29 February 2020

News Flash

तेंडुलकरांच्या लेखणीचा प्रथमावतार

प्रस्तुतच्या पाच कथांपैकी माजरेरी रोलिंग्ज यांची कथा १९३६ साली प्रसिद्ध झाली होती.

विजय तेंडुलकरांच्या बहुस्पर्शी प्रतिभेचा आविष्कार सर्वानी बघितला आहे. सामान्य रसिकाला नाटककार, चित्रपट कथालेखक आणि पटकथाकार म्हणून ते अधिक परिचित आहेत. त्यांचे ‘कोवळी उन्हे’ हे सदरही अनेकांच्या लक्षात असेल. पण तुलनेने कथालेखक म्हणून त्यांना फार लोकप्रियता मिळाली नाही. प्रस्तुतचे पुस्तक म्हणजे तेंडुलकरांच्या सुरुवातीच्या काळातील कथासंग्रह आहे.. तोही अनुवादित कथांचा! जॉन स्टाईनबेक (आलास पाहुणा), जेम्स थर्बर (साहेबांच्या बाईचा बंदोबस्त), जॅक लंडन (जनावर), माजरेरी कीनन रॉलिंग्ज (त्याची आई), हॉर्टेन्स कॅलिशर (गाठ) अशा पाच कथाकारांच्या या कथा आहेत. प्रत्येक कथेच्या अगोदर मूळ लेखकाचा त्याच्या वैशिष्टय़ांसह व महत्त्वाच्या कलाकृतींसह परिचय दिलेला आहे.
पुस्तकाच्या सुरुवातीस ‘तुम्हाला कथालेखक व्हायचं आहे?’ या मथळ्याखाली कथा-तंत्राविषयी तेंडुलकरांनी लिहिले आहे.. ‘‘तुम्हाला चांगले कथाकार व्हायचे असेल तर तुमच्या कथा इतर कुणाच्याही कथांसारख्या नसणे फार महत्त्वाचे आहे. या पाच कथांचे चांगुलपण त्यातल्या प्रत्येकीच्या वेगळेपणात आणि स्वतंत्र घाटातच आहे. चांगल्या कथेला स्वतंत्र घाट हवा, तसाच कथाकाराला त्याचा स्वत:चा स्वतंत्र साचा असणे आवश्यक आहे.’’
प्रस्तुतच्या पाच कथांपैकी माजरेरी रोलिंग्ज यांची कथा १९३६ साली प्रसिद्ध झाली होती. अनाथाश्रमातला एक मुलगा आणि लेखिका यांचे सुरुवातीला अगदी व्यावहारिक, औपचारिक पातळीवर असलेले संबंध पुढच्या काळात अतिशय हृद्य बनतात. तो मुलगा खरोखरच पोरका असतो. पण त्याने लेखिकेला आपली आई हयात आहे, ती चांगली आहे आणि काही कारणांनी आपल्याला तिच्याजवळ ठेवू शकत नाही, असे भासविलेले असते. कथेच्या अखेरीस सत्य उघडकीला येते. आणि पुढे सारे लेखिका तुमच्यावर सोडून देते. तो मुलगा तसे का वागला असेल, याची काहीशी खूण लेखिकेच्या पहिल्या निवेदनात येते- ‘त्याच्यात कर्तेपणा होता. ‘स्वयंभू’पणा नव्हता. त्यात धैर्य, कर्तृत्व अभिप्रेत आहे. पण त्यापेक्षा अधिक काहीतरी आहे.’
चांगल्या कलाकृतीचा एक निकष असा की, ती प्रेक्षक/ वाचक यांना सारे समजावून सांगण्याच्या खटाटोपात पडत नाही. ही कथा तशीच आहे. ती वाचताना एकेक अनुभूती देत राहते आणि अखेरीस वाचक दिङ्मूढ होतो.
‘साहेबांच्या बाईचा बंदोबस्त’ ही तशी हलकीफुलकी कथा आहे. ऑफिसमध्ये नव्या आलेल्या ‘सल्लागार’ बाईचा काटा काढण्यासाठी ऑफिसमधला वरिष्ठ कारकून काय युक्ती करतो आणि सल्लागार व इतर कर्मचारी यांच्यात तेढ नक्की कशामुळे असते, याचे हे वर्णन आपल्याला खूप परिचित वाटते. ज्या निष्पाप विनोदाचे दिवस आता उरले नाहीत असे आपल्याला वाटते त्या निष्पाप विनोदाच्या काळाची आठवण या कथेत ताजी होते.
‘जनावर’ ही कथा संपूर्णपणे वेगळ्या वातावरणातली आहे. उष्णतामान शून्याखाली कित्येक अंशांनी उतरलेल्या प्रदेशात अस्तित्वासाठी एकटय़ा एका माणसाने दिलेला शिकस्तीचा लढा या कथेत मोठय़ा तन्मयतेने रंगवला आहे. (लेखक परिचयातून) या कथेत प्रवाशाबरोबर एक कुत्रा आहे. प्रवास जसजसा लांबतो तसतसा प्रवाशाचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. सुरुवातीला कुत्र्याबद्दल असणारा कौतुकमिश्रित हेवा गळून पडतो. त्याची जागा दु:स्वास घेतो. असह्य झाल्यावर प्रवासी कुत्र्याला ठार मारायलाही तयार होतो. ‘‘त्याला वाटलं, की कुत्र्याला ठार करावं आणि त्याच्या उबदार शरीरात हात लपवावेत- बधिरपणा जाईपर्यंत.’’ पण अखेर तेवढेही त्याला शक्य होत नाही. प्रवासी बर्फवासी होतो आणि कुत्रा जिवाच्या आकांताने गळा काढून भुंकतो आणि तळाच्या दिशेने सरावाची पायवाट तुडवू लागतो.
पृथ्वीवरच्या जीवसाखळीत वरच्या शिडीवरचा मानव खालच्या श्रेणीच्या जनावराची जागा घेतो आणि प्राणी वरच्या पातळीवरील मानवाची लढाऊ शक्ती दाखवून जिवंत राहतो. या कथेतील वर्णने वाचताना जी. एं.च्या कथांची सहज आठवण होते.
‘आलास पाहुणा’ ही एका शेतकरी स्त्रीच्या स्व-भावाला मिळालेल्या धक्क्याची गोष्ट आहे. प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे ‘गाठ’ ही किंचितशी भावविवश कथा आहे : योग्य माता-पित्याच्या अभावीदेखील आपल्या आयुष्यातल्या एकेका प्रश्नाची जबाबदारीने सोडवणूक करणाऱ्या शिकलेल्या दोन तरुण जीवांची! पण प्रत्यक्ष कथेत फारसं काही घडत नाही. दोघांची गाठ पडेपर्यंतचा प्रवास.. त्यातही नायकाची हकिकत तपशिलाने येते. नायिका अगदी शेवटी येते. त्यामुळे कथा तेवढी भिडत नाही.
साऱ्याच कथा वाचनीय आहेत. त्या- त्या काळात आणि त्या- त्या देशात त्या खूप लोकप्रिय, समीक्षकमान्य ठरल्या. मराठी वाचकांनाही त्या निश्चितपणे आवडतील. गालबोट एवढंच, की तेंडुलकरांनी बऱ्याचदा शब्दागणिक अनुवाद केला आहे. त्यामुळे यातली सहज टाळता येण्याजोगी कृत्रिम शैली खडय़ासारखी
बोचते.
‘पांच पाहुण्या’, अनुवाद- विजय तेंडुलकर,
प्रकाशक- वसंतकुमार सराफ,
प्रकाशन वर्ष : १९५०.
मूल्य- २ रु.
vazemukund@yahoo.com
(समाप्त)

First Published on December 27, 2015 1:01 am

Web Title: first incarnation of vijay tendulkars text
टॅग Vijay Tendulkar
Next Stories
1 आमोक उर्फ वेडापिसा
2 स्त्रीसाहित्याचा दशकी मागोवा
3 माझा आफ्रिकेचा प्रवास
X
Just Now!
X