‘भावा.. काय भारी आहे हा माझा नवा मोबाइल! सरस एकदम.. आवरा! सेल्फी तर एक नंबर येतोय’. दचकू नका! ही कुठल्या मवाली किंवा टप्पोरी मुलाची भाषा नाही, तर कॉलेज कट्टय़ावर सर्रास ऐकू येणारी आजची ‘मराठी’ आहे. भावा, भारी, सरस, कहर, आवरा, टवका, राडा, बिनधास्त, घंटा, कल्ला असे अनेक मराठी (?) शब्द आजच्या अमराठी तरुण मुलांच्याही तोंडी आहेत. हेच ते ट्रेण्डी मराठी शब्द. (अर्थात याचा मराठी भाषेत मराठी म्हणून वापर करायचा का नाही यावर वाद होऊ शकतात.. नव्हे.. होतातच.)
हे शब्द बहुधा उद्गारवाचक असतात आणि शब्दांपेक्षा तोफगोळे असल्याचाच भास होतो.
प्रगतीच्या वाटेची पायपीट करत असतानाच सर्वानाच असा काही वेग गवसला आहे की, मेसेज टाइप करण्याच्या पद्धती बदलत असताना आमची भाषाही बदलली. या वेगवान जमान्यात नाती बदलली तर भाषेचं काय! आता भाषेतही भेसळयुक्त ‘टच’ येऊ लागला आहे. बघा.. सलग एकसंध पाच-सहा मराठी शब्दांचं वाक्यच नाही बनवता येत आम्हाला हल्ली! तीच तीच भाषा, व्याकरणाचे नियम हे सारं काही बाजूला सारत आम्ही ज्या ठिकाणी वावरतो तिथल्या गोष्टींचा प्रभाव आमच्या भाषेवर पडतो आहे. ती शुद्ध मराठी आहे की नाही, यापेक्षा ती प्रत्येकाला जवळची वाटतेय हे मात्र खरं. म्हणूनच मूळच्या मराठी भाषेतले खानदेशी, कोकणी, कोल्हापुरी, वऱ्हाडी, पुणेरी, आगरी, बिहारी आणि बम्बइया ढंगातले नवीन शब्द मिसळून बोलता बोलता हेच शब्द आता चलतीत आलेत. ही पर्यायी ‘भाषेची मिसळ’ प्रत्येकानेच चाखली असेल.
असा कोणतातरी एक शब्द असतो जो कोणा एकाची अलिखित ओळखच बनून जातो. जरा काही झालं की ‘लोचा झाला ना भाई’, ‘वाट लागली’ असं म्हणता म्हणता हेच मराठी असं बाहेरच्या माणसाला वाटून जातं. समोरून कोणी गेलं की ‘कसला छावा होता तो..’ हे उद्गार मग सर्रास ऐकू येतात. भाषेला मिळालेली ही कलाटणी पाहता ही तरुणाईची भाषा आहे, असं म्हणणारे बरेच आहेत. म्हणूनच ही आजची मराठी ट्रेण्डमध्ये आहे. आजकाल कपडय़ांपासून ते मोबाइलच्या कव्हर्सपर्यंत आणि राहणीमानापासून ते बोलण्या-चालण्यापर्यंत बहुतांशी सारं काही ट्रेण्डला धरून होताना दिसत आहे. मग या ट्रेण्डिंग जमान्यात भाषा मागे का? काही गोष्टींना मिळालेला अनपेक्षित बदलच त्यांचं गमतीदार ‘ट्रेण्डसूत्र’ बनून जातं.
कट्टय़ावर गप्पांचा फड रंगत असतानाच ‘मित्रा जिंकलंस’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया ऐकायला मिळाली नाही तर कट्टय़ावरच्या गप्पाच कसल्या. काही जरी बाचाबाची झाली तर आजकाल ‘अॅटिटय़ुड’मध्ये ‘इज्जतीत राहायचं’, ‘हिसाबात राहायचं’ असेच जाहीर रागे भरले जातात.
त्या दिवशी मात्र आईसमोर म्हटलं, ‘यार ही एवढी प्रॉजेक्ट्स म्हणजे डोक्याला शॉटच आहे’. झालं.. भाषेत झालेला हा ‘बदल’ घरापर्यंत आल्यावर मात्र आईने बरोब्बर १५ मिनिटं पद्धतशीरपणे कानउघाडणी केली. तेव्हा लक्षात आलं अरेच्चा! कसली बदलली आहे आपली भाषा. आपण लहानपणी असं बोलत होतो का? आता बोलतो त्यात जवळपास तीन-चार भाषांचा अंश असावा. भारी आहे हे प्रकरण ! असा विचार करतानाच मग लिस्ट आली ‘ट्रेण्डिंग शब्दांची’ आणि भाषेच्या मिसळीची.. तीच ही यादी. – कल्ला, घंटा, माहोल, कमाल, छपरी, बिंधास्त, विषय कट, छावा, रावस, फाटय़ावर मारणे, वाट लावणे, कहर, सारवासारव, वटक, निकलेश (शेवटी श लाऊन बोलणं), कल्टी, डोक्याला शॉट, फाडू आयडिया, ढिंच्यॅक, बापमाणूस, सरस, भावा, सव्वाल, राडा, मॅटर, टवका, इज्जतीत राहायचं.. इत्यादी.. ट्रेण्डी मराठीची ही यादी. आता यावर काय म्हणायचं.. बोले तो अपनी मराठी ट्रेण्ड मे हैं!