30 October 2020

News Flash

परिचयोत्तर विवाह

कोणाशी लग्न करायचं याचा निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायला पाहिजे.

यापूर्वीच्या लेखात मी असे म्हटले होते की, कोणाशी लग्न करायचं याचा निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायला पाहिजे. त्यासाठी आणखी एक गोष्ट स्पष्ट करतो. नवराबायकोमध्ये जे मतभेद होतात ते जवळजवळ सगळे डोक्याच्या आत काय चालू आहे त्यावरून होतात. ते कळण्यासाठी मी माझ्या समुपदेशनाच्या व्यवसायात २० वर्षांपूर्वी खऱ्या परिचयाची एक पद्धत तयार केली होती  त्याला ‘प्रश्नावली पद्धत’ नाव पक्कं केलं होतं.

विवाहोच्छुक मुला-मुलींचं प्रश्नावली पद्धतीने संभाषण सुरू झालं आणि त्यानंतर प्रत्यक्ष गाठ पडून अधिक बोलायचं ठरलं, की त्यानंतर प्रश्नावली प्रक्रियेला साधारणपणे ६ महिने लागतात. स्वत:बद्दल माहिती आणि दुसऱ्याची पारख यातून होणे हा दुहेरी उद्देश या प्रश्नावली मागे असतो. त्यामुळे लग्नापूर्वी प्रत्येकाने ही प्रश्नावली भरायला हवी असे वाटते. सविस्तर प्रश्नावलीमध्ये त्या व्यक्तींची संपूर्ण माहिती मिळावी हा उद्देश असल्याने त्यातले विभाग असे असावेत – शिक्षण आणि व्यासंग, छंद याचं स्वत:चं वर्णन नि जोडीदाराकडूनच्या अपेक्षा. आपल्या आरोग्याविषयी, खेळ, आजार याविषयी माहिती, दुसऱ्याशी वागतानाचे आपल्या स्वभावातले मुख्य गुण, आपली पैशांबद्दलची विचारसरणी, मासिक प्राप्ती, कामाचं स्वरूप याबद्दलची माहिती. स्त्री-पुरुष संबंधांबद्दलचे स्पष्ट विचार. स्वत:च्या कुटुंबाबद्दल सविस्तर माहिती, मुलांना जन्म देण्याबद्दलच्या स्पष्ट कल्पना, लग्न-समारंभाबद्दलचे विचारही यात मांडावेत, त्याचबरोबर देव, धर्म, जात, पत्रिका, रूढी, परंपरा, कर्मकांडं इतकेच नव्हे तर  एकत्र की विभक्त कुटुंबात रहायला आवडेल याबद्दलची मतंही मांडावीत. पत्रिका बघायची असली तर त्याची देवाणघेवाण आधी करावी. नकाराचं कारण म्हणून पत्रिकेचा वापर करू नये. बघायची नसली तर बघू नये, दाखवू नये आणि तो विषय डोक्यातून, आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकावा. आमचं कुटुंब त्याचंच उदाहरण आहे. त्यामुळे जगणं सोपं होतं. यापुढची पायरी म्हणजे फक्त एका फुलस्केप कागदावर स्वत:ची त्रोटक पण पुरेशी माहिती देता आली पाहिजे. खूप विचार केल्याशिवाय हे अशक्य आहे. तरीही प्रश्न असा शिल्लक राहतो की जोडीदाराची निवड या पद्धतीने केल्यावर यशस्वी संसाराची ‘गॅरंटी’ देता येईल का? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण लोक असा प्रश्न खरोखरच विचारतात.

जोडीदाराची निवड कशी करावी, हा प्रश्न जेव्हा जेव्हा निघाला तेव्हा काही तरी नवा मार्ग शोधायला हवा, असं वाटत राहिलं. लग्न जमवण्याच्या एकूण दोन पद्धती रूढ आहेत. एक म्हणजे स्थळ बघून. त्यातला दाखवण्याचा कार्यक्रम कोणालाच आवडत नाही, पण इलाज नसतो. दुसरी पद्धत म्हणजे प्रेमविवाह. त्यात काव्य आहे, शौर्य आहे, पण डोळस विचार नाही. परिचयोत्तर विवाह हा तिसरा पर्याय आहे. परिचयासाठी सहवास हवा. त्याविषयी पालकांना चिंता वाटते म्हणून मार्गदर्शन हवं आणि चांगलं, सभ्य वातावरण हवं. चारचौघांत बोलबाला नको, यासाठी योग्य ठिकाण हवं. यासाठी विविध ठिकाणी अभ्यास मंडळं स्थापन होणं गरजेचं आहे.

एवढं सगळं साधायचं तर जोडीदार निवडताना अभ्यास टाळताच येणार नाही. इतर सगळ्या विषयांचे अभ्यासक्रम फी भरून, कॉलेजमध्ये जाऊन, अनेक वर्ष घालवून करायचे; मग लग्नासारख्या महत्त्वाच्या विषयात झटपट निर्णय कसा योग्य ठरेल? मुख्य म्हणजे या पद्धतीत निर्णय सावकाश घ्यायचा असतो. स्वत:विषयी खरं सांगायचं असतं. त्यामुळे खोटं पचवण्याचा ताण नसतो.

प्रत्यक्षात कायद्याने हुंडय़ाला बंदीच आहे; पण एक काळ असा होता की, मुलगा हुंडा नको म्हणत असेल तर त्या मुलाच्या स्थळात काही तरी खोट असली पाहिजे, असा समज होता. माझ्या आणि शोभाच्या लग्नाच्या वेळी म्हणजे ४८ वर्षांपूर्वी जवळजवळ अशीच परिस्थिती होती. मी हुंडय़ाला नकार दिल्यामुळे माझ्यात  व्यंग असणार अशी अनेकांना खात्री होती.

अभ्यास मंडळात भेटून, परिचय वाढवून, डोळसपणे, शांतपणे स्वत: निर्णय घेऊन लग्न ठरवण्याचे मला खूप फायदे दिसतात. त्यात एवढे मुद्दे आहेत :

  • त्यामध्ये कुटुंबीयांची संमती असेल. त्यामुळे चोरून भेटण्याची जरूर नसेल.
  • चोरून भेटताना झालेल्या, केलेल्या स्पर्शाची शक्यताच कमी होईल. मानसिक, शारीरिक, भावनिक सापळे कमी होतील.
  • बघण्याचा एकच पारंपरिक समारंभ नसेल. अनेक चर्चा असतील. दोन्ही व्यक्तींच्या, दोन्ही कुटुंबीयांच्या चर्चा होतील.
  • स्त्री-पुरुष समानता पाळून या चर्चा करता येतील. मुलाकडचे किंवा मुलीकडचे या कल्पनेचं अतिरिक्त बंधन नसेल. त्यामुळे उपचाराचं बंधन नसेल. होकार आणि नकार हा मानापमानाचा प्रश्न न करता निर्णय घेता येईल.

शाळा-महाविद्यालयीन परीक्षेत १० निरनिराळ्या विषयांत कमी किंवा जास्त मार्काच्या सरासरीवर शेवटी गुणवत्ता ठरते. जोडीदार निवडताना, पैसे, धमक, शिक्षण, सौंदर्य, आरोग्य, सामाजिक समज, समानतेची समज, कलांविषयी समज, वाचन, वाक्चातुर्य, प्रामाणिकपणा वगैरे अशा अनेक ‘पेपरांना’ आपल्याला बसायला हवं आणि ‘गुणवत्तेप्रमाणे नवरा किंवा बायको मिळते तीच टिकते’ असं मला खात्रीनं वाटतं. यालाही अपवाद असतात, पण ते शेवटी क्वचित घडणारे फिल्मी किस्से आहेत. सध्याच्या लग्न करणाऱ्यांना इतका स्पष्ट विचार केल्याशिवाय धडगत नाही.

काही जण म्हणतील की, आम्हाला तोंडी बोलणंच बरं वाटतं. लेखी कशाला? लेखी मजकुरात आणखी एक फायदा असतो. बोलताना आपण जेवढं अघळपघळ बोलतो, त्या तुलनेत लिहिताना जास्त विचार करून लिहितो. विचार व्हावा हाच तर उद्देश आहे.

आणखी एक महत्त्वाची परीक्षा म्हणजे प्रत्यक्ष लग्नापूर्वी वैद्यकीय तपासणी. खरं म्हणजे तपासणीला नकार याचा अर्थ ती व्यक्ती नापास असाच होतो. निरोगी माणसाशी लग्न करावं, अशी इच्छा प्रत्येकाची असते. इतक्या प्रदूषणाने भरलेल्या काळात काही विकार असला तर तो बरा होण्याजोगा असावा हेही एकदम रास्त आहे.

समुपदेशनासाठी माझ्याकडे लग्नापूर्वी जोडय़ा येतात. एकमेकांशी लग्न करायचं अशी त्यांची इच्छा असते. दोघांना एकमेक आवडले असले तर नाही म्हणणारा मी कोण? मी एकच काम करू शकतो. मी तयार केलेली ‘एम. एम. आय. + आर. क्यू. टेस्ट’ त्यांना देतो. त्या जोडप्याला लग्नानंतरच्या आयुष्यात कुठच्या बाबतीत कमी प्रश्न येतील आणि कुठच्या बाबतीत जास्त प्रश्न येऊ शकतील, हे मी त्यावरून सांगतो. अशा निवडक विषयांचा जास्त अभ्यास करायला लागणार, एवढाच त्याचा अर्थ असतो.

आणखी एक शक्यता असते. सर्वसाधारणपणे सारासार विचाराने वागणाऱ्या मुला-मुलींनाही आपल्या समाजात स्त्री-पुरुष निकट सहवासाचा अनुभव नसतो. पाश्चात्त्य समाजात लैंगिक संभोगाचा अनुभव फार लवकर सुरू झाल्यामुळे अनेक विकृती जन्मलेल्या आहेत हेही खरं आहे. प्रश्न समतोल साधण्याचा आहे.

काही मुली लग्न ठरवण्यासाठी उतावीळ असतात. अशा अधीर मुली विकृत मुलांना बरोबर कळतात. ते त्या मुलींचा गैरफायदा घेण्याच्या हेतूने भलभलत्या असभ्य सूचना करतात, अटीही घालतात. अशा सूचना मान्य केल्यामुळे लग्न जमेल, हे खरं नसतं. असं लग्न न ठरण्याची शक्यताच जास्त असते. सबंध आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट समतोलपणे निर्णय घेता येणं हीच जर आहे, असं आपण म्हणतो तर विवाहाचा निर्णय त्याला अपवाद कसा असेल?

– अनिल भागवत

hianildada@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 3:17 am

Web Title: questions about marriage part 2
Next Stories
1 विवाहाचा अर्थ : लग्न कशासाठी?
Just Now!
X