News Flash

‘ई अभिव्यक्ती’चा सेतू..

काळानुसार अभिव्यक्तीची माध्यमं बदलताहेत. या बदलणाऱ्या माध्यमांचा वाचक-प्रेक्षकही ग्लोबल होतोय. या पाश्र्वभूमीवर सोनाली जोशी यांनी संस्कृती, कला, जाणिवांना जोडणारा सेतू बांधला जावा, या हेतूनं ‘साहित्यसंस्कृती

| May 31, 2013 12:38 pm

काळानुसार अभिव्यक्तीची माध्यमं बदलताहेत. या बदलणाऱ्या माध्यमांचा वाचक-प्रेक्षकही ग्लोबल होतोय. या पाश्र्वभूमीवर सोनाली जोशी यांनी संस्कृती, कला, जाणिवांना जोडणारा सेतू बांधला जावा, या हेतूनं ‘साहित्यसंस्कृती प्रकाशना’ची स्थापना केली. ऑडिओ, ई-बुक्सची संकल्पना मांडणाऱ्या मराठीतल्या या पहिल्या प्रकाशन संस्थेविषयी (www.sahityasnskruti.com) तिच्या संचालिका सोनाली जोशी यांच्याशी साधलेला हा संवाद.

ही साइट सुरू करावीशी का वाटली?
माझ्या लिखाणानं जो वेग घेतला तोच मुळी ‘मनोगत डॉटकॉम’या फोरमवर मी लिहायला लागल्यावर. तेव्हा मला जाणवलं की, अशा फोरमवर वेगवेगळ्या भागातली मराठी मंडळी लिहू शकतात. आमच्या लेखांवर प्रतिसाद देतात. त्यामुळं नवीन गोष्टी शिकायला मिळतात. पण यात मिळणाऱ्या इन्स्टंट प्रतिक्रियेमुळं काही वेळा एक प्रकारची नशा चढायला लागते. त्याचा आपल्या लेखनावरती परिणाम व्हायला लागतो. अशा वेळी आपल्या आजूबाजूला कोण आहेत नि ते काय सल्ला देताहेत, यावर खूप काही अवलंबून असतं. ही तात्कालिकता बाजूला सारता आली तर.. थोडा अधिक विचार केल्यावर जाणवलं की, ब्लॉगर्स एका बाजूला नि मुद्रित माध्यमात लिहिणारे दुसऱ्या बाजूला. या दोघांना जोडणारं असं माध्यम नाहीये. जोडणारं माध्यम म्हणजे मला मुद्रित माध्यमांतल्या लोकांच्या केवळ मुलाखती नको होत्या. ते पुस्तकांकरिता लिहितात, तशा प्रकारचं लेखन त्यांनी करावंसं वाटत होतं. ब्लॉगर्स मुद्रित माध्यमात जाऊन लिखाण करतात, पण उलटा फ्लो नव्हता. कारण ऑनलाइन माध्यमात उथळपणा असतो, हा गैरसमज. यात अभ्यासपूर्वक लिहीत नाहीत, हे सार्वत्रिक मत. त्यात थोडं तथ्य असलं तरीही सर्वच लेखन असं नसतं. त्याला अपवाद असतात नि तो सिद्ध करू शकणारं एक माध्यम मला हवं होतं. त्यासाठी ‘साहित्यसंस्कृती’ची निर्मिती झाली.

साइटबद्दल काय सांगाल?
इकडं स्वभाषिक मंडळी आजूबाजूला असतात. पण आपण महाराष्ट्राबाहेर किंवा भारताबाहेर गेलो की, स्वभाषा ऐकणं-बोलणं ही एक गरज असते. अशा वेळी ऑडिओ माध्यम फार जवळचं वाटतं. म्हणून कथांची मौखिक परंपरा जतन व्हावी नि ती नव्या तंत्रप्रणालीला अ‍ॅक्सेस असावी, म्हणून ‘साहित्यसंस्कृती’वर काही निवडक कथांचा ऑडिओ करायला सुरु वात केली. ऑडिओ आणि ईबुक्सची संकल्पना मांडणारी ही मराठीतली पहिली प्रकाशन संस्था आहे. मी तिकडून काम करत असल्यानं प्रिंटिंग, वितरण व्यवस्था वगैरें गोष्टी हाताळणं सध्या शक्य नसल्यानं एवढय़ात मी प्रिंटला जाणार नाहीये. पण पुढंमागं मी ते नक्कीच करेन. कारण एका प्रकाशकाकडं आवश्यक असणाऱ्या सगळ्या फॉर्मलिटीज मी पूर्ण केल्यात.  

साइटचे हायलाइट कोणते?
आयटी क्षेत्रातील मंडळी नि तरु ण वर्ग आमचा टार्गेट ग्रुप आहे. आम्ही तरु णांच्या आवडी-निवडी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. जुन्या गोष्टी चांगल्याच आहेत, पण त्यांच्याशी रिलेट करणं आताच्या पिढीला कठीण जातंय. या साइटवरचं लेखन आणखी काही वर्षांनीही ताजं वाटावं, असं मला वाटत होतं. त्यामुळं प्रामुख्यानं आयटी फिल्डमधली मंडळी आमचे लेखक आहेत. त्यांचे देशोविदेशातले नि संस्कृतीतले अनुभव ते मांडतात. ते मराठीपणाला जोडणारे आहेत. काही विषयांची मांडणी सर्वसमावेशक करण्यात आल्येय. दिवाळी अंकांत गाजलेल्या निवडक कथांचं रेकॉर्डिग करून घेतलंय. ‘साहित्यसंस्कृती’वर ऑडिओची फ्री सॅम्पल्स सगळ्यांना ऐकता येतात. पण ऑडिओ डाऊनलोड करायचा असल्यास सभासदत्व स्वीकारावं लागतं. बरंचसं लेखन आणि ऑडिओ फ्री असून काही सशुल्कही आहे.          

ऑडिओला मिळणारा प्रतिसाद कसा आहे?   
भारताबाहेरून ऑडिओला मिळणारा प्रतिसाद जास्त आहे. तिथल्या तांत्रिक सोयींचा उपयोग करून घेऊन ऑडिओ ट्रान्सफर करून घेण्यात येणाऱ्या समस्या कमी आहेत. मुळात परराज्यात-परदेशात असणाऱ्यांची भाषा ऐकण्याची गरज जास्त आहे. इथल्या मंडळींना अन्य चांगले पर्याय उपलब्ध असल्यानं इथं ऑडिओ ऐकणाऱ्यांची संख्या कमी आहे.

सर्वाधिक हिटस् कोणत्या साहित्याला मिळाल्यात?
माझ्या ‘व्हिलचेअर’ कथेचं सुमुखी पेंडसे यांनी निवेदन केलं असून तिला सर्वाधिक प्रतिसाद मिळालाय. अमेरिकेत राहणाऱ्या एका जोडप्याच्या कथेत टिपिकल पांढरपेशं आयुष्य टाळून वेगळं आयुष्य सांगायचा प्रयत्न केलाय. त्याच्याशी तरु ण पिढीही रिलेट करू शकतेय. शिवाय सतीश तांबे, सुनील गोडसे, वंदना भागवत, उत्पल यांच्या कथांचे- सदरलेखनाचे ऑडिओही अधिक वाचले जातात.

या कामाच्या स्वरूपाविषयी-
अत्याधुनिक तांत्रिक सोयींमुळं गोष्टी सोप्या झाल्यात. युनिकोड फॉण्ट वापरतोय. अपवादात्मक परिस्थितीत टायपिंग करून घेतलं जातं. या उपक्रमाची आवश्यकता पटलेली मंडळी मला सतत सहकार्य करताहेत. अमेरिकेतील अनेक मंडळी आमच्यासाठी लेखन करताहेत. ऑडिओही करून देताहेत. त्यात मधुरा गोखले यांचं नाव प्रामुख्यानं घ्यायला हवं. या सगळ्या टीमबाबत मी खूपच सुदैवी आहे.

तरुणांच्या प्रतिसादाबद्दल काय?
तरु णापर्यंत मी अजून पोहचू शकलेले नाहीये. ठरावीक ऑडियन्ससमोर प्रत्यक्ष जाणं आवश्यक आहे. इथं आता तशा पद्धतीनं कार्यक्रम आयोजित करत्येय. एफएम रेडिओच्या माध्यमातून आमच्या उपक्रमांची झलक देता आल्यास या उपक्रमाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू शेकल. त्यानुसार प्रतिसाद मिळू शकेल. कारण मी आतापर्यंत लेखन आणि ऑडिओ तयार करण्याकडंच लक्ष दिलं होतं, लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केलेला नाही.

तिथल्या यंग जनरेशनविषयी..
प्रामुख्यानं तिथल्या मुलांनी आम्हाला इंग्रजीमध्ये लिहायचंय, असं सांगितलं. त्यांची मातृभाषा ही इंग्रजी आहे. त्यामुळं ही मुलं त्यांचे विचार इंग्रजीतून जास्त चांगल्या पद्धतीनं मांडू शकतात, असं मला वाटतं. दोन्हीकडची समवयस्क मुलं एकमेकांच्या संपर्कात राहू शकतील. त्यांच्या लिखाणाच्या अनुवादापेक्षा त्यांचा अनुभव मला अधिक महत्त्वाचा वाटतो. त्यांचं अनुभवविश्व सगळीकडं पोहोचणं, जास्त महत्त्वाचं वाटतं. सध्या २-३जण इंग्रजीतून लिहीत असून हळूहळू ती टीम आता मोठी होईल.
आतापर्यंत अमेरिकेतील लोकांचे अनुभव इथं अनुवादित होऊन येत होते. त्याऐवजी ते इंग्रजीत असले तरी ते मी तसेच ठेवत्येय, कारण ते इथल्या वातावरणाशी रिलेट करू शकतात. माझ्या एका मैत्रिणीच्या लिखाणाची मांडणी व आशयाशी इथल्या मुली रिलेट करू शकतील. असे वेगळे प्रयत्न होणं मला महत्त्वाचं वाटतं. त्यामुळं भिन्न संस्कृतीच्या ज्या जाणिवा असतात, त्या अगदी सारख्याच असतात. म्हणजे अभिव्यक्ती असते ती एका प्रकारची असते. कारण एका कालखंडात आपण इतके ग्लोबलाइझ झालोय, की सारख्या चष्म्यानं आपण त्याच्याकडं बघतोय का, असं वाटायला लागलंय.

मराठीच्या गोडीविषयी..
मराठीची गोडी लहानपणापासून लागायला हवी. घरी मराठी बोलणं, वाचणं नि ऐकण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा. मुलाला एकापेक्षा जास्त भाषा शिकवण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक फायदा आणि भाषा शिकणं यांची सांगड घालू नये. मटेरिअलिस्टिक दृष्टिकोनापलीकडं जाऊन आवड किंवा अभिव्यक्तीचा भाग म्हणून भाषा शिकावी.

कॉपीराईट व तांत्रिक सुरक्षेबाबत..
प्रकाशन संस्थेचे व्यवहार पूर्णपणं कायदेशीर असावेत. लेखक आणि व्हॉइसओव्हर आर्टिस्टशी लेखी करार करावेत. या व्यवहारात ट्रान्सपरन्सी असणं आवश्यक आहे. कॉपीराइट त्या लेखकाचा असतो. ऑनलाइन माध्यमाचं प्रकाशन आणि वितरणाचे हक्क प्रकाशकाकडं असतात. पण कुणी सिस्टम हॅक केल्यास किंवा काही भाग डाऊनलोड करून घेतल्यास त्याला एका मर्यादेपर्यंत रोखता येतं. आपल्याला आवडणाऱ्या ऑनलाइन गोष्टी शेअर करताना संबंधितांची परवानगी घ्यावी लागते, हे लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवलं गेलं पाहिजे. मोठं आर्थिक पाठबळ असणाऱ्या कंपन्यांना आपला मजकूर तांत्रिकदृष्टय़ा सुरक्षित करता येतो. पण लहान स्तरावरच्या मंडळींना आर्थिक अडचणींमुळं ते करणं शक्य नसतं. ही सुरक्षा व्यवस्था सर्वव्यापी झाल्यावर सगळ्यांना त्याचा लाभ घेता येईल.

पुढील प्रोजेक्टस् कोणती?
ऑनलाइन असण्यासोबतच ह्य़ुमन इंटरॅक्शनचा भाग महत्त्वाचा अहे. त्यासाठी ठिकठिकाणी कथांचं अभिवाचन होणं गरजेचं आहे. त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू केलेत. सध्या हे वाचन मी मराठी व इंग्रजी ठेवत्येय, त्याच्या प्रतिसादावर आणखी एखाद्या भाषेचा समावेश करता येईल. असे उपक्रम इतर प्रकाशकांकडूनही राबवले जावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 12:38 pm

Web Title: sahityasnskruti com directress sonali joshis interview
टॅग : Internet
Next Stories
1 शुभ-रात्र
2 लर्न अ‍ॅण्ड अर्न : राजश्रीचा खो..
3 बुक शेल्फ : उत्तम अभ्यासासाठी
Just Now!
X