12 August 2020

News Flash

मिसिंग श्रावणसरी

मित्रांच्या अड्ड्यावर किंवा कॉलेजच्या कट्ट्यावर, गरम गरम कांदा भजी-वडे आणि फेसाळणारा कटिंग चाय यासोबत कोसळणाऱ्या पावसामुळे थट्टामस्करीला उधाण येते.

|| विपाली पदे

ज्येष्ठाच्या अखेरीस भरू लागलेलं आभाळ आषाढात मनसोक्त कोसळतं. त्या कोसळत्या धारा सुखावणाऱ्या असल्या तरी आपल्याला चिंब भिजवतात त्या श्रावणसरी.. श्रावण म्हणजे सण, श्रावण म्हणजे व्रतवैकल्यं, सात्त्विकता या सगळ्या गोष्टी मोठय़ांबरोबर आनंदाने साजऱ्या करणाऱ्या तरुणाईच्या मनातला श्रावण मात्र वेगळाच असतो. बाहेर पाऊस दाटलेला आणि मनात गरमागरम चहा-भजीबरोबर मित्रांशी रंगलेल्या गप्पांच्या आठवणी फे र धरू लागतात. यंदा याच आठवणींमध्ये भिजत श्रावणसरींचा आनंद अनुभवावा लागणार आहे..

परीक्षा-अभ्यास या सगळ्या काळज्या, करीअरच्या जबाबदाऱ्या सगळं काही काळ बाजूला ठेवून पावसातली मित्रांबरोबरची भटकंती, कटिंग चहावर झडणाऱ्या गप्पांना रंगत आणणारा श्रावण तरुणाईला जास्त जिवाभावाचा वाटतो. मित्रांच्या अड्ड्यावर किंवा कॉलेजच्या कट्ट्यावर, गरम गरम कांदा भजी-वडे आणि फेसाळणारा कटिंग चाय यासोबत कोसळणाऱ्या पावसामुळे थट्टामस्करीला उधाण येते. गप्पा-गाण्यांना रंग चढू लागतो. यार मंडळींच्या या ग्रुपमध्ये हरतºहेचे लोक असतात. कुणाकुणाचं प्रेम फुलू लागलेलं असतं, कुणाचं ऐन बहरात असतं, तर कुणी आशिक आवारा आपल्या चोळामोळा झालेल्या जखमांवरती मलमपट्टी करत असतो. त्यामुळे कुणी ‘रिमझिम गिरे सावन’ गाऊ लागतं, कुणी  ‘मोहब्बत बरसा दे ना तू’वर ताल धरू लागतं, तर कुणाला गच्च पावसातलं ‘क्यों की तुम ही हो’ आठवतं. या काळात कवितांनाही बहर येऊ लागतो. मग कट्ट्यावर बसलेलं असताना हळूच कोणी तरी सौमित्रचं गारवा लावतं, तर कोणी गुरू ठाकूरची कविता वाचतं, तर कोणी मस्तपैकी गिटार घेऊन मरिन ड्राइव्हवर जाऊन आपल्या मित्रांसोबत केलेल्या कवितांना चाली लावत बसतं. पावसाळी सहली हा तर युवामनांचा आकर्षणबिंदू. पावसाला सुरुवात होते न होते तोच हौशी मंडळींची इंटरनेटवर ट्रिपच्या जागा शोधण्याची मोहीम सुरू होते. जागा ठरल्यानंतर खरेदीची धावपळ असते. सहलीमध्ये फोटोंचा तर अक्षरश: कारखाना उघडला जातो. जाताना रिकामी करून नेलेली फोन मेमरी फोटो आणि व्हिडीओमुळे ओसंडून वाहत असते. त्यात जर एखादा फोटोग्राफीची आवड असणारा असेल, तर काही विचारायलाच नको! त्या व्यक्तीला हक्काने राबवून तिच्याकडून आपल्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील ‘प्रोफाइल पिक्चर’ अपडेट करण्याची पूर्ण तजवीज केली जाते.

पण यंदा हे सगळं आठवणीतच जमा झालं आहे. या वर्षी तरुणाई हे सगळंच मिस करतेय. करोना या आजारामुळे आपण घराबाहेर पडू शकत नाही आहोत. त्यामुळे कॉलेज नाही, कट्टा नाही, चहा आणि भजी नाही किंवा गर्लफ्रेंडसोबत पावसातली रोमँटिक राइडही नाही. यातही असे अनेक जण आहेत ज्यांना पक्षीनिरीक्षणाची आवड आहे आणि ज्ञान आहे म्हणून भिगवण, भंडारदरा अशा अनेक ठिकाणी खास भेटी देतात. अनेकांच्या गावाकडे छान हिरवंगार शेत बहरलेलं असतं ते अनुभवण्यासाठी गाव गाठण्याची कोण घाई होते आणि मुंबईतली मुलं-मुली तर काय खास लेक्चर्स बुडवून मरिन ड्राइव्हवर पावसाचा आनंद घ्यायला जातात. या सगळ्या गोष्टी आता या वर्षी करायच्या राहून गेल्यात. अनेक जण असे आहेत जे रोजचा रेल्वेचा प्रवास आणि त्यानिमित्ताने झेललेल्या पावसाच्या आठवणींचे किस्से सांगण्यात रमले आहेत. किती महिने झाले ‘लोकल गाड्या उशिरा धावत असल्यामुळे आम्ही दिलगीर आहोत!’ असे शब्द कानावर पडले नाहीत म्हणून गमतीने का होईना सांगत मनातल्या निराशेला वाट मोकळी करून देत आहेत. इतकंच नाही तर तरुणाईचे असे ग्रुप आहेत, जे कित्येक महिने आधी ट्रेकिं गचे नियोजन करून खास या काळात गिरिभ्रमंतीसाठी निघतात. मात्र आता हेही नियोजन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरचं बंद झालं आहे.

श्रावणातल्या या पाऊसधारांच्या बऱ्यावाईट अनुभवांचे सगळेच साक्षीदार असतात. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात.  क्षणापूर्वी रोमँटिक वाटणारा पाऊस अनेकांचे संसार उद््ध्वस्त करतो, होत्याचे नव्हते करतो तेव्हा मनात चर्र झाल्याशिवाय राहत नाही; पण निसर्गाची सगळीच रूपं महत्त्वाची असतात.  क्षणार्धात ‘होत्याचे नव्हते’ होते; आणि तरीही दर वर्षी श्रावण आला की सगळया वाईट आठवणी मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त होतात आणि हिरवीगार वनराई, मातीच्या सुगंधाची दरवळ आणि मनात झालेली आठवणींची वर्दळ  पुन्हा एकदा सगळ्यांना साद घालायला लागते.

आता या तरुणाईकडे एकच मार्ग राहिलाय तो म्हणजे फेसबुक, इनस्टाग्रामवर ‘वन इअर अ‍ॅगो’ अशी कॅ प्शन देत या आठवणी शेअर करण्याचा. कोणी पावसाळी कविता टाकतंय, कोणी जुने व्हिडीओज एडिट करून टाकतंय, तर कोणी ‘व्हिडीओ कॉल’च्या माध्यमातून ‘व्हर्च्युअल’ सहल अनुभवत आहेत. यावर अजून एक पर्याय आता तरुणांनी शोधला आहे तो म्हणजे मित्रांना ग्रुप व्हिडीओ कॉल करायचा. सगळ्यांनी आपापल्या घरात गरमागरम भजी तळायची आणि व्हच्र्युअली आपापसात गप्पांचा फड रंगवत या भज्यांचा आस्वाद घ्यायचा. अशा व्हर्च्युअल गप्पा मग कधी मस्त गरमागरम मॅगी किं वा वाफाळत्या चहा-कॉफीबरोबर रंगवायच्या. श्रावणातली ही मजा आणखी कुठल्या-कु ठल्या पद्धतीने अनुभवता येईल, याबद्दलही सगळेच खल करताना दिसत आहेत.  हेही दिवस जातील या विचाराने व्हर्च्युअल का होईना श्रावणातील सणवार, खिडकीतून भिजवणारा पाऊस आणि आकाशातली रंगांची उधळण या सगळ्याचा आनंद घरच्यांबरोबर-मित्रांबरोबर शेअर करत ताण-नकार दूर पळवण्याचा प्रयत्न के ला जातो आहे. किमान गणेशाचे आगमन होईपर्यंत तरी हे अरिष्ट कमी होईल आणि पुन्हा एकदा पावसाच्या सरीत चिंब भिजता येईल… आठवणींचे हे इंद्रधनू पुन्हा नव्याने आकाशात रंगेल… ही आशाच सगळ्यांना नवे बळ देते आहे.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 2:16 pm

Web Title: article missing shravansari akp 94
Next Stories
1 क्षितिजावरचे वारे : वेलकम प्रतिसृष्टी – १
2 मंदीतून संधी साधणारे शिलेदार
3 सदा सर्वदा स्टार्टअप : ‘फंडिंग राउंड’चे कार्य
Just Now!
X