत्याही रानात आंतरमशागती झालेल्या नाहीत. यामुळे नव्या समस्या शेतीसमोर उभ्या राहिलेल्या आहेत. सध्या तरी सगळ्या उसात पावसाचे पाणी साचून आहे. फक्त माळावरच्या जमिनींमधून पाण्याचा निचरा होतो आहे.

ऊस उत्पादन वाढीसाठी खताची जी पावसाळी मात्रा द्यायची असते. उदा. १०:२६:२६, ९:२४:२४, अमोनिअम सल्फेट यांचा डोससुद्धा पाऊस सतत सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी अजून देता आलेला नाही. तापमानवाढ व हवामान बदलामुळे पाऊस पडण्याच्या तंत्रातही बराच बदल झालेला आहे. कमी वेळात प्रचंड वेगाने पाऊस येतो आहे. या हवामान बदल व तापमानवाढीच्या संकटाचा मोठा फटका शेती क्षेत्राला व सर्व पिकांप्रमाणेच उसालाही बसला आहे.

६) पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव

पांढऱ्या माशीची समस्या पश्चिम महाराष्ट्रात पूर्वी फारशी जाणवत नव्हती. परंतु, तापमानवाढ आणि ढगाळ वातावरणाची वारंवार होणारी निर्मिती यामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव पश्चिम महाराष्ट्रातही वाढू लागला आहे. ही कीड उसाच्या पानातील रस शोषून घेते. पानाच्या खालच्या बाजूला पांढऱ्या बारीक ठिपक्यांच्या स्वरूपात ही कीड असते. ती पानातील रस फार मोठ्या प्रमाणावर शोषून घेत असल्यामुळे पानांची अन्न तयार करण्याची (प्रकाश संश्लेषणाची क्रिया) क्षमताच नष्ट होते. पाने पिवळी पडतात. उसाच्या प्रत्येक कांडीला एक पान असते. ते पान वाळले, की कांडीचे पोषण होत नाही. मागे २००१-०२ साली जसा मोठ्या प्रमाणावर मावा आला होता आणि उसाचे सगळे पीक संपुष्टात आले होते, तशी स्थिती या पांढऱ्या माशी किडीमुळे आज निर्माण होण्याची शक्यता नसली, तरीही उत्पादन घटण्यामध्ये २५ टक्क्यांपर्यंत वाटा या किडीचा राहू शकतो. त्यामुळे किडीचा वेळीच बंदोबस्त करणे आवश्यक असते.

७) कोळीचा (माईट्स) प्रादुर्भाव

सततचा पाऊस, ढगाळ वातावरण व जास्त तापमान यामुळे मागील वर्षापासून ऊस पिकावर ही कीड मोठ्या प्रमाणात येऊ लागली आहे. ऊस उंच वाढलेला असल्यामुळे ड्रोनने औषध फवारणी करावी लागते. परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांना वारंवार ड्रोनने औषधफवारणी करणे शक्य होत नाही आणि ऊस पिकाचे क्षेत्र लहान व तुकड्यांमध्ये विभागलेले असेल, तर ड्रोनची फवारणी परवडतही नाही. याशिवाय कोळ्याप्रमाणेच हुमणीसारख्या किडीचादेखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो आहे. जास्त पावसाच्या प्रदेशात हवा मिळत नसल्यामुळे जमिनीच्या खाली असणारी हुमणी ही कीड मरून जाते. पण कमी पावसाच्या प्रदेशात ती तग धरून राहते व पिकाचे मोठे नुकसान करते.

ऊसउत्पादक शेतकऱ्यांना उसाची शेती फायदेशीर व किफायतशीर ठरावी, असे वाटत असेल, तर सरासरी एकरी उत्पादन व उत्पादकता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. आज अनेक साखर कारखाने एकरी १०० ते १५० टन उत्पादन घेण्याचा प्रयत्न करून त्या दृष्टीने निरनिराळे कार्यक्रम राबवित आहेत. साखर कारखान्यांच्या उत्पादनवाढीच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाहिजे. ठिबक संचावर उसाची लागवड करून प्रीसिजन शेतीचे तंत्र अवलंबिले पाहिजे. उसाचे क्षेत्र महाराष्ट्रासारख्या दुष्काळी व अवर्षणप्रवण भागात फार वाढू न देणे आपल्या हिताचे आहे. त्यासाठी कमीत कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त ऊस कसा उत्पादित करता येईल, याचा विचार व त्या दृष्टीने नियोजन केले पाहिजे.

‘सुपर केन नर्सरी टेक्निक’चा वापर

शेतीत बियाणे बदल, गवताळवाढीला आळा आणि कमी खर्चाची ऊस शेती करावयाची असेल, तर त्यासाठी पर्यायी शेती पद्धतीचा विचार केला पाहिजे. ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डाॅ. बाळकृष्ण जमदग्नी यांनी सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञानाचा वापर करून घरच्या घरी कमी खर्चाची खात्रीशीर ऊस रोपे कशी तयार करावयाची याचे अनुभवसिद्ध तंत्र विकसित केलेले आहे. त्याची छोटी पुस्तिकाही त्यांनी तयार केली आहे. तिच्या माध्यमातून ऊस शेतीतील अनेक समस्यांवर उपाय शोधले आहेत. शेतकऱ्यांनी या तंत्राचा वापर केला पाहिजे.