13 July 2020

News Flash

विनोदाचा नवा अध्याय

स्टॅण्ड अप कॉमेडी सादरीकरणाचे विषय ठरावीकच असतात असं नाही.

सध्या विनोदाला पुन्हा एकदा चांगले दिवस आले आहेत. यूटय़ूबसारख्या माध्यमामुळे स्टॅण्ड अप कॉमेडी क्षेत्रातील कलाकारांना मोठय़ा प्रमाणावर प्रसिद्धी मिळतेय आणि ओपन माईकसारख्या लाईव्ह कार्यक्रमातून नव्या कलावंतांना मंच मिळतोय..
स्टेजवरच्या काळोखात केवळ तिच्यावर असणारा स्पॉटलाइट, सगळ्यांचं तिच्याकडे असणारं लक्ष आणि तिला ऐकण्यासाठी टवकारलेले कान, त्यात तिचं समोरचा माईक लकबीनं हाताळणं आणि मग विनोदाची फटकेबाजी. केवळ हश्या आणि टाळ्या..असा तिचा तिथला वावर सगळ्यांना हसवणारा मुळात त्या स्टेजवर उभं असण्याचं कारणच असतं हसवणं. आजपर्यंत मुलाचं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्रात मुलीदेखील आपल्या विनोदी शैली दाखवताना दिसत आहेत.
स्टॅण्ड अप कॉमेडी हा मनोरंजनाचा जुना प्रकार. पण जगभर पोचलेला. त्याचे स्वरूप भिन्न असलं तरी जगभर रुजलेला. आपल्याकडेही एकपात्री प्रयोगांमधून,ऑर्केस्ट्रांमधून अनेक विनोदवीर घडले. सध्या स्टॅण्ड अप कॉमेडी म्हटलं की, एक ठरावीक स्टेजच डोळ्यापुढे येतं असं नाही. नाटय़गृहाच्या रंगमंचावरून हे प्रयोग प्रेक्षकांच्या अधिक जवळ जाणाऱ्या कॅफेच्या मंचावरदेखील रंगतात. कलाकाराला प्रेक्षकांसमोर थेट आपल्या शैलीत किस्से सांगण्याचं व्यासपीठ मिळतं. सादरकर्त्यांला प्रेक्षकांच्या हास्याचे फवारे आणि विनोदाला मिळणारी दाद तत्क्षणी अनुभवता येते. प्रेक्षकही त्या विनोदाच्या पेरणीला दाद देत त्यात सामील होतो. स्टॅण्ड अप कॉमेडी सादरीकरणाचे विषय ठरावीकच असतात असं नाही. पण रोजच्या आयुष्यातले प्रसंग मांडत प्रेक्षकांना आपलंसं केलं जातं.
अशा प्रकारचा विनोदी कार्यक्रम करणाऱ्या पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे. पण हल्ली परिस्थिती बरीच सुधारल्याचं दिसतं. स्टॅण्ड अप कॉमेडी करणाऱ्या तरुण मुलीदेखील वाढल्या आहेत. पूर्वी स्त्रिया केवळ विनोद करण्याचा एक विषय होता, कारण हे क्षेत्र तसं पुरुषांचं समजलं जायचं. पण आता स्त्रियादेखील यात आपला ठसा उमटवत आहेत. नीती पलटा, अदिती मित्तल, अपर्णा नानचेरला यांनी आपल्या विनोदी शैलीने रसिकांची मने जिंकली आहेत. देशातल्या आघाडीच्या स्टॅण्ड अप कॉमेडियन्समध्ये यांचं नाव घेतलं जातं.
नीती इंग्रजीतून स्टॅण्ड अप कॉमेडीचे कार्यक्रम करते आणि यातून भारतीय स्त्रियांचा दृष्टिकोन मांडण्याचा तिचा प्रयत्न असतो. भारतीय स्त्रीच्या आयुष्यातील विविध विषय ती या माध्यमातून हाताळताना दिसते. तिला ‘बेस्ट स्टॅण्ड अप कॉमिक’ म्हणून अनेक फेस्टमध्ये गौरवण्यात आलं होतं. २०१३ मध्ये प्रतिष्ठित अशा मेलबर्न इंटरनॅशनल कॉमेडी फेस्टिवलमध्ये परफॉर्म करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. त्यामुळे देशाबाहेरदेखील तिला कलागुण दाखवण्याची संधी व कौतुकाची थाप मिळाली आहे. तसेच ती कॉर्पोरेट शोदेखील करते. जाहिरात आणि टीव्ही, चित्रपट यासाठीदेखील तिनं लेखन केलेलं आहे. तिच्या पावलांवर पाऊल टाकून अनेक जणी या क्षेत्रात येत आहेत. त्यापैकीच एक गुजरातची कलाकार अवनी व्यास म्हणाली, ‘विनोदाचं अंग असणं ही काही कोणा एका वर्गाची मक्तेदारी नाही. स्त्रियासुद्धा इतरांना हसवू शकतात आणि तेही विनोदाचा एक दर्जा राखून, हे सिद्ध करणं हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं. मुलगी गायिका असलेली, नर्तकी असलेली चालते पण मुलगी ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ करते हे आपल्याकडे पटकन स्वीकारलं जात नाही. मी शिक्षणाने आयुर्वेदिक डॉक्टर आहे. केवळ आवड म्हणून कॉमेडी शोज करते. गुजराती दूरदर्शनवरदेखील मी कार्यक्रम करते. मला माझ्या मातृभाषेतच काम करायचं आहे. भारतीय संस्कृती एका ठरावीक दर्जाच्या खालचे विनोद स्वीकारत नाही आणि मला आपल्या संस्कृतीप्रमाणेच माझ्या कार्यक्रमाचा, कलेचा दर्जा राखायचा आहे.’
यू टय़ूबचा बोलबाला वाढला तसा अनेक स्टॅण्ड अप कॉमेडियन्सनी या नवीन माध्यमाकडे मोर्चा वळवला. पण तरीही लाइव्ह शोची गंमत कमी झालेली नाही. स्टॅण्ड अप कॉमेडीचे लाइव्ह शो उलट वाढत आहेत. यू टय़ूबवरदेखील काही जणींनी स्वत:चे असे चॅनलच्या माध्यमातून अशा प्रकारचे व्हिडीयो बनवून शेअर करताना दिसतात. तसेच ‘वुमन ओपन माईक’च्या रूपाने अनेक मुलींना या क्षेत्रात येण्याची संधी मिळतेय, त्यामुळे आता अधिकाधिक मुली या क्षेत्रात यायला उत्सुक आहेत. मुंबईची कॉमेडिअन पवित्रा शेट्टी म्हणाली, ‘मी स्टॅण्ड अप कॉमेडीच्या माध्यमातून माझे स्वत:चे अनुभव शेअर करते. बालपण, कुटुंब असे विषय मांडते. जे कधीही ताजेच वाटतात आणि प्रेक्षक त्याच्याशी स्वतला रिलेट करू शकतात. अजून यू टय़ूब चॅनेल्सचा लाइव्ह कॉमेडी शोच्या कार्यक्रमांवर फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही. कारण लाइव्ह शोचा अनुभव, तिथला माहोल हा वेगळा असतो. काही कण्टेंट असा असतो की जो ऑन कॅमेरा आपण पब्लिश करू शकत नाही. त्यासाठी असा लाइव्ह अनुभवच हवा.’
पुण्या अरोरा ही बंगलोरची फोटोग्राफर. विनोदी कथन ही तिची आवड. स्टॅण्ड अप कॉमेडीच्या प्रयोगांसाठी ती देशभर फिरत असते. ‘ओपन माईक इव्हेंटचा फायदा होतो. मलाही अशाच कार्यक्रमांमधून संधी मिळाली. कुठलाही विषय विनोदी किंवा गंभीर असा नसतो. तुमची मांडण्याची शैली ते ठरवत असते. मी अनेक संवेदनशील सामाजिक विषयही विनोदाच्या माध्यमातून हाताळते. सिंगल पेरेंटिंग, स्त्री-पुरुष भेदभाव, समानता या विषयांवर माझं कथन असतं. विनोदनिर्मिती होईल अशा शैलीतच मी तो विषय मांडते, पण लोकांच्या मनालाही तो विषय भिडला पाहिजे, हे भान ठेवण्याचा प्रयत्न करते. या माध्यमातून समानतेविषयी जागरूकता आणण्याचा प्रयत्न करते.’
क्लब,कॅफे, मॉलची संस्कृती मोठय़ा शहरांमधून वाढायला लागली आहे. त्यातून नव्या पिढीसमोर मनोरंजनाची नवनवीन माध्यमं खुली होत आहेत. या संस्कृतीमुळे आणि अशा ठिकाणांमुळे नव्या, हौशी कलाकारांना ‘ओपन माईक’अंतर्गत व्यासपीठ देणंही सोपं झालंय. अनेक नव्या पद्धतीची रेस्टॉरंट्स, कॅफे आणि मॉलमधून छोटे मंच उभारून अशा ‘ओपन माईक’चे कार्यक्रम घेतले जातात.

कॉमेडी फेस्टिव्हल
स्टॅण्ड अप कॉमेडीचे फेस्टिव्हलदेखील होतात. बिग पाइन कॉमेडी फेस्टिवल, युरोपातील सर्वात मोठा असा ग्लासगो इंटरनॅशनल कॉमेडी फेस्टिवल, मेलबर्न इंटरनॅशनल कॉमेडी फेस्टिवल तसेच कॅनडा येथील फनीफेस्ट कॅल्गारी कॉमेडी फेस्टिवल असे अनेक कॉमेडी फेस्टिवल प्रसिद्ध आहेत. मुंबई, पुण्यात सध्या अनेक ठिकाणी ‘स्टॅण्ड अप कॉमेडी शो’ होताना दिसताहेत. त्यातून अनेक नवीन तरुण कलाकार घडत आहेत. कॅनव्हास लाफ क्लब (लोअर परळ), अंधेरी बेस (अंधेरी), द हाइव्ह (खार), द कॉमेडी स्टोर (लोअर परळ), द हाय स्पिरिट कॅफे (कोरेगाव पार्क, पुणे)

(संकलन साहाय्य : वेदवती चिपळूणकर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2016 1:38 am

Web Title: stand up comedy shows on youtube
टॅग Social Media
Next Stories
1 विदेशिनी: मानवी इतिहासातल्या ‘बालक’खुणा..
2 व्हायरलची साथ: शुभस्य शीघ्रम..
3 डाएट डायरी: ‘बी’ पॉसिटिव्ह
Just Now!
X