|| वेदवती चिपळूणकर

त्याच्या नावाप्रमाणेच त्याच्यामध्ये अपरिमित उत्साह आहे, प्रचंड सकारात्मकता आहे आणि अभेद्य असा खंबीरपणा आहे. भरभरून जगणं कशाला म्हणतात ते कोणीही त्याच्याकडे बघून शिकावं! त्याची त्याच्या कामावर असलेली निष्ठा आणि पॅशन त्याला कधी स्वस्थ बसूच देत नाही. विल्सन डिसीजसारखा शरीराला स्थिर राहू न देणारा गंभीर आजारही त्याला पाय भक्कम रोवून उभं राहण्यापासून रोखू शकला नाही. फोटोग्राफीचं कोणत्याही पद्धतीचं फॉर्मल शिक्षण न घेता त्याने स्वत:च धडपड करत, स्वत:हून शिकत, रत्नागिरी ते पुणे अशी मजल मारली आहे. पुण्यात एकटा राहून दिवसाचे सोळा तास काम करणारा अवघ्या चोवीस-पंचवीस वर्षांचा, मराठी सेलेब्रिटींचा लाडका फोटोग्राफर अक्षय परांजपे.

beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

शैक्षणिक वर्षांबद्दल बोलताना अक्षय मोठय़ा उत्साहाने सांगतो, ‘तीन वर्षांचा असताना ताप येऊन कानाच्या शिरांवर परिणाम झाला आणि ऐकू येणं बंद झालं. मग मी लिप-रीडिंग शिकलो. पहिली ते चौथी कानाला मशीन न लावता मी शिकलो. त्या काळात शिक्षकांनी मला खूप सांभाळून घेतलं आणि मदतही केली. पाचवीपासून कानाला मशीन लावली. दहावीच्या सहामाहीपर्यंत सगळं मस्त चाललं होतं. सहामाहीनंतर मी आजारी पडलो ते थेट चार वर्ष बेडवर काढली. मला थोडय़ाफार मूव्हमेंट्स करता यायला लागल्यानंतर मात्र दहावीची परीक्षा द्यायचा माझा हट्ट होता. भविष्याची खात्री कोणी दिलीये, असं माझं मत होतं आणि म्हणून मी बाबांकडे हट्ट धरला. दिली तर आत्ताच दहावी देणार, नाहीतर पुन्हा कधीच परीक्षेला बसणार नाही.’ अक्षयचा हा हट्ट बाबांनीही पुरवला आणि त्यासाठी त्याने जीवतोड मेहनतही केली. २०१४ साली त्याने दहावीची परीक्षा दिली. ‘शाळेत असताना सहामाहीला ९६ टक्के होते आणि फायनलला मात्र ६७ टक्के मिळाले. दहावीच्या परीक्षेत माझे पेपरही खूप मेहनत घेऊन परीक्षकांना तपासावे लागले. बारावी मी माझ्याच शाळेतून पण बाहेरून दिली. शाळेत मला लेक्चरला येऊन बसायची पूर्ण परवानगी होती आणि माझ्यासाठी स्वतंत्र टेबल-खुर्चीची खास व्यवस्था केलेली होती. या काळात मला शिक्षकांनी प्रचंड सपोर्ट केला आणि मदतही केली,’ असं अक्षय सांगतो.

अक्षयने कॅमेरा पहिल्यांदा हातात घेतला तेव्हा त्याला कोणतंही ट्रेनिंग किंवा शिक्षण नव्हतं. स्वत: प्रयत्न करत त्याने कॅमेऱ्यावर हात बसवला. फोटोग्राफीच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल अक्षय म्हणाला, ‘मी कॅमेरा का हातात घेतला हे मला माहिती नाही. फोटोग्राफीच का निवडली याला काही लॉजिक नाही, कारण नाही, प्रेरणा नाही. पण मी कॅमेरा मागितला आणि मला आजोबांनी आणून दिला, अगदी कोणताही प्रश्न न विचारता की कोणतीही शंका न घेता! माझ्या हातात कॅमेरा कोण देणार असं मला वाटलं होतं, पण आजोबांनी माझा समज चुकीचा ठरवला. स्वत:च्या प्रयत्नांनी मी फोटोग्राफी शिकत गेलो, हात स्थिर ठेवत गेलो. कॉलेजमधल्या इव्हेंट्सचे फोटो काढायला सुरुवात केली.’ अक्षयचे कॉलेजमधले मित्र त्याच्या या संपूर्ण प्रवासात त्याच्यासोबत होते. त्याला खचू न देण्यापासून ते हौसेने त्याला फोटोग्राफीच्या सुरुवातीच्या संधी मिळवून देण्यापर्यंत मित्रांनी त्याला सर्वतोपरी साथ दिली.

फोटोग्राफी हे प्रोफेशन म्हणून करायचं हा निर्णय वाटतो तितका अक्षयसाठी सोपा नव्हता. अनिश्चिततेची टांगती तलवार कायमच या क्षेत्रावर असते. आज काम आहे याचा अर्थ उद्या असेलच अशी खात्री देता येत नाही. त्यामुळे हे पूर्णवेळ प्रोफेशन म्हणून निवडताना शिक्षणही घेत राहायचं हा विचार करून अक्षयने केवळ बारावीवर अभ्यास थांबवला नाही. सध्या तो पुण्यात एम.आय.टी.मधून फोटोग्राफीमध्ये डिप्लोमा करतो आहे आणि सोबतच इतिहास विषयात ग्रॅज्युएशनही करतो आहे. प्रसंगी दिवसाचे सोळा तास काम करून तो अभ्यास सांभाळतो आहे.

फोटोग्राफी करायचा निर्णय एकदा पक्का झाल्यानंतर मात्र अक्षयने फोटोग्राफी करत राहण्याचा ध्यास घेतला. कामं शोधून, मेहनत करून स्वत:ला सिद्ध करण्याची त्याची धडपड हळूहळू फलद्रूप व्हायला लागली. पुण्यात आल्यावर दोन चित्रपटांच्या स्टील फोटोग्राफीचं काम त्याने समर्थपणे पेललं आणि त्याच्या करिअरच्या वाटा विस्तृत झाल्या. ‘बाय बाय बायको’, ‘हॅम्लेट’, ‘आमच्या हिचं प्रकरण’, ‘अमर फोटो स्टुडिओ’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ अशा सुमारे १२ नाटकांचे फोटो अक्षयने प्रयोगादरम्यान काढले आहेत आणि ते सोशल मीडिया पब्लिसिटीसाठी वापरण्यात आले आहेत. ‘माझं पुण्यात यायचं निश्चित झाल्यावर घरच्या सगळ्यांनीच मला प्रचंड सपोर्ट केला,’ असं अक्षय म्हणतो, ‘कुठेही एकटं राहणं वाटतं तितकं सोपं नाही. आपलं मूल सामान्य मुलांसारखं नाही हे लक्षात आल्यावरही त्यांनी मला कधीही एकटं पडू दिलं नाही, माझा आत्मविश्वास कमी होऊ  दिला नाही किंवा मला कधीच कमी लेखलं नाही. हा काय मोठं करणार आहे आयुष्यात असा विचारही त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. पुण्याला मला एकटं ठेवणं त्यांनाही कठीणच जाणार होतं, मात्र तसं कधी त्यांनी मला जाणवू दिलं नाही की बोलून दाखवलं नाही. उलट माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझे आई-बाबा, आजी-आजोबा, बहीण या सगळ्यांमुळेच मी स्वत:साठी काहीतरी करू शकतोय. कोणताही निर्णय घेताना घरच्यांचा पाठिंबा ही गोष्ट फार मोलाची ठरते’, असं अक्षय आग्रहपूर्वक सांगतो.

अक्षय पुण्यात एकटा राहतो, स्वयंपाक करतो, घर सांभाळतो, फोटोग्राफी करतो आणि अभ्यासही करतो. मराठी सेलेब्रिटींच्या गळ्यातला ताईत असणाऱ्या अक्षयला कोणतंच आव्हान कधीच रोखू शकलेलं नाही. स्वत:च्या निर्णयाबद्दल ‘मन में है विश्वास’ ही भावना असली की अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीही घडवून आणता येतात हे अक्षयने स्वत:च्याच उदाहरणातून सिद्ध केलं आहे.

viva@expressindia.com

मला माझ्या आयुष्यात कोणापुढे हात पसरायला लागू नयेत एवढं माझं साधं उद्दिष्ट आहे. माझ्या आवडीच्या क्षेत्रात माझी मेहनत घ्यायची तयारी असेल तर ते उद्दिष्ट साध्य करता येऊ शकतंच, मात्र कामात कुठलीही तडजोड नको.