नमिता धुरी

‘तुमचं बरंय आपलं.. आमच्या काळात नव्हतं असं’, ‘सगळं मिळतंय ते नशीब समजा’, अशा प्रकारची एक ना अनेक वाक्ये वडीलधारी पिढी सतत तरुण मुलामुलींना ऐकवत असते. त्यातून आपल्या वडीलधाऱ्यांना आपले काहीही मान्य नाही, हाच विसंवादी सूर तरुणाईपर्यंत पोहोचत असतो. जन्माला आलेल्या कोणत्याही सजीवाला संघर्ष चुकलेला नाही. तसा तो नव्या पिढीलाही चुकलेला नाही, त्याचे स्वरूप बदलले आहे इतकेच. तरुण पिढीने जे मिळवले त्याचा हेवा करत बसण्यापेक्षा जे गमावले त्याचा गांभीर्याने विचार करत हे विसंवादी सूर योग्य संवादात बदलण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे..

बदलत्या काळात जशा सोयीसुविधा आल्या तशी स्पर्धा वाढली. यामुळे तरुण पिढीने मन:शांती गमावली, एकाग्रता गमावली आणि आत्मविश्वासही गमावला आहे.. पूर्वी दळणवळणाची साधनेच कमी असल्याने कोणाचा मुलगा काय करतो, कोणत्या देशात गेला याच्याशी पालकांना आणि मुलांनाही देणे-घेणे नसायचे. शिवाय पैसेवाल्यांच्या चंगळवादी संस्कृतीचाही फारसा प्रसार झाला नव्हता. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ठरावीक एका शाखेत प्रवेश घेऊन त्याच त्या प्रचलित वाटांवरून पुढची वाटचाल करायची हे समाजातल्या खूप मोठय़ा गटाचे ध्येय असायचे. एखादा परदेशी गेलाच तरी, ‘तो लहानपणापासूनच हुशार होता म्हणून तिथे गेला. आपण मात्र सामान्य आहोत,’ असे म्हणून पुन्हा प्रचलित वाटांनाच चिकटून बसण्याची मानसिकता समाजात होती. त्यामुळे इच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा फार कमी होत्या. शिवाय कुटुंबाच्या सर्व गरजा भागवण्याइतपत पगार देणारी नोकरी मिळाली की माणूस यशस्वी आणि कर्तृत्ववान झाला असे समजले जायचे. जास्तीत जास्त जणांना हाच नियम लागू असल्याने समाजात बऱ्यापैकी समानता होती. नेमकी हीच समानता आजच्या तरुण पिढीने गमावली आहे.

शालेय स्तरापासूनच अनुभवायला मिळणारी असमानता माणसाला आयुष्यभर पुरते. कोणी घरीच अभ्यास करतो, कोणी पंचवीस हजारांचा क्लास लावतो, कोणी पन्नास हजारांचा. त्यामुळे कोणी नापास होण्याच्या भीतीने आधीच धास्तावलेला, तर कोणी भरभरून गुण मिळाल्याने सर्वाकडून पाठ थोपटून घेणारा. पुढील आयुष्यात कधीही विचारले न जाणारे दहावीचे गुण मिळवताना मुलांची बरीच दमछाक होते. त्यानंतरचा अकरावी प्रवेश तर कधी कधी नैराश्य आणणारा असतो. ‘माझ्यापेक्षा कमी गुण मिळवून तो पुढे गेला आणि मी मागे राहिलो,’ ही आठवण ठरवूनही विसरता येत नाही. हे नैराश्य इतकं  की, ‘मला हव्या त्या कॉलेजमध्ये पैसे भरुन प्रवेश घेतला नाही, तर मी पुढे शिकणारच नाही,’ अशी धमकी पालकांना देण्यापर्यंत मुलांची मजल जाते. प्रत्येकाचं नैराश्य वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडतं. काहींनी आत्महत्येपर्यंतचा विचार आधीच करून ठेवलेला असतो.

हव्या त्या महाविद्यालयात, हव्या त्या शाखेत प्रवेश मिळूनही भागत नाही. पुढे आकर्षणांवर मात करत स्वत:ची प्रगती करावी लागते. विशिष्ट प्रकारचे कपडे, बूट घालावेत ही इच्छा बळावू लागते. यावर पालक किंवा महाविद्यालयाने बंधने लादली की, हे लोक आपले कोणी तरी शत्रूच आहेत अशी भावना निर्माण होते. एकाच पिढीच्या नजरेसमोर आयफोनच्या किती तरी पिढय़ा जन्म घेत असतात. शाळेत असताना पालकांना सोबत घेतल्याशिवाय कुठेच फिरायला मिळत नाही. मग महाविद्यालयात आल्यानंतर एकटय़ाने किंवा मित्रमैत्रिणींसोबत रात्री उशिरापर्यंत बाहेर थांबण्याचे अप्रूप वाटते. या सगळ्याकडे दुर्लक्ष करून अत्यंत एकनिष्ठेने अभ्यास करणाऱ्यांच्या हातात तरी काय पडते? तर, फुटलेला पेपर, चुकलेला निकाल आणि उच्च शिक्षणाची हुकलेली संधी..

एका बाजूला महाविद्यालयातील आयुष्याचे चढउतार सुरू असताना दुसऱ्या बाजूला पालकांशी मतभेद वाढू लागतात. स्वत:ची मते तयार होतात. ‘इतकी वर्षे आम्ही पालकांचे ऐकत होतो, आता पालकांनी आमचे ऐकावे,’ ही अपेक्षा चुकीची म्हणता येणार नाही. या परिस्थितीवर मार्ग काढायचा असेल तर ‘लिसन टु हिज नॉनसेन्स, ही विल लिसन टु युअर सेन्स’. मुलांच्या विचारांच्या कक्षेत प्रवेश करावा. पालकांनी मुलांच्या काही गोष्टी ऐकून घेतल्या की, मुलं पालकांच्या चांगल्या गोष्टी ऐकतात, असं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी सांगतात. त्यांच्या मते, एकाकडून योग्य संवाद घडला की दुसरीकडूनही तसाच प्रतिसाद मिळतो. मात्र यासाठी घरात नियम कमी आणि मार्गदर्शक तत्त्वं अधिक असावीत. नकार ऐकण्याची सवय पालकांनी मुलांना लावावी. लॅपटॉप, मोबाइल यामध्ये फिल्टर लावल्यास अनावश्यक गोष्टी मुलांपर्यंत पोहोचणार नाहीत. मुलांना पॉकेटमनी द्यावा, मात्र घरातल्या अर्थविषयक निर्णयप्रक्रियेत त्यांना सहभागी करून घ्यावं. यामुळे पैसे जपून वापरायला मुले शिकतील. अशा पद्धतीने पुढे गेलो तर चांगला बदल अनुभवायला मिळेल, असे ते म्हणतात.

एककीडे आधुनिक कपडय़ांना विरोध न करणारे पालक आधुनिक विचारांना मात्र उद्धटपणाचे नाव देतात. बारीकसारीक गोष्टींच्या आड येणारी अंधश्रद्धा, जातपात तरुण मुलांना नकोशी वाटत असते. मात्र सुशिक्षित पालकसुद्धा बदलायला तयार होत नाहीत. मित्रमैत्रिणींच्या घरात खुल्या विचारांचे वातावरण दिसत असताना आपल्या घरातील बौद्धिक मागासलेपण तिडीक आणणारे असते. हा विरोधाभास, पालक आणि मुलांमधील विचारांमध्ये असणारी ही तफावत याने नवी पिढी पछाडलेली आहे. त्यात बाहेरची आकर्षणेही त्यांच्यावर परिणाम करतात.

समाजमाध्यमांचे आकर्षण किंबहूना वेड हे त्यापैकीच म्हणावे लागेल. यातून काही चांगल्या गोष्टीही निष्पन्न होतात. सामाजिक मुद्दय़ांवर एकत्र येण्यासाठी हे खूप सोपे माध्यम आहे. मात्र समाजमाध्यमांमुळे तरुण पिढी अफवांनाही चटकन् बळी पडते. कोणत्याही सामाजिक आंदोलनापासून स्वत:ला दूर ठेवता येत नाही. भावनिक आवाहने तरुणांना संवेदनशील तरी बनवतात, नाही तर आक्रमक तरी. यातून येणाऱ्या मानसिक अस्थैर्याचा परिणाम मुलांची आकलन क्षमता, स्मरणशक्ती, एकाग्रता, निर्णयक्षमता म्हणजे एकूणच मानसिक आरोग्यावर होतो.

पालक, नातेवाईक, शेजारीपाजारी हे एकाच पिढीतले असल्याने त्यांची एक ‘टीम’ बनते. मग समवयस्कांना एकत्र करून तरुण मुलेमुली आपली वेगळी ‘टीम’ बनवतात. या खेळात ना कोणी हरत, ना कोणी जिंकत. अकारण संघर्ष सुरू राहतो. त्यापेक्षा तरुण मुलांच्या समस्या समजून घेण्यासाठी पालकांनी सध्याच्या काळाशी जुळवून घेण्याची गरज मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांनी व्यक्त केली. ‘पालकांची जडणघडण अशा काळात झालेली असते जिथे शिस्तीला, नात्यांना महत्त्व असते. मात्र नवी पिढी अशा वातावरणात वाढत असते जिथे तंत्रज्ञानाला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे ही पिढी चंचल आहे. भावनिक गोष्टींमध्ये अडकून पडणे त्यांना पटत नाही. त्यांना समजून घेणे पालकांनाही कठीण जाते. अशा वेळी पालकांनी संयम राखायला हवा. बदलत्या जगाची दिशा आणि त्याचा साचा समजून घ्यायला हवा,’ असं त्या सांगतात. अर्थात, कुठे तरी याची सुरुवात पालकांनी लहानपणापासूनच करायला हवी, असंही त्या सुचवतात. त्यांच्या मते, मुलं लहान असताना पालक त्यांना तंत्रज्ञानामध्ये प्रचंड अडकवून ठेवतात. नात्यांपासून दुरावायला इथूनच सुरुवात होते. मात्र ही गोष्ट जेव्हा पालकांच्या लक्षात येते तेव्हा उशीर झालेला असतो. त्यामुळे लहानपणापासूनच पालकांनी मुलांना नात्यांची ओढ लावायला हवी, असं त्या सांगतात.

पालकांनी आपल्या काळाच्या कथा ऐकवत नुसताच उपदेश करण्यापेक्षा तरुण पिढीच्या संघर्षांचे स्वरूप समजून घ्यायला हवे. सुखदु:खाच्या बदललेल्या व्याख्या समजून घ्याव्यात. ‘तुमच्या कष्टांची जाणीव आम्हाला आहे,’ हा विश्वास पालकांनी मुलांना द्यावा. मुलांशी कोणत्याही चांगल्या-वाईट मुद्दय़ावर चर्चा करताना निराशाजनक सूर ठेवू नये. विचार वेगळे असले तरी स्वभावाच्या बाबतीत आपला पाल्य आपलेच प्रतिबिंब आहे हे पालकांनी विसरू नये. त्याच्या ठामपणाला उद्धटपणा समजू नये. त्याच्याकडून येणाऱ्या तार्किक प्रश्नांना तार्किक उत्तरेच देण्याचा केला तर संवादाचा योग्य तो धागा या दोन पिढय़ांमध्ये जोडला जाईल आणि त्यातूनच भविष्याचे चित्र बदलायला मदत होईल.