-सुनिता कुलकर्णी

‘नावात काय आहे ?’ हे शेक्सपीअरचं वाक्य सगळेच जण उठताबसता उदाहरणादाखल सांगत असतात. पण उद्या एखाद्या कुणी देवगड हापूस आंबा विकणाऱ्यांनी ‘आमच्याकडे उत्कृष्ट आंब्यांबरोबरच उत्कृष्ट चिकन लॉलीपॉप मिळेल’ अशी पाटी लावली तर ती झेपेल का ? किंवा कोल्हापुरात जाऊन कुणी मरीआई किंवा तत्सम देऊळ शोधत बसेल का?
तसंच देवादिकांचं नाव असलेल्या माणसांनी काही दुष्कृत्यं केली तर सामान्य माणसाला देवाचं नाव असूनही हा असा कसा वागतो? असं वाटायला लागतं. याच धर्तीवर पंढरपूरमधल्या एका चोराची बातमी सध्या चर्चेत आहे.

पंढरीमधला हा कैदी खुनाच्या गुन्ह्याची शिक्षा मंगळवेढा तुरूंगात भोगतो आहे. तुरुंगात असला, शिक्षा भोगत असला तरी त्याचं मन अडकलेलं होतं ते त्याच्या गावात आणि घरादारात. गटारी अमावस्येच्या आसपास त्याच्या गावात होती म्हसोबाची जत्रा. या जत्रेत घरोघरी म्हणे बोकड कापला जातो. आपल्या गावाच्या म्हसोबाच्या जत्रेसाठी आपल्या घरात कापल्या जाणाऱ्या बोकडाचं मटण खायची त्याला म्हणे इच्छा झाली. मग त्याने काय करावं, तर त्याने तुरूंगातल्या पोलीस हवालदाराला हाताशी धरलं. पोटात दुखत असल्याने उपचारासाठी त्याला सरकारी रुग्णालयात नेणं आवश्यक असल्याचा असल्याचा बनाव या दोघांनी मिळून रचला. अर्थात आणखीही काहीजण त्यात सहभागी असतील. मग या कैद्याला पंढरपूरला त्याच्या घरी नेण्यात आलं. तिथे कैदी महाशयांनी अगदी पोलीस बंदोबस्तात मटणावर ताव मारला.

पण या सगळ्या प्रवासात त्याला कुठे ते समजलं नाही पण करोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे तो तुरुंगात परत गेल्यावर तिथल्या २८ कैद्यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे आणि तो घरी गेला तेव्हा तिथे उपस्थित असलेले शंभरेक नातेवाईकही आता करोनाग्रस्त झाले आहे. त्याच्या बरोबर बंदोबस्ताला असलेले पोलीसही करोनाग्रस्त झालेले असण्याची शक्यता आहेच.

एकूण काय तर नावात काय आहे, असं जे शेक्सपीअर म्हणतो ते काही प्रमाणात बरोबरच आहे… गावांची नावं आणि माणसांची कृत्यं यांचा संबंध जोडूच नये कधी.