राधिका कुंटे
आपल्या रोजच्या जीवनात सध्या जीवाभावाच्या ठरलेल्या मोबाइलच्या चुकीच्या वापरामुळे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात यासाठीच्या छोटय़ा प्रयोगांपासून ते फोल्डोस्कोपची माहिती अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यापर्यंत अनेक गोष्टी तिने केल्या. ते करताना त्यातून नवं काही शिकणं आणि त्यावर विचार करणं, यातून प्रयोगशील वृत्ती अंगी बाणवणाऱ्या प्रीती दुबेच्या संशोधनाविषयी जाणून घेऊ या.

प्रीतीचं चारचौघांसारखं मध्यमवर्गीय घर. शिक्षणाचं महत्त्व जाणणारं. तिच्या शिक्षणाच्या बाबतीत आईने कायमच पुढाकार घेतला. अगदी तिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यापासून ते आत्ताच्या टप्प्यापर्यंत तिची आई आणि घरच्यांचा प्रीतीला ठाम आणि सक्रिय पाठिंबा लाभला. प्रीतीने डॉक्टर व्हावं, अशी तिच्या आईची इच्छा होती. पण आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य झालं नाही. पुढे प्रीतीने बीएस्सीला प्रवेश घेतल्यावर तिला जाणवलं की डॉक्टर, इंजिनीअरिंग या नेहमीच्या पर्यायांव्यतिरिक्त इतरही अनेक चांगले पर्याय आपल्यापुढे आहेत.

डी. जी. रुपारेल महाविद्यालयात एसवायबीएस्सीला असताना प्रा. डॉ. गायत्री नारायणन यांच्यामुळे ‘आविष्कार’ या आंतरमहाविद्यालयीन वैज्ञानिक उपक्रमाची माहिती मिळून त्यात सहभागी व्हायची संधी प्रीतीला मिळाली. प्रा. नारायणन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इफे क्ट्स ऑफ मोबाइल फोन रेडिएशन ऑन झेब्रा फिश एमब्य्रो’ हा प्रकल्प केला. या संशोधनाचा एक हेतू असा होता की, मानवी शरीरावरही मोबाइल फोनमधून उत्सर्जित होणाऱ्या लहरींचे काय परिणाम होतात, विशेषत: गर्भवती महिलांनी मोबाइल फोन वापरल्यास त्यांच्या गर्भावर काय परिणाम होतात, याची पुसटशी कल्पना या प्रयोगामुळे येऊ शकली असती. मग उन्हाळी सुट्टीचे जवळपास तीन महिने प्रीती आणि तिच्या टीमने यावर काम केलं. आतापर्यंत केलेल्या थिअरीचा अभ्यास प्रत्यक्षात न्याहाळायला मिळत होता. झेब्राफिशचं जीवनचक्र अभ्यासायला, हाताळायला मिळालं. त्यावर लहरींचा काय परिणाम होतो आहे हे पाहता आलं. हे सगळं करताना त्यांना खूप उत्सुकता आणि कुतूहल वाटत होतं. अर्थातच या लहरींचा झेब्राफिशच्या गर्भावर काहीसा नकारार्थी परिणाम होतो असं दिसलं. चार्जिग सुरू असताना फोन वापरायचा नाही आणि बॅटरी लो असेल तरीही फोन वापरणं टाळावं हे कळलं. अर्थात मानवी शरीरावरच्या परिणामांचा फक्त अंदाज त्यावरून बांधता येऊ शकतो. थेट निष्कर्ष काढण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठावा लागेल, हेही तितकंच खरं. हा प्रकल्प प्रा. गायत्री नारायणन यांनी ‘डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी’कडे पाठवला.

प्रीती सांगते, ‘एसवायच्या सुट्टीतल्या मूळ प्रकल्पात आम्ही आठ जणी होतो. तिसऱ्या वर्षांला विषय बदलले, रुची बदलली असं करता करता वीणा देसाई आणि मी अशा दोघीच राहिलो. आम्ही पुढचा अभ्यास सुरू  ठेवला. मुंबई विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय नॅशनल कॉन्फरन्समध्ये ‘अ‍ॅडव्हान्सेस इन बायॉलॉजिकल सायन्स’ ही थीम होती. तेव्हा आमचं संशोधन वीणाने सादर केलं. त्यासाठी प्रा. नितीन वासनीक यांनी टेक्नॉलॉजीसंदर्भात मोलाचं मार्गदर्शन के लं होतं. त्या कामाची नोंद घेतली गेली आणि अनेकांनी कौतुकही केलं.’

पुढे ‘एमएस्सी इन अ‍ॅनिमल फिजिओलॉजी’ करण्यासाठी तिने विल्सन महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे काही प्रकल्प केले. त्यातल्या एका प्रकल्पात मासा साफ करताना त्याचे काही भाग काढून टाकले जातात. त्यापैकी काही भाग हा खरंच पोषक असतो, पण तोच टाकून दिल्यास त्यातल्या पोषकद्रव्यांचा उपयोग होणार नाही. या प्रयोगासाठी बांगडा, हलवा, राजा-राणी, मांदेली हे मासे आणि कोळंबी यांच्या लिव्हर, हार्ट इत्यादी भागांचा वापर केला. पोषकद्रव्यांपैकी अमिनो अ‍ॅसिड माशाच्या कोणत्या भागांमध्ये असतं, त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या प्रकल्पात पानफुटीची पानं किडनी स्टोन बरा होण्यासाठी खातात, असं पूर्वापार सांगितलं जातं. तो दुवा तिने पडताळून पाहिला. त्यासाठी तिनं कॅल्शिअमचा (कॅ ल्शिअम ऑक्झलेट) एक क्रिस्टल लॅबमध्ये तयार केला आणि पानफुटीचा अर्कही तयार केला. हा क्रिस्टल पानफुटीच्या अर्काने विरघळतो का याचं गुणात्मक विश्लेषण करून पाहिलं.

ती म्हणते की, ‘विल्सनमध्ये असताना दुसऱ्या वर्षी बीएआरसीमध्ये तीन महिन्यांची इंटर्नशिप केली होती, तिथे माझ्या संशोधनाचा खरा पाया रचला गेला, असं म्हणता येईल. तिथल्या सॉइल पेस्ट्रिसाइडस् डिपार्टमेंटमध्ये काम करायची संधी मिळाली. लॅबवर्क कसं करावं, कसं वावरावं, संशोधनाचं काम कसं चालतं, अशा अनेक बारीकसारीक गोष्टी कळल्या. तिथे मी ‘ऑप्टिमायझेशन ऑफ कनिडियल जर्मिनेशन अ‍ॅण्ड अ‍ॅप्रेसोरियम कं डिशन्स ऑफ राईस फं गल पॅथोजेन मॅग्नापोर्ट ऑरिझा’ या प्रकल्पात काम केलं. भातपिकाला या रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्या संदर्भात हे संशोधन होतं. तिथे मला बायोटेक्नॉलॉजीसंदर्भातल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. तिथल्या डॉ. सोनिया चढ्ढा यांचं खूप सहकार्य आणि मोलाचा पाठिंबा मला मिळाला.’

एमएस्सीनंतर लगेच अर्थार्जनाची संधी न मिळाल्याने प्रीतीने चार महिने ‘इंडिया बुल्स’मध्ये कस्टमर एक्झिक्युटिव्ह सव्‍‌र्हिसमध्ये काम केलं. त्या काळात ती संशोधनाला फार मिस करत होती. तिथे काम करताना तिला कळलं की एसवायमध्ये असताना केलेल्या प्रकल्पाला डीबीटीचं अनुदान मिळालं आहे. त्या प्रकल्पांतर्गत तिला ज्युनिअर रिसर्च फेलो म्हणून काम मिळाल्याने  तिच्या आवडीच्या क्षेत्रात परतता आलं. या प्रकल्पातील अभ्यासात सेल टॉवरमधून उत्सर्जित होणाऱ्या लहरींचे झेब्राफिशच्या गर्भावर काय परिणाम होतात ते अभ्यासलं. त्यातही खूप काही शिकायला मिळालं. स्टॅण्डफोर्ड युनिव्हर्सिटीमधील एक भारतीय शास्त्रज्ञ मनू प्रकाश यांनी फोल्डोस्कोपची निर्मिती केली आहे. तो विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांनाही वापरायला उपयुक्त आणि स्वस्त आहे. मायक्रोस्कोपऐवजी या प्रकल्पात हा फोल्डस्कोप वापरला. सेल टॉवरजवळ हा फोल्डस्कोप वापरणं सोयीचं गेलं. गच्चीवरच्या सेल टॉवरजवळ जायला कधी कुणाची परवानगी चटकन मिळाली, तर कधी थोडा वेळ लागला. त्या त्या ठिकाणच्या रहिवासी, संस्थांच्या सहकार्यामुळे हे काम करता आलं, असं ती सांगते.

शिवाय फोल्डस्कोपच्या संदर्भात विज्ञानशिक्षणाची जागृती करण्याचं काम तिने प्रा. डॉ. गायत्री नारायणन यांच्या मार्गदर्शनाखाली केलं. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेतली. मुंबईत विरार, सांताक्रूझ, माटुंगा, भिवंडी, कोकणात मालवण, आसाम अशा ठिकाणच्या जवळपास १५०० शालेय विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती दिली. काही ठिकाणच्या मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक यांनाही फोल्डस्कोपची माहिती नव्हती. तरीही काहींनी परवानगी दिली तर काहींनी परवानगी नाकारली. या दरम्यान विज्ञानासारखा महत्त्वाचा विषय किती दुर्लक्षित राहतो आहे ते तिला कळलं. प्रीती सांगते, ‘विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना अनेक गोष्टी मलाही नव्याने करायला, बघायला मिळाल्या. मीही परागकण पहिल्यांदा नीटपणे  पाहिले. मुलं स्वत: स्लाइड्स करत आहेत, प्रश्न विचारत आहेत, असं चित्र या कार्यशाळेच्या निमित्तानं दिसत होतं. काही शाळेतल्या चौथीच्या विद्यार्थ्यांना स्लाइड तयार करायची माहिती होती. एखाद्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सायन्स क्लब असून ते अनेक प्रकल्प करताना दिसले. कोकणातल्या काही विद्यार्थ्यांना खरोखरच विज्ञानात रस होता आणि त्यात मुलीही मागे नव्हत्या. त्यामुळे मला फार बरं वाटलं. आसाममधल्या कार्यशाळेत संवादाची भाषा हिंदी आणि इंग्रजी होती. मूलभूत जगणं आणि अर्थार्जनाच्या प्रश्नात गुंतल्याने तिथल्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची तितकी ओढ दिसली नाही.’

या प्रकल्पाचं काम सुरू असतानाच तिने पेट अर्थात पीएचडीची प्रवेश परीक्षा दिली. नंतर माहीमच्या ‘पी. डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अ‍ॅण्ड मेडिकल रिसर्च सेंटर’मध्ये संशोधनाची संधी असल्याचं कळलं. त्यासाठी अर्ज केला. मुलाखत होऊन तिची रिसर्च स्टुडण्ट म्हणून निवड झाली. इथे ती बायोकेमिस्ट्रीमधल्या डिसीज आणि जेनेटिक्स या विषयाशी संबंधित काम करते आहे. सध्या तिची रेफरन्सिंग फेझ सुरू आहे. कोव्हिडकाळातील लॉकडाऊनचा काळ वजा करता तिला इथे रुजू होऊन आठ महिने झाले आहेत. करोनामुळे वाहतुकीची सोय नसल्यामुळे ती वर्क फ्रॉम होम करत होती. करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर तिला तिच्या घरच्यांचा भक्कम पाठिंबा मिळतो आहे. अभ्यासाव्यतिरिक्त प्रीतीला वाचन आणि गाणी ऐकण्याचा छंद आहे. रिलॅक्स होण्यासाठी ती गाणी ऐकते, गुणगुणते. पीएचडी झाल्यावर ती आयुष्यात स्थिरावणार आहे आणि नंतर पोस्टडॉकचा विचार आहे. प्रीतीला तिच्या पुढल्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.