सौरभ करंदीकर viva@expressindia.com

एका कंपनीसाठी आयुष्यभर काम करायचं नाही, तर एकाच ठिकाणी राहण्यात तरी काय अर्थ आहे? असा प्रश्न काही मंडळी विचारू लागली आहेत. आज अनेकांच्या मिळकतीतील मोठा भाग हा गृहकर्ज फेडण्यासाठी किंवा शहराच्या विशिष्ट भागात राहता यावं म्हणून घरभाडय़ावर खर्च होतो आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ ही परिस्थिती कायमस्वरूपी झाली तर तुम्ही कुठे राहता, याला काहीही अर्थ उरणार नाही.

प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि ‘कॉसमॉस’ नावाच्या आपल्या टीव्ही मालिकेतून विज्ञान आणि तंत्रज्ञान घराघरात पोहोचवणाऱ्या कार्ल सेगन यांना एका मुलाखतीदरम्यान एक प्रश्न विचारला गेला. मुलाखतकार म्हणाली, ‘आपल्याशी बोलताना विज्ञान हा विषय मनोरंजक आणि रोमहर्षक वाटतो, पण मी शाळेत असताना तसा तो कधीच वाटला नाही, हे कसं काय?’ त्यावर डॉक्टर सेगन म्हणाले, ‘मी अनेकदा शालेय समारंभांना हजेरी लावतो. बालवर्गातील मुलांचं कुतूहल ओसंडून वाहत असतं, त्यांना हजारो प्रश्न पडतात. त्यांना विज्ञानाविषयी सर्व काही जाणून घ्यायचं असतं. मात्र दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांशी बोलताना जाणवतं की अनेकांचं कुतूहल आता नष्ट झालेलं आहे. हे असं का होतं, कुणाला दोष द्यावा, कल्पना नाही, पण हे आपल्या मानवजातीसाठी फार धोक्याचं आहे. आपला समाज विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारलेला आहे. आपलं जग ज्या गोष्टीवर चालतं त्याविषयी स्वारस्य नसेल तर परिस्थिती बिकट आहे’.

ही मुलाखत होती १९९० सालातली, परंतु आजदेखील आपल्यापैकी अनेकांना विज्ञान आणि तंत्रज्ञान हे डोंगर दुरूनच साजरे वाटतात. आपल्या कामापुरत्या गोष्टी समजल्या तरी पुरेसं आहे, असा आपल्यापैकी अनेकांचा शिरस्ता असतो. आणि आपलं (सध्या तरी) कुठे काही अडत नाही. परंतु डॉक्टर सेगन म्हणत त्याप्रमाणे आपला समाज विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारलेला आहे. आणि भविष्यात ही मदार अधिकाधिक वाढत जाणार आहे. मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे आज अनेकांच्या कामाचं स्वरूप बदललेलं आहे. ऑफिसच्या दावणीला बांधून न राहता आज अनेकजण आहे तिथून, आहे तसं, आपलं काम करत आहेत. करोनाकाळात अनेकांचे उद्योगधंदे बदललेले आहेत. या साऱ्या शक्यता केवळ तंत्रज्ञानामुळे शक्य झाल्या आहेत. इंटरनेटशी जोडलेली प्रत्येक व्यक्ती आज जागतिक स्तरावर (आणि उद्या वैश्विक स्तरावर) चढाओढ करू शकते, आपल्या अंगभूत गुणांना जागतिक बाजारपेठ मिळवून देऊ शकते. पूर्वापारच्या शेतीप्रधान समाजाने जसा कृषीविषयक ज्ञानाला अग्रक्रम दिला, औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादनप्रधान देशांनी जसं अभियांत्रिकी शिक्षणाला महत्त्व दिलं, तसंच माहिती आणि तंत्रज्ञान आधारित समाजाने तंत्रशिक्षणाला महत्त्व देणं क्रमप्राप्त आहे. तंत्र‘शिक्षण’ या शब्दाचा संबंध केवळ शालेय आणि उच्चशिक्षणाशी न लावता समाजातील प्रत्येक घटकाने त्याबद्दल जागरूकता दाखवली पाहिजे.

करोनाकाळात आपल्याला भविष्यातील कामाच्या पद्धती कशा असतील याचा ट्रेलर मिळालेलाच आहे. आता पूर्ण चित्रपट कसा असेल त्याबाबत काही तज्ज्ञांचे अंदाज काय आहेत, ते जाणून घेऊ. हे सारे अंदाज अर्थातच काल्पनिक नाहीत. या गोष्टी काही प्रमाणात घडत आहेत. अशा काही ‘ट्रेण्ड्स’चा अंदाज घेऊनच पुढील भाकितं करण्यात आली आहेत.

‘गिग इकॉनॉमी’: आपल्या मागील पिढीतल्या नोकरदारवर्गाने क्वचितच आपली मालक कंपनी बदलली. ज्या कंपनीमध्ये उमेदवारी केली त्या कंपनीतूनच रिटायर होऊ, अशी सर्वसामान्य अपेक्षा आणि आकांक्षा असे. सरकारी नोकरी असेल किंवा बिनसरकारी, ती अनंत काळपर्यंत कशी टिकवता येईल, हीच विवंचना असे. परंतु समजा अशी नोकरी धरलीच नाही तर? काम तेच, पण नोकरीचे पाश नाहीत, याला ‘गिग इकॉनॉमी’ म्हणतात. सतत कंत्राटी कर्मचारी म्हणून जगणारी एक पिढी हळूहळू तयार होते आहे. त्यांना नोकरीची बंधनं नको आहेत. त्यांना कामाचे ठरलेले तास नको आहेत. जितकी मेहनत तितका पैसा, हे त्यांना मान्य आहे. या व्यवस्थेत अनेक फायदे आहेत. काम करणाऱ्यांना स्वातंत्र्य आहे. प्रोजेक्ट असलं तर तेवढंच काम करून घेता येणं हे कंपन्यांनादेखील फायद्याचं वाटत आहे. याचे तोटे म्हणाल तर अर्थातच कमाईची अनियमितता, प्रोजेक्ट किती काळ टिकेल याची शाश्वती नाही, कंपनीकडून मिळणारे विम्याचे संरक्षण, प्रॉव्हिडंट फंडसारखी  बचतीची साधनं नसणं, स्वत:च या साऱ्या गोष्टींचं नियोजन करावं लागणं, इत्यादी. परंतु तरुण पिढी या कार्यप्रणालीकडे आकर्षित होताना दिसते आहे. सतत नवीन प्रोजेक्ट्स मिळवणं इ-लॅन्ससारख्या वेबसाइट्समुळे शक्य होतं. याखेरीज सोशल  मीडियाचा वापर चतुराईने करून सतत काम मिळवत राहता येतं, हे या पिढीला उमगलेलं आहे.

‘नोमॅडिक लाइफस्टाइल’: एका कंपनीसाठी आयुष्यभर काम करायचं नाही, तर एकाच ठिकाणी राहण्यात तरी काय अर्थ आहे?, असा प्रश्न काही मंडळी विचारू लागली आहेत. आज अनेकांच्या मिळकतीतील मोठा भाग हा गृहकर्ज फेडण्यासाठी किंवा शहराच्या विशिष्ट भागात राहता यावं म्हणून घरभाडय़ावर होतो आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ ही परिस्थिती कायमस्वरूपी झाली तर तुम्ही कुठे राहता, याला काहीही अर्थ उरणार नाही. त्यामुळे प्रगत देशातील अनेकांनी घर खरेदी किंवा घरभाडं यांना कायमचा रामराम ठोकून ट्रेलर (चार चाकी घर) मध्ये राहायचं ठरवलं आहे. एखाद्या बसप्रमाणे हे घर हव्या त्या ठिकाणी नेता येतं, कुठल्याही शहरातील ट्रेलर – पार्कमध्ये उभं करता येतं. असे ट्रेलर पार्क इंधन, ऊर्जा, इंटरनेट, सांडपाणी, गृहोपयोगी वस्तूंची संलग्न दुकानं, इत्यादी सुविधा देतं, त्यामुळे अशा पार्कचं भाडं देऊन हवा तितका वेळ (अर्थातच नियमांनुसार) आपला ट्रेलर तिथे ठेवता येतो. शिवाय मन मानेल तसा प्रवासदेखील करता येतो. आधुनिक तंत्रज्ञानानं असं घराशिवाय राहणं सोयीस्कर केलेलं आहे.

‘अप-स्किलिंग’: खरं सांगायचं तर आपलं ‘शिक्षण’ आयुष्यभर सुरूच असतं. प्रत्येक नवीन नोकरी, धंदा, छंद आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असतो. काम करता करता एखाद्या विशिष्ट विषयाचं शिक्षण घेणं याच्यात आज काही विशेष राहिलेलं नाही. नोकरीत बढती मिळावी किंवा आपला व्यवसाय बदलता यावा यासाठी अधिक शिक्षण घेणं आता सहज शक्य झालं आहे. लिंडा डॉट कॉम, लिंक्ड—इन लर्निग, आयटय़ून्स- यूसारख्या सुविधा तुमची पात्रता काहीही असो, तुम्हाला हवं ते शिक्षण देऊ करत आहेत. काही वर्षांपूर्वी स्टॅनफर्ड विद्यापीठाने तयार केलेला क ॉम्प्युटर इंजिनीअरिंगचा एक मोफत कोर्स मी करायला घेतला. अर्थातच मला त्यात फारशी गती नसल्यामुळे मी तो अर्धवटच सोडला, पण सांगायचा मुद्दा असा की केवळ भारतात उपयोजित कलेचं शिक्षण घेतलेलं असताना, अमेरिकन विद्यापीठाचा इंजिनीअरिंगचा कोर्स मी सुरू करू शकलो. कोर्ससाठी नाव नोंदवताना ना कुणी आडकाठी केली, ना टोफेल-बिफेल परीक्षा उत्तीर्ण होण्याची सक्ती केली. इंटरनेटमुळे ज्ञानाची दारं अधिक खुली झाली आहेत. स्थळकाळवय यांच्या मर्यादा झुगारून कुणालाही कुठलंही शिक्षण घेणं आज शक्य झालं आहे.

थॉमस फ्रीडमनने उल्लेखलेलं फ्लॅट – समतोल  जग आज खऱ्या अर्थाने आकाराला आलं आहे. त्या जगात वावरायचं तर आपल्या भावी पिढीला तंत्रज्ञानप्रेमी किंवा तंत्रज्ञानगामी होणं आवश्यक आहे. स्क्रीन टाइम वाढला म्हणून कुरकुर करणाऱ्या पालकांनी मुलांचा ‘ड्रीम’ टाइम वाढतोय की नाही, त्यांना वैश्विकीकरणाची स्वप्नं पडतात की नाही, याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे.