News Flash

विदाव्यवधान : जाळ्यांतील विदासुरक्षा..

इंटरनेटची यशोगाथा आणि या तंत्रज्ञानाचा आपल्या दैनंदिन जीवनावर पडलेला प्रभाव याबद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही.

लिओनार्डो क्लाइनरॉक

|| अमृतांशु नेरुरकर

विकेंद्रित पद्धतीने माहितीचे मूकवहन करणारे इंटरनेट खुल्या व्यवहारांस उत्तेजन देणारी व वापरकर्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणारी अशी आदर्श व्यवस्था असेल, या अपेक्षेला गेल्या दीडेक दशकात बऱ्याच अंशी तडा गेला आहे..

गेल्या काही लेखांमध्ये सेल्युलर तंत्रज्ञानात व्यापक पद्धतीने होणाऱ्या संदर्भीय विदेच्या (मेटाडेटा) अविरत संकलनामुळे या तंत्रज्ञानाचा शासकीय किंवा कायदा व सुव्यवस्था यंत्रणांकडून व्यक्तींच्या दैनंदिन व्यवहारांवर निरीक्षण ठेवण्यासाठी (सव्‍‌र्हेलन्स) कसा दुरुपयोग होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्या खासगी माहितीची गोपनीयता जपण्यात कोणती आव्हाने येऊ शकतात, याचा आढावा घेतला. सेल्युलर तंत्रज्ञानाच्या समांतरपणे अस्तित्वात आलेल्या आंतरजाल (इंटरनेट) आणि वाय-फाय तंत्रज्ञानानेदेखील विदासुरक्षा क्षेत्रात नवनवी आव्हाने निर्माण केली, त्यांची येथे दखल घेणे आवश्यक आहे.

इंटरनेटची यशोगाथा आणि या तंत्रज्ञानाचा आपल्या दैनंदिन जीवनावर पडलेला प्रभाव याबद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याआधीच्या कोणत्याही तंत्रज्ञानाने (दूरध्वनी, तारयंत्र, कॅमेरा, रेडिओ, टेलिव्हिजन आदी) आपल्या आयुष्यात एवढी उलथापालथ घडवली नसेल; किंबहुना याबाबतीत इंटरनेटची तुलना करायची झाल्यास केवळ सेल्युलर तंत्रज्ञान व त्याबरहुकूम चालणाऱ्या स्मार्टफोनशीच करता येईल. असे असले तरीही, इतर अनेक तंत्रज्ञानांप्रमाणेच इंटरनेटची सुरुवात व त्याचा प्रसार काहीशा संथ गतीनेच झाला. इंटरनेटच्या जन्मापासून पहिली जवळपास ३० वर्षे इंटरनेटवरील संशोधन व त्याचा वापर हा प्रायोगिक तत्त्वावर अमेरिकी संरक्षण खाते व त्याच्याशी निगडित असलेल्या प्रयोगशाळांमध्येच होत होता.

बऱ्याचदा टीम बर्नर्स-ली या ब्रिटिश शास्त्रज्ञाला इंटरनेटचा जनक असे संबोधले जाते, जे काहीसे चुकीचे आहे. कारण बर्नर्स-लीचे योगदान हे आंतरजालावरून विविध सेवा पुरवण्यासाठी जी संस्थळे निर्मिली जातात, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे ‘वर्ल्ड वाइड वेब (डब्लूडब्लूडब्लू)’ तंत्रज्ञान वापरतात, त्यामध्ये आहे. खरे तर लिओनाडरे क्लाइनरॉक या अमेरिकी संगणक-शास्त्रज्ञाला इंटरनेटचा जनक म्हणून संबोधणे अधिक उचित ठरेल. याचे कारण हे तंत्रज्ञान माहितीच्या देवाणघेवाणीसाठी ज्या ‘पॅकेट स्विचिंग’ पद्धतीचा वापर करते, तिचा शोध क्लाइनरॉकने ‘एमआयटी’मध्ये (मसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) संशोधन करताना लावला. ‘पॅकेट स्विचिंग’ तंत्रज्ञानावरील त्याचा प्रबंध १९६२ साली प्रकाशित झाला, त्यामुळे ते वर्ष इंटरनेटच्या जन्माचे वर्ष म्हणून ग्राह्य़ धरायला हरकत नाही!

त्याच सुमारास अमेरिकी संरक्षण खाते हे गोपनीय माहितीच्या सुरक्षित आदान-प्रदानाकरिता एका नव्या तंत्रज्ञानाच्या शोधात होते. तारयंत्र किंवा टेलिफोनच्या मदतीने शीघ्र संदेश पाठवण्याची पद्धत वायरटॅपिंगच्या उदयामुळे फारशी सुरक्षित राहिली नव्हती. म्हणूनच दोन भिन्न ठिकाणी असलेल्या, पण केबल व स्विचच्या मदतीने एकमेकांना जोडल्या गेलेल्या संगणकांमध्ये सुरक्षित संदेशवहन करण्यासाठी, अमेरिकी संरक्षण खात्याने आपल्या ‘आर्पा’ (अ‍ॅडव्हान्सड् रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी) या संस्थेतर्फे ‘आर्पानेट’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. १९६७ साली क्लाइनरॉक ‘आर्पानेट’ प्रकल्पाचा भाग झाला. १९६९ मध्ये पहिल्यांदा एक संदेश ‘पॅकेट स्विचिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून ‘आर्पानेट’वर प्रसृत करण्यात त्याला यश आले आणि खऱ्या अर्थाने आंतरजालाला मूर्त स्वरूप मिळण्यास सुरुवात झाली.

सत्तर आणि ऐंशीच्या दशकांमध्ये आंतरजालाचा वापर हा अमेरिकी संरक्षण खाते, त्याच्याशी निगडित असलेल्या प्रयोगशाळा आणि ‘आर्पानेट’ प्रकल्पात सक्रिय योगदान देत असलेली विद्यापीठे यांच्यापुरताच मर्यादित होता. बर्नर्स-लीने १९८९ मध्ये ‘वर्ल्ड वाइड वेब’चा शोध लावल्यानंतर १९९३-९५ दरम्यान इंटरनेट तंत्रज्ञान सामान्यांसाठी खुले झाले आणि त्याचा खऱ्या अर्थाने व्यावसायिक वापर सुरू झाला. त्यानंतर मात्र या तंत्रज्ञानाने मागे वळून पाहिले नाही. आज जगभरात १०० कोटींहून अधिक सव्‍‌र्हर्स (ज्यांना ‘होस्ट’ असे म्हटले जाते) आंतरजालाशी जोडलेले आहेत. तसेच इंटरनेटच्या सार्वत्रिकीकरणानंतर उदयास आलेल्या ‘ई-कॉमर्स’ क्षेत्राची वैश्विक उलाढाल आज कित्येक हजार कोटींच्या घरात आहे, यावरूनच इंटरनेटच्या विशाल व्याप्तीची कल्पना येऊ शकेल.

आपण आपल्या घरात, कार्यालयात किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी ब्रॉडबॅण्ड अथवा वाय-फाय सेवेचा वापर करून आंतरजालावर प्रवेश मिळवत असतो. इंटरनेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी (लास्ट माइल) ज्या इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्या (आयएसपीज्) कार्यरत असतात, त्यांना तीन स्तरांत (टीअर) विभागले जाते. पहिल्या स्तरावरील (टीअर-१) कंपन्यांना खऱ्या अर्थाने इंटरनेट सेवेचा कणा म्हणायला हवे. या कंपन्यांनी जमिनीखालून किंवा पाण्याखालून नेलेल्या आणि १०० गिगाबीट्स प्रति सेकंद किंवा त्याहूनही अधिक वेगाने संदेशवहन करू शकणाऱ्या ऑप्टिकल फायबर तारा एकमेकींशी जोडलेल्या असतात. त्यामुळेच मग जगाच्या एक कोपऱ्यात बसलेल्या माणसाने जर असे एखादे संस्थळ उघडायचा प्रयत्न केला की ज्याचा सव्‍‌र्हर जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात आहे, तर अशा आंतरजोडणींमुळे ते सहज शक्य होते. ‘एटीअ‍ॅण्डटी’, ‘एनटीटी कम्युनिकेशन्स’, ‘डॉइश टेलिकॉम’, ‘व्हेरिझॉन’ या बलाढय़ आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गणना ‘टीअर-१’ इंटरनेट सेवा पुरवठादारांमध्ये होते. ‘टाटा कम्युनिकेशन्स’ ही भारतातील एकमेव ‘टीअर-१ आयएसपी’ कंपनी आहे.

द्वितीय स्तरावरील (टीअर-२) कंपन्या या राष्ट्रीय स्तरावर इंटरनेटचे जाळे विणण्याचे काम करतात. प्रत्येक ‘टीअर-२’ कंपनीला आपल्या ग्राहकाला सक्षम इंटरनेट सेवा देण्यासाठी ‘टीअर-१’ कंपनीच्या नेटवर्कशी सतत जोडलेले राहावे लागते. भारतापुरता विचार केला तर, आपल्याला सुपरिचित अशा अनेक कंपन्या (रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएसएनएल, व्होडाफोन-आयडिया आदी) ‘टीअर-२’ प्रवर्गात मोडतात. सर्वात शेवटच्या स्तरावरच्या (टीअर-३) कंपन्यांचे कार्यक्षेत्र हे एखाद्या प्रदेशापुरते (एखाद्दुसरे राज्य वा काही शहरे) मर्यादित असते. ‘टीअर-३’ कंपन्या या तुमच्या-माझ्यासारख्या इंटरनेटच्या उपभोक्त्यांशी प्रत्यक्षपणे जोडलेल्या असतात, कारण आपले घर किंवा कार्यालयापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवून ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ देण्याचे मोलाचे काम त्या करत असतात. दिल्ली अथवा मुंबईसारख्या महानगरांपुरतेच कार्यक्षेत्र असलेली ‘एमटीएनएल’ ही एक ‘टीअर-३’ कंपनी आहे. एके काळी केवळ लॅण्डलाइन दूरध्वनी सेवेतच नव्हे तर इंटरनेट सेवा प्रदान करण्यामध्येही मक्तेदारी असलेल्या या सरकारी कंपनीच्या सेवेचा दर्जा उत्तरोत्तर खालावल्याने किती ग्राहक तिची ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा वापरत असतील, हा प्रश्नच आहे. खरे तर आज जगभरातच ‘टीअर-२’ आणि ‘टीअर-३’ कंपन्यांमधला भेद पुसट होतो आहे. ‘टीअर-२’ प्रवर्गातल्या वर उल्लेखलेल्या भारतातील सर्वच कंपन्या आज त्यांच्या अंतिम ग्राहकाशी जोडल्या गेल्या आहेत.

थोडक्यात, इंटरनेट किंवा आंतरजाल हे नावाप्रमाणेच विविध स्तरांवर कार्यरत असणाऱ्या कंपन्यांनी विणलेल्या व एकमेकांशी वेगवेगळ्या मार्गानी जोडलेल्या तारांचे एक विशाल जाळे आहे. इंटरनेटच्या संरचनेत दोन प्रमुख वैशिष्टय़े आहेत. एक म्हणजे, यातील संदेशवहन हे विकेंद्रित (डीसेण्ट्रलाइज) पद्धतीने केले जाते. त्याआधी अस्तित्वात असलेल्या संदेशवहनाच्या तंत्रज्ञानाच्या (उदा. टेलिफोन) हे पूर्ण विरुद्ध आहे. टेलिफोनचा वापर करण्यासाठी तो ज्या एक्स्चेंजशी जोडला गेला आहे ते सतत कार्यरत राहणे आवश्यक असते; कारण टेलिफोन सेवेची संरचना ही एक्स्चेंजभोवती केंद्रित असते. त्याउलट, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील नेटवर्कमध्ये जर काही बिघाड झाला तरीही इंटरनेट सेवा सुरळीत चालू राहू शकते.

दुसरे वैशिष्टय़ म्हणजे, या नेटवर्कचे काम हे केवळ आपण दिलेल्या माहितीचे, सूचनांचे किंवा आज्ञांचे कार्यक्षमतेने वहन करण्यापुरतेच मर्यादित ठेवले गेले आहे. म्हणजेच वहन होत असलेल्या माहितीचे संकलन हे नेटवर्क करू शकत नाही किंवा तिच्या आधारे कोणताही निर्णयही घेऊ शकत नाही. तो अधिकार आंतरजालाच्या टोकांवर कार्यरत असलेल्या सॉफ्टवेअर प्रणालींना दिलेला असतो.

विकेंद्रित पद्धतीने माहितीचे मूकवहन करण्याच्या इंटरनेटच्या वैशिष्टय़ामुळे, ती खुल्या व्यवहारांस उत्तेजन देणारी व वापरकर्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणारी अशी आदर्श व्यवस्था असेल अशी अपेक्षा ठेवणे काही गैर नाही आणि सुरुवातीच्या कालखंडात ती तशी होतीदेखील! गेल्या एक-दीड दशकात मात्र इंटरनेटबद्दलच्या वरील समजुतीला बऱ्याच अंशी तडा गेलाय. मी कोणत्या देशात राहतो, माझा आयएसपी कोणता आहे, यावर- मी इंटरनेटवर काय करू किंवा बघू शकतो, हे ठरवले जाऊ शकते. तसेच मी प्रसृत करत असलेल्या विदेचा वापर करून मला ठरावीक माहितीच कशी सतत दाखवली जाते आणि काही विशिष्ट प्रकारच्या विचारकुपांमध्ये कसे अडकवले जाऊ शकते हे समजून घेणे उद्बोधक आहे, ज्याचा परामर्श पुढील लेखांमध्ये घेऊ.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स, विदासुरक्षा व गोपनीयता तसेच डिजिटल परिवर्तन या विषयांचे अभ्यासक आहेत.

amrutaunshu@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2021 12:15 am

Web Title: security in the net internet virus user akp 94
Next Stories
1  ‘पुणे करारा’च्या फेरविचाराची वेळ
2 विदाव्यवधान : ‘मेटाडेटा’स तात्पुरती उसंत…
3 विदाव्यवधान : ‘मेटाडेटा’ संकलनाचे (गैर)फायदे..
Just Now!
X