कुठे शाळा बंद पडत आहेत, कुठे विद्यार्थ्यांची गळती, तर कुठे शिक्षकच नाहीत अशी ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षणाची अवस्था असताना तेथील विद्यार्थ्यांचे कुतूहल शमवण्यासाठी पुण्यातील ‘विज्ञान वाहिनी’ तीन दशके धडपड करत आहे. बसचे रूपांतर प्रयोगशाळेत करून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग करून पाहण्याची संधी देत आहे. पुढील पिढी अधिक चिकित्सक व्हावी यासाठी अशा प्रयत्नांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे! संस्थेचे कार्यालय पुणे शहरातील कर्वेनगर परिसरात आहे. कर्वेनगर येथील नटराज गृहनिर्माण सोसायटीच्या ‘लेन १०’मध्ये ‘रंगदीप’ प्लॉट २०मधून संस्थेचे कामकाज चालते.

‘विज्ञानवाहिनी’ संस्थेची फिरती प्रयोगशाळा एका वर्षात सुमारे १५० शाळांना भेट देते. सुमारे १४ हजार किलोमीटरचा प्रवास करते आणि २० हजार विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग दाखवते. बस गावात पोहोचल्यावर शाळेने परवानगी दिली की, संस्थेचे विज्ञान संवादक विद्यार्थ्यांना धडे देण्यास सुरुवात करतात.

मीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे शिवधनुष्य ‘विज्ञान वाहिनी’ गेल्या तीन दशकांपासून अव्याहतपणे पेलत आहे. एक तर खेड्यांतील विद्यार्थी हे बहुतांश ‘नाही रे’ वर्गातीलच असतात. शिक्षण घेण्यासाठी त्यांना खडतर परिश्रम घ्यावे लागतात, अशा मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्याचा वसा विज्ञानवाहिनीने घेतला आहे. हा वसा पुढे नेण्यासाठी संस्थेला समाजातील दानशूर व्यक्तींकडून अर्थरूपी समीधेची नितांत आवश्यकता आहे.

शासनाची एसटी जिथे पोहोचली आहे, अशा अनेक गावांतील शाळेत आजही प्रयोगशाळा नाहीत. एखाद्या शाळेत प्रयोगशाळा असेल, तर प्रयोगांसाठी लागणारे साहित्य नाही. तेही असले तर प्रयोग करवून घेण्यासाठी शिक्षकच नाहीत. एसटी न पोहोचलेल्या गावखेड्यांत, तर याहून बिकट अवस्था आहे. तिथे ना प्रयोगशाळा आहे, ना मंगळावर भरारी घेण्याचे स्वप्न. विद्यार्थ्यांच्या मनातील कुतूहल त्यांना शोधाच्या वाटेवर नेते. त्या वाटा प्रशस्त करायच्या असतील, तर लहान वयातच विज्ञानाची ओढ आवश्यक आहे. नेमकी हीच गरज लक्षात घेऊन पुण्यातील ‘विज्ञान वाहिनी’ या संस्थेने फिरती प्रयोगशाळा सुरू केली. जिथे विज्ञानाचे प्रयोग करण्याची किंवा पाहण्याचीही सोय नाही, अशा ठिकाणी जाऊन मुलांना प्रयोग दाखवून, त्यांची शास्त्रशुद्ध माहिती देऊन विज्ञानाची ओढ निर्माण करण्याचा संकल्प या संस्थेने केला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे हे कार्य सुरू ठेवण्यासाठी संस्थेला सढळहस्ते मदत करण्याची गरज आहे.

अमेरिकेत गणिताचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेल्या पुष्पा देशपांडे आणि डॉ. मधुकर देशपांडे या दाम्पत्याच्या कल्पनेतून ही संस्था साकार झाली. त्यांनी १९९५ मध्ये पुण्यात स्वखर्चाने एक बस ‘तयार करून’ घेतली. त्यात बसण्यासाठी सहा जागा, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे प्रयोग दाखवण्याचे सारे साहित्य, एक जनित्र (जनरेटर), गॅस सिलिंडर, दूरचित्रवाणी संच, प्रोजेक्टर, लॅपटॉप आणि बारा फोल्डिंग टेबल्स अशा आवश्यक वस्तू ठेवण्यात आल्या आणि विज्ञानवाहिनी ज्ञानदानासाठी सज्ज झाली. ही बस दररोजचा शंभर-सव्वाशे किलोमीटरचा प्रवास करून पुण्याच्या आजूबाजूच्या लोकवस्त्यांमध्ये जाते.

सोमवार ते शुक्रवारदरम्यान पुणे शहरापासून ५०-६० किलोमीटर अंतराच्या परिघात असलेल्या विविध शाळांपर्यंत विज्ञानवाहिनी जाते. पुणे-सातारा रस्ता, पुणे- सोलापूर रस्ता, कामशेत, पिंपरी-चिंचवड अशा विविध भागांना भेटी देत भोर, पुरंदर, वेल्हे, मावळ, खेड, शिरूर, आंबेगाव या तालुक्यांतील शाळांपर्यंत पोहोचते. सकाळी साडेआठच्या दरम्यान सुरू झालेला प्रवास संपवून सायंकाळी साडेसहापर्यंत परत येण्याची कसरत संस्थेचे विज्ञान संवादक मोठ्या आनंदाने करत असतात. वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा उत्साह आणि विज्ञानप्रेम कधीही संपत नाही. गावकुसातल्या नव्या विद्यार्थ्यांपर्यंत हा विज्ञान प्रवाह पोहचवण्यासाठी त्यांना समाजाचा आधार हवा आहे.

विज्ञान वाहिनीची बस गावात पोहोचल्यावर शाळेतल्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी परवानगी दिली की, संस्थेचे विज्ञान संवादक विद्यार्थ्यांना धडे देण्यास सुरुवात करतात. इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना एकामागून एक असे विविध विषयांवर आधारित, त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातले प्रयोग दाखवले जातात. ते विद्यार्थ्यांकडूनही करून घेतले जातात. त्याआधी जे प्रयोग करायचे आहेत, त्याची माहिती वर्गात दिली जाते. त्यामागच्या संकल्पना स्पष्ट केल्या जातात. एका शाळेत दररोज सहा संवादक विज्ञान प्रयोग करवून घेतात. त्यात जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे प्रत्येकी दोन संवादक असतात. संवादकांसाठीचे वेळापत्रक शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच तयार केले जाते. एका दिवशी सुमारे १०० विद्यार्थ्यांशी संवाद साधला जातो. दिवसात २० ते २२ प्रयोग करणे शक्य होते. हे लक्षात घेऊन ज्या शाळांना सरकारकडून पुरेसा निधी मिळत नाही, जिथे प्रयोगशाळाच नाहीत किंवा प्रयोगांसाठी आवश्यक उपकरणे नाहीत, अशा शाळांना प्राधान्य दिले जाते. आता विज्ञानाचे प्रयोग केवळ पुस्तकात बघणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संस्थेला मदत हवी आहे.

‘पुण्याबाहेरचा प्रवास’

जिल्ह्याबाहेरील शाळांमध्ये जाण्यासाठी संस्था एका आठवड्याचे शालेय दौरे आखते. काही गावांची निवड केली जाते. ज्या वस्त्यांमध्ये जायचे आहे, तिथून जवळपासच्या अंतरावर मुक्कामासाठी बस थांबवली जाते. आतापर्यंत ही विज्ञानवाहिनी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सोलापूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांतील गावखेड्यांमधून प्रवास करून आली आहे. ४ लाख ६६ हजार ५२८ किलोमीटरचा प्रवास करून सुमारे साडेपाच लाख विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून विज्ञानाच्या प्रयोगांचा अनुभव घेता आला आहे. संस्थेची फिरती प्रयोगशाळा एका वर्षात सुमारे १५० शाळांना भेट देते. सुमारे १४ हजार किलोमीटरचा प्रवास करते आणि २० हजार विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग दाखवते. राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठीही संस्थेने विज्ञानाची वाट मोकळी करून दिली आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, बिहार, झारखंड या राज्यांतील दुर्गम भागातील शाळांमध्ये ‘विज्ञानवाहिनी’ गेली आहे. संस्थेच्या कामातून प्रेरणा घेत चेन्नई, हैदराबाद आणि सुरतेतही अशा फिरत्या प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत. अरुणाचल प्रदेशातील एका सेवाभावी संस्थेने तर अशीच एक बस महाराष्ट्रातून बनवून घेतली. आता हा टप्पा विस्तारण्यासाठी संस्थेला मनुष्यबळाबरोबरच निधीचीही आवश्यकता आहे.

‘विज्ञानाचा मेळा’

विज्ञानवाहिनी दर दोन वर्षांनी पुण्यात विद्यार्थी शिबिराचे आयोजन करते. साधारण जून महिन्यात हा विज्ञान मेळा भरवला जातो. त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या विविध विषयांची आणि प्रयोगांची ओळख करून दिली जाते. बायोइंजिनीअरिंग, नॅनो टेक्नॉलॉजी, स्टेम सेल्स, सौर तंत्रज्ञान, खगोलशास्त्र, रॉकेट तंत्रज्ञान या विषयांवर आधारित विविध उपक्रमांचे, चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. तीन ते चार दिवस हे उपक्रम चालतात. संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय केली जाते. शिबिरादरम्यान विज्ञान-तंत्रज्ञान विषयात संशोधन, अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या पुण्यातील नामवंत संस्थांना भेट दिली जाते. विद्यार्थ्यांना तेथे चालणाऱ्या अभ्यासक्रमांची, उपक्रमांची माहिती दिली जाते. यातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्याच्या मूळ उद्देशापासून संस्था कधीही ढळली नाही.

विज्ञान वाहिनी

Vidnyan Vahini

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.

ऑनलाइन देणगीसाठी तपशील

● बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, गणेशनगर शाखा

● चालू खाते क्रमांक : ००९१००१०१५३०३

● आयएफएससी : सीओएसबी००००००९

धनादेश येथे पाठवा…

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

ठाणे कार्यालय – संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मॅन्शन, तनिष्क शोरूमच्या वर, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. ०२०-२५३८५१३२

मुंबई कार्यालय – लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय – संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००

पुणे कार्यालय – संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय – संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

दिल्ली कार्यालय – संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००